कमरेखालचा विनोद आणि कमरेवरचा विनोद यात फरक काय? मुळात कंबरच का, डोक्याखालचा आणि डोक्यावरचा विनोद का नसतो?
– शिवराम गोंधळे, अकोला
या तुमच्या प्रश्नात तुम्हाला कुठलाही विनोद कळू शकत नाही हे कळते… त्यामुळे फार खोलात जाऊ नका.
आपला नवरा चांगला आहे, तो आपल्यावर खूप प्रेम करतो, असं वाटणारी एखादी बायको आहे का हो तुमच्या माहितीत? बायका कायम नवर्यांच्या तक्रारी का सांगत असतात? त्यांना नेमकं हवं तरी काय असतं?
– तात्या सोनावणे, नेहरूनगर
त्यांना सुखी आनंदी नवरा पाहवत नाही…
‘आनंद’ चित्रपटाचा रिमेक होतोय असं वाचलं. संधी मिळाल्यास तुम्हाला त्या रिमेकमध्ये तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडेल?
– शाल्मली वैद्य, पुणे
राजेश खन्ना
उत्खनन करून म्हणजे जमिनीत खोलवर भोक पाडून आरपार जाऊन पलीकडे अमेरिकेत बाहेर पडता येईल का? लहानपणी तशी समजूत होती म्हणून विचारले.
– मंगेश पाटील, कुर्ला
नाही… मध्ये लाव्हारस आहे…
नवराबायकोचे भांडण झाल्यावर बायको निदान माहेरी तरी जाऊ शकते. मग नवर्याने कुठे जावे?
– अशोक परशुराम परब, ठाणे
बारमध्ये
समोरच्या इमारतीतील एक तरुण मला नेहमी स्माईल देतो. मी त्याच्याकडे पाहून काहीच प्रतिक्रिया देत नाही. असा प्रसंग दिवसातून चार-पाच वेळा तरी येतो. मी काय करू?
– सोनाली जाधव, बीड
एकदा पटकन आईला उभी कर तुझ्या बाजूला.
बायकांचे स्थान चूल आणि मूल एवढेच आहे, असे मानणारे अनेक जण आज सार्वजनिक जीवनात मोठ्या पदांवर आहेत. तसं मानणारे खूप आहेत. बायकांचे स्थान कुठे आहे, असे तुम्हाला वाटते?
– प्रज्वला कांबळी, रत्नागिरी
तुम्ही कुठे समजता ते महत्वाचे… समाज कुठे का समजेना…
आयपीएल हे गंभीर क्रिकेट आहे की क्रिकेटची जत्रा आहे की सट्टेबाजांचा अड्डा आहे की फिक्सिंगची पंढरी?
– आदित्य जोशी, वडनेरा
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याच प्रश्नात आहेत.
शादी का लड्डू ऐसा- जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए… हा काय प्रकार आहे? लग्न करावं की करू नये?
– माधवी शहापूरकर, चौल
म्हण बरोबर आहे… हे कळण्यासाठी लग्न करावेच लागते.
आपल्यात अभिनयगुण आहेत, असं अनेक मुलांना वाटतं. आपल्या मुलांमध्ये हे गुण आहेत, असं अनेक पालकांना वाटतं. खरोखरच त्यांच्यात ते गुण आहेत की नाहीत, हे तपासायचे कसे?
– टोनी फर्नांडिस, नालासोपारा
अगदी बरोबर… पण हे ज्याचं त्यालाच कळावं लागतं… कुणी सांगूनही लोकांना पटत नाही…
माणूस माकडापासून उत्क्रांत झालाय, असं विज्ञान म्हणतं… पण, आसपासची परिस्थिती पाहता तो माकडापासून अपक्रांत झालाय, असं नाही वाटत?
– अंजली रत्नाकर, सोलापूर
माकडांची का बदनामी करताय?
बलात्काराचं वर्णन करताना पाशवी बलात्कार म्हटलं जातं, पण पशूंमध्ये ना बलात्कार होतो, ना खून, उगाच त्यांची बदनामी कशाला करायची?
– धनंजय पारखे, अहमदनगर
पाशवी हा शब्द बलात्कार या प्रक्रियेशी संबंधित आहे… म्हणजे पशू ज्याप्रमाणे त्यांच्या सावजाची शिकार करून जसे फाडून खातात तसा बलात्कार केला.
वैभवजीनु, तुमी कोकणातले म्हणून तुमका मालवणीत्सून प्रश्न इचारलो पण तुमी उत्तरच देऊक नाय! तुमका आवडुक नाय की काय?
– अनिल तोरणे, तळेगाव दाभाडे
रे झीला माजा प्रदेश कोकण हा… पण मी रत्नागिरी जिल्ह्यातलो असय रे… माजी भाषा मालवणी नाय हा… संगमेश्वरी असंय… कल्ला.. माय… या…