‘या प्रत्येक लहानग्याचा गळा चिरण्यात आलाय. गळ्यावरचे हे घाव बघा. अत्यंत सफाईदारपणे एकाच घावात जीव घेण्यात आला आहे. इतकी सफाई फक्त एका डॉक्टरकडेच असू शकते आणि अशा प्रकारची हत्यारे देखील डॉक्टरच वापरतात.’ डिकास्टाने आपल्या बुद्धिमत्तेवर योग्य दिशा तर शोधली होती, पण आता मुंबईतल्या हजारो लाखो डॉक्टरमध्ये हवा असलेला खुनी सापडायचा कसा?
– – –
‘भोसले तुला वेड लागलंय का? हे असे करणे कसे शक्य आहे?’ कमिशनर साहेब तावातावाने ओरडले.
‘शक्य आहे सर! तुम्ही मनात आणले तर हे सहजशक्य आहे. जगभरात नावाजलेली अनेक देशातील पोलिस दले ह्या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. अगदी अमेरिकेचे उदाहरण घ्या.. तिथे तर कायदेशीर मार्गाने असे करता येते.’
‘ही अमेरिका नाही भोसले आणि मला स्वत:ला देखील हा मार्ग फारसा पटत नाहीये!’
‘तुम्हाला, मला किंवा कायद्याला काय पटते; ते आता ह्या क्षणी महत्त्वाचे नाहीये सर. कोवळ्या जीवांच्या आयुष्याचा सवाल आहे. आज मुंबईतील प्रत्येक कोवळ्या जीवाचे आई बाप हादरून गेलेले आहेत. अवघ्या तेरा दिवसात सात कोवळ्या जीवांची हत्या करण्यात आली आहे आणि ती देखील अत्यंत विकृतपणे. आपल्याकडे सारासार विचार करायला वेळ कुठे उरलाय सर?’
‘इंद्रजीत अरे पण एका सैतानाला जेरबंद करण्यासाठी दुसर्या सैतानाला मोकळे करायचे? डोकं फिरलंय का तुझं?’
‘नाही.. माझे डोके योग्य मार्ग सुचवते आहे. तुम्हाला देखील तो पटतो आहे पण तुम्ही कायद्याची चौकट मोडायला कचरता आहात.’ कमिशनर साहेबांच्या डोळ्यात डोळे घालत इन्स्पेक्टर इंद्रजीत भोसले ठामपणे म्हणाला आणि कमिशनर साहेबांनी त्याची नजर चुकवली.
‘मला थोडा वेळ दे इंद्रजीत. मला ’वरती’ बोलावे लागेल.’
‘नुसते बोलू नका सर. वाटले तर मला सोबत घ्या, पण ही परवानगी मिळवाच.’
इंद्रजीतचा मार्ग अनोखा असला, तरी सध्या मुंबईतील जे काही वातावरण बनले होते, ते बघता ह्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग कमिशनर साहेबांना देखील सुचत नव्हता हे ही खरे. कुठलाही पुरावा मागे न सोडता हे सात खून करण्यात आले होते. खरे तर पुरावा सोडला नव्हता असे म्हणणे योग्य होणार नाही; कारण प्रत्येक मृतदेहापाशी पोलिसांना अंकलिपीचे अर्धे अर्धे फाटके पान मिळाले होते. जणू ’काढा ह्या पानाचा माग आणि पकडून दाखवा मला’ असे आव्हान ह्या ’सीरियल किलर’ने पोलिसांना दिले होते. पोलिसांनी तपासाचा एकही मार्ग सोडला नव्हता. वेळेला कायद्याची फिकीर देखील न करता संशयितांना उचलले, मार मार मारले देखील पण तपासाची प्रगती एक पाऊल देखील पुढे सरकत नव्हती. दुसरीकडे या विकृत खुन्याचे काम मात्र अगदी बेमालूमपणे चालू होते. मृत्युमुखी पडत असलेल्या कोवळ्या जीवांची संख्या वाढत होती. शेवटी त्यांनी निर्णय घेतला आणि मंत्रीसाहेबांच्या भेटीची तातडीची वेळ मागून घेतली.
‘बसा वर्मा साहेब…’ मंत्र्यांचा पी.ए. अदबीने म्हणाला.
‘नमस्कार साहेब, हे इन्स्पेक्टर इंद्रजीत सावंत ’सात खून’ केस हेच हाताळत आहेत.’
‘वर्मा साहेब, अहो काय चाललंय का मुंबईत? जनता आणि मीडियावाले पार सालटी सोलत आहेत आमची. दोन दिवसांपूर्वी तुम्ही मला आश्वस्त केले होते. पण अजून साधा एक संशयित देखील तुम्हाला सापडलेला नाही किंवा खुनांमागचे कारण शोधता आलेले नाही.’ मंत्रीसाहेब चांगलेच चिडलेले होते.
‘त्याच संदर्भात आम्ही तुमच्याकडे आलो आहे सर..’
‘मी ऑलरेडी तुम्हाला ‘फ्री हँड’ दिला आहे वर्मा. आता मी तर काही तुमच्यासोबत उतरून तपासात मदत करू शकत नाही.’
वर्मांनी एकवार मंत्रीसाहेबांच्या ‘पी.ए.’ कडे पाहिले आणि योग्य तो इशारा समजून मंत्री साहेबांनी त्याला बाहेर पिटाळले.
‘सर, तपासात अजिबात प्रगती नाही असे नाही. हे खून करणारा इसम मनोविकृत आहे हे नक्की. पण तो अचानक असे खून का करू लागला आहे? त्या मागचे कारण काय आहे? आणि इतक्या सराईतपणे खून करून, कुठलाही पुरावा मागे न सोडता तो निसटतो कसा? असे अनेक प्रश्न सुटता सुटत नाही आहेत. आम्ही गस्त वाढवली आहे, प्रत्येक शाळेच्या बाहेर, क्रीडांगणाबाहेर आपली साध्या वेषातील माणसे घिरट्या घालत आहेत.
रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांना उचलून चौकशी करून झाली आहे. अगदी शहराच्या आजूबाजूचा परिसर देखील सोडलेला नाही.’
‘रिझल्ट कुठे आहे वर्मा?’ काहीशा वैतागाने मंत्रिमहोदय म्हणाले.
‘सर, हा गुन्हेगार नुसता विकृत नाही, तर हुशार देखील आहे. सर, जुन्या काळात आणि सध्याच्या वर्तमान काळात देखील बरेचदा जनावराची शिकार करायला कुत्री सोबत घेतली जातात. ही कुत्री शिकारीचा अचूक वास काढतात आणि तिला कोंडीत पकडायला देखील मदत करतात.’
‘तुमचा मुद्दा मला कळला नाही इन्स्पेक्टर भोसले…’
‘सर, ह्या केसमध्ये आम्ही पोलिस शिकारी आहोत आणि आम्हाला मदतीसाठी ह्या हिंस्र जनावराचा अचूक माग काढू शकेल अशा तितक्याच एका हिंस्र जनावराची गरज आहे!’
‘तुमचा इशारा कोणाकडे आहे भोसले?’
‘डिकास्टा..’ शांतपणे इंद्रजीत म्हणाला आणि मंत्री महोदय खुर्चीतून अर्धवट उठते झाले आणि पुन्हा धप्पकन खाली बसले. सगळ्यात आधी त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास गटागट रिकामा केला.
‘शुद्धीवर आहात का भोसले?’ मंत्री साहेब किंचाळले.
‘पूर्णपणे! विश्वास ठेवा सर. ह्या विकृत खुन्याला पकडण्यासाठी इतका योग्य माणूस सध्या तरी दुसरा कोणी नाही.’
‘भोसले… अठरा दिवसांवर फाशी आली आहे त्याची.’
‘मला कल्पना आहे सर. म्हणूनच त्याला पुणे जेलमध्ये हलवण्याच्या आधी आपल्याला आपला कार्यभाग साधायला हवा आहे.’ इंद्रजीत ठामपणे म्हणाला. मंत्र्यांनी कमिशनर साहेबांकडे नजर टाकली, मात्र ते टेबलावरच्या पेपरवेटकडे शांतपणे बघत बसले होते.
‘ह्यातून दुसरे काही विपरीत घडणार नाही ह्याची हमी देता?’ मंत्रीसाहेबांनी चाचरत विचारले आणि समोर बसलेल्या दोघांच्याही माना ठामपणे हालल्या.
—-
‘डिकास्टा.. तुझ्या सगळ्या पापांनंतर देखील येशूने तुला एक चांगली संधी दिली आहे. ही संधी सोडू नकोस. ह्या मदतीने तुझी पापे धुतली जाणार नाहीत, पण तुझ्या मनाला एक शांती नक्की मिळेल. प्लीज डिकास्टा.. तुला मी हात जोडून विनंती करतोय’ खरोखर डिकास्टा समोर हात जोडत इंद्रजीत म्हणाला.
‘कुत्र्यासमोर हात जोडायचे नसतात साहेब, त्याला वास देऊन फक्त शिकारीच्या मागावर सोडायचे असते.’ ओठ मुडपत कुच्छीतपणे डिकास्टा बोलला आणि इंद्रजीतला एका क्षणात डिकास्टा काय चीज आहे त्याचा अनुभव आला.
आजही नवीन ऑफिसर्सना डिकास्टाची केस ’स्पेशल स्टडी’ म्हणून दिली जाते. थोडे थोडके नाही, तर तब्बल एकोणतीस खून करणारा असा नराधम डिकास्टा. सर्वच्या सर्व एकोणतीस बळी हे डॉक्टरांचे. डिकास्टाच्या लहानग्या लेकीला उपचारासाठी दाखल करून घ्यायला एका डॉक्टरने नकार दिला आणि तो कोवळा जीव हॉस्पिटलच्या दारात तडफडून मेला. त्या दिवशी त्या कोवळ्या जीवासोबत ’हिम्मतचंद अँड सन्स’मध्ये कारकुनी करणारा डिकास्टा देखील मेला आणि जन्माला आला ’इंजेक्शन डिकास्टा’… एकोणतीस डॉक्टरांना इंजेक्शन मधून विष देऊन मारणारा ’इंजेक्शन डिकास्टा’. अटक झाल्यानंतर काही काळातच डिकास्टाच्या डोक्यावरचे भूत उतरले आणि आपण काय करून बसलो ह्याची जाणीव त्याला असह्य होऊ लागली. पहिला खून कदाचित आपण मानसिक वेडात केला देखील असेल, पण नंतर आपल्याला कुठे तरी ह्या खुनांची चटक लागली होती हे डिकास्टाला प्रकर्षाने जाणवले. आपल्या हातून नक्की हे का घडले ह्याचा शोध डिकास्टाने सुरू केला. डिकास्टाची केस तब्बल दोन वर्षे चालली. मात्र ह्या काळात डिकास्टाने जगभरातील प्रत्येक सीरियल किलरचा, विकृत गुन्हेगारांचा बारकाईने अभ्यास केला. देश विदेशातील डॉक्टरांचे प्रबंध वाचले. आज डिकास्टा स्वत: ह्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ बनला होता.
‘ह्या मदतीच्या मोबदल्यात डिकास्टा भूभूला काय मिळणार साहेब? हाडं ? का पावाचा तुकडा?’ डिकास्टाने पुन्हा तुच्छपणे विचारले.
‘त्याबद्दल मी काही आश्वासन देऊ शकत नाही. सॉरी!.’
डिकास्टाने काही क्षण शांतपणे डोळे बंद करून विचार केला आणि तो समोर ठेवलेल्या पुराव्यांकडे वळला. काही वेळ त्याने अंकलिपीची मिळालेली पाने बघण्यात घालवला. त्यानंतर तो प्रेतांचे फोटो पाहण्यात गुंग झाला. अचानक त्याने मान वर केली आणि आपले आग ओकणारे डोळे भोसलेच्या डोळ्याशी भिडवले.
‘मी तुम्हाला नक्की मदत करेन साहेब.. अगदी नक्की करेन. कारण हा विकृत खुनी एक डॉक्टर आहे!’ डोळे गरगरा फिरवत डिकास्टा म्हणाला आणि इंद्रजीत थक्कच झाला.
‘कशावरून तो डॉक्टर आहे डिकास्टा?’
‘या प्रत्येक लहानग्याचा गळा चिरण्यात आलाय. गळ्यावरचे हे घाव बघा. अत्यंत सफाईदारपणे एकाच घावात जीव घेण्यात आला आहे. इतकी सफाई फक्त एका डॉक्टरकडेच असू शकते आणि अशा प्रकारची हत्यारे देखील डॉक्टरच वापरतात.’ डिकास्टाने आपल्या बुद्धिमत्तेवर योग्य दिशा तर शोधली होती, पण आता मुंबईतल्या हजारो लाखो डॉक्टरमध्ये हवा असलेला खुनी सापडायचा कसा? पण निदान तपास वेगाने पुढे सरकत होता हे ही नसे थोडके.
—
‘बोल डिकास्टा.. कशासाठी बोलावले आहेस?’
‘साहेब, मला हत्या झालेली प्रत्येक जागा बघायची आहे. जागेचे फोटो नको, तर प्रत्यक्षात मला जागा बघायची आहे.’
‘हे अशक्य आहे डिकास्टा. त्याची परवानगी मिळणे शक्य नाही.’
‘काही जागा ह्या प्रत्यक्षात अनुभवायच्या असतात. त्यांचे फोटो आपले समाधान करू शकत नाही साहेब.’
‘मी प्रयत्न करतो. पण दिवसा उजेडी तुला असे उघडपणे कुठे नेणे अवघड आहे. तेव्हा शक्यतो रात्रीच तुला न्यायची व्यवस्था करण्यात येईल.’
प्रचंड धावपळ आणि कष्ट करून शेवटी इंद्रजीतने दोन तासाची परवानगी मिळाली आणि बुरखा घालून डिकास्टाला बाहेर काढण्यात आले. जिथे जिथे खून झाले किंवा प्रेत सापडले अशा जागांपैकी मोजक्या चार जागा डिकास्टाला दाखवण्यात आल्या.
‘डिकास्टा आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्या घटनास्थळांची तपासणी केली आहे. आम्हाला काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.’
‘वास्तू बोलतात साहेब. जिथे जिथे अमानुष घटना घडतात, त्या वास्तू तर किंचाळत असतात. आपण फक्त मनाचे कान उघडे ठेवायची गरज असते.’ शांतपणे त्या खोलीचे निरीक्षण करत डिकास्टा बोलला.
‘ह्या खुनामागे कारण तरी काय असावे? असा लहान मुलांचा जीव घेऊन एखाद्याला काय समाधान मिळत असेल.’
‘अशा विकृती बर्याचदा आनुवंशिक असतात साहेब. किंवा मग अचानक आयुष्यात घडलेली एखादी भयानक घटना तुमचे आयुष्यच बदलून टाकते. जगाकडे बघण्याची तुमची नजर बदलते, सारासार विचार शक्ती नष्ट होते. मला एक सांगा, ह्या सात मुलांचा किंवा त्यांच्या पालकांचा एकमेकांशी काही संबंध आढळला?’
‘काहीच नाही. आम्ही सगळ्या बाजू तपासून पाहिल्या, पण असे काही आढळले नाही.’
‘एक कुठलातरी धागा समान आहे, जो ह्या मुलांना एकमेकांशी जोडतो. एक धागा.. कदाचित त्या अंकलिपीचा? साहेब, ह्या मुलांच्या पालकांना विचारा, की ही मुलं अभ्यासात कशी होती? विशेषत: अंकलिपीबद्दल..’
—
‘डिकास्टा… ‘ उत्साहाने ओरडत इंद्रजीत त्याच्या सेलमध्ये शिरला आणि डिकास्टा सावरून बसला. ‘डिकास्टा तुझा अंदाज खरा ठरला. खून झालेली सातही मुले अभ्यासात थोडी मागे पडलेली होती. त्यांना सलगपणे अंक वाचणे किंवा अ ब क ड देखील पाठ करणे अवघड जात होते. ह्यातील तीन मुलांच्या पालकांनी ह्याविषयी ’अगस्ती हॉस्पिटल’शी कन्सल्ट केला होता, तर तिघांच्या पालकांनी ’नेहरू हॉस्पीटलशी.’
‘ह्याचा अर्थ, आपला जो खुनी डॉक्टर आहे, तो एकतर ह्या दोन हॉस्पिटलपैकी एकात जॉब करतो किंवा तो अशा ठिकाणी काम करतो, जिथून त्याला ह्या दोन्ही हॉस्पिटलच्या पेशंटची माहिती सहजपणे मिळवता येते.’
‘मला देखील हिच शक्यता वाटते.’
‘साहेब एक काम करा. ह्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या किंवा हॉस्पिटलला व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून काम करणार्या सर्व डॉक्टर्सची माहिती मिळवा. ह्यापैकी कोणाच्या आयुष्यात नुकतीच एखादी अप्रिय घटना घडली होती का? किंवा एखाद्या डॉक्टरसोबत काही विचित्र घटना घडली आहे का? किंवा एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात अचानक काही फरक पडला आहे का? विशेषत: या डॉक्टर्सपैकी ज्यांना लहान मुलं आहेत किंवा ज्यांनी आपल्या लहान मुलाला गमावले आहे अशा डॉक्टर्सची माहिती काढा.’
संपूर्ण तपासयंत्रणा आता कामाला लागली होती. लहानात लहान घटना अभ्यासली जात होती, शंका आली तर डॉक्टर कोणत्या पदावर आहे, त्याची प्रतिष्ठा काय आहे ह्याची देखील फिकीर न करता तासंतास त्याची चौकशी करण्यात येत होती. एका बाजूला मीडिया आणि दुसरीकडे वरिष्ठ अशा कात्रीत असून देखील पोलिस अत्यंत चोखपणे आपले कर्तव्य बजावत होते. मात्र ह्या प्रचंड मेहनतीला फळ काही मिळण्याची चिन्हे नव्हती. जवळपास प्रत्येक डॉक्टरचा तपास करून झाला होता; मात्र अगदी एक लहानसा धागा देखील हाताला लागत नव्हता.
‘बोल डिकास्टा…’
‘साहेब, ह्या प्रकरणाचा मी सखोल अभ्यास करतो आहे. पण आजवर जे काही माझ्यासमोर आले आहे, किंवा जी माहिती मला देण्यात आली आहे, त्यावरून तर मी अशा निष्कर्षापर्यंत आलो आहे की, ह्या खुनी इसमाला अभ्यासात गती नसलेल्या, विशेषत: पाढे, मुळाक्षरे देखील पटकन न उमगणार्या मुलांविषयी प्रचंड राग आहे. त्याच्या दृष्टीने अशी मुले जगण्यास लायक नाहीत. ती जगावर, समजावर ओझे आहेत. आणि ह्याच विकृत विचारातून तो त्यांना एकेक करत त्यांना जगातून नाहीसा करत आहे.’
‘पण त्याला शोधायचे कसे?’
‘ही खून झालेली मुले पाहिलीत, तर ती अत्यंत सामान्यवर्गातील आहेत. अशा आजारावरील उपचारांचा खर्च शक्यतो न परवडणारी आहेत. ही मुलं खुन्याच्या दृष्टीने त्यांच्या पालकांवर भार आहेत, एक ओझे आहेत. हा खुनी देखील अशाच एखाद्या प्रसंगातून गेलेला असावा. कदाचित त्याच्या लहानपणी तो अशा गतीमंदत्वाच्या आजाराने ग्रासलेला असावा. शक्यता अनेक आहेत साहेब, पण कुलुपाची योग्य किल्ली मिळणे आवश्यक आहे.’
—
‘डॉ. तपस्वी, तुमचा महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या सात खुनांपैकी खून झालेल्या तीन मुलांवर तुम्ही उपचार करत होतात किंवा त्यांना तुम्हाला दाखवायला आणण्यात आले होते.’
‘राइट! त्यातील एका मुलावर व्यवस्थित उपचार सुरू झाले होते. मात्र इतर दोघांच्या पालकांनी त्यांना अचानक आणणे बंद केले. कदाचित उपचारांचा खर्च हा मुद्दा असू शकतो.’
‘ह्या तीन मुलांविषयी किंवा त्यांच्या पालकांविषयी काही विचित्र घटना किंवा एखादा संवाद असे काही घडल्याचे आठवतंय?’
‘नाही साहेब. लक्षात राहील असे काही घडलेले नाही.’
तपस्वींचा निरोप घेऊन इंद्रजीत बाहेर पडला आणि जाता जाता अचानक थबकला. केबिनच्या बाहेर पेशंटची बसायची व्यवस्था करण्यात आली होती. पेशंट अर्थात लहान मुले असल्याने तिथे काही लहान मुलांची मासिके देखील ठेवलेली होती. त्यातल्या एका पुस्तकाने इंद्रजीतचे पाय जागीच रोखले होते. ते पुस्तक अंकलिपीचे होते.
‘सॉरी, मी पुन्हा येऊन त्रास देतोय. पण तुमच्या केबिनच्या बाहेर टीपॉयवरती मला हे पुस्तक दिसले.. अंकलिपीचे.’
‘ओह! गेल्या महिन्यात ’चिल्ड्रन्स डे’ला एका जोडप्याने अशा शंभर कॉपी दिल्या होत्या आमच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये वाटायला. बहुतेक त्यातलीच ही एक कॉपी आहे.’
‘बाकी सगळ्या कॉपी संपल्या?’
‘कल्पना नाही. स्टोअर रूममध्ये तुम्हाला जास्ती माहिती मिळेल.’ डॉक्टरचे वाक्य संपले आणि इंद्रजीत स्टोअर रूमची पाटी शोधायला लागला.
‘ह्या पुस्तकाच्या सगळ्या कॉपी वाटल्या गेल्यात?’ स्टोअर मॅनेजरला पोलिसी खाक्यात इंद्रजीतने विचारले.
‘सगळ्या तर नाही संपल्या साहेब. येवढे पेशंट कुठे होते? असतील इथेच.. थांबा…’ बर्याच वेळ शोधूनही उरलेल्या कॉपी काही त्याला सापडेना पण इकडे इंद्रजीतच्या चेहर्यावर मात्र गूढ हास्य तरळत होते.
‘सर आपल्याला हवा असलेला गुन्हेगार ’नेहरू हॉस्पिटल’मध्ये आहे हे नक्की. पण तिथल्या एव्ाâूण एक डॉक्टरांची चौकशी झाली, गुप्तपणे त्यांची माहिती काढून झाली पण हाताला काही लागले नाही.’
‘इंद्रजीत अरे डिकास्टाचे म्हणणे आपण वेगळ्या अर्थाने तर घेत नाहीये ना?’
‘म्हणजे सर?’
‘डिकास्टाच्या अभ्यासानुसार बळी गेलेल्यांच्या गळ्यावर झालेले वार हे एखाद्या सराईत डॉक्टरने केलेले असावेत. आपण डॉक्टर शोधायला जंग जंग पछाडत आहोत; पण तो समजा एखादा वॉर्डबॉय किंवा नर्स असेल तर?’ कमिशनर साहेबांनी आपली शंका बोलून दाखवली आणि इंद्रजीतचे डोळे लकाकले.
ताबडतोब पोलिस कर्मचारी आणि खबर्यांना कामाला लावण्यात आले. अखेर पोलिसांना यश मिळाले आणि वॉर्डबॉय रतनवर संशयाचे चक्र स्थिरावले. त्याचे कॉल रेकॉर्ड्स, मोबाइल लोकेशन पोलिसांनी मिळवले, त्याच्या घराच्या झडतीत अंकलिपीची पुस्तके देखील मिळाली. रतनच्या मोबाइल लोकेशनवरून खुनाच्या प्रत्येक ठिकाणी तो हजर होता ह्याचे पुरावे पोलिसांच्या हाताला लागले. सर्व भक्कम पुरावे हाताला लागताच पोलिसांनी रतनला उचलले. मानसोपचार तज्ज्ञ आणि डिकास्टा अशा दुहेरी पडताळणीमधून रतन हळूहळू पोलिसांसमोर स्पष्ट होऊ लागला.
रतन पहिल्यापासून अभ्यासात सुमार. त्यात त्याची स्मरणशक्ती बेताची. घरी दारी होणारी टिंगल, सततचे अपमान सहन करत, कसातरी थोडाफार शिकत, तो एका डॉक्टरकडे कामाला लागला. झाडू, कचरा उचलणे अशी सुरुवात करत मग कंपाउंडर, छोट्या मोठ्या स्टिचेस, प्लॅस्टरमध्ये डॉक्टरांना मदत कर अशा कामापर्यंत देखील पोहोचला. पण तिथे देखील त्याची गती कमी पडत होती आणि मग एक दिवस डॉक्टरने सरळ त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. बस.. तो क्षण रतनला पुन्हा त्याच्या बालपणीच्या भयानक जगात घेऊन गेला आणि त्याचा मानसिक तोल ढासळला. पुढे जो काही अनर्थ त्याने घडवला त्याचा आजही मानसोपचार घेणार्या रतनला पत्ता देखील नाही…