सिंगापूरच्या सरकारनं तिथल्या लोकसभेत नुकताच एक कायदा तयार केला. अन्नपदार्थ विकणार्या टपर्यांवर अस्वच्छता करणार्या गिर्हाईकांना १८ हजार रुपये (३०० सिंगापूर डॉलर) दंड केला जाईल. हा कायदा १९६०पासूनच अस्तित्वात होता, त्याला सरकारनं नवं रूप दिलं, दंडाची रक्कम वाढवली आणि पहिल्या गुन्ह्यापासूनच शिक्षा केली जाईल, अशी तरतूद केली. पूर्वी पहिल्यांदा गुन्हा करणार्याला कमी शिक्षा असे आणि पुन्हा गुन्हा केला तर जास्त दंड केला जात असे.
सिंगापूरमध्ये खाऊ गल्ल्या आहेत. तिथं पदार्थ तयार करून विकणार्या टपर्या (स्टॉल्स) असतात. स्वच्छतेचे नियम पाळण्याचं बंधन टपर्यावर असतं, सरकार टपर्यांना परवाने देतं. या खाऊ गल्ल्यामध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत, कायदा मोडणार्यांवर लक्ष ते ठेवत असतात. या पोलिसांची संख्याही वाढवण्यात आलीय, कारण पंचवीस तीस टक्के लोक कायदा पाळत नसतात, असं सरकारच्या लक्षात आलं.
इथे माणसं पदार्थ घेऊन टेबलावर बसतात. खाऊन झाल्यावर बशा, ग्लासेस, चमचे इत्यादी टेबलावरच ठेवून निघून जातात, टेबलावर खरकटं सांडलेलं असतं. तसं आढळलं की पोलीस पकडतात. माणसं जेवताना हाडं, एखादा तोंडात आलेला कठीण पदार्थ, न आवडलेला पदार्थ तोंडातून काढतात आणि बाजूला टाकतात, थुंकतात. पोलीस त्यावर लक्ष ठेवतील. काही लोक बिनधास्त ताटात हात धुतात, टेबलाच्या बाजूला हात धुतात. पोलीस त्यावर लक्ष ठेवतील.
साधारणपणे चांगल्या हॉटेलात असले घाण उद्योग लोक करत नाहीत. पण रस्त्याच्या कडेला, टपरीवर अशी वर्तणूक घडताना दिसते. सिंगापूरमध्ये टपर्यांची संख्या नॉर्मल हॉटेलं, रेस्टॉरंट यांच्यापेक्षा जास्त असल्यानं तिथं या कायद्याची आवश्यकता जास्त होती. सिंगापुरी लोकांना रस्त्यावर जेवायला आवडतं. मित्र गोळा करायचे, कुटुंबातली माणसं बरोबर घ्यायची आणि टपरीवर जेवायचं ही सिंगापुरी लोकांची संस्कृती आहे.
एकोणिसाव्या शतकात सिंगापूर हे एक बंदर-शहर होतं. दुनियाभरची लोकं तिथं येत असत. बोटी बाहेर बंदरात थांबत, बोटीवरचे लोक जेवाखायला, मस्ती करायला शहरात येत. त्यांची सोय करण्यासाठी लोकांनी पदार्थांच्या टपर्या (स्टॉल्स) लावले. येणारी माणसं सर्वसाधारण असत, गरीब असत, त्यांना स्वस्त अन्न हवं असे. खायला येणारी माणसं चिनी, मले, भारतीय, वियेतनामी, थाई अशा नाना प्रकारची असत. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या टपर्या लोकांनी लावल्या.
टपरीवर उभं रहायचं. टपरीला एक लाकडी फळी लावलेली असते. त्यावर पदार्थ ठेवायचा आणि उभ्या उभ्या खायचा. टपरीच्या बाजूला थोडीशी जागा असेल तर तिथं घडीचं टेबल आणि घडीची खुर्ची लावली जायची. बकाबका खायचं, जायचं. चिनी आणि थायी पदार्थांची संख्या जास्त. नूडल्स, मोमो, नूडल सूप. चिकन आणि पोर्क. नूडल्स हे भारी प्रकरण. त्यात काहीही मिसळता येतं. चिकन घाला, पोर्क घाला, भाज्या घाला नाही तर त्याचं सूप करा. नूडल्सच्या हज्जारो रेसिपी असतात.
चहा नावाची चीज सर्वांना समान आवडीची. परंतु प्रत्येक देशाची चहाची चव वेगळी. चिनी, कोरियन, जपानी लोक वेगळा चहा पितात. त्यात दूध नसतं, कसलासा पाला असतो. थाय लोक दुधाचा चहा पितात. भारतीय लोकांचं तर विचारायला नको. नाना मसाले भारतीय लोक वापरतात. आलं, दालचिनी, मिरी, इलायची. सिंगापूरमध्ये गुजराती आणि मारवाडी लोक फारसे नाहीत. त्यामुळं तिथं मसाला चहा, उकाळा मिळत नाही. तर चहाच्या टपर्या खूप. एका मगमध्ये चहा उकळायचा आणि हवेत चार पाच फूट उंचीवर नेऊन तो खालच्या मगमध्ये ओतायचा. मग त्या चहाला फेस येतो. चहा ओतण्याचं कसब प्रत्येक टपरीवर वेगवेगळं असतं.
एकोणिसाव्या शतकात सिंगापूरच्या गल्लोगल्ली टपर्या होत्या, चारचाकी हातगाड्या होत्या, खांद्यावरच्या कावडी होत्या. आरोग्याची ऐशी की तैशी होती. साधारणपणे ली कुआन यू पंतप्रधान झाले तेव्हापासून सिंगापूरला शिस्त लागू लागली. शहरं नीट ठेवली जाऊ लागली, स्वच्छ ठेवली जाऊ लागली. रस्त्यावर कचरा टाकणार्या माणसाला दंड होऊ लागला. अन्नपदार्थ विकणारी टपरी स्वच्छ असायला हवी, असं ली कुआन यांना वाटलं. टपरी बंद तर करता येत नाही. एकेकाळी टपरी लोकांची गरज होती आणि कालांतरानं ती सिंगापूरची संस्कृती झाली. माणूस गरीब असो वा श्रीमंत, सिंगापूरमध्ये आठवड्यातून एकदा तरी टपरीवर जाऊन खायला त्याला आवडतं.
टपरीवरचे पदार्थ हेही एक खास सिंगापुरी प्रकरण झालं होतं. पदार्थ तयार करणारे लोक खूप क्रिएटिव्ह होते, त्यांनी चिनी, भारतीय, थायी इत्यादी पदार्थांची नाना रूपांतरं केली. सिंगापूरमधली बहुढंगी बहुसांस्कृतिक जनता खायला बसते, तेव्हा तिला टेबलावर नाना प्रकारचे पदार्थ लागतात. टपर्यांनी चव लोकांनी तयार केली, लोकांची चव टपर्यांनी तयार केली. दुतरफा मामला.
ली कुआन यांनी शिस्त लावली. टपर्यांची जागा त्यांनी ठरवून दिली. पाच पन्नास टपर्या एकत्र केल्या, त्यांना एक सामूहिक छप्पर दिलं, त्यांना विजेची सोय करून दिली, पाण्याचे पाईप दिले, बशा-ग्लासेस इत्यादी टाकण्यासाठी व्यवस्थित आखून जागा ठरवून दिल्या. टपरीला लायसन्स दिलं, ज्याला कोणाला टपरी उघडायची असेल त्यानं ठरवून दिलेल्या जागेतच टपरी उघडायची.
साधारणपणे एखादं जोडपं टपरी चालवतं. एकाद-दोन नोकर असतात. त्यांना सरकारनं प्रशिक्षण दिलं, बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं आणि स्वच्छता कशी पाळायची तेही शिकवलं. सरकारनं टपरी विभाग तयार केले. गेल्या वर्षी सरकारनं २४ नवे टपरी विभाग तयार केलेत. तरुण मुलाला अन्न टपरीचा व्यवसाय करावासा वाटतो. तो तरुण सरकारकडे अर्ज करतो. सरकार त्याला प्रशिक्षण देतं, सवलतीच्या दरानं कर्ज देतं, पहिले काही दिवस भाड्यात सवलत देतं. काही उद्योजकांचा जथ्था तयार होईपर्यंत सरकार वाट पाहातं आणि मग जशी जागा उपलब्ध असेल त्यात बसतील एवढ्यांना परवानगी देऊन तिथं खाऊ गल्ली तयार केली जाते. सिंगापूरमध्ये १४५ टपरी वस्त्या, खाऊ गल्ल्या, आहेत. त्यात ७००० टपर्या आहेत. साधारण खाऊ गल्लीत २ हजार ते २५०० खादाड बसू शकतील एवढी सोय असते. टपर्या गोळा करून त्यांना एका छपराखाली आणणं ही आयडिया भारी आहे. इस्तंबुलमध्ये एक कव्हर्ड मार्केट आहे. एकाच छपराखालचं मार्केट. त्यात २००० दुकानं आहेत. दुनियेतल्या सर्व गोष्टी त्या मार्केटमध्ये मिळतात. आशियातल्या वस्तू युरोपात जाताना या मार्केटमध्ये थांबतात. युरोपातल्या वस्तू भारत, चीन, इत्यादी ठिकाणी जाण्याआधी त्या मार्केटमध्ये थांबतात. सारं जगच जणू त्या मार्केटमध्ये सामावलेलं असतं. दुकानदारही जगभरचे असतात.
तशाच या सिंगापूरमधल्या खाऊ गल्ल्या. दुनियाभरचे आणि दुनियेत कुठंही न मिळणारे पदार्थ या खाऊ गल्ल्यांत मिळतात. खाऊ गल्ली ही सिंगापूरची सांस्कृतिक खूण आहे असं मानून सरकारनं तिच्यावर नियंत्रण ठेवलंय. सामान्य माणसाला, बाहेरून आलेल्या पर्यटकाला तिथं खाणं परवडायला हवं असे दर तिथं असतात. दुकानात किमान एक तरी पोटभर खाता येईल असा पदार्थ १५० ते २०० रुपयाच्या आत मिळेल अशा किमतीत ठेवायचं दुकानदारावर बंधन आहे.
खाऊ गल्लीत सर्व पदार्थ मिळतात. तिथं अर्थातच पोर्क (डुकराचं मांस) असतं. मुस्लिम पोर्क खात नाहीत. पण म्हणून गल्लीत पोर्क विकायचं नाही असा नियम सरकारनं केलेला नाही, त्यांना हलाल, पवित्र अन्न मिळेल एवढी सोय तिथं आहे.
सिंगापूरमध्ये फिरायला गेलेला माणूस बर्यापैकी हॉटेलमध्ये उतरतो. हॉटेलमधल्या पदार्थांचे दर तो पाहात असतो तेव्हा हॉटेलमध्ये काम करणारा एक साधा कर्मचारी हळूच पर्यटकाच्या कानात कुजबुजतो, ‘बाहेर पडा, अर्धा किमी अंतरावर तुम्हाला खाऊ गल्ली सापडेल. तिथं तुम्हाला हवं तसं अन्न खूपच स्वस्त मिळेल.’
सिंगापूर स्वच्छ आहे. कारण स्वच्छतेचे कडक कायदे तिथं आहेत. तिथं कायदे पाळले जातात. पुढार्याच्या मुलाला, श्रीमंत घरच्या मुलाला एक कायदा आणि इतरांना दुसरा कायदा अशी स्थिती तिथं नाही. सिंगापूर शांत आहे आणि गजबजलेलंही आहे. रस्ते शांत असतात, खाऊ गल्ल्यांत गजबज असते, माणसं मोठ्या आवाजात बडबड करत असतात. गजबज असते पण स्वच्छता मात्र असते. तीच तर सिंगापूरच्या खाऊ गल्लीची गंमत आहे.
– निळू दामले