देशाचे माजी अर्थमंत्री आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं आणि आपण काय गमावलं आहे आणि त्याबदल्यात काय डोक्यावर बसवून ठेवलं आहे, याची जाणीव अजून विचारशक्ती शाबूत असलेल्या काही देशवासीयांना झाली. ज्या प्रकारे आणि ज्या परिस्थितीत मनमोहन सिंगांना सत्तेवरून दूर व्हावं लागलं आणि त्यांच्या नखाचीही सर नसलेल्या माणसांनी त्यांच्यावर ज्या अश्लाघ्य भाषेत टीका केली, ती पाहून ते शांतपणे म्हणाले होते की इतिहास मला अधिक दयाबुद्धीने वागवेल याची मला खात्री आहे… डॉ. सिंग यांना इतिहासजमा व्हायला अजून फार काळ जायचा आहे, पण आजच्या वर्तमानालाच त्यांच्याविषयी हळहळ आणि स्वत:च्या मूर्खपणाविषयी पश्चात्ताप वाटू लागलेला आहे. आपण हिरा फेकून गारगोट्या गोळा करून बसलो आहोत, आता त्यांच्यातून फक्त ठिणग्याच उडणार आहेत. आगी लावण्यापलीकडे गारगोट्यांचा उपयोग काय असतो?
मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून काय केलं आणि पंतप्रधान म्हणून काय केलं, याच्याबद्दल एव्हाना तावच्या ताव भरून लिहून आलेलं आहे. व्हॉट्सअपवर बिनबुडाचे, सत्यापलाप करणारे, अर्धवट माहिती सांगून भ्रम निर्माण करणारे आयटी सेलचे फॉरवर्ड हाच इतिहास मानणार्या अधू मेंदू भक्तांचा अपवाद सोडला तर इतरांना ते नीट माहितीही आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून अमुक बंद, तमुक चालू अशा नाटकी, धक्कादायक आणि मतलबी घोषणा करून आपला मोठेपणा ठसवण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांचा कार्यक्रम अमलात आला असता, तर देश एव्हाना भिकेला लागला असता… देश म्हणजे चार उद्योगपती नव्हेत, देशातला सर्वसामान्य माणूस. मनमोहन सिंग यांच्यासारखा खरोखरच गरिबीतून पुढे आलेला आणि तिचा बाजार न मांडणारा विद्वान अर्थवेत्ता तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेची कमान सांभाळत होता, म्हणून या वैश्विक बदलांना मानवी चेहरा मिळाला. या काळात देशाचा झालेला सर्वांगीण विकास आणि गरिबीतून बाहेर आलेला मोठा समाज ही मनमोहन सिंग यांच्या मोठेपणाचं दर्शन घडवणारी जिवंत स्मारकं आहेत. त्यांचं स्मारक बनवण्यासाठी कद्रू मनाच्या मोदी किंवा भाजपच्या कृपेने ना जागा मिळण्याची गरज आहे, ना भव्यातिभव्य पुतळे उभारण्याची.
मनमोहन सिंग हे काही राजकारणी नव्हते, नेते नव्हते, त्यांची नियुक्ती केली गेली होती आणि ते कुणाच्या तरी आदेशाने काम करत होते, याकडे अंगुलिनिर्देश करून फिदीफिदी हसण्यात एक वर्ग आजही मग्न आहे. आपल्या डोक्याने काय वाट्टेल तो चक्रमपणा करणार्या तुघलकी खाक्याच्या सत्ताधीशाच्या राजवटीत यांची खंक होण्याची हौस पुरेशी फिटलेली नाही. मनमोहन सिंग हे एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत नेमले गेलेले किंवा नेमावे लागणारे पंतप्रधान होतेच; ते राजकारणी नसल्यामुळे आणि सरकार आघाडीचं असल्यामुळे त्यांच्यामागे भरभक्कम राजकीय बळ उभं करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पार पाडावी लागणार होती. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कामात होता होईल तेवढा मुक्तहस्त देऊन त्यांनी ती पार पाडली, हे नमूद करायला हवं. बरं या ज्या दीडशहाण्या साक्षरांना (हे शिक्षित आहेत, असंही म्हणवत नाही, सुशिक्षित तर फारच लांब) ही रचना खटकते, त्यांनी विचार करून पाहावा, मनमोहन सिंगांसारख्या गुणवंत माणसाला निवडून देणारी लोकशाही आपल्या देशात विकसित झाली आहे का? यापुढे ती विकसित होण्यासाठी मुळात शिल्लक राहण्याची गरज आहे. तीच शक्यता आता उरलेली नाही.
एका अपघाताने का होईना मनमोहन सिंग हे देशाला अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून लाभले, हे भारताचं भाग्य होतं. देशातल्या नेहरुवादी परंपरेतले ते स्टेट्समन म्हणण्याच्या योग्यतेचे नेते होते. सगळ्या समाजाचा, खासकरून तळागाळातल्या सगळ्यात शेवटच्या माणसाचा विचार करणारी, धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्थेला (सर्वधर्मसमभाव नामक गोलमाल मांडणीला नव्हे) कटिबद्ध असलेली, सौजन्यशील, ऋजू, उदारमतवादी, दिलदार, उमदी आणि सभ्य राजकीय संस्कृती जपणारे ते पंतप्रधान होते. त्यांनी देशविदेशात कमावलेला आदर कोणाच्या बळजबरीने गळ्यात पडून कमावला नव्हता किंवा एखाद्या महासत्तेच्या निवडणुकीत जाऊन कोणा एकाची तळी उचलून धरण्याचा असभ्यपणा करून मिळवला नव्हता.
त्यांच्या डिगर्या खर्या होत्या, त्यांच्या बालपणीची गरिबी खरी होती, त्यांची गोरगरीबांप्रतीची आणि लोकशाहीप्रतीची कळकळ खरी होती. म्हणूनच मोदी आणि कंपनीने मौनीबाबा म्हणून त्यांना कितीही हिणवलं, तरी त्यांनी कारकीर्दीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पत्रकार परिषदांना सामोरं जाण्याची लोकशाहीतल्या उत्तरदायित्वाची हिंमत ठेवली आणि भाषणं करताना टेलिप्रॉम्पटरवर वाचून भीमगर्जनांचा कंठाळी अभिनय करण्याची गरज त्यांना भासली नाही. तुम्ही लसूण सोलून खाता की तसाच सालीसकट खाता, असले वावदूक प्रश्न त्यांना विचारण्याची हिंमत कधी कोणी केली नाही.
खोल पाणी संथ आणि शांत असतं, वाहत्या पाण्याला खळखळाट फार असतो, हे या देशाला डॉ. सिंग यांच्या निधनाने जाणवलं आणि आपण काय गमावलं आहे, हेही कळलं. भारतीय जनता पक्षाची सध्याची राजवट देशासाठी चांगली नाही, ती देशाला अराजकाकडे घेऊन जाईल, हा त्यांनी दिलेला इशारा खरा ठरवण्याचा चंग त्या पक्षाने बांधलेला दिसतो आहे. २०१४ला झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी जनतेने १० वर्षांनंतरही थोडक्यात गमावली आहे. आता नियतीने काही चमत्कार घडवला तरच काही आशा; अन्यथा डॉ. सिंग केवढे मोठे द्रष्टे होते, हेच सिद्ध होईल.
या संदर्भात तो बहुमान त्यांनाही आवडला नसता.