आपल्या देशात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्यातला फरक किती टक्के प्रजेला समजत असेल हो संतोषराव?
– मिनार चाफळकर, खेड
त्या दिवशी ज्यांचा ड्राय डे नसतो, त्यांनाच असा प्रश्न पडत असतो.
बहिष्कारी गँगला उताणे पाडून लोकांनी पठान सिनेमा इतका उचलून धरला, याचं काय कारण असेल? हे सगळे लोक देशद्रोही आहेत?
– स्वाती पंडित, पंढरपूर
यालाच पठाणी वसुली म्हणत असावेत!
हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आणि अदानीचा बाजार उठला, हजारो कोटींचं नुकसान झालं… तुमचा काही घाटा झाला नाही ना?
– रमाकांत पोखरकर, ठाणे
आपण आधी गुंतवत नाही, त्यामुळे नंतर कुंथवत नाही; आपण मराठी माणस मेहनतीचं खातो (शेअर बाजार ‘घाटा’ आपल्याला कळत नाही…)
बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये असं काय असेल जे झाकण्यासाठी केंद्र सरकार आणि मोदीभक्त एवढा आटापिटा करतायत?
– प्रतीक्षा पोळके, पारनेर
हा तुमचा गैरसमज आहे… बीबीसीने त्या डॉक्युमेंटरीची स्क्रिप्ट सरकारच्या लेखकांकडून लिहून घेतली नसेल किंवा फायनान्स पण त्यांच्याकडून घेतला नसेल किंवा हिरो-हिरोईन म्हणून अक्षय, कंगना यांना घेतलं नसेल, म्हणून त्यांचे भक्त जरा नाराज झाले असतील… उगाच विरोधकांसारखं बोलू नका.
ईडी आणि सीबीआयचे अधिकारी परवा माझ्याकडे तुमचा पत्ता विचारत होते… देऊ का त्यांना पत्ता?
– स्वप्नील नारकर, चेंबूर
मी कोणत्या देवाचा ‘भक्त’ आहे, हे ईडी आणि सीबीआयवाल्यांना कळलं ना, तर माझा पत्ता सांगणार्यांचाच पत्ता लागणार नाही!
किरीट सोमय्या अदानींच्या मागे लागलेल्या त्या हिंडेनबर्गच्या अँडरसनच्या विरोधात ईडीकडे तक्रार का नाही करत? त्याला वठणीवर आणण्याचा तोच एक मार्ग आहे, नाही का?
– अमर पाटील, सोलापूर
हिंडेनबर्ग आणि अँडरसन हे तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्ही तक्रार करा ना, दुसर्याकडून अपेक्षा का करता?
शाळेत तुम्हाला कोणत्या विषयात चांगले मार्क मिळायचे हो? आणि कोणत्या विषयात भोपळा?
– रेहान तांबोळी, उस्मानाबाद
कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आणि हस्तकलेमध्ये भोपळा मिळायचा, बाकी विषयांत चांगले मार्क्स मिळायचे.
घराघरांत बायकोची सत्ता असताना पुरुषांची प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची हिंमत होऊ शकते का?
– अशोक कोतवाल, सातारा
२६ जानेवारीला सत्यनारायणाची पूजा करा, बायको तुमच्या मागून मम करते की नाही बघा… वर्षातून एक दिवस घरात तुमचीच सत्ता!
मी आजपासून चिकन मुघलाईला चिकन अमृताई म्हणण्याचं ठरवलं आहे. शाळेत पण मुघल काळ आता अमृत काळ म्हणून शिकवणार असतील काय?
– सुखदा शेंडे, चंद्रपूर
तुम्हाला का असं वाटतं? आपल्याकडे काय अमृतलाई आहे का??
ज्यांच्यापाशी शिक्षण घेतल्याचा विश्वासार्ह पुरावाही नसतो, असे राजकारणी नेते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कशाच्या बळावर करत असतील?
– बाळकृष्ण पारखे, अहमदनगर
बापाच्या जिवावर… मनात येतं त्याच्या बाता मारायला शिक्षण लागत नाही… रेडिओ लागतो, कॅमेरा लागतो. नाहीतर भाषण ऐकायला मारून मुटकून बसवलेली मुलं लागतात!
वापर न केल्याने मेंदू गंजत असेल का? आसपासच्या अनेक माणसांना पाहून मला शंका येते हो!
– रवी शेट्टी, डोंबिवली
हा प्रश्न वाचून मला तुमची शंका येते… मी मेंदूचा वापर न करता उत्तर देतो अशी शंका येते का तुम्हाला? उगा टोमणे मारू नका.
बायकोने फळं आणायला सांगितलं. मी टोमॅटो घेऊन गेलो, तर फुरंगटून बसली आहे. टोमॅटो हे फळ नाही का?
– सादिक सातारकर, माण
तुमच्या कर्माचं फळ आहे ते… भोगा!