अमेरिकन अध्यक्षांवर महाभियोग चालवणे ही ऐतिहासिक घटना ठरली. या ‘लेविन्स्की स्कॅन्डल’मुळे अमेरिकन न्यायव्यवस्था, उच्च-नीच हा भेद न करता सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे कार्य करते हे सिद्ध झाले. प्रसिद्ध वकील केन स्टार यांनी जी भूमिका बजावली त्याच्यावर हे व्यंगचित्र आधारलेले आहे. बिल क्लिंटन हे अध्यक्ष असूनही ‘लेविन्स्की स्कँडल’मुळे त्यांची कशी दयनीय अवस्था झाली हे दाखवण्याचा प्रयत्न यात केला आहे.
– – –
ज्या ज्या प्रदेशात जे जे ऋतुचक्र अव्याहतपणे सुरू आहे, ते नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही राहिले तर जगाचे रहाटगाडगेही त्याच प्रवाहात मनसोक्त डुंबण्याचा खेळ अविरत खेळत राहील. परंतु ऋतुचक्राने क्रम बदलला तर बर्फाच्या ठिकाणी वाळवंट वा वाळवंटात दुथडी भरून नद्या वाहू लागतील, हाहाकार माजेल… तोच प्रकार माणसांच्या जीवनात षड्रिपूंचा आहे. असं म्हटलं जातं की जो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर विजय मिळवतो तो आयुष्यात यशस्वी होतो. सहापैकी एकानेही माणसाला ऑक्टोपससारखी करकचून मिठी मारली तर ती व्यक्ती, परिवार, समाज, कधीकधी देश वा जगाचीही शिकार होते.
षड्रिपू नसतील तर जग लोळ्यागोळ्यासारखे, थांबलेले, स्तब्ध, अर्थहीन भासेल. त्यांचे मर्यादित असणे महत्त्वाचे. ‘काम’ ही भावनाच नसेल तर उत्पत्ती थांबेल. निसर्ग थांबेल… क्रोध नसेल तर वाह्यात व्यक्ती अधिक वाह्यात बनेल, घर, समाजातील शिस्त बिघडेल… लोभ नसेल तर ऐहिक सुखाला तिलांजली द्यावी लागेल. मोह असल्यानेच उद्याच्या सुखाची आपण चिंता करतो. आज कमावले, आजच संपवले असे होत नाही. पुढे सुगीचे दिवस येण्यासाठी साठवणूक केली जाते. ‘मद’ आपल्या इभ्रतीचा, देशाचा वा संस्कृतीचा असलाच पाहिजे. तरच जे जे पूर्वसुरींनी करून ठेवले आहे त्याची जोपासणूक होईल. मत्सर असल्याशिवाय स्पर्धा होणार नाही. स्पर्धा नाही, प्रगती नाही… या सहाही भावनांचा अतिरेक न करता अंमलात आणल्या तर प्रत्येकजण ‘माझ्यासारखा मीच’ या संज्ञेस पात्र होईल. जगाच्या भूतकाळाची पाने उघडताना जागोजागी षड्रिपूंचा अतिरेक केल्याची उदाहरणे सापडतील. अतिशय हुशार, पट्टीचा योद्धा, शिवभक्त रावण त्याच्यावर ‘काम’देव आरूढ झाला आणि रामायण घडले. ज्यूंचा नायनाट करण्याच्या क्रोधी भावनेतून हिटलरने अनन्वित अत्याचार केले आणि रक्तलांछित महायुद्ध पेटले… युक्रेनच्या भूमीवर ‘नाटो’ने बस्तान मांडू नये, जेणेकरून रशियाला कोणताही धोका उत्पन्न होऊ नये, या लोभापायी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला… राणी पद्मावतीच्या लोभापायी दिल्लीचा शहेनशहा अल्लाउद्दीन खिलजीने केलेली चित्तोडगढची लढाई… मत्सरापोटी दुसर्यांचा भूभाग हडप करण्यासाठी सदोदित गरूडाच्या नजरेतून लक्ष ठेवणारा चीन… षड्रिपूंच्या अतिरेकाची अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
१९९८ साली अमेरिकेत विवाहबाह्य संबंधी प्रकरणाने संपूर्ण अमेरिकेसह जग ढवळून निघाले होते. जानेवारी ९८ साली ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन व व्हाइट हाऊसमधील एक कनिष्ठ कर्मचारी मोनिका लेविन्स्की यांच्यामध्ये अनैतिक लैंगिक संबंध आहेत अशी हेडलाइन छापून जगामध्ये खळबळ माजवली. बिल क्लिंटन यांनी ही घटना सपशेल नाकारली.
अन्नाची जशी भूक असते तशीच सेक्सचीही नैसर्गिक भूक असते. ती कोणीही टाळू शकत नाही. लग्न होऊनही स्त्री-पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्याला अनेक कारणे असू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये बळेबळेच संबंध निर्माण केले जातात. नेहमीच नजरानजर होत असल्याने लैंगिकतेकडे पाय कधी घसरतोय हे जाणवतही नाही. कनिष्ठ नेहमीच बॉसच्या अधिकाराखाली दबलेले असतात. काहीवेळा आमिष दाखवली जातात. एक प्रकारे उपकाराच्या भावनेचा मासोळी पकडण्यासाठी जाळे म्हणून उपयोग केला जातो.
कामावरील लैंगिक नाती कोणताही कायदेभंग करीत नाहीत. तरीही नात्यामध्ये बिघाड होतो त्यावेळी प्रत्येकाने जबाबदारी पेलली पाहिजे. ‘अंगवस्त्र’ ठेवण्याची फार प्राचीन पद्धत आहे. पत्नी सोडून दुसर्या बाईशी संबंध ठेवणे, अर्थातच हे ‘प्रकरण’ उघडे असून उघड न केल्यासारखे. एक प्रकारचे विवाहबाह्य संबंधच. पत्नीला माहीत असते. पण नवर्याची जरब एवढी असते की ती त्याला त्या स्त्रीबद्दल काहीही विचारू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांंचा मार. सरदार, पाटील, देशमुख किंवा गावातला वजनदार माणूस अंगवस्त्र ठेवायचे. आजही काही ठिकाणी ही प्रथा आढळते.
भारतीय राजकारणात वा समाजात अनेकजण विवाहबाह्य संबंध ठेवून आहेत. पण ‘राम’ असल्याचा देखावा करतात. बिल क्लिंटन यांचे प्रकरण जास्त सनसनाटी निर्माण करणारे. कारण ते एका जागतिक बलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष… आणि त्यांच्याकडून अशी वागणूक? जग अचंबित झाले. हे प्रकरण सुरू झाले आणि आराकान्स येथील माजी कर्मचारी पॉली जॉन्स हिने आपला लैंगिक छळ झाल्याचा खटला दाखल केला तेव्हा. क्लिंटन हे सर्व आरोप नाकारत होते. मोनिका लेविन्स्की हिनेसुद्धा क्लिंटन यांच्याविरोधात लैंगिक अत्याचारप्रकरणी तक्रार केली. क्लिंटन यांच्याशी सतत होणार्या भेटीगाठीमुळे लेविन्स्कीची बदली पेन्टॅगॉनला कमी हुद्द्याच्या जागेवर करण्यात आली. वर्षभरातच. तेथे तिची भेट व्हाइट हाऊसच्या माजी कर्मचारी लिंडा ट्रिप हिच्याशी झाली. त्यांची मैत्री फुलासारखी बहरली. मोनिकाने क्लिंटनबरोबर लैंगिक संबंधाच्या सर्व कहाण्या सांगायला सुरुवात केली. ट्रिपने तिला सल्ला दिला की तुला क्लिंटनने दिलेली बक्षीसे, ‘तो’ निळा ड्रेस जपून ठेव. जसजशी मोनिका मन मोकळे करू लागली, ट्रिप गुपचूप तिचे संभाषण रेकॉर्ड करू लागली. पॉली जॉन्सच्या खटल्यामध्ये मोनिका लेविन्स्की हिने बिल क्लिंटनशी माझे शारीरिक संबंध नव्हते, असे अॅफिडेव्हिट दिले तेही खोटेच होते.
जॉन्सची केस एक सुप्रसिद्ध वकील केन स्टार हे लढवत होते. लिंडा ट्रिप हिने गुपचूप केलेल्या रेकॉर्डिंगप्रमाणे मोनिका हिने क्लिंटन यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे कबूल केले होते. ती टेप ट्रिप हिने केन स्टार, जे बिल क्लिंटन-मोनिका प्रकरणाची चौकशी करत होते, त्यांना दिली. मोनिकाचा कबुलीजबाब मिळाला आणि स्टार यांना आकाश मुठीत गवसल्यासारखे झाले.
अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन इत्यादींमध्ये चर्चा, आरोप-प्रत्यारोप यांना ऊत आला. क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी यांनी डाव्या विचारांच्या शक्तींनी अध्यक्षांची प्रतिमा डागाळण्यासाठी रचलेला हा डाव आहे, असे जाहीर केले. खटला चालू असताना अनेक धक्कादायक प्रकार बाहेर आले. लेविन्स्की व क्लिंटन यांनी लैंगिक खेळ कसे खेळले याची माध्यमांमधून येणारी रसभरीत वर्णने वाचून लोक शरमिंदा झाले. त्यांना धक्का बसला. वकील केन स्टार याने सर्व पुरावे कोर्टासमोर आणले. एफबीआयने त्याची योग्य चिरफाड करून शेवटी क्लिंटन यांना मोनिकासोबत आपले लैंगिक संबंध होते हे कटुसत्य मान्य करावे लागले.
केन स्टार यांनी अतिशय चाणाक्षपणे साक्षी-पुरावे यांचा पुरेपूर वापर करून हे ‘प्रकरण’ जगासमोर उघडे केले. या प्रकरणाला ‘लेविन्स्की स्कॅन्डल’ असे म्हटले जाते. कोर्टामध्ये शपथेवर खोटे बोलणे, न्यायदानात अडथळे आणणे, सत्तेचा दुरुपयोग करणे, साक्षीपुराव्यात दबावतंत्राचा वापर करणे असे आरोप क्लिंटन यांच्यावर लावण्यात आले. हे सर्व आरोप त्यांच्यावर महाभियोग चालवण्यास पुरेसे ठरल्याने त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. अमेरिकन अध्यक्षांवर महाभियोग चालवणे ही ऐतिहासिक घटना ठरली. या ‘लेविन्स्की स्कॅन्डल’मुळे अमेरिकन न्यायव्यवस्था, उच्च-नीच हा भेद न करता सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे कार्य करते हे सिद्ध झाले.
केन स्टार यांनी जी भूमिका बजावली त्याच्यावर हे व्यंगचित्र आधारलेले आहे. क्लिंटन अध्यक्ष असूनही ‘लेविन्स्की स्कँडल’मुळे त्यांची कशी दयनीय अवस्था झाली हे दाखवण्याचा प्रयत्न यात केला आहे. सत्ताधीश, जगाचे सुकाणू ज्याच्या हाती त्याची एखाद्या भिकार्यापेक्षाही आजची कमी दर्जाची पत ज्या वकिलाने केली, त्या स्टार या नावाचा द्वयर्थ करून अमेरिकेचा राष्ट्रीय झेंडा आणि त्यावर असलेले स्टारचे चित्र वापरून स्टार यांनी क्लिंटनला कसे नागवे केले हे दाखवले आहे. त्यासाठी स्टार असलेला भाग कापून त्यामधून क्लिंटनची लज्जा जगासमोर मांडली आहे. क्लिंटन यांच्या नजरेतून असहाय्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय झेंडा कसा वापरावा या संदर्भात आपल्याकडे अनेक नियम आहेत. परंतु अमेरिकन झेंडा कसाही, कोणत्याही संदर्भात वापरला तरी चालतो. तो झेंडा कमोडमध्ये लावला तरीही चालतो. चपलांसाठी वापरला तरीही कोणीही त्याबद्दल तक्रार करणार नाही.
या व्यंगचित्रामध्ये चित्रांकनाची पद्धत मी थोडीशी बदललेली आहे. काळ्या रंगाची आऊटलाइन शिवाय चित्र वॉटर कलर्स व पेस्टल कलर्स वापरून गुळगुळीत पद्धतीने न रंगवता फटकार्यांचा उपयोग केला आहे. ८०च्या दशकापासून दोन दशकांच्या कालावधीत मी जी व्यंगचित्रे करीत असे त्यामध्ये मी अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करीत असे. जसे- पेन-इंक, पेस्टल कलर्स, ड्राय ब्रश, अॅक्रेलिक कलर्स, कलर पेन्सिल्स व चारकोल, ब्रश, क्रुकवेल, टेक्श्चर पेपर्स इत्यादी. ज्यामुळे व्यंगचित्र लक्ष वेधून घेईल आणि त्यानंतर त्यातील आशयाचा आनंद देईल. दुसरा हेतू असा की एकच प्रकारची स्टाइल वापरून रसिकांना रोज डाळ-भात न वाढता रोज वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद घ्यायला लावणे. म्हणजेच हे चित्र कोणी रेखाटले ही रसिकाची जिज्ञासा जागृत करणे व नंतर त्याने माझी सही पाहावी, हा हेतू असावा.
त्याकाळी मिड-डे, इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, बॉम्बे टाइम्स, ब्लिट्झ इत्यादीमधील माझी व्यंगचित्रे वेगवेगळ्या माध्यमातून चितारलेली असायची. मी इलेस्ट्रेटर म्हणून जाहिरात संस्थेत नोकरी करीत असल्याचा परिणामही असू शकेल, कारण जाहिरात संस्थेत इलेस्ट्रेटरला स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर अनेक माध्यमे, स्टाइल्स वापरता आल्या पाहिजेत.
प्राचीन संस्कृतीत नातीगोती काहीही नव्हते. दोनच वर्ग नर आणि मादी, कोण कोणाशी संग करतो याचा कोणी विचारही करीत नव्हता. हळूहळू बदल होत गेला. सामाजिक बंधने नीती-अनीती यांची मांडणी गेली गेली. नवरा-बायको, भाऊ-बहीण, मुलं अशी इतर नाती समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी निर्माण केली गेली. नात्यांवरही बंधने लावली गेली. लग्न ही संकल्पना मांडली गेली. परंतु आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचाराला खतपाणी घातले जात आहे. लग्न या संस्थेचा पायाही लटपटायला लागला आहे.
आजच्या जमान्यात लाखो स्त्री-पुरुष कामानिमित्त एकमेकांच्या सहवासात, खांद्याला खांदा लावून काम करताहेत. विवाहबाह्य संबंधाचे रोप लावण्यासाठी जमीन अगदी सुपीक आणि भुसभुशीत झाली आहे. आपल्या पूर्वसुरींनी समाज संतुलित राखण्यासाठी अलिखित नियम, नीती-अनीतीच्या मुशीतून तावून सुलाखून समाजाभिमुख केले. त्यांचे पालन करावयाचे की बिल क्लिंटन संस्कृतीला रांगोळीचा सडा घालून घरात प्रवेश द्यायचा हा विचार ‘ज्याने’ ‘तिने’ करावा.