देशाच्या घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे देशवासीयांना वंदनीय आहेत. या दोघांचा लढा, त्याग आणि योगदान यांच्यावरील आक्षेप घेणे आणि वैयक्तिक टीका करणे हे निंदनीय आहे. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष निवडणुकीपुरता वापर करतात. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्याप्रती असलेला आदरभाव दाखवतात. प्रेम दाखवतात. परंतु हे त्यांचे पुतना मावशीचे प्रेम असते असे वर्तमान आणि भूतकाळातील त्यांच्या कृतीतून, वागण्यातून दिसते.
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, वंचित समाजाचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान केला. ते म्हणाले होते, ‘‘आजकाल डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन झाले आहे. आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… असा जप काहीजण करत असतात. त्यांनी एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती.’’ अमित शहा आणि भाजपावाल्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देव नसतील. पण महाराष्ट्रासह देशातील वंचित, मागासवर्गीय आणि दीनदुबळ्यांचे ते देव आहेत, दैवत आहे. या दैवताचा अपमान कुणीही सहन करणार नाही, महाराष्ट्र तर नाहीच नाही. महाराष्ट्राला कसेही वाकवा, कसेही झोडा, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करा, महाराष्ट्र काहीच करू शकत नाही. अशा मस्तीत राज्य व केंद्रातील भाजपा नेते वागत आहेत. तेव्हा त्यांची मस्ती उतरवायलाच लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. काही ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले. राज्याच्या विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर भाजपाच्या महायुती सरकारला जाब विचारला, निषेधही केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना आमदारांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला वंदन केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र प्रतिसाद उमटले. काँग्रेसनेही महाराष्ट्रात आणि देशात निषेध मोर्चे काढले. गेल्या दहा वर्षांत भाजपा केंद्रात सत्तेवर आल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. संविधान पायी तुडवून कारभार केला जात आहे.
अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेतही उमटले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि चर्चेची मागणी केली. पण भाजपाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. असे भाजपाने डॉ. आंबेडकरांवरील प्रेम दाखवले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारतरत्न’ दिल्याचे सांगितले. हे धादांत खोटे आहे. खरी हकीगत अशी आहे की, महाराष्ट्र जनता दलाचे तत्कालीन महासचिव प्रा. अरुण कांबळे यांनी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांना डॉ. आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी १९८९ साली पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटीत केली होती. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी १९९० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरव केला. ना काँग्रेसने, ना भाजपाने डॉ. आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ दिले. पण आपणच डॉ. आंबेडकर यांचा गौरव करतो अशा खोट्या अविर्भात भाजपा नेते वागतात.
भाजपाचे नेते स्वर्ग आणि नरक यांच्याबद्दल बोलतात तेव्हा ही भाषा मनुस्मृतीतील आहे. हा त्यांचा विचार आहे, संघाचा विचार आहे. त्यांचा संविधानावर विश्वास नाही, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला. मग भाजपाने बचावासाठी काँग्रेसवर जुन्या आरोपाची टेप वाजवली की काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. डॉ. आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आनंदच झाला होता. काँग्रेसला डॉ. आंबेडकर संसदेत नको होते म्हणून डॉ. आंबेडकरांचा लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभव केला. काँग्रेसने त्यांच्या ६० वर्षांच्या केंद्रातील सत्तेच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न किताब दिला नाही. वगैरे वगैरे.
जे डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत तेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकातील स्वा. वि. दा. सावरकर यांच्या विषयांच्या दोन लेखांवरून काँग्रेस व भाजपामध्ये चांगलीच जुंपली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय गलिच्छ आणि विकृत लिखाण या दोन्ही लेखात केले होते. तेव्हा या लेखांवर भाजपाने थयथयाट करत राज्य शासनाने या मासिकावर बंदी आणावी. अशी मागणी केली. नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण दोन दिवसातच हा इशारा हवेतच विरला.
२०१९च्या हिवाळी अधिवेशनात स्वा. सावरकरांविषयी फार मोठा पुळका दाखवत भाजपने अधिवेशनात गोंधळ घातला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून येऊनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन न करू शकल्यामुळे भाजपाला नैराश्य आले होते. सत्तेचा घास महाविकास आघाडीने पळवला म्हणून भाजपाने स्वा. सावरकर यांना पुढे करून महाविकास आघाडी सरकार स्वा. सावरकरविरोधी आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. स्वा. सावरकर यांच्या या भाजपाच्या बेगडी प्रेमावर विरोधकांनी टीका केली. पण अंदमानातील महाराष्ट्र मंडळाचे आजीव सदस्य व सल्लागार विष्णू गवळी यांनी भाजपाच्या खोट्या सावरकरप्रेमाचा बुरखाच फाडला. ते म्हणाले होते, ‘‘भाजपाने फक्त राजकीय स्वार्थासाठी सावरकरांच्या नावाचा आतापर्यंत वापर केला. भाजपाच्या योगदानापेक्षा भाजपेतर राजकीय नेत्यांनीच स्वा. सावरकरांसाठी मोठे योगदान दिले आहे. अंदमानातील स्वा. सावरकर स्मारकाचे भूमिपूजन पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. १९७० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील पहिले टपाल तिकीट जारी केले. स्वा. सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी इंदिरा गांधींनी एकदा नव्हे तर दोनदा प्रशंसोद्गार काढले. शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्मारकासाठी पाच लाखाचा निधी दिला होता. ते पुढे असेही म्हणतात की, माजी मंत्री स्व. पांडुरंग फुंडकर हे अंदमानला भेट देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याकडे रुपये दोन कोटी मदतीची मागणी मंडळाने केली होती. पण ती मदत भाजपाचा मुख्यमंत्री असूनही मिळाली नाही. अंदमान येथे पार पडलेल्या विश्व मराठी साहित्यसंमेलनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून स्मारकास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्वा. सावरकरांविषयी नेहमीच आदर शिवसेनेने दाखवला आहे. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सेल्युलर कारागृहातील सावरकरांच्या स्वतंत्र ज्योतीवरील काव्यपंक्ती हटवल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी आणि हिंदूंनी देशभर आंदोलन केले होते. मुंबई येथे स्वत: बाळासाहेबांनी मणीशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारले होते. हे जोडे मारो आंदोलन गाजले होते. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकरांच्या स्मारकासाठी जागा मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला होता. त्यात भाजपाचे काहीही योगदान नाही. एवढेच नाही तर संगीतकार सुधीर फडके हे जेव्हा स्वा. सावरकरांवर चित्रपट निर्माण करीत होते, तेव्हा बाळासाहेबांनी सर्वतोपरी सहकार्य केले. जवळजवळ ८ ते १० वर्ष निर्मिती करण्यासाठी लागले. प्रत्येक चित्रिकरणाच्या वेळी आणि नंतर घटनांविषयीची माहिती/अहवाल सुधीर फडके बाळासाहेबांकडे अवलोकनार्थ पाठवायचे. बाळासाहेबांच्या विचारांवर, सल्ल्यावर चित्रिकरणाच्या वेळी चर्चा व्हायची. काही सूचना अमलात आणल्या जायच्या.
शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वा. सावरकरांवरील प्रेम भाजपाप्रमाणे बेगडी नव्हते. फक्त निवडणुकीपुरता, काँग्रेसवर टीका करण्यासाठी सावरकरांचा वापर भाजपा करते. नाही तर आधी अटल बिहारी वाजपेयींचे सहा वर्षे आणि आता नरेंद्र मोदी यांची साडेदहा वर्षे म्हणजे एकूण साडेसोळा वर्षे भाजपाचे केंद्रात सत्तेवर आहे. परंतु त्यांनी स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ किताब बहाल केला नाही. तर शिवसेनेने सातत्याने स्वा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देण्याची मागणी केली आहे, तो किताब मिळेपर्यंत करत राहणार आहे.
नाशिकच्या कटाच्या खटल्यात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. स्वा. सावरकर १९११ ते १९२१पर्यंत अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. नंतर सावरकरांना १९३७पर्यंत रत्नागिरी येथे स्थानबद्ध ठेवण्यात आले होते. अंदमानच्या जेलमध्ये त्यांचा अनन्वित छळ झाला. नरकयातनाच भोगाव्या लागल्या. त्यांची नंतर ब्रिटिशांनी सुटका केली. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली. असा आरोप केला जातो. तेव्हा ते स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्ष सदैव करीत असतो. या टीकेवर सावरकरप्रेमींना संताप येणे स्वाभाविक आहे. राजकीय पक्ष जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. वि. दा. सावरकर या दैवतांचा निवडणुकीपुरता वापर करतात आणि पुतना मावशीचे प्रेम दाखवतात. तेव्हा ते सामान्य देशप्रेमींसाठी क्लेशदायक ठरते, वेदनादायक ठरते.
– योगेंद्र ठाकूर