माझ्या मानलेल्या परममित्र पोक्याला मी धुक्यात हरवलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुलाखत घेण्यासाठी पाठवलं, तेव्हा ते इतकी संस्मरणीय मुलाखत देतील याची कल्पना नव्हती. मी पोक्याला आधीच बजावून सांगितलं होतं की तू जास्त प्रश्न विचारू नकोस. फक्त सुरुवातीला चावी दे, मग ते सुसाट सुटतील ते फक्त व्यवस्थित टेप करून घे. त्यांना मध्ये अजिबात डिस्टर्ब करू नकोस. आता त्या मुलाखतीची टेप ऐकल्यावर कोश्यारींचे हे नटसम्राटासारखं स्वगत ऐकून मीही चाट झालो. आता ही मुलाखत तुम्हाला ऐकवतो. ऐका.
– कोश्यारी साहेब, आपण पदमुक्त होण्याची इच्छा मोदीजींना पत्र पाठवून का बरं व्यक्त केलीत? सारा महाराष्ट्र त्यामुळे हळहळतो आहे. फडणवीसांनी तर चार दिवस अन्नपाणी सोडलं होतं. फक्त सफरचंदाच्या ज्युसवर होते.
– त्यांच्याबद्दल काही बोलू नका. इतका संधीसाधू माणूस मी आयुष्यात दुसरा पाहिला नाही. माझ्यासारख्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसाला किती राबवून घ्यायचं याची पर्वाच केली नाही त्यांनी. मी शांत सोज्वळ माणूस. कधी कुठली कारस्थान केली नाहीत की कुणाचं वाईट चिंतलं नाही. पण या माणसाने माझ्याकडून नको-नको त्या गोष्टी करवून घेतल्या. मला रात्रीची झोप कधी लागलीच नाही. मोदीजींची, अमित शहाजी यांची आणि फडणवीसांची अशा तीन हॉटलाईन्स हॉलपासून बाथरूमपर्यंत सगळ्या खोल्यांमध्ये होत्या. एकाचवेळी सगळे फोन घणघणायचे आणि जणू घंटानाद घुमायचा. असेन तिथे फोन घ्यावा लागायचा. त्यांना रात्रीच राजकीय कटकारस्थानं करायला वेळ मिळायचा आणि ती शिजली की मी काय करावं याचे हुकूम दिले जायचे.
‘त्या’ पहाटेच्या शपथविधीच्या वेळी तर रात्रभर मला सूचना दिल्या जात होत्या. दिल्लीहून आणि फडणवीसांकडून. इतकं जागरण आयुष्यात कधी झालं नव्हतं. पिंजर्यातल्या पोपटासारखी माझी कोंडी झाली होती. ही यादी मंजूर करू नका, ती नावे मंजूर करू नका, ती कागदपत्रं हरवली म्हणून सांगा, अशा कितीतरी सूचना त्या हॉटलाईनवरून दिल्या जायच्या. तसं करणं मला भागच असायचं. विरोधी पक्षीयांच्या शिव्या मला पडायच्या आणि सगळं खापर माझ्या डोक्यावर फुटायचं. हे मात्र नामानिराळे. बदनामी माझी व्हायची आणि यांना विरोधकांच्या फजितीमुळे आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. असा अनुभव यापूर्वी कधी आला नव्हता. कधी या सार्यातून सुटका होते याची वाट पाहात होतो, पण इच्छा असूनही बोलण्याचं धाडस होत नव्हतं. शेवटी निर्धार केला आणि मनातलं सगळं मोदींपाशी फोनवरून बोलून नंतर औपचारिक विनंती त्यांच्यापाशी केली.
तुम्हाला सांगतो, त्या पत्रात लिहिलेली कारणं सगळी झूठ आहेत. मला जबाबदार्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उरलेला काळ अध्ययन, मनन, चिंतन करण्यात घालवायचा आहे, असे लिहिले आहे, हे खरं नाही. मात्र कुणाकडे हे बोलू नका. मला अध्ययनात कधीच रस नव्हता आणि मनन-चिंतनाशी तर संबंधच नाही, पुढेही नसेल. माझ्या चेहर्यावरून आणि पेहरावावरून मी तुम्हाला आध्यात्मिक पुरुष वाटत असेन, तर तो तुमचा भ्रम आहे. माझे छंद वेगळेच आहेत. पण इथे डोक्यावर सतत भाजप नेत्यांची टांगती तलवार असल्यामुळे मला मन मारून छंदांना तिलांजली द्यावी लागली. सगळ्या खोट्या नाट्या व्यवहारांबद्दल खरं तर मला ईडी लावायला हवी. पण इथून सुटका झाली तरी पुरे. राज्यपाल म्हणजे फक्त रबरी शिक्का असतो, असं म्हणतात ते काही खोटं नाही. दुसर्याच्या मर्जीनुसार शिक्के मारत जायचे एवढंच काम. त्यापेक्षा पोष्टात कामाला असतो तरी बरं वाटलं असतं. पण यांना सांगकाम्याच पाहिजे होता राजकीय स्वार्थासाठी. ते काम मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला न जागता कृत्रिमपणे पार पाडलं ते फक्त वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाला जागून.
ना मला महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल माहीत ना इथल्या थोर पुरुषांच्या चरित्राची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल मला गोळवलकर गुरुजींपासून, डॉ. हेडगेवारांपासून मोहन भागवतांपर्यंत कोणतीही माहिती विचारा, मी ती तुम्हाला बिनचूक सांगतो. मला गोडसेच्या कर्तृत्वाबद्दल विचारा. मी विस्ताराने सांगतो. मात्र महाराष्ट्राबद्दल काहीही विचारू नका. राज्यपाल काय, त्याच्या सेक्रेटरींनी दिलेली भाषणे विधिमंडळात वाचतो. ते एकदोन विधी सोडल्यास त्यापलिकडचं काही जाणून घ्यावं, असं मला कधीच वाटलं नाही. आपल्याला काडीचंही जनरल नॉलेज नसताना आपण दुसर्यांनी दिलेल्या ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळावं असं मला वाटत नसतानाही मी महाराष्ट्रातल्या थोर पुरुषांबद्दल अवमानास्पद बोललो त्याबद्दल मी महाराष्ट्राची पुन्हा पुन्हा क्षमा मागेन. पं. दीनदयाळ उपाध्याय यांची शपथ घेऊन सांगेन की महाराष्ट्राबद्दल खरंच काही माहीत नाही.
एखादा नट तोंडाला रंग फासून कोणतीही भूमिका साकार करतो तशीच मीही केली. पण खरं सांगतो मीही कट्टर परंपरावादी आहे. कदाचित तुमच्या कानावर कधीतरी आलं असेल की मी संघाच्या हाफचड्डीबद्दल कितीतरी वेळा आवाज उठवला होता. प्रत्येक संघ स्वयंसेवकाचा गणवेष धोतर, सदरा, काळी टोपी असाच असला पाहिजे हा माझा आग्रह होता. त्यासाठी मी माझं मॉडेलिंग करून वरिष्ठांना त्याचं शूटिंग पाठवलं होतं. पण कोणीच दाद दिली नाही. त्यात लाठी-काठी फिरवण्यापासून दांडपट्ट्यापर्यंत अनेक प्रकारांचा समावेश होता. कॉलेजात असताना मी फुलपँट, फुलशर्ट घालायचो. पण जेव्हा संस्कृतीरक्षणाबद्दल मला तीव्र जाणीव झाली तेव्हा मी शर्ट-पँटमधून धोतरात आलो. भारतातल्या सर्व पुरुषांना धोतर-सदरा आणि स्त्रियांना नऊवारी हा ड्रेसकोड सरकारने सक्तीचा करावा, अशी माझी पंतप्रधान मोदींकडे आग्रहाची मागणी आहे. सर्व देशाला एकच ड्रेसकोड लागू झाला तर खर्या अर्थाने खर्या अर्थाने देश एकसंध होईल आणि संस्कृतीरक्षणाचे कार्यही आपोआप साधेल, ही माझी भूमिका आहे. त्यासाठी एकपात्री आंदोलनही करण्याची माझी तयारी आहे. शेवटी देशाची एकात्मता महत्त्वाची.
माझी आता महाराष्ट्राला आणि भाजपलाही गरज नाही, कारण त्यांची माझ्याकडून जी अपेक्षा होती ती मी पार पाडली आहे. महाराष्ट्र मला कधीच विसरणार नाही याची मला खात्री आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.