□ भाजपला एका वर्षात २,२४४ कोटींच्या देणग्या; ईडीची धाड पडलेल्या कंपन्यांचेही धन पोहोचले.
■ ईडीच्या धाडी (पत्रकारितेच्या संकेतांनुसार सरकारी यंत्रणा खरंतर छापे घालतात आणि दरोडेखोर धाडी घालतात; पण ईडीवाले ‘धाडी’च घालतात हल्ली) यासाठीच घातल्या जातात… खंडणी तरी द्या किंवा कंपनी किंवा कंपनीचा कारभार निमूटपणे चौकीदाराच्या मालकाच्या स्वाधीन करा.
□ सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही, तर सर्वधर्मसमभाव – नितीन गडकरी.
■ आधी तो मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल, त्यात लक्ष घाला गडकरी साहेब. रोज उठून नवे प्रवचन द्यायला नागपुरातच एक बुवा आहेत तुमच्या परिवारातले! तुम्ही कामाचा माणूस म्हणून ओळखले जाता. कशाला त्यांच्या स्पर्धेत उतरता… आणि देशाची आधीच बहुसंख्याकवादी असलेली शासनयंत्रणा कधी सर्वधर्मांप्रति समभाव ठेवेल, याची सुतराम शक्यता नाही. शिवाय त्या नावाखाली सगळे भजनकीर्तनात दंग झाले तर कामं कोण करणार? शासनयंत्रणा धर्मनिरपेक्षच असली पाहिजे, धर्म घरांमध्ये आणि प्रार्थनास्थळांमध्येच राहिला पाहिजे.
□ ठाणेकरांची रामभरोसे बोट सफर; लाइफ जॅकेट न घालताच मासुंदा तलावात स्टंटबाजी.
■ बोटवाले बोटी कशाही भरतात, तो त्यांचा व्यवसाय आहे; पण, बोटीत बसणारे सामान्यजन स्वत:च्या सुरक्षेची फिकीर का करत नसावेत? ते जाब का विचारत नसतील?
□ बीडमध्ये दहा महिन्यांत ३६ खून, १५६ बलात्कार; बिहारपेक्षाही भयंकर जंगलराज.
■ कशाला उठता बसता बिहारची बदनामी? त्या राज्याने दलित मुख्यमंत्री दिला, महिला मुख्यमंत्रीही दिल्या; आपण शाहू फुले आंबेडकरांची नावं फक्त शोभेसाठी वापरतो. आता तिकडचे लोक म्हणत असतील की बिहारचा बीड करू नका.
□ राज्ये स्वत:ची तिजोरी भरताहेत, त्यांना पर्यावरणाची फिकीर नाही – सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे.
■ केंद्र सरकारपासून राज्यांपर्यंत, स्थानिक प्रशासन संस्थांपर्यंत सगळ्यांची हीच मनोवृत्ती आहे. कधीकाळी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारा हा समाज आता विकासाच्या नावाखाली वनसंपदेवर कुर्हाड मारून आपलं भवितव्य उजाड करून घेतो आहे. नद्यानाले नासवून सामूहिक आत्महत्येकडे वाटचाल करतो आहे, मिलॉर्ड…
□ लोखंड, पोलाद बाजार समितीत घोटाळा; नियमबाह्य कंत्राटे दिली
■ नियमाने कंत्राटे दिलीच पाहिजेत, असा काही नियम आहे का? आणि सगळे नियम पाळलेच पाहिजेत, असा तरी नियम आहे का?
□ बेस्ट वाचवा… २९ डेपोंमध्ये काळ्या फिती लावून कर्मचार्यांचे आंदोलन.
■ आता आंदोलनं करून काय उपयोग आणि बेस्ट कर्मचार्यांनी आंदोलनं करून काय उपयोग? बेस्टने प्रवास करणारा सर्वसामान्य माणूस स्टॉपवर जथ्याजथ्याने वाट पाहतो, इतकी गैरसोय सोसायला लागूनही निमूट राहतो, कारण, त्याचं रक्त सोयीसुविधांच्या अभावावर उसळत नाही, ते धार्मिक विद्वेष पसरवणार्या बनावट व्हॉट्सअप फॉरवर्डनेच खवळतं. त्याला बेस्ट नव्हे, वर्स्ट सेवाच मिळणार, तीच त्याची योग्यता आहे.
□ मुंबईत एकाही वाईन शॉपमध्ये एआय कॅमेरे नाहीत; अल्पवयीन मुलांना सहजपणे मद्य उपलब्ध.
■ महसूल वाढवण्यासाठी काहीही सकारात्मक करण्यासारखं आहे का आपल्या राज्य सरकारकडे? समाजाला कसल्या ना कसल्या गुंगीत ठेवणं हेच त्यांना जमतं… त्यात पुन्हा एखाद्या नशेतून सरकारला पैसाही कमावता येत असेल, तर प्रॉब्लेम काय!
□ रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नुकसानभरपाईचा नऊ कोटींचा प्रस्ताव तीन महिन्यांपासून धूळ खात.
■ ते गेले लाडक्या बहिणींना १५००-१५०० वाटण्यात. तुम्ही काय लाडके भाऊ आहात का?
□ नवी मुंबईत सिडकोचा घोटाळा; जमीन वनविभागाची, एक हजार कोटींचे भूखंड दुसर्यालाच.
■ तो दुसरा कोण आहे ते पाहा, तो कोणाचा कोण आहे ते पाहा, तो कोणाच्या कोणाचा कोण आहे ते पाहा… क्रोनॉलॉजी समजून घ्या… एका कामात सगळे विभाग आणि त्यांचे प्रमुख एकमेकांना मनापासून साथ देतात… कोणते काम ते सांगायला हवे का?
□ माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? शिवसेनेच्या संरपंचाचा उरणमध्ये पोलिसांना सवाल.
■ तुमच्याकडचा वाल्मीक कोण आणि आका कोण, त्यांची पॉवर किती, यावर ते अवलंबून आहे सरपंच साहेब, सांभाळून राहा…
□ कल्याणमधील विशाल गवळी मनोरुग्ण सर्टिफिकेट दाखवून जामीनावर सुटायचा; पाच मुलींचे आयुष्य बरबाद केले.
■ मनोरुग्ण होता, इतके गंभीर गुन्हे करत होता, तर मनोरुग्णालयात कसा डांबला गेला नव्हता? त्याला सर्टिफिकेट देणारे लोक कोण आहेत? या गुंडाची दहशत कुणाच्या आशीर्वादाने आहे?
□ धनंजय मुंडेंचे नाव न घेता बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप; महादेव अॅचपद्वारे एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार.
■ ९०० कोटींचे अधिकृत, खात्यातून होणारे व्यवहार असतील, तर खात्याशी संबंधच न येणारे व्यवहार किती आणि केवढे असतील?
□ लाडक्या बहिणींमुळे शिक्षकांचा पगार रखडला…
■ आता लाडके शिक्षक योजना आणा, त्यांना पगार देण्यासाठी इतर कोणाचे तरी पगार थकवा… याची टोपी त्याला, त्याची टोपी आणखी कुणाला… फिरवाफिरव करत राहायचं… जनतेला टोपी घातलीच आहे पाच वर्षांसाठी.
□ ठाण्यात लाचखोर कार्यकारी अभियंत्याला अभय; लिपिकावर मात्र झडप.
■ इथे मच्छीमारीच्या उलटा प्रकार चालतो, अशा जाळ्यांमध्ये छोटे मासेच अडकतात, मोठे मासे अलगद सुटत असतात… छोट्या माशांनी याचा विचार करायला हवा आधीच.