□ कटुता संपविण्याचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात – संजय राऊत
■ राऊत साहेब, त्यांनी सध्या शिवसेना, मग मराठी माणूस, मग महाराष्ट्र संपवण्याचा विडा घेतला आहे… कटुता त्यांनीच जन्माला घातली आहे… तेच संपवतील?
□ वसईत पर्यावरणाचा र्हास; तहसील प्रशासन कुंभकर्णी निद्रेत.
■ त्यांना झोपेच्या गोळ्यांचे खोके पुरवले जातात, ते तरी काय करतील!
□ बेस्टने ४०० बसेस बंद केल्याने प्रवासी चार लाखांनी घटले – बेस्ट कामगार नेते सुहास सामंत यांचा आरोप.
■ बेस्टची वाटचाल एसटीच्या मार्गाने झाली, तर ते वर्स्ट होईल मुंबईकरांसाठी… सावधान!
□ राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड पुन्हा लांबणीवर.
■ माजी भाज्यपालांनी महाविकास आघाडीला अपशकुन केला, तेव्हा जे दात काढत होते, त्यांच्या आता लक्षात आलं असेल की त्यासाठी त्यांनी भाजपचंच नाक कापून घेतलं होतं…
□ धारावी पुनर्विकासाच्या अदानींच्या कंत्राटाला राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाचा आक्षेप.
■ मालकांच्या मालकांवर आक्षेप? इनकी ये जुर्रत कैसे हुई?
□ आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात ओवैसींची तोफ धडाडणार.
■ जिथे जिथे भाजप-मिंधे युतीसाठी परिस्थिती अवघड होणार, तिथे ओवैसी अवतरणार… पण, आव्हाडांच्या मजबूत बालेकिल्ल्यात या तोफेच्या गोळ्यांनी पोरं टेनिस बॉल क्रिकेट खेळतील!
□ पुढील १५ वर्षे केंद्रात भाजपचेच सरकार – विनोद तावडे.
■ विनोद भाऊ, छान विनोद, आणखी एक सांगा विनोद.
□ राष्ट्रप्रेमाच्या भावना प्रबळ करा- राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन.
■ अरे हे बैस म्हणून बसले ना बसले तोच लगेचच उठले?
□ नऊ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पाळणा हलेना.
■ राक्षसविवाह आहे… वेळ लागणारच… त्यात गर्भपाताचीच शक्यता अधिक!
□ एलआयसी बुडण्याच्या मार्गावर.
■ जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असा प्रगाढ विश्वास भारतीयांनी एलआयसीवर ठेवला होता, ती बुडाली तर सरकारच्या बाकीच्या संस्थांवरही लोकांचा कणभर विश्वास राहणार नाही आणि सगळेच कारभार सरकारमित्र उद्योगपतींना खुले होतील… क्रोनॉलॉजी समझिये!
□ मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही- नसिरुद्दीन शहा.
■ कोणाला ना कोणाला खलनायक बनवल्याशिवाय काही लोक नायक कसे ठरणार, नसीर भाई!
□ दिल्लीत भाजप-आपच्या नगरसेवकांत तुंबळ हाणामारी.
■ आता एकदा संसदेतही हेच घडवा, म्हणजे भारतीय लोकशाहीचे आचके थांबतील आणि ती सुखाने डोळे मिटायला मोकळी होईल.
□ नाव आणि पक्षचिन्हाची लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची – अजितदादा पवार.
■ शिवसेना हे एका राजकीय पक्षाचं नाव आहे, ते निवडणूक आयोगासाठी… संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो अस्मितेचा एक ठसठशीत उद्गार आहे… हे आयोगाच्या मालकांना कळले असते तर त्यांनी हा उद्गार खोडून काढण्याचा आत्मघातकी प्रकार केलाच नसता!
□ कसबा पेठ-चिंचवडमध्ये भाजपने पोलीस बंदोबस्तात पैसे वाटले, मविआच्या उमेदवाराचा आरोप.
■ अरे, यांच्याकडून मतदारांना जास्तीत जास्त एवढेच मिळेल, गॅस, पेट्रोलच्या दरवाढीतून टाकलेल्या बोजाची परतफेड होऊ द्या जरा… अडवू नका… वाटू द्या… विजय आपलाच आहे!
□ एकत्र येऊ या, भाजपला हरवू या! – काँग्रेसने हात पुढे केला.
■ महाराष्ट्रात त्या हातावर घड्याळ आहे आणि हातात मशालही आहे… इथे लागलेल्या वाळवीची होळी पेटवण्याचा काळ जवळ येत चाललाय!
□ मिंधे सरकार चंद्रावर रॉकेट पाठवण्याचं श्रेयही घेईल : आदित्य ठाकरे यांचा सणसणीत टोला.
■ अहो, चंद्रावर पहिला माणूसही त्यांनीच पाठवला होता… जग त्याला नील आर्मस्ट्राँग म्हणून ओळखत असलं तरी नीलकांत भुजबळ हे त्याचं मूळ नाव… हवं तर निवडणूक आयोगाला विचारून पाहा…
□ कणेरी मठात ५० गायींचा मृत्यू.
■ मिंधे सरकारच्या काळात ही घटना घडली हे गायींचे दुर्दैव, मविआ सरकारच्या काळात घडली असती, तर सगळे बैल सरकारवर चालून गेले असते…
□ रशिया-युक्रेन संघर्षातून शांततामय तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ भारतात शेतकरी आंदोलन, सीएए एनआरसीविरोधी आंदोलन अशी आंदोलनं झाली तेव्हा विश्वगुरू मौनात होते बहुतेक!