महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शहात्तर वर्षांच्या आयुष्यात शेती, उद्योग, शिक्षण, प्रशासन, सामाजिक सुधारणा, साहित्य, कला आदी क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. त्यांचे दातृत्त्वही वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याचे पुनरावलोकन, पुनर्स्मरण आणि पुनर्मूल्यांकन करण्याचे काम गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सातत्याने केले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांची भाषणे, पत्रे, गौरवग्रंथ आदींचे बारा खंड प्रसिद्ध केले. आता याच समितीच्या वतीने तेरा खंडांतील पन्नास ग्रंथांचे प्रकाशन नाशिक येथे साहित्य संमेलनात होत आहे.
—-
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतावर बिटिशांचा अंमल सुरू झाला. तो शतकाच्या मध्यापर्यंत होता. या वसाहतकालीन भारतातील काही प्रदेशांवर थेट बिटिशांचा, तर काहींवर संस्थानिकांचा अंमल होता. संस्थानिकांच्या अधिकारांचा संकोच झाला होता. त्यांच्या शौर्याला, कर्तृत्त्वाला मर्यादा आल्या होत्या. या परवशतेच्या काळातही अनेक संस्थानिक आपापल्या जीवनात मश्गुल होते, तर काही मोजक्या संस्थानिकांनी आपल्या कार्य-कर्तृत्त्वाचा ठसा कालपटावर उमटविला. अशा कर्तृत्त्ववान संस्थानिकांमध्ये बडोद्याचे महाराजा श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) यांचा विशेषत्त्वाने उल्लेख करावा लागतो.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शहात्तर वर्षांच्या आयुष्यात शेती, उद्योग, शिक्षण, प्रशासन, सामाजिक सुधारणा, साहित्य, कला आदी क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. त्यांचे दातृत्त्वही वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याचे पुनरावलोकन, पुनर्स्मरण आणि पुनर्मूल्यांकन करण्याचे काम गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सातत्याने केले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांची भाषणे, पत्रे, गौरवग्रंथ आदींचे बारा खंड प्रसिद्ध केले. आता याच समितीच्या वतीने तेरा खंडांतील पन्नास ग्रंथांचे प्रकाशन नाशिक येथे होणार्या साहित्य संमेलनात होत आहे.
तेरावा खंड बहुभाषिक आहे. त्यामध्ये सयाजीराव महाराजांचा ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ हा इंग्लिश ग्रंथ आहे. तसेच या ग्रंथाचा राजारामशास्त्री भागवत यांनी ‘फ्रॉम कैसरकडून सुलतानाकडे’ असा मराठी अनुवाद केला, तोही या खंडामध्ये आहे. त्याचबरोबर सयाजीराव महाराजांनी ‘नोट्स ऑन दी फेमिन टूर बाय हिज हायनेस दी महाराजा गायकवार’ अशा इंग्लीशमध्ये नोंदी लिहिल्या. या नोंदींचा ग्रंथ आणि त्यांचा ‘दुष्काळी दौर्याच्या नोंदी’ असा मराठी, तर ‘अकाल यात्रा का अभिलेख’ असा हिंदीतील अनुवाद आहे. थोडक्यात, तेराव्या खंडामध्ये सयाजीराव महाराजांचे इंग्लिशमधील दोन ग्रंथ, या ग्रंथांचे दोन मराठी आणि एक हिंदी भाषेतील अनुवाद; अशा पाच ग्रंथांचा समावेश आहे. एकाच ग्रंथामध्ये मूळ ग्रंथ आणि त्यांचा अनुवाद वाचायला मिळणे ही दुर्मिळ बाब या खंडात प्रत्यक्ष आली आहे.
सयाजीराव महाराजांचा ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ ब्रिटिश इतिहासकार एडवर्ड गिबन यांच्या इतिहासग्रंथावर आहे. गिबन यांनी इ.स. १७७६ ते इ.स. १७८९ या कालावधीत सहा खंडांमध्ये ‘डिक्लीन अॅण्ड फॉल ऑफ दी रोमन एम्पायर’ हा बृहद इतिहास ग्रंथ लिहिला. हा इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात पाश्चात्य संस्कृतीचा इ.स. ९८ ते इ.स. १५९०पर्यंतचा इतिहास येतो. गिबन हे सयाजीराव महाराजांचे एक आवडते इतिहासकार होते. त्यांच्या वाचनात हा ग्रंथ आला. त्यानंतर महाराजांनी एकाहत्तर प्रकरणे आणि ३७० पृष्ठांचा ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ चिसविक प्रेस, लंडन यांनी इ.स.१८९६मध्ये प्रकाशित केला. महाराजांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. तो लिहिण्यापूर्वी त्यांनी रोमच्या इतिहासाचे विविध ग्रंथांतून वाचन केले, त्यांचा अभ्यास केला. विविध तथ्यांचे अवलोकन केले. त्यांच्या सर्व मेहनतीचा प्रत्यय प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी दिलेल्या मुद्यांतून येतो. महाराज लेखनात सनावळ्यांची अचूक नोंद करतात. इतिहासलेखनाची शिस्त आणि पथ्ये पाळतात. त्याचवेळी इतिहासाचा व्यापक कालपटही सांभाळतात. या ग्रंथाचा ‘कैसरकडून सुलतानाकडे’ असा अनुवाद केलेल्या ग्रंथामध्ये राजारामशास्त्री भागवत यांची ‘प्रस्तावना’, ‘मराठी दृष्टीने जगाचा इतिहासाची पाहणी’, ‘वाचणारास इशारत’ आणि ‘गिब्बनचे चरित्र’ असे स्वतंत्र लेख येतात. यातून ग्रंथाची पार्श्वभूमी स्पष्ट होते. तसेच इतिहासलेखन, अनुवादाविषयीची भागवतांची भूमिकाही समजते.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ हा मूळ ग्रंथ आणि त्याचा अनुवाद महत्त्वाचा आहे. या ग्रंथामध्ये महाराज साररूपाने कथन करतात. प्रत्येक कैसरने रोमचे राज्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला. ही सत्ता मोठी, अजिंक्य वाटत असली तरी इ.स. २४४च्या आसपास तिची पतनाकडे वाटचाल सुरू झाली होती. महाराज म्हणतात, ‘पहिली चारशे वर्षे ठेचा खाऊन खाऊन राज्य चालवण्याचे व लढण्याचे गुण रोम्यांनी आपल्या अंगी आणले होते व त्याच्या योगाने त्यांनी युरोप, आशिया व आप्रिâका या तीन खंडातील पुष्कळ प्रांत जिंकून त्यांच्यावर निरंकुश सत्ता चालवली होती. शेवटची तीनशे वर्षे जसी बाहेरच्या दिखाऊ थाटामाटात गेली. तरी आतून कीड लागली होती.’ हा अनुवाद वाचताना शब्द, वाक्ये, शैली बदलाची जाणीव होते. मात्र, इंग्लिश मजकूर वाचू न शकणार्यांसाठी हा अनुवाद म्हणजे एक मोठा अनुभव आहे. अनुवादात काही शंका आल्यास मूळ मजकूर पाहण्याची सोय याच खंडात आहे. भारताच्या वसाहत काळातील एका संस्थानिकाचे, एक राजाचे आंतरराष्ट्रीय इतिहासावरील पहिलेवहिले गंभीर लेखन कर्तृत्त्व निश्चितच नोंद घेण्यासारखे आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा दुसरा ग्रंथ दुष्काळातील नोंदींवर आहे. या नोंदी इ.स. १९०१मध्ये ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आल्या. बडोदा राज्यात इ.स. १८९८-१८९९मध्ये मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी महाराजांनी सर्व राज्याचा दौरा केला. दुष्काळाच्या नोंदींचा हा ग्रंथ अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराजांची एक कार्यशैली आहे. सर्वप्रथम ते दुष्काळामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्यांची दखल घेतात. त्यावेळी ते लहानसहान बाबींची नोंद घेतात. समस्यांवर तातडीने उपाययोजना करतात. याची अनेक उदाहरणे या नोंदीत सापडतात. उदाहरणार्थ, कडी प्रांतातील गरोदर स्त्रिया, त्यांची प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या सुविधा, शिशुसंगोपन, दवाखाने यासाठीच्या मदतीच्या नोंदीतून महाराजांची कार्यशैली समजते. या ग्रंथात महाराजांच्या दुष्काळाच्या पाहणीच्या, दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मदतीच्या विभागावार नोंदी येतात. महाराज या नोंदींचा भविष्यकालीन आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोग करतात. यातून ते स्वत:चा भविष्यकालीन आपत्ती निवारणाचा दिशादर्शक राजमार्ग तयार करतात.
एका राजाने केलेल्या या नोंदी तत्कालीन वास्तव पुढे आणतात. दुष्काळाची भयावहता, निसर्ग प्रकोप, माणसांची असहायता सांगतात. त्याचवेळी राज्यकर्त्याची संवेदनशीलता, मानवताही स्पष्ट करतात. या नोंदी सयाजीराव महाराजांचा कनवाळूपणा, त्यांची संवेदनशीलता, प्रजाहितदक्षता, कार्यकुशल प्रशासक आणि उत्तुंग दातृत्वाचा प्रत्यय देतात. तशाच उत्तम कार्यशैलीचा एक वस्तुपाठ उभा करतात. राज्यकर्त्याची इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते, याचा वस्तुपाठ देणार्या या नोंदी आजही दिशादर्शक आहेत. अशा या कालातीत, मूळ इंग्लिश ग्रंथाचा मराठी अनुवाद दिलीप चव्हाण यांनी तर हिंदी अनुवाद शांताराम डफळ यांनी केला आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर सुमारे वीस वर्षांनी ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि सुमारे तेवीस वर्षांनंतर दुष्काळाच्या नोंदी घेतल्या. एका राजाने ग्रंथलेखन करणे हे कार्य अपूर्व नसले, तरी ते निश्चितच अनोखे आहे. कारण महाराज दत्तक गेले तेव्हा अक्षरशत्रू होते. नंतर त्यांना शिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांचा व्यासंग सुरू झाला. या व्यासंगाचा दाखला म्हणजे प्रस्तुतचे दोन ग्रंथ होत! इतिहासलेखन हे कष्टसाध्य असते. त्यातही परकीयांचा इतिहास संदर्भासह समजून घेऊन नव्याने मांडणे, हे कठीण काम आहे. म्हणून महाराजांचे हे काम निव्वळ भाषांतरकार, अनुवादकाचे नाही; तर त्यापलीकडे जात ही एक स्वतंत्र निर्मिती ठरते.
असे म्हणतात, शेतकर्याजवळ पेरण्याचे, सेनापतीजवळ घेरण्याचे आणि राजाजवळ हेरण्याचे कौशल्य पाहिजे. ते नसले तर कार्यनाश हा निश्चित असतो. याचा प्रत्यय इतिहासाची पाने चाळताना नेहमी येत असतो. इतिहासातून व्यक्तींच्या, राजांच्या कार्य-कर्तृत्त्वाच्या कथा आणि व्यथा पुढे येतात. तशाच माणसांच्या अंगभूत गुणांच्या, बुद्धिमत्तेच्या, कला-कौशल्यांच्या आणि मर्यादांचाही प्रत्यय येत असतो. या सगळ्याचा प्रत्यय तेराव्या खंडात येतो. म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रज्ञा, संवेदनशीलता, कर्तृत्त्व आणि दातृत्त्वाचा प्रत्यय देणारा हा खंड वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.
खंड-१३ महाराजा सयाजीरावांचे लेखन
भाग- १ : कैसरकडून सुलतानाकडे (मराठी), किंमत – १२०/-
भाग- २ : ‘फ्रॉम सीझर टू सुल्तान’ (इंग्रजी), किंमत -१२०/-
भाग- ३ : दुष्काळी दौर्याच्या नोंदी (मराठी), किंमत ६०/-
भाग- ४ : अकाल यात्रा का अभिलेख (हिंदी), किंमत -६०/-
भाग- ५ : ‘नोट्स ऑन दी फेमिन टूर बाय हिज हायनेस दी महाराजा गायकवार’ (इंग्रजी) किंमत – ६०/-
प्रकाशक – सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, औरंगाबाद.