औरंगाबादमध्ये जन्मलेला सावदेकरांचा मनोहर तिथल्या प्रसिद्ध शाळेतून चांगल्या मार्कांनी इयत्ता दहावी पास झाला. त्या काळात लातूर पॅटर्नचे प्रस्थ नवीनच सुरू झाले होते. अगदी पुण्या-मुंबईची मुलेसुद्धा अकरावी-बारावीसाठी लातूरला पाठवायची पद्धत सुरू झाली होती. मुलाला लातूरला पाठवले की इंजीनिअरिंग किंवा मेडिकलची अॅडमिशन पक्की अशी ठाम समजूत संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेला पसरली होती. यशस्वी झालेल्यांचे आकडे आणि त्यांचे फोटो पाहिले की ‘लातूरमध्ये पाठवू आणि मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर करून टाकू’, असा सारा मध्यमवर्गीय समज झाला होता. म्हणजे पुणे-मुंबई येथील क्लास किंवा कॉलेजे वाईट होते अशातला भाग नाही. पण लातूरवाल्यांनी मुलांना ठाकून ठोकून त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्याची अशी काही विलक्षण पद्धत बसवली होती की त्यापुढे पुणे मुंबई फिके पडत होते. त्या काळातील लातूर पॅटर्नच्या चित्तरकथा आजही मजेने चघळल्या जातात. गमतीने सांगायचे तर लातूरचे मास्तर सकाळी चहा न घेताच सात वाजता पोराच्या होस्टेलच्या दारात जाऊन तो अभ्यासाला बसला आहे की नाही बघतात; किंवा रात्री अकरा वाजता तो झोपला नाही ना, याची खात्री करून झाली की मग स्वतः झोपायला जातात. अशी कोणतीच गोष्ट पुण्या-मुंबईचे मास्तर करण्याची शक्यतासुद्धा नव्हती.
सावदेकरांचा औरंगाबादमध्ये मोठा प्रिंटिंग प्रेस होता. तीस-पस्तीस वर्षे उत्तम चाललेला व्यवसाय ते सांभाळत होते. मात्र दिवसेंदिवस त्या व्यवसायात असलेली स्पर्धा पाहून मुलाने इंजीनियर होऊन दुसराच काहीतरी उद्योग करावा, असे त्यांच्या वरचेवर मनात येत असे. सावदेकरांच्या बायकोच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘काय तो कागदाला शाई लावण्याचा धंदा.’ असे ती म्हणत असली तरीसुद्धा नवराबायकोचे या धंद्यावर प्रेम होते. गरजेनुसार नवर्याला ऑफिसमध्ये मदत करायला बायकोसुद्धा जात असे. सगळ्या आर्थिक उलाढालींमध्ये तिचाही सहभाग असे.
अर्थातच लातूरला मुलाला पाठवायचा जेव्हा विचार आला तेव्हा सावदेकरांच्या बायकोने सगळ्यात पहिल्यांदा दोन वर्षाचा आर्थिक हिशोब मांडला. राहण्याचा खर्च जास्त नव्हता. कारण लातूरची राहणी आणि होस्टेल यामुळे छान सोयी होत होत्या, त्याही अगदी थोडक्यात. क्लासेसची फी जास्त असली तरी ती सावदेकरांच्या आवाक्यात होती. मुख्य म्हणजे पुणे-मुंबईपासून लातूर फारच लांब पडत असे. ती स्थिती औरंगाबाद येथून नव्हती, जेमतेम तीन तासाचे अंतर. याबद्दल मनोहरला फारसे कोणी विचारलेच नव्हते. तो काळही तसाच होता. पोरांना कुठे घालायचे ते घरातील वडील व्यक्ती ठरवत असे. जिथे घातले तो अभ्यासक्रम धडपणे पूर्ण करणे ही मात्र पोरांची जबाबदारी. आजही फार परिस्थिती बदलली आहे अशातला भाग नाही. पण आता अनेक मुले-मुली ‘नको, ते आवडत नाही’ असे सांगत ते शिकायचे धुडकावून लावण्याचा प्रयत्न तरी नक्की करतात. काहींना तो यशस्वीरित्या पार पाडणे जमतेसुद्धा.
हे सारे मुद्दामहून लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतीच आलेली बोर्नविटाची जाहिरात. अप्रतिम जाहिरात होती ती. मुलांना एकाच साच्यात बसवू नका हे सांगण्यासाठी त्यांनी बोर्नविटा रोज वापरायच्या विविध आकारातील वस्तूंमध्ये घालून विक्रीला स्टोअरमध्ये ठेवले होते. आलेले ग्राहक कोणत्याही आकाराची वस्तू उचलली तरी त्यात बोर्नविटाच पाहून चकित तरी होत होते किंवा नाक तरी मुरडत होते. तुमच्या मुलांना अशाच पद्धतीत एकाच ठोकळ्यात घालू नका, असा बोचरा मेसेज त्या जाहिरातीतून द्यावा लागण्याची वेळ वीस बावीस सालामध्ये येत असेल, तर मनोहरच्या वेळची परिस्थिती तुमच्या सहज लक्षात येऊ शकेल. तेव्हा मनोहरला सावदेकर पती-पत्नींनी लातूरला पाठवायचे नक्की केले. त्याप्रमाणे सर्व तयारी करून त्याची रवानगी लातूरला झालीसुद्धा. मनोहरची अकरावी-बारावी संपली. मार्क चांगले पडले. अर्थातच हव्या त्या इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशसुद्धा मिळाला. हव्या त्याच याचा अर्थ अगदी साधा होता. औरंगाबादच्या सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे कमी फी असलेल्या जुन्या उत्तम संस्थेत शिकणार होता, तेही घरी राहून. दोन वर्षे लातूरच्या संपूर्ण जाचात, तुरुंगात असल्यासारखा मनोहर औरंगाबादला आल्यानंतर एकदम मोकळा मोकळा झाला.
जेमतेम सोळाव्या वर्षी लातूरला पाठवल्यानंतर एक शाळा संपून दुसर्या शाळेत घातल्यासारखी त्याची दोन वर्षे गेली होती. गाव अनोळखी, मित्र अनोळखी, अभ्यासाचा रेटा व आई-वडिलांचा, शिक्षकांचा सततचा धाक. त्याला तो जरी कंटाळला नसला तरी या सगळ्यातून सुटका झाल्याची भावना औरंगाबादला परत आल्यावर झाली होती. घरापासून कॉलेज बर्यापैकी लांब होते. स्वाभाविकपणे दोनचाकी म्हणजे अर्थातच बाईक मनोहरने मागितली. वडिलांनी त्याला ती तातडीने घेऊन पण दिली. मुलाने छान अभ्यास करून इंजीनिअरिंगला प्रवेश मिळवला याबद्दलचे हे बक्षीस देतो असेही ते सांगायला विसरले नाहीत.
मात्र इंजीनिअरिंगचा अभ्यास हा खूप वेगळा आणि स्वतः करायचा असतो हे मात्र त्यांच्या ध्यानात आले नाही. मनोहरची आई मुलाला मिळालेल्या प्रवेशामुळे आनंदित होती. आणि मनोहर आता थोड्या वेगळ्याच मानसिकतेत मोकळा, मुक्त झाल्यासारखा, पंख फुटल्यासारखा वागू लागला होता. हातात बाईक असल्यामुळे संपूर्ण औरंगाबादचा परिसर केवळ भटकण्यासाठीच आहे व नाईलाजाने कॉलेजमध्ये जायचे असते अशी त्याची समजूत झाली होती. अशा विचारांना खतपाणी घालणारे मित्र असतातच.
‘अरे यार, अभ्यास तर काय रोजचाच पडलेला आहे. चल पिक्चरला जाऊ. बाईक दामटवत जरा वेरूळ बघून येऊ. आर्ट्सच्या पोरी बघायला जरा त्या कॉलेजच्या गेटवर थांबू,’ अशा दैनंदिन प्रलोभनांना मनोहर स्वाभाविकपणे बळी पडत गेला. व्हायचे तेच वर्षअखेरीस घडले, मनोहर सर्व विषयांत नापास झाला. सावदेकरांचे ग्राहक भरपूर होते. प्रेसमुळे समाजाच्या अनेक स्तरांमध्ये संपर्कही खूप होता. मुलाला सरकारी कॉलेजमध्ये इंजीनियरिंगला अॅडमिशन मिळाली याची बातमी त्यांनी स्वतःच भरपूर कौतुकाने पोहोचवली होती आणि मनोहर नापास झाला. या धक्क्यातून आईवडील सावरायला खूप वेळ लागला आणि मुख्य म्हणजे लोकांना काय सांगू या चिंतेने दोघांना प्रचंड सतावले.
आपल्याकडे एक पारंपारिकरीत्या शिकलेल्या समाजात पद्धत आहे. ती चांगली का वाईट माहिती नाही. पण जून महिना उजाडला की समोर भेटलेल्या माणसाला तुमची मुलं काय शिकतात? निकाल लागला का? किती टक्के मार्क मिळाले? मग पुढे काय करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करण्याची एक प्रथाच आहे. कोणाकडेही सावदेकर गेले की या अशा प्रश्नांना उत्तर देताना ते थकून जात. एवढेच नाही तर मानसिकरित्या खचून जात. घरी आल्यावर घरात बसलेला मनोहर बघून या सार्याचा राग उफाळून येत असे. नापास झालेला मनोहर याला कंटाळून आता उलट उत्तरे द्यायलाही शिकला होता. आई हताशपणे दोघांची भांडणे सोडवण्याच्या नादात कंटाळून जात असे. पण उपाय कोणालाच सापडत नव्हता. खरे तर नापास झालेल्या मुलाला नीट धीर देऊन अभ्यासाला प्रवृत्त करणे हे आई-वडिलांचे काम असते. सहसा अभ्यास न केल्याबद्दल बोल लावून त्याला ना उमेद करण्याचे काम बहुसंख्य आईवडील अगदी काटेकोरपणे पार पाडतात.
अजून एका गोष्टीचा उल्लेख करायचा राहिला. इथे लातूर पॅटर्नमधील चुका काढणे किंवा लातूर पॅटर्नला नावे ठेवणे हा हेतू नाही. पण तिथे अभ्यास पाठांतरातून करून घेतला जातो. घोटून घोटून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. एवढेच नव्हे तर मार्क प्रत्येक टेस्टमध्ये वाढतील कसे यावरच सर्व लक्ष केंद्रित केले जाते. अशा स्वरूपाच्या भारतातील सर्व अन्य केंद्रातही हीच पद्धत आता रुजत आली आहे. आयआयटी प्रवेशासाठी क्लास लावायचा तर मुलाला कोट्याला किंवा हैदराबादला पाठवतात, ते यामुळेच. मुळात हुशार मुलगा सखोल अभ्यास करून उत्तरे देतो. याउलट सामान्य ते हुशार मुलांना फक्त परीक्षेसाठी तयार करण्याचे काम या सर्व केंद्रांत केले जाते. खर्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला जेव्हा या मुलांना तोंड द्यावे लागते, तेव्हा त्यांची पंचाईत सुरू होते. तो अभ्यास सगळ्यांना झेपतोच असे नाही. इंजीनियरिंग मध्येच सोडून देणार्या मुलांची संख्या यामुळेच सतत वाढत आहे.
मनोहरने नीट अभ्यास केला असता, हिंडणे-फिरणे, मोकाटणे बंद केले असते तर कदाचित खूप फरक पडला असता. पण आई-वडिलांच्या भूमिकेने कॉलेजबद्दल व अभ्यासाबद्दल एक स्वरूपाचा तितकारा त्याच्या डोक्यात भरू लागला. परिणामी मनोहर दुसर्याही वर्षी निम्म्या विषयात नापास झाला. आता त्याने नवीनच ठेका रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू केला होता. मला इंजीनिअरिंग करायचेच नव्हते. बाबांचा हट्ट म्हणून मला त्यांनी इकडे घातले, त्याला आईने खतपाणी घातले. हे ऐकून आई-वडील पूर्णपणे हताश झाले होते.
सावदेकरांचे व्यवसायातील जोशी बुवा हे ज्येष्ठ मित्र सुमारे २५ कामगार असलेला मोठा प्रिंटिंग प्रेस चालवत असत. अनुभव, पैसा आणि औरंगाबादच्या परिसरात प्रिंटिंग क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या कानावर हे सर्व गेले. सावदेकरांना त्यांनी, मनोहरला एकट्यालाच माझ्याकडे पाठवून देशील काय, म्हणून विचारले. नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते. मनोहरला फोन करून त्यांनी तसे सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोही त्यासाठी लगेच तयार झाला.
मनोहरला घेऊन ते दोघेजण एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले. बराच वेळपर्यंत जोशीबुवा मनोहरशी स्वतःच्या व्यवसायाबद्दलच बोलत होते. कोणकोणती मशीन्स कसकशी घेतली? त्यांची किंमत काय? त्यासाठीचा पैसा कसा उभा केला? व्यवसायात ते स्वतः कसे उतरले? हे सारे सांगत असताना त्यांनी स्वतःच्या शिक्षणाबद्दलची माहिती मनोहरला सांगितली. पुण्याला ‘विद्यार्थी गृह’ नावाची संस्था आहे. त्यांचा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करून आज संपूर्ण भारतात उत्तम पद्धतीचे मोठे मोठे प्रेस चालवणारी मंडळी कशी तयार झाली आहेत याचे त्यांनी वर्णन केले. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी स्वतः हा डिप्लोमा कसा मजेत पूर्ण केला हे त्याला वर्णन करून सांगितले. सारे ऐकताना मनोहर भारावून गेला होता. सहजपणे त्याने जोशी बुवांना प्रश्न विचारला, मला तो अभ्यासक्रम पूर्ण करणे जमेल का?
त्यांचे सरळ उत्तर होते, अरे माझे मार्क तर तुझ्या दहावी बारावीपेक्षा खूपच कमी होते. पदवी इंजीनियरिंगसाठीचा एक वर्षाचा अभ्यासही तू पूर्ण केला आहेस. पास झाला नसला म्हणून काय झाले? चांगल्या मार्गानेच काय, उत्तम मार्काने नक्की पास होशील. एवढे बोलून ते थांबले नाहीत तर त्यांचे पुढचे वाक्य होते, तू पास होऊन आल्यावर माझ्याकडे मॅनेजर म्हणून मी तुला तातडीने कामावर ठेवून घेईन. मलाही आता मदतीला हाताशी कोणीच नाही. जेवण झाले. मनोहर वेगळ्याच उभारीने घरी आला. वडिलांनी जोशी बुवांनी सुचवलेला रस्ता पूर्णपणे मान्य केला. कारण स्वतःच्या प्रेसमध्ये मुलांनी यावे हे त्यांना फारसे मान्य नव्हते. पण जोशी बुवा त्याला मॅनेजर म्हणून घेणार आहेत म्हटल्यावर त्यांनी याला पूर्ण पाठिंबा दिला.
यानंतरचा सगळा प्रवास अगदी साधा सरळ होता. मनोहरने पुण्याला जाऊन विद्यार्थी गृहाचा प्रिंटिंग डिप्लोमा उत्तम गुणांनी पूर्ण केला. परत येऊन जोशीबुवांच्या प्रेसमध्ये मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. पाच-सहा वर्षे झाल्यानंतर जोशी बुवांनी त्याला भागीदारीत घेतले. स्वतः निवृत्ती घेऊन सारा व्यवसाय मनोहरवर सोपवला. उत्तम चाललेल्या व्यवसायातून त्यांच्या निवृत्तीनंतरचे उत्पन्नाचे खात्रीचे साधन नियमितपणे सुरू झाले आणि मनोहरची करिअरसुद्धा.
तात्पर्य : मुलांशी संवाद साधा. त्यांना काय करायचे आहे याविषयी चर्चा करा. स्वतःचे निर्णय त्यांचे वर लादू नयेत. मुलांचे शिक्षणासंदर्भात केवळ क्लास लावून, मोठा खर्च करून करियर बनत नसते. त्यांच्या कुवतीनुसार झेपणारे शिक्षण यशस्वी ठरते. एवढेच नव्हे तर आनंददायी करिअर त्यांच्या जीवनाची पायाभरणी करते.