आपण सक्काळपासून राबराबराबून स्वयंपाक केला आणि आज पण वांग्याचीच भाजी असं कुणी न राहवून विचारलं किंवा चवकशी केली की आपल्याला कसला परम संताप येतो! काल भरली वांगी होती, परवा वांग्याचं भरीत होतं आणि आज वांगं-बटाटयाची शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट घातलेली भाजी आहे हे सांगताना आपला चेहरा जो आहे तो कसला ओबडधोबड होतो… मग अशा लोकांचं (ईडीच्या हापिसात जाणार्या) मनातल्या मनात भारी कौतुक वाटतं… की हे लोक कसे काय दीर्घ चौकशीला सामोरे जातात कोण जाणे…
—-
आजकाल राजकारण्यांना सगळ्यात जास्त भीती वाटते ती ईडीकाडीची… ईडीने अशी काडी मारली जाते की काडेपेटीला लोक आता ईडीपेटी म्हणतील, अशी भीती वाटायला लागलीय. ईडी म्हणजे पीडेचच दुसरं नाव आहे.
एकवेळ निवडणुकीत पडलं, डिपॉझिट जप्त झालं किंवा तिकीटच नाय भेटलं तरी चालेल; पण ईडी लागली तर आयुष्याचंच डिपॉझिट जप्त होण्याची भीती वाटायला लागली आहे. कोणी कोणी पटापट कुंपणावरून उड्या ठोकलेल्या आहेत… आणि उडी मारताना पाय मोडला असला तरी रात्रीची आम्हाला शांत झोप लागते असं जाहीर सभेत सांगून हशा आणि टाळ्या वसूल केलेल्या आहेत. (लाखो कोट्यवधी टाळ्या…)
आपण एवढं मरमर मरून, सगळ्या योजनांचा बारकाईने अभ्यास करून जास्तीत जास्त आपण किती खावू शकतो आणि आपल्या मर्जीतल्या माणसांवर कशी सढळ कृपा करू शकतो याचा तौलनिक अभ्यास करून (तप:श्चर्याच आहे ही एक प्रकारची) सुव्यवस्थितपणे सर्व पार पाडणे ही काय खायची गोष्ट नाही महाराज… (अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत हे मी नम्रपणे आणि सावधपणे सांगू इच्छिते.)
परत परत उत्पन्न व्हावं म्हणून ते काम निकृष्ट करण्याची जबाबदारी पण पार पाडावी लागते. ते कौशल्य वेगळंच. एकंदरीत मेंदूला सुरकुत्या पाडून अत्यंत कष्टपूर्वक जे मिळवलेलं आहे, त्या सर्वांवर पाणी कसं सोडणार, तुम्हीच सांगा. म्हणजे झेपत असेल तर सांगा…
बरं ही सगळी संपत्ती (हिला लक्ष्मी नाही म्हणवत) गेली तर पुढच्या पिढयांनी काय करायचं काय? सामान्य माणसासारखी नोकरी करायची की शेती करायची की एखादा धंदा-व्यवसाय करून प्रामाणिकपणे राबून तो नावारूपाला आणायचा? हे असलं शोभेल पुढच्या पिढ्यांना?
लोक काय म्हणतील, यांचे आजोबा राजकारणात मंत्रीपदावर होते आणि हा घाम गाळून स्वत:च्या हिंमतीवर कुटुंबाचं पोट भरतोय… चार लोकांत हसं नाही होणार?
तर सगळ्या बाजूंनी, सर्वंकष रीतीने आपण विचार केला तर ईडी लागणं मला सर्वथा चूक वाटतं..
पण मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं किंवा आश्चर्य वाटतं ते हे लोक चौकशीला दहा दहा तास सामोरे जातात तेव्हा…
कुठून येतं हे आत्मिक बळ? आम्हाला तर एकच प्रश्न दुसर्या दिवशी कोणी विचारला तरी वैताग येतो.
मी शाळेत होते, तेव्हा एक आजी रोज एकच प्रश्न विचारायची, ‘गो, आज काय जेवण केल्ला आईनं?’
सुरवातीला आठवून सांगायचे… पण नंतर आठ दिवसांनी माझी एक मैत्रीण म्हणाली, डाळभात, बटाट्याची भाजी… मग मी पण तेच उत्तर द्यायला लागले.
एका दिवशी तर कोणी काहीच न विचारता मी डाळभात, बटाट्याची भाजी असं ओरडून पुढे गेले होते. सांगायचा मुद्दा हा की आपण किती इरिटेट होतो अशा चवकशांनी!
परवा लग्नात मी चटणी कलरची साडी नेसले होते (हिरवी मिरची आणि ओलं खोबरं घातलेली चटणी बरं का) तर एका बाईने लगबगीने येत, मागच्या वेळी निमूच्या लग्नात तू हीच साडी नेसली होतीस ना? असं मला डायरेक्ट विचारलं.
मी होय म्हणून सरळ लगबगीने (तेवढ्याच) आईस्क्रीम खायला गेले. बरं तेव्हाही ही साडी तुला छान दिसत होती आणि आता पण त्याहून (किमान तेवढीच) छान दिसतेय असं म्हणायचं तरी… असले काहीच मॅनर्स नाहीत. शेवटी आपण या संसारात सोसायचं तरी किती हा प्रश्न उरतोच… त्याला काय लिमिट असं नाहीच!
अरे, आपण सक्काळपासून राबराबराबून स्वयंपाक केला आणि आज पण वांग्याचीच भाजी असं कुणी न राहवून विचारलं किंवा चवकशी केली की आपल्याला कसला परम संताप येतो! काल भरली वांगी होती, परवा वांग्याचं भरीत होतं आणि आज वांगं-बटाटयाची शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट घातलेली भाजी आहे हे सांगताना आपला चेहरा जो आहे तो कसला ओबडधोबड होतो…
मग अशा लोकांचं (ईडीच्या हापिसात जाणार्या) मनातल्या मनात भारी कौतुक वाटतं… की हे लोक कसे काय दीर्घ चौकशीला सामोरे जातात कोण जाणे…
मुलांनी चौकस असलं पाहिजे असं आपण म्हणतो… पण दुसर्याचा चौकसपणा (भोचकपणा) आपणाला किती हैराण करतो! मग दहा तास, बारा तास, सतरा तास असे कित्येक दिवस कसं काय तोंड देत असतील… परमेश्वरा…
(याचं ट्रेनिंग देणं जरूरी आहे का… किंवा क्लासेस काढावेत का याचा सांगोपांग जरूर जरूर विचार व्हायला हवा)…
बरं चौकशी सुरू असताना काही प्रश्नांना उत्तरंच दिली नाहीत आणि मख्खासारखं बसून राहिलं तर चालत असेल का, हा यक्षप्रश्न आहे.
उत्तरं खरीखुरी द्यायची की आठवणीने तयार केलेली, पाठ केलेली उत्तरं प्रेझेन्ट करायची हे सुध्दा ईडीवाल्यांनी आधी पष्टपणे सांगितले पाहिजे.
सतत चौकशीच सुरू असते की मध्ये मध्ये चहा-पाणी, लिंबू सरबत, नाश्ता, जेवण पुरवत असतील आणि ते खाताना त्यांची ‘खायची’ सवय न्याहाळून बघत असतील? असं पण मधेच तोंडात चुरमुरे उडवताना मनात येवून जातं. (काही लोक मुरमुरे बोलतात. पण खाताना चुर्र असा कुरकुरीत आवाज येत असल्यामुळे चुरमुरे हाच शब्द दीर्घ विचांरांती बरोबर वाटतो. तुमचं काय मत? ईडीच्या संदर्भात आणि चुरमुर्यांच्याही बाबतीत?
तर एकंदरीत या चौकशीच्या दरम्याने लहानपणापासूनच्या रम्य आठवणींना उजळा मिळत असेल असा कयास आहे. आयुष्याचा उभा आडवा तिडवा आढावा यानिमित्ताने नक्कीच घेवून होत असेल… हेही नसे थोडके…
पूर्वी दृष्ट काढताना ईडापिडा टळो म्हणून भाताचं मुटकं किंवा भाकरतुकडा ओवाळून टाकण्याची पद्धत होती. आता ‘ईडीपिडा’ टळो म्हणून तेच करण्याची वेळ परत येवून ठेपलेली आहे. विलाज नाही.