तो तरुण तिशीतला. बीएससी पदवीधर. दर साल दर हंगाम स्पर्धा परीक्षा फीचं धर्मदान करण्याचं पदरी पुण्य! तशी विज्ञान विषयाचा कंत्राटी शिक्षक म्हणून काही खाजगी संस्थांत सेवा केलेली! पण मेवा संस्थाचालकांनीच खाल्लेला. मग करणार काय? तर जवळचा मित्र म्हणाला, केस झडण्याआधी नोकरी आणि छोकरी मिळवली पाहिजे. काही खाजगी बँकांमध्ये एमबीए झालेल्या तरुणांना सरळ भरतीनं मॅनेजर करतात. पण द्विपदवीधर असणं ही गरज आहे. मग त्यानं तीन वर्षांपूर्वी एमबीए केलेलं. त्यादरम्यान अनुभवासाठी गावच्या पतसंस्थेत कर्जवसुली करायला नि पावती फाडायला जाऊन बघितलेलं. पण तीन वर्षांत मिळालं कागदांचं देणं. एक डिग्रीचा, दुसरे पावतीपुस्तकांचे!
नाही म्हणायला यंदा नामदार झालेल्या रावानं प्रचाराच्या मोसमात सगळ्या बेरोजगारांना नोकर्या देण्याचं गाजर फेकलं होतं आणि कुणी मतं न देताही राव ईव्हीएम कृपेनं दणदणीत विजय मिळवून निवडून आल्यावर निराशेने नि नाईलाजाने चारसहा पोरं त्याच्यासह रावांच्या ‘विला’ वर गेलेली आणि आश्वासनांचं गाजर प्रत्यक्ष दिसतंय कसं, याचा अदमास घेऊ लागली. पण रंगलेल्या मैफलीत पीएकडं बघून राव एवढंच म्हणाले, ‘यांना फॅक्टरीत घ्या!’ कुत्र्यानं भाकर आणि रावांच्या दारात उभारलेल्या गरजूनं मिळालेलं आश्वासन निमूट झेलून बाहेर पडायचाच शिरस्ता! त्यानं आणि त्याच्या सहकार्यांनी देखील तो मोडला नाही.
तशी सगळ्यांची अपेक्षा डिर्ग्यांच्या कागदांची लाज राखली जावी अशीच होती. त्यावर बहुतेकांनी इमलेही बांधले होते. पण फॅक्टरी निघाली बिअरची. तंत्रज्ञ, लिपिकाच्या अपेक्षेने गेलेल्यांना काम मिळालं बाटलीला बुचनं लावायचं! पण सांगायचं कुणाला आणि बेकार फिरायचं किती दिवस? गपगुमान सकाळी डबे बांधून आता ती पोरं बिअर फॅक्टरीत जाऊ लागलीत.
त्या युवकाच्या घरची परिस्थिती बेताचीच! आज्याच्या काळात गावात घर होतं, वाटपात दुसर्याला मिळालं. मग आजा त्याच्या बापासह नटमोगर्याच्या घरात भाड्यानं राहू लागला. त्या तश्या जुन्या वाड्याच्या खोल्या! पण गाव वाढत गेलं. ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली. घरपट्टी-पाणीपट्टी पटीपटीनं वाढत गेली. उत्पन्नाचा खर्चाशी मेळ बसेना. मग बापानं कंटाळून दोन वर्षाआधी शेतात रहायला जायचा निर्णय घेतला. तात्पुरतं पत्र्याचं खोपटं बांधलं आणि अख्खा कुटुंबकबिला मळ्यात नेला. नाही म्हणायला बापानं आवास योजनेचा फॉर्म भरलेला. किमान एक पक्की खोली पावसापाण्याची बांधून मिळंल ह्या आशेने! पण हाय! तो फॉर्म फाईल बनून कुठल्या तरी टेबलवर ‘ओल्या’ हातांसाठी अडलेला!
त्याच्यात बरोबरच्या पोरांची लग्नं झाली. ती चौबल शीट मोटारसायकलवर दात निचकीत फिरताना दिसली का पोटात खड्डा पडतो. घरच्यांना ते कळत नाही, असंही काही नाही. भाऊबंद, काके-मामे आणि झाडून सार्या नातेवाईकांना त्यांनी फोन करून-करून हैराण केलेलं. त्याच्यात आधी नोकरीचा इश्शु होता. पण फॅक्टरीत लागल्यावर किमान सांगायला तरी तो प्रश्न सुटलेला. त्यात मागं एक माळकरी घरातलं स्थळ सांगून आलेलं. पण ऐन बघायच्या कार्यक्रमात पोरीच्या काकानं पाटावर बसलेल्या त्याला विचारलं, ‘सध्या काय करता?’ तर पांडुरंगाच्या भेटीचा धावा करणार्या खाटेवरल्या आज्जीनं निमूट पडावं ना? नाही! ती मधीच बोलली, ‘हां जातो दारूच्या फॅक्टरीत बुचनं लावायला!’ बस्सं मोडलं ते!
आज असंच मावस चुलत्याच्या साल्याच्या भाऊबंदात कुणी पोर असल्याचा निरोप आलेला. मग काय? तिकडून फोन आला तसा गडी पहाटेच उठलेला. तसं पहाटे उठायचं हे काय एकमेव कारण नाही! मळ्याच्या वस्तीला पहाटेच लाईट जाती. त्यामुळं पेयचं अन् वापरायचं पाणी भरायला अख्ख्या मळ्याला पहाटीच उठावा लागतं. त्यामुळं तो उठलाय. तसं अख्ख्या राज्यात कुठं लोडशेडिंग नाही. पण वायरमन भारी म्हणतो, ‘हे अनऑफिशियल आहे. वरनं सांगताय का मोठं मेजर काम चालुय म्हणून लाईट बंद केली असं सांगत जावा, असे निरोप आहे.’ अन् रोज काहीएक घंटे फिक्स लाईट जातीच! असो! त्यानं उठून पाणीबिणी भरून अंघोळ केली. बरेमाठे कपडे घातले. मोटारसायकलवर बसला, हलवून बघितली तर टिपूस नाही. याचा अंदाज आलेला. मग केली गाडी कानी! आणि नेली पंपापर्यंत. तिथं गंज दोनशेचं पेट्रोल वतलं, पण ते तळालाच वाजतं. अच्छा दिनात टाक्यांची भूक वाढली आहे असं म्हणायचं नि सोडून द्यायचं. तो मनाला समजावतो. निघताना पुढं कोपर्यावरल्या न्हाव्याच्या दुकानात दाढी अन् मिशीला कट मारायला थांबतो. सोबत कपाळावरला गोंडापण तुर्यासह नीट करतो. ते कारागीर पोर तेव्हढ्या कर्तबीचे एक नोट घेतं. तो बाहेर येतो. मोटरसायकलच्या आरश्यात पहात किक मारणार तोच मोबाईल मेसेजच्या नोटिफिकेशननी किंचाळतो. ही नवी स्टाईल. तो पटकन बघतो. ‘विसरला नाहीस ना आपला संकल्प?’
तो नंबर पुनः पुन्हा बघतो. नेमका हा मेसेज कुणी पाठवला असंल? काकानं-मामानं-आत्यानं-आज्यानं-मावश्यानं? तो जोर देऊ-देऊ आठवू लागतो. तो नंबर कुणाचा आहे हे नेमकं शोधायला सर्च मारणार तर फोन स्विच-ऑफ होतो. रात्री मोबाईल चार्जिंग करून ठेवायची आठवण होती कुठं? नव्या स्थळाच्या कल्पनेनंच मन पार हुरळून गेलं होतं न्ाा? त्याचं डोकं गरम होतं. आता अख्ख्या गावात कुणाकडं लाईट नाही. करायचं काय? नंबर काढायचा कसा? किमान कॉल करून नाव विचारता आलं असतं. पण आता तीही सोय नाही. त्याच डोकं तडतडतं. बरं! असा मेसेज कोण पाठविल नेमकं? ‘विसरला नाहीस ना आपला संकल्प?’
एकाएकी त्याला आठवते एमबीएच्या सेकंड इयरची सुमी! हा तीच! ठसकेबाज बांध्याची मूर्ती! नाक चाफेकळी, डोळे लांडोरीगत! ओठ….? आता आठवत बसावं का? नाही! त्यानं तड लागायची कशी? तिनं तसं तेव्हा एक लेटर दिलं होतं. पण गावातून मळ्यात सामानसुमान हलवायच्या गर्दीत ते वाचायचं राहिलं. ते कायमचंच! काय लिहिलं असंल तिनं? काही इजहार? काही संकल्प? त्याला उमगंना! काय करावं? स्थळ बघायला जावं? का ते लेटर शोधावा?
‘सोडलं चाल!’ तो स्वतःशीच पुटपुटतो. ‘अशी ५६ स्थळं सुमीवरून ओवाळून टाकीन. काय?’ म्हणत तो किक मारतो. पण आता ते लेटर असंल कुठं? तेव्हा ते घेतलं, घरी आणलं. पण सामान हलवायच्या नादात घाईनं ते शेरोशायरीच्या वहीत, अलिया-कियाराच्या बोल्ड फोटोबरोबर ठेवलेलं. ती वही? नटमोगर्याच्या खोलीत? बहुतेक कोनाड्यातल्या कप्प्यात तळातल्या फळीखाली फटीत ठेवली असावी वा ढाब्याच्या फळ्यांत कुठंतरी सारलेली असावी, हा त्याचा तर्क! मग काय? गाडीनं दिशा पकडली नि वेगही!
तो पोहचतो नटमोगर्याच्या पडीत खोलीपुढं. पण दार उघडंच! तो सावधपणे आत जातो तर आई स्वयंपाक करण्याच्या जागेवर मागे सांधीकोंदयात काही शोधताना दिसते. तो दबकतो. पण धीर एकवटून आईला विचारतो, ‘काय शोधते?’ एकदम आलेल्या प्रश्नाने आई घाबरते, गडबडते. मागे बघते तर तो! ती चाचरत फक्त एवढंच बोलते, ‘अरे तपकिरीची पितळी डबी शोधतीय. बरेच दिवस झाले, इथं राहिली असंल तर बघते.’ बोलता बोलता ती तपकिरीच्या डबीतून तपकीरीचं बोट नाकाला लावते नि पुन्हा काही शोधू लागते. पुढं झाल्यावर मागल्या दाराला काका काही खुडबुड करताना दिसतो. काकाला हटकल्यावर तो चाड शोधत असल्याचं उत्तर देतो, शोधत मात्र जुन्या तिजोरीच्या जागेवर असतो. त्यांची शोधाशोध बघून तोही वहीच्या शोधात लागून जातो. तितक्यात चुलती येते आणि त्यालाच हटकते, ‘काय शोधतोय रे? आणि मुलगी बघायला गेलास नाही ते?’ चपापून तो फक्त एवढंच बोलतो, ‘ते बेल्ट शोधतोय, पॅन्ट ढघळ आहे ना? आणि तू काय शोधायला आलीस?’ एकूण एक अंदाज बघून तो प्रश्न करतो. आता वेळ चुलतीवर! ततपप करत ती चपला शोधायचं कारण देते. देव्हारा ठेवण्याच्या जागेवर उभं राहून! बघता बघता अख्खं कुटुंब येतं! पोकळं कारणांच्या नावाने पडीक खोली धुंडाळत बसतं.
तोच एक दहाएक वर्षाचं कुपोषित व्याधीग्रस्त पोरगं अचानक आत येतं. आल्यावर ते किंचित हसत बोलतं होतं, ‘ओळखलंत? नसेलच.’ नाहीच्या चालीवर माना हलतात. ‘मी तोच ज्यासाठी ज्याच्या भविष्यासाठी तुम्ही अकरा वर्षांपूर्वी मतं दिली होती. नवा भारत! सत्तर वर्षांच्या सशक्त, सुदृढ आजोबाकडे असहायतेने बघतोय. तुमच्या तीन चुकांमुळे माझ्यात आणि माझ्या आधीच्या पिढ्यांत हे अंतर तुम्ही तयार केलंत! मी आज अगदी अशांत, उद्विग्न आणि व्यक्ती नि समूह द्वेषाने पछाडलोय की डोळ्यांवरल्या पापण्यांत उद्याची स्वप्नं फुलवण्याऐवजी मी परधर्माबद्दल विखार, परजातीबद्दल द्वेष, परस्त्रीबद्दल वासना पेरतोय. भ्रष्टाचाराने मला पोखरलंय. मला अराजकाची ओढ लागलीय. अनागोंदी खुणावतेय. उन्मादाने झिंगलोय. व्यक्तिस्तोमाने मी ठार आंधळा झालोय. मला यातून बाहेर काढाल का?’
सगळ्यांच्या माना होकारार्थी हलतात. ‘मग माझ्यासाठी संकल्प करा! ‘शक्य त्याप्रकारे जुलमी राजवटीला, त्याच्या धोरणांना विरोध कराल! आणि येणार्या हरेक निवडणुकीत उद्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान कराल!’ काय विसरणार नाहीत ना आपला संकल्प?’
ते दहाएक वर्षांचं पोरगं त्यांच्या आणि तुमच्याही उत्तराच्या प्रतीक्षेत आहे…