हे व्यंगचित्र आहे १९७२ सालातलं. म्हणजे ५० वर्षांपूर्वीचं. तेव्हा मुंबई महानगरपालिकेत डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले, तेव्हा त्या काळातल्या महाराष्ट्रद्रोही आणि मुंबईद्रोही मंडळींच्या पोटात दुखू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप होऊ लागला. तेव्हा संतप्त आणि व्यथित झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी महापालिकेवर हस्तक्षेपाचा रोड रोलर चालवला जातो आहे, असे हे व्यंगचित्र काढले आणि मराठी मुंबईकरांच्या मनात चाललेल्या खदखदीला मार्मिकच्या मुखपृष्ठावर वाट करून दिली. आज ५० वर्षांनी तेच व्यंगचित्र पुन्हा काढण्याची वेळ आली आहे… फक्त नव्या दिल्लीशहांनी रोड रोलरच्या जागी केंद्रीय तपास यंत्रणांचा बुलडोझर चालवायला घेतला आहे… मुंबई महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिल्लीला आपल्या डालग्याखाली हवी आहे… त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिसकावून घेतलेल्या शिवसेनेला आणि दमदार कामगिरी करणार्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची, जेरीला आणण्याची खेळी भाजपने चालवली आहे… एकीकडे विखारी प्रचार, समाजात आगी लावण्याचे धंदे आणि दुसरीकडे ईडी-सीबीआयचे फंदे अशा कचाट्यात शिवसेना सापडेल आणि ते पाहून मुंबईकर खूष होऊन आपल्याला मतं देतील, अशी यांची भाबडी समजूत आहे.