रवींद्र साठेला अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे सामान्य गायकाला दुरापास्त, अशा महान गायकांबरोबर गाण्याची संधी रवीला मिळाली. रशियामध्ये इंडिया फेस्टिव्हल झाला, त्यावेळी भारतरत्न पंडित रविशंकर यांच्या दिग्दर्शनाखाली गायची संधी मिळाली. इतकेच नव्हे तर १५ दिवस दिल्लीला त्यांच्या घरी राहून रिहर्सल्स झाल्या आणि पुढे रशियाला प्रयाण केले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरही गाण्याची संधी मिळाली, तसेच भारतरत्न लतादिदींबरोबर परदेश दौरेही केले. तीनही भारतरत्न आणि संगीतातले दिग्गज रवीला नावानिशी ओळखतात हे कोणत्याही पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठच आहे, असे रवी अभिमानाने सांगतो.
—-
‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’ ‘सामना’ या चित्रपटातील डॉ. श्रीराम लागू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं रेडिओवर, कॅसेटवर, टीव्हीवर ‘वाजू’ लागलं आणि लगेचच ‘गाजू’ लागलं… आणि या गाण्यामुळे रवींद्र साठे हा नवा गायक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. केवळ गाता येतं म्हणून एका रात्रीत रवींद्र साठे स्टार गायक झाला का? याच उत्तर ‘नाही’ असंच आहे. कारण त्यामागे कसून केलेली मेहनत, यथायोग्य शिक्षण आणि योग्य ते मार्गदर्शन इतक्या बाबी आहेत. पण तरीसुद्धा हा संघर्ष नेमका कसा आहे? रवींद्र साठेला हे सर्व सहजासहजी मिळाले का? त्यासाठी काय काय करावे लागले? आणि ते करताना आलेले अनुभव म्हणजेच एक घडत गेलेला गायक कलाकार… रवींद्र साठे.
काहींच्या आयुष्यात आईचं मार्गदर्शन असतं, तर काहींच्या वडिलांचं, तर काहींच्या आई आणि वडिलांचं. रवी साठेच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचं मार्गदर्शन हे होकायंत्रासारखं होतं. नेमकं आता कुठे जायचं असा विचार मनात आला की त्याचे वडील अगदी नेमका रस्ता दाखवायचे आणि तोसुद्धा अगदी स्वच्छ आणि योग्य. त्यामुळे ऐन कारकिर्दीच्या सुरुवातीला किंवा मध्यावरसुद्धा योग्य निर्णय घ्यायची वेळ आली की रवीला त्याचे वडील मोरेश्वर साठे हे योगायोगाने सल्ला देतच असत. गाणं हे त्याला वडिलांकडूनच आलं. उच्चारांचं महत्व आणि भाषेचं प्रभूत्व वडिलांकडे ठासून भरलेलं होतं. आकाशवाणीवर मोरेश्वर साठे हे नाव बर्याच जणांना परिचित होतं. रेडियोवरच्या नोकरीच्या निमित्ताने मोठमोठे लेखक साहित्यिक आणि संगीतकार यांचे त्यांच्याशी कलात्मक संबंध होते. रवीची आत्या ही संगीत विशारद होती, तर आतेभाऊ श्रीरंग निकेतन ही संगीतविषयक संस्था चालवत. वडील उत्तम हार्मोनियमवादक होते. जन्माने त्याला वडिलांचं रूप, स्वभाव आणि आवाज आला असला तरी तालासुराचं ज्ञान हे परमेश्वर देतो, असे मानणारा रवी ‘मला आई आणि वडील इतके चांगले लाभले हीसुद्धा परामेश्वराचीच कृपा आहे,’ हे अगदी श्रद्धेने म्हणतो.
मी १९७६ ते ७८ दूरदर्शन केंद्रात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत होतो, तिथे माझी अनेक दिग्गज कलावंतांशी दोस्ती झाली. त्यात विनय आपटे, प्रदीप भिडे, बी. पी. सिंह, बबन दळवी, विलास वंजारी, तसेच भक्ती बर्वे, स्मिता पाटील यांच्याशीही मैत्री झाली. त्यात आवर्जून उल्लेख करावा असा एक तंत्रज्ञ म्हणजे रवींद्र साठे. होय, तंत्रज्ञ, कारण रवी तेव्हा तिथे ध्वनिलेखक, म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करीत होता आणि अगदी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून रीतसर तसे शिक्षण घेऊन त्याला ती नोकरी मिळाली. दूरदर्शन केंद्र म्हणजे त्याकाळच्या कलावंतांचा जणू अड्डाच होता, जणू काय एखाद्या महाविद्यालयाचे आवार असल्यासारखे ते फुलून यायचे. तिथल्या टॉवरखाली किंवा जवळच असलेल्या कँटिनमध्ये एका चहा-इडलीवर तासन्तास गप्पा चालायच्या, अर्थात हातातली कामे पूर्ण करूनच. तिथेच मी आणि रवीने तासन्तास गप्पांचे फड जमवलेत. ‘कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय? या टोपीखाली दडले काय?’ हे गाणंसुद्धा ‘सामना’ या चित्रपटातलंच… तेसुद्धा रवीनेच गायलंय… असे असताना एकदम साऊंड रेकॉर्डिस्ट कसं काय, असा मला प्रश्न पडला. ‘इथेही माझे वडीलच मार्गदर्शक ठरले.’ गप्पांच्या ओघात रवी वडिलांना श्रेय देत होता. ‘जनरली त्या वयात वडील आपल्या इच्छा मुलांवर लादतात, डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचा सल्ला देतात; पण माझ्या वडिलांनी मला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जायला सांगितलं. माझा एकूण कल बघून त्यांनी तसा सल्ला दिला असावा. कारण बीएससीमध्ये मला बर्यापैकी मार्क्स होते, पण एमएससीला प्रवेश मिळण्याइतके नव्हते. तेव्हा पुढे न शिकता मी कुठेतरी नोकरी करावी असं मला वाटत होतं आणि वडिलांनी सल्ला दिला की तू ध्वनिलेखनाचं तंत्र शिकून घे. गाणं तर आहेच तुझ्याकडे, पुढेमागे या तंत्राचा उपयोग होईल. आणि मी पुण्याचा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालो. गंमत म्हणजे मी तिथे जे शिक्षण घेतले ते त्याकाळी ‘स्थळ’ म्हणून एकदमच कुचकामी होते. त्यामुळे मुली सांगून येईनात, इतका तो कोर्स आणि फिल्म इन्स्टिट्यूट समाजव्यवस्थेत बदनाम होते.’ पुढे रवीचे लग्न नूतन नावाच्या एका सुविद्य मुलीशी झाले ही गोष्ट वेगळी.
रॅगिंगमधून एका गायकाचा जन्म आणि ब्रेक
रवीला रीतसर गाण्याचे शिक्षण मिळाले असूनसुद्धा त्याच्या गाण्याला तसा कुठे वाव नव्हता किंवा त्याने तसा प्रयत्नही केला नव्हता. म्हणजे शाळेनंतर जेव्हा फर्ग्युसनला कॉलेजमध्ये चार वर्षे होता, त्या काळात कोणालाच माहिती नव्हते की रवी हा उत्तम गायक आहे. त्याने कॉलेजमध्ये कधी गाण्यासाठी तोंडही उघडले नाही. पुढे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर ज्युनियर मुलांवर सीनियर मुले सर्रास रॅगिंग करीत. अगदी वाट्टेल ते प्रकार करायला लावीत. त्यातले बरेचसे पुढे सिनेमात आलेसुद्धा. पण रवीच्या वाट्याला मात्र अत्यंत सुखकारक आणि सोप्पे रॅगिंग आले. त्याची भंकस करता करता त्याला चक्क गायला लावले, आणि रवीने सहज म्हणून असे काही गुणगुणून दाखवले की ती सीनियर मुलं रॅगिंग विसरली. फक्त डोलायची बाकी होती. तिथल्या तिथे वन्समोअर मिळवत रवी शांतपणे गाणी म्हणत गेला. त्या सीनियर मंडळींमध्ये प्रदीप दीक्षित नामक एक विद्यार्थी होता. पटकथा लेखन विभागातला होता आणि एफटीआयआयचा विद्यार्थी सेक्रेटरी होता. रवीमधले गुण त्याने हेरले आणि परस्पर रवीचे नाव त्याने एका स्पर्धेत दिले. त्याआधी फिल्म इन्स्टिट्यूटच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राज कपूर प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. तिथे रॅगिंगचा एक भाग म्हणून केवल शर्मा या रॅगिंग मास्टर विद्यार्थ्याने रवीला कार्यक्रमात गायला लावले. तेही मराठी गाणे (पुढे तो मोठा एडिटर झाला). त्यात दुसरा गायक होता अभिनयशाखेचा विद्यार्थी शैलेन्द्र सिंह, त्याने अर्थात हिंदी गाणे म्हटले आणि रवीने सर्वांचा आग्रह म्हणून अभिषेकींचे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे मराठी गीत म्हटले. त्यातूनच बहुदा शैलेन्द्र सिंह यांना राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटात पार्श्वगायक म्हणून घेतले असावे. (कल्पना करा, त्या दिवशी रवीने हिन्दी गाणे म्हटले असते तर? ऋषी कपूरच्या तोंडी ‘मैं शायर तो नहीं’ हे गाणे कदाचित रवींद्र साठेच्या आवाजात असले असते.) पण त्या रॅगिंग टीममधल्या प्रदीप दीक्षितांनी रवीचे नाव ज्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत दिले होते, तिथे रवीला १७ महाविद्यालयांमधून पहिले पारितोषिक मिळाले आणि त्या विजयाच्या अभिनंदनाची पत्रके त्याच्या नावानिशी इन्स्टिट्यूटमध्ये सर्वत्र नोटिस बोर्डावर लावली गेली. त्याच काळात डॉक्टर जब्बार पटेल, सतीश आळेकर आणि मोहन आगाशे हे इन्स्टिट्यूटमध्ये आर्काइव्हमधल्या शॉर्टफिल्म्स बघायला येत. त्यावेळी ते ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाची जुळवाजुळव करीत होते आणि त्यांना ब्राह्मण दिसणार्या नटमंडळींची गरज होती. त्यावेळी सतीश आळेकरांच्या नजरेला ती नोटिस पडली आणि रवींद्र साठेचे नाव वाचून त्यांना शाळेतला आपल्याला दोन वर्षे ज्युनियर असलेला रवींद्र साठे आठवला. ‘मी याला ओळखतो’ म्हणून त्यांनी रवीला शोधून काढला आणि जब्बार पटेल यांच्या पुढ्यात नेऊन ठेवला. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये एका गायक नटाची गरज होती आणि रवींद्र साठेने त्याआधी कधीच अभिनय केलेला नव्हता. आता पुन्हा प्रश्न होता गायक व्हायचं की गायक नट व्हायचं? अर्थात पुन्हा रवीच्या वडिलांचे मार्गदर्शन इथे उपयोगाला आले. त्यांनी कधीकाळी भालबा केळकर या पुण्यातल्या ज्येष्ठ रंगकर्मींबरोबर काम केले होते, आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भालबा केळकर सर्वेसर्वा असलेल्या पीडीए या प्रख्यात नाट्यसंस्थेतर्पेâ होणार होते. त्यामुळे वडिलांनी रवीला नाटक करण्याचा सल्ला दिला. तरीही दोन तीन महिन्यांनी रवीने होकार कळवला, रवी ऑडिशनला पोहोचला तेव्हा तिथे प्रत्यक्ष भास्कर चंदावरकर ऑडिशन घेते होते, हे बघून त्याला प्रचंड आनंद झाला. कारण त्यांच्याकडे खरे तर त्याला सतार शिकायची होती आणि तसा चार वर्षांपूर्वी विचारही केला होता. पण तोपर्यंत वेळ टळली होती आणि ते राहून गेलं. रवी अर्थातच निवडला गेला. फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या रॅगिंगमधून एक गायक नोटिस बोर्डवर चमकला आणि त्यातून रवींद्र साठे ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात गायक नट म्हणून उभा राहिला. आता पुन्हा कल्पना करा, समजा रवीने हिन्दी राज कपूर यांच्यासमोर हिंदी गाणे म्हटले असते आणि राज कपूर त्याला हिंदीत घेऊन गेले असते तर ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी नाट्यसृष्टीला भूषणावह ठरलेल्या नाटकात रवी नसताच… (नको.. या कल्पना बाजूला ठेवू या.)
पहिला ब्रेक
घाशीराम कोतवाल या नाटकाने इतिहास घडवला आणि अख्खा भूगोलही पालथा घातला. भारतातच नव्हे, संपूर्ण जगात अनेक देशांमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले आणि गाजले. जितक्या शांतपणे रवींद्र साठे कारकीर्दीला सामोरं जात होता, तितकेच ते नाटक अनेक प्रकारचे वादंग निर्माण करून मोठे होत होते, गाजत होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे, रमेश टिळेकर, मोहन गोखले, आनंद मोडक, उदय लागू ही मंडळी त्यात जितकी महत्वाची होती तितकाच किंबहुना काकणभर जास्त रवींद्र साठे त्यात महत्वाचा गायक नट होता. विशेष म्हणजे डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे आणि मोहन गोखले यांच्या अत्यंत लक्षवेधक आणि महत्वाच्या भूमिका असूनसुद्धा रवींद्र साठेला त्यातल्या गायक आणि एका ब्राह्मणाच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार दोन वेळा मिळाले. पण त्याने या यशाचा कधी गवगवा केला नाही, उलट सांघिक यशातच आनंद मानला. त्यातली ‘जागी सारी रतिया, नाही समझत पिया’ ही ठुमरी रवी लाजवाब गायचा, त्याच्या आधी आणि नंतर नाटकातल्या सत्तावीस ब्राह्मणांनी ज्यांना ताब्यात घेतलेलं असायचे ते सर्व प्रेक्षक रवीची ही ठुमरी रवीच्या ताब्यात जाऊन मग्न होऊन ऐकत असत.
दुसरा ब्रेक
‘घाशीराम कोतवाल’च्या दिग्दर्शकांनी, म्हणजे डॉ. जब्बार पटेलांनी ‘सामना’ हा त्यांचा पहिला चित्रपट केला, त्यात थिएटर अकादमीच्या अनेक लोकांना त्यांनी महत्वाच्या भूमिका दिल्या. अर्थात रवींद्र साठेला मात्र त्यांनी यावेळी गायक म्हणूनच संधी दिली. भास्कर चंदावरकर संगीत दिग्दर्शक होते. ‘सामना’मधली ती दोन गाणी रवींद्र साठेच्या आवाजात रेकॉर्ड झाली आणि सिनेमा प्रकाशित होताच गाजू लागली. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताने सर्वत्र धमाल उडवली आणि आरती प्रभू, भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे हे तिघेही, रेडियो, दूरदर्शन आणि लाऊडस्पीकर्स गाजवू लागले. त्या काळात दादा कोंडकेंच्या झंझावाती संगीतासमोर तरल, आशयघन गाणे त्यातल्या काव्यासहित उचलून धरले गेले, ही एक विक्रमी घटनाच होती.
तिसरा ब्रेक
‘सामना’नंतर डॉ. जब्बार पटेल यांचे चित्रपट येऊ लागले, तशी रवींद्र साठेची चित्रपटातली गाणी देखील वाढू लागली. शिवाय प्रायव्हेट गाण्याच्या कार्यक्रमात आमंत्रणे येऊ लागली. त्यामुळे दूरदर्शनची नोकरी आणि बाकीची कामे यांची कसरत होऊ लागली. नोकरी सुरू ठेवावी की ठेवू नये असा प्रश्न उभा राहिला आणि नेहमीप्रमाणे यावेळी मार्गदर्शनासाठी वडिलांची उणीव भासली. पण यावेळी ती उणीव पत्नी नूतन यांनी भरून काढली. रेकॉर्डिंग आणि प्रायव्हेट कार्यक्रमांमुळे महिन्याभरात नोकरीपेक्षा जास्त पैसे घरात येत होते ही गोष्ट तिने लक्षात आणून दिली. आता पूर्णपणे गाण्यांवर लक्ष केंद्रित केल्यास अनेक संगीतकारांना नोकरीमुळे जो नकार द्यावा लागतो तो द्यावा लागणार नाही, म्हणून नोकरी सोडावी असा निर्णय दोघांनी घेतला, आणि तोच फायद्याचा ठरला. एखादी मोठी गोष्ट सोडल्यावर त्या त्यागाचे फळही तितकेच मोठे असते, याचा प्रत्यय पुढच्या काळात आला. जब्बार पटेलांच्या ‘उंबरठा’ या चित्रपटापासून रवींद्र साठे हा चित्रपट ध्वनिलेखक म्हणून ही काम करू लागला. त्यानंतर हिन्दी ‘सुबह’ आणि डॉक्टरांचे इतर सिनेमे तर त्याने केलेच; शिवाय माझ्या ‘हमाल! दे धमाल’ या पहिल्या चित्रपटापासून पुढील चार चित्रपटांचेही ध्वनिमुद्रण केले; शिवाय पार्श्वगायन सुरू होते ते वेगळेच. आणि अखेर तंत्रज्ञ म्हणूनही त्याने काम थांबवले आणि फक्त आणि फक्त पार्श्वगायन सुरू ठेवले. या दुसर्या निर्णयामुळे मात्र रवीच्या गाण्यामध्ये वैविध्य आले आणि गेले अनेक वर्षे रवी सर्व माध्यमांमध्ये गाताना दिसतोय… तोही अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये.
एक मित्र म्हणून रवी अत्यंत प्रामाणिक भूमिकेत वावरत असतो, त्याच्यावर विश्वास ठेऊन कोणतेही काम योजले तर ते तडीस नेण्यात त्याचा मोठा हातभार असतो. केवळ गाणेच नव्हे तर संगीतातल्या सर्व बाजूंचा विचार करून अतिशय मौल्यवान अशा सूचनाही त्यात समाविष्ट असतात. तो अत्यंत व्यावसायिक म्हणजे ‘कामात तत्पर’ या अर्थाने ‘सफाईदार व्यवसायिक’ आहे. तेवढाच विश्वास त्याचा एक मित्र म्हणून आपल्यावरही असतो.
दूरदर्शन केंद्रात असताना एकदा रवी घाईघाईने मला घेऊन व्हीटीआर रूममध्ये गेला आणि तिथे खूप मोठी टेप लावून त्यातली तीन गाणी ऐकवली. एकपेक्षा एक अशी ती गाणी आम्ही ऐकत होतो. ती होती नुकतीच मिक्सिंग होऊन आलेली ‘जैत रे जैत’ या चित्रपटातली. हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि ना. धों. महानोरांची गीते. अत्यंत विश्वासाने रवी मला ती ऐकवत होता. बेधुंद होऊन गायलेल्या त्या गाण्यांचा बहुतेक पहिला श्रोता होण्याचा मान रवीने मला दिला असावा. पुढे ‘जैत रे जैत’च्या सर्वच गाण्यांनी इतिहास घडवला आणि गायक म्हणून रवीच्या शिरपेचात आणखी एक तुरा लागला.
ब्रेक के बाद
असे अनेक तुरे त्याच्या शिरपेचात पुढे लागले. मात्र त्यासाठी कधी त्याला हुजरेगिरी करायची वेळ आली नाही आणि ते त्याच्या स्वभावातही नाही. सातत्याने तंत्रज्ञानातल्या नव्या कक्षा पडताळून पाहत राहण्यामुळे रवी नवनव्या संगीतकारांशी आपोआप जोडला गेला. ते सर्व जाणकार संगीतकार आहेत. एकेकाच्या नावावर अनेक मोठमोठ्या कलाकृती आहेत असे दिग्गज पुढे रवीच्या कारकिर्दीत त्याला आपण होऊन भेटत गेले. त्यासाठी त्याला बाजारू गाणी गाण्याची गरजच पडली नाही. अगदी लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर. डी. बर्मन यांच्याकडेही रवी गाऊन आलाय, पण पुन्हा पुन्हा जाऊन, भेटत राहून आपलं स्थान बळकट करण्याच्या भानगडीत न पडता, त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते बोलावतील, या तत्वावरच रवी राहिला. एकदा तर ख्यातनाम गीतकार जगदीश खेबूडकरांनी त्याची शाळाच घेण्याचा प्रयत्न केला. तुमचा आवाज इतका छान आहे, इतकं छान तुम्ही गाता, तुम्ही हिन्दीमध्ये प्रयत्न केला पाहिजे. लोकांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यावर शांतपणे रवीने त्यांचा मान ठेवून सांगितले की सगळ्यांकडे मी गायलो आहे, माझा आवाज त्यांना माहिती आहे, गरज वाटेल तेव्हा बोलावतील. खेबूडकरांना ते काही फारसे पटले नाही, कारण त्यांच्या दृष्टीने संपर्क वाढवणे ही व्यवसायाची गरज होती, आणि रवीला नेमके तेच मान्य नाही. माझ्या योग्यतेचे काम फक्त मीच करू शकतो आणि त्यासाठी मला नक्कीच बोलावले जाईल, या विश्वासावर ठाम असलेल्या रवींद्र साठेला खरोखरच त्याच्यायोग्य काम असते तेव्हा शोधून बोलावले जाते, हा माझाही अनुभव आहे.
आज भारतातल्या विविध भागांतून कित्येक गायक करियर करायला मुंबईत येतात, त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा गायनकला लोकांसमोर आणण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात, त्या रवीला कराव्या लागल्या नाहीत, याचे कारण अर्थात वडिलांचं योग्य मार्गदर्शन आणि मिळालेल्या संधीचं केलेलं सोनं. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच पंडित भास्कर चंदावरकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे असे दिग्गज संगीतकार रवीवर संस्कार करून गेले. दूरदर्शन केंद्रावर ‘अमृत मंथन’ या सुहासिनी मुळगावकर यांच्या संस्कृत कार्यक्रमातले सगळे श्लोक रवीच्या भारदस्त आवाजात गायले गेले आहेत. ते गात असताना रवीवर सुहासिनीबाईंचे संस्कृत उच्चारांचे संस्कार झाले ते त्याला आजन्म पुरले.
आजच्या संगीताबद्दल रवी एकूणच नाराजीचा सूर लावत नाही, पण रवीची गाणी जशी टिकली, तसे टिकणारे संगीत असावे या मतांचा तो आहे. वाढत्या वयाबरोबर नायकांसाठी गायचं बाजूला सरलं आणि आपोआपच रवी भक्तिगीते, वेदमंत्र, भजने, श्लोक, आशा संगीतप्रकारांकडे वळला. संस्कृत श्लोकांवरच्या त्याच्या अधिराज्याबद्दल नाना पाटेकर त्याला एकदा म्हणाला, ‘तू लोकप्रिय गायक नाहीस, श्लोकप्रिय गायक आहेस’. आज भारतभरात कुठेही संस्कृतप्रचुर रेकॉर्डिंग असेल तर रवींद्र साठेला खास बोलावले जाते. ‘म्युजिक टुडे’ या म्युजिक कंपनीसाठी पंडित शिवकुमार शर्मा आणि आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रवीचे पाच मोठमोठे अल्बम संस्कृत भाषेत येत आहेत. त्यासाठी पंडित हरिप्रसादजींना सहाय्यक म्हणूनही तो काम करतोय. ही त्याच्यासाठी कारकीर्दीच्या या टप्प्यावर खूप मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी आहे.
रवींद्र साठेला अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे सामान्य गायकाला दुरापास्त, अशा महान गायकांबरोबर गाण्याची संधी रवीला मिळाली. रशियामध्ये इंडिया फेस्टिव्हल झाला, त्यावेळी भारतरत्न पंडित रविशंकर यांच्या दिग्दर्शनाखाली गायची संधी मिळाली. इतकेच नव्हे तर १५ दिवस दिल्लीला त्यांच्या घरी राहून रिहर्सल्स झाल्या आणि पुढे रशियाला प्रयाण केले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरही गाण्याची संधी मिळाली, तसेच भारतरत्न लतादिदींबरोबर परदेश दौरेही केले. तीनही भारतरत्न आणि संगीतातले दिग्गज रवीला नावानिशी ओळखतात हे कोणत्याही पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठच आहे, असे रवी अभिमानाने सांगतो.
शांत, धीरगंभीर स्वभावाचा रवींद्र साठे कारकिर्दीच्या या टप्प्यावर समाधानी आहे. आर्किटेक्ट मुलगा ऋत्विक आणि सून अमेरिकेत स्थायिक आहेत, आणि मुलगी मेघना मुंबईत एक उद्योजकाची पत्नी म्हणून स्थायिक आहे. रवीच्या आवाजातली गाणी ही लतादीदींच्या, आशाताईंच्या, रफीसाहेबांच्या आणि सुरेश वाडकरांच्या आवाजातल्या काही दिव्य शक्तीच्या गाण्यांसारखी शक्ती देणारी आहेत. धीरगंभीर आवाजातली त्याची गाणी शांतपणे ऐकणे हे मनाला उभारी देणारे असे परमेश्वराचे दान आहे. ज्यांच्या हातांना ते घेणे झेपते, त्यांच्या कानांना श्रवणभक्ती तृप्ती आणि समाधान देते.
एक दिव्य आवाज जो आपल्या पिढीतून निपजला आणि आपल्यासमोर आसमंतात पसरला याचा राहून राहून अभिमान वाटतो.