गोष्ट १९९३ सालची… तेव्हा मी सांगोला पोलीस स्टेशन इथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत होतो. एक दिवस नाझरे पोलीस आऊटपोस्टच्या हद्दीत एक इसम हरवला असल्याची खबर आली. त्याचे वय ४० होते. त्याचा तपास पोलीस आऊटपोस्ट हवालदार यांनी सुरू केला. मिसिंग इसम शामकांत तांबोळी (नाव बदलले आहे) याचे सर्व मित्र, नातेवाईक यांच्याकडे तपास केला, परंतु त्याचा काहीच ठावठिकाणा मिळाला नाही.
हा तपास सुरू असताना एक माहिती मिळाली. काही दिवसांपासून तांबोळी याचा जमिनीच्या हद्दीवरून भाऊबंदांशी वाद आहे. हा धागा पकडून आम्ही आणखी बारकाईने तपास सुरू केला, तेव्हा असे समजले की, चार ते पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी त्याचा चुलत भावाला दिलीप तांबोळी या एका भाऊबंदाच्या शेतातील वस्तीवरून रात्री आठ साडेच्या सुमारास ओरडण्याचा आवाज आला होता. पण तो कोणाचा होता, कोणाची कसली मारामारी चालली होती, ते कळलं नाही. याची काहीच माहिती मिळाली नाही. दिलीपचा आणि मयताचा वाद होता, ही माहितीही मिळाली. यांच्यामध्ये वाद झाला त्या दिवशी दिलीपचा मिलिट्रीतून नुकताच रिटायर झालेला मेव्हणा मोहन पण आलेला होता. ही भांडणे झाली त्याच्या दुसर्या दिवशी सकाळीच तो गायब झाला होता.
याबाबत पोलीसांनी दिलीपकडे विचारणा केली तेव्हा तो भांडण झाल्याचे काहीच सांगेना तसेच मोहन आल्याबद्दल त्याने चकार शब्दही काढला नाही. हे सारेच संशयास्पद असल्याने हा संपूर्ण तपास मी माझ्याकडे घेतला. मिल्ट्री मॅन असणार्या मोहनला त्याच्या गावात जाऊन पकडून आणले होते. दोन दिवस त्याची सखोल विचारपूस करण्याचा कार्यक्रम सुरू होता. पण तो काहीच बोलत नव्हता, अखेरीस आमच्या ‘प्रेमळ कार्यक्रमा’पुढे मोहनने शरणागती पत्करली. त्यानंतर त्याने खरी हकीकत सांगायला सुरुवात केली.
त्या रात्री शामकांत दिलीपच्या मळ्यातील वस्तीकडे यायला निघाला, तेव्हा वस्तीपासून एक किलोमीटर अलीकडे पांदीमध्ये (खोलगट रस्ता) त्याची गाठ पडली. तेव्हा शामकांतने दिलीपला बांध कोरण्यावरून आणि सामायिक विहिरीतील पाणी ठरल्यापेक्षा जास्त वेळ घेण्याबाबत तक्रार केली. मिल्ट्री मॅन मोहनने बरोबर रमच्या बाटल्या आणल्या होत्या. नुकताच दोघांचा ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ होऊन ते दारूच्या नशेत होते, झाले शब्दाला शब्द भिडला आणि एका क्षणात भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघांनी मिळून शामकांतला लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यावेळी तो ओरडत होता. रात्रीच्या शांततेत तोच आवाज शेजारच्या लोकांनी ऐकलेला होता. या मारहाणीतच शामकांतचा जागेवर मृत्यू झाला.
प्रेत कुठे टाकले? असे विचारता मोहनने सांगितले की त्याने व दिलीपने प्रेत पोत्यात घातले आणि सायकलवरुन नाझरे फाट्यावर आणले. तेथे लोक नेहमीच भाजीपाला पोत्यात घालतात आणि तेथून ट्रक किंवा टेम्पोने मिरज किंवा सांगलीला बाजारात जाऊन विकतात. त्यामुळे शंका येण्याचे काही कारण नव्हते. सांगलीला जाणार्या एका ट्रकवर त्यांनी ते पोते टाकले व सांगलीच्या जवळ आयर्विन ब्रिजजवळ ते उतरले. पावसाचे दिवस असल्या कारणाने कृष्णामाई दुथडी भरून वाहत होती. कृष्णा नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ आहे, तसेच नदीचे पात्र फारसे रूंद नसल्याने पाण्याची पातळी वाढलेली असते. आयर्विन ब्रिजच्या जवळून त्यांनी ते पोते पाण्यात ढकलले व तेथून ते नाझरे फाट्याजवळ परत आले. नाझरे फाट्याच्या जवळ एका नाल्याच्या पुलाखाली त्यांनी सायकल लपवून ठेवलेली होती, ती काढली व तेथून ते दिलीपच्या घरी परत आले. लागलीच मोहन तेथून त्याचे सांगली जिल्ह्यातील त्याच्या गावी आला.
गुन्ह्यात वापरलेली सायकल ताब्यात आम्ही घेतली, तेव्हा सायकलच्या फ्रेममध्ये पोत्याच्या तागाचे बारीक धागे मिळाले. म्हणजेच त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा मिळाला होता. प्रेत ज्या ठिकाणी टाकले त्या जागेचा तपास करावयाचा होता. आरोपींना अटक केली, सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतली. आरोपी मोहनला घेऊन येथून प्रेत टाकले ती जागा पाहिली, तेव्हा मोहन सांगत असलेली प्रत्येक गोष्ट मला पटली होती. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला होता. या सार्याचा पंचनामा झाला होता. कृष्णा नदी, वर सांगितल्याप्रमाणे फुल फोर्समध्ये सुसाट वाहत होती. नदीच्या आजूबाजूला पंचवीस तीस गावात तपास केला. गावोगावी दवंडी देण्यासाठी संबंधित पोलीस व पोलीस पाटील यांना पत्र दिले. परंतु नदीच्या प्रवाहाचा वेग बघता प्रेत असलेले पोते कितीही लांब जाऊ शकणार असल्याने प्रेत सापडले नाही. त्यामुळे गप्प बसलो.
सारे व्यवस्थित चालले होते. कागदपत्रे बनवणे जवळजवळ संपत आले होते. आरोपींच्या पोलीस कस्टडीची सात दिवसांची रिमांड संपण्याच्या आदल्या दिवशी रात्री, लॉकअप गार्डच्या पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले की, आरोपी मोहनला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. म्हणून रात्री १० वाजता मी पोलीस स्टेशनला परत आलो. आरोपी मोहनला बाहेर काढले त्याला माझ्याशी एकांतात बोलायचे होते, म्हणून रूमचे दार लावले. तो म्हणाला, ‘साहेब तुम्हाला मला एक लाख रुपये द्यायचे आहेत, ते मी जामीनावर सुटलो की देतो.’ यावर मी त्याला पैसे नकोत असे सांगितले परंतु तो एेकायला तयार नव्हता. उलट आणखी असे म्हणाला की उद्या जरी पोलीस कस्टडी रिमांड मिळाला, तरीही जमीन कोणाकडे तरी गहाण ठेवतो आणि तुम्हाला पैसे देतो. हे ऐकल्यावर मी मोहनला लॉकअपमध्ये ठेवण्यास सांगितले आणि या तपासात महत्त्वाचा रोल बजावणारे पोलीस आऊटपोस्टचे लान्स नाईक स्वामी यांना बोलावून घेतलं. त्यांना हकीगत सांगितली. आमची बराच वेळ चर्चा झाली पण काही समजेना.
कारण आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली होती, आरडाओरडा ऐकणारे साक्षीदार मिळालेले होते. प्रेत वाहून नेलेली सायकल मिळाली होती. तिच्या बॉडी फ्रेमवर तागाचे धागे मिळाले होते. प्रेत येथून ढकलले ती जागा आरोपींनी दाखविलेली होती. ज्या लाकडी दांडक्याने मारहाण केली ते आरोपींनी काढून दिलेले होते. त्याच्यावर रक्ताचे डाग व केस मिळून आलेले होते. तपास जवळजवळ ९९ टक्के संपल्यात जमा होता.आणि हा मिल्ट्री मॅन न मागता पैसे का देत होता? तेही एवढी मोठी रक्कम, आणि तेही जमीन गहाण ठेवून? हे सगळे ऐकून हे काय घडतंय या विचाराचा किडा डोक्यात वळवळत होता.
घरी आलो झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या झोप येईना. म्हणून एक तासाभराने पुन्हा पोलीस स्टेशनला परत आलो, लान्स नाईक स्वामींना बोलवून घेतले. म्हणालो, काहीतरी घोळ आहे. आपण आरोपीला कोणतीही मदत केलेली नसताना तो पैसे का ऑफर करतोय, कुठेतरी पाणी मुरतंय, त्याला बाहेर काढल्याखेरीज सत्य उजेडात येणार नाही. म्हणून त्या आरोपी मोहनला पुन्हा बाहेर काढले पुन्हा विचारपूस सुरू केली. पण काही कळेना, उमगेना… डोके सुन्न झाले होते. त्याला पुन्हा पुन्हा त्याला विचारले, ‘कशा करता पैसे देतोय?’ तर म्हणाला, ‘तुम्ही तपासात आम्हाला त्रास दिलेला नाही म्हणून.’
पुन्हा विचार सुरू…
अरे, आपण आरोपींना अटक केली. त्यांचा व्यवस्थित प्रेमाने ‘कार्यक्रम’ करून विचारपूस केली आणि हा म्हणतो की त्रास दिला नाही. हे काय कोडे आहे? पुन्हा एकदा आरोपी मोहनकडे ‘अति प्रेमाने आणि कौशल्याने’ एक ते दीड तास विचारपूस केल्यावर त्याचे तोडून खरी हकीगत बाहेर आली.
त्याने सांगितलेली ७५ टक्के हकीकत खरी होती, म्हणजे प्रेत पोत्यात घातले, सायकलवर टाकले इथपर्यंतची हकीगत बरं का! परंतु त्या पुढची हकीकत ऐकून मला शॉकच बसला. या दोघांनी ते प्रेत सायकलवरून सांगलीला न नेता आटपाडी तालुक्यात माडगुळेला (सुप्रसिद्ध कवी, लेखक, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांचे गाव) नेले. (माझ्या मनात अनेक दिवसांपासून आपण आधुनिक वाल्मिकीच्या कर्मभूमीत जाऊन तिथली माती कपाळाला लावावी अशी इच्छा होती. पण कामाच्या व्यापातून ते जमत नव्हते. हा माझा मानस अशा प्रकारे पूर्ण होईल, असे माझ्या स्वप्नातही आले नव्हते.) माडगुळ्यात गावाबाहेर एका वेड्या बाभळीच्या (चिलारीच्या) रानात खड्डा खणला व प्रेत तेथे पुरले असल्याचे त्याने सांगितले.
पुन्हा नव्याने तपास सुरू केला. तहसीलदार सांगोला, तहसीलदार आटपाडी (माडगूळ गाव आटपाडी तालुक्यात येत असल्याने) यांची परवानगी घेतली आणि आरोपींनी दाखविले ठिकाणी दोन पंचांसमक्ष खोदकाम करून डेडबॉडी बाहेर काढली. प्रेत डिकंपोझ झाले असल्यामुळे जागेवरच त्याचे पोस्टमॉर्टेम झाले.
वास्तविक पाहता खुनाच्या गुन्ह्यांमध्ये जोपर्यंत डेडबॉडी मिळत नाही तोपर्यंत तपासाला तसा काही अर्थ नसतो, गुन्हा शाबित करणे कठीण असते. आणि या केसमध्ये डेडबॉडी मिळालेली नव्हती. ती कृष्णा नदीचे पाण्यात टाकल्याच्या कथेवर माझा विश्वासही बसला होता. परंतु लॉकअपमध्ये असलेल्या आरोपी मोहनच्या मनात मात्र भलतेच विचार चालले होते, ‘साहेब या स्टोरीवर कायम राहतील की नाही, की पुन्हा तपास करतील…’ या वैचारिक द्वंद्वाच्या पोटी त्याला हे पैसे देण्याचे सुचले होते.
प्रेत मिळाले नसल्याने मी स्वत: परेशान होतो. पण विचार करीत होतो की, आपण नैसर्गिक तपास केलेला आहे, कोर्टात आरोपींना बहुधा शिक्षा लागेलच. आरोपी मोहनने पैसे देण्याची ऑफर मला दिली नसती तर प्रेताचे सत्य उघडकीस आले नसते आणि आरोपींना कोर्टात सुटण्यासाठी त्याचा फायदा झाला असता. पण म्हणतात ना, कितीही हुशार आरोपी असला तरीही तो काहीतरी चूक करतो, पण ते समजण्यासाठी तुम्ही संवेदनशील असायला हवे.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)