□ अनिल देशमुख यांचा पेन ड्राईव्ह पुराव्यांसह विस्फोट करणार! – फडणवीसांना उघड आव्हान.
■ कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू?… महाराष्ट्राच्या नव्या गानकोकिळेच्या आवाजात या गाण्याचे रिमिक्स ऐकायला अवघा महाराष्ट्र आतुरला आहे…
□ नोकरी मुंबईत, पण फक्त अमराठींसाठी – अंधेरीतील गोल्ड कंपनीची जाहिरात.
■ मिंध्यांच्या राज्यात सगळा महाराष्ट्र मिंधा झालेला आहे, असा गैरसमज परप्रांतीयांनी करून घेतला असेल, तर त्यांना दोष कसा देणार? इथल्या कंत्राटदारांच्या मुखियाच्या पाठिला कणा तरी आहे का?
□ सुप्रीम कोर्ट अपात्रतेचा पैâसला करणार; मिंधे हादरले – गद्दार आमदारांची हायकोर्टात चुळबूळ सुरू.
■ बैल गेला अन् झोपा केला, अशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवस्था आहे… पण शेवटी न्याय झाला पाहिजे… तो कधी होतो, हे महत्त्वाचं नाही… खरा न्याय मराठी जनतेने लोकसभा निवडणुकीत केला आहे, तोच विधानसभेतही होईल.
□ अजित पवारांना क्लीनचीट देण्यास विरोध करणार्या ५० निषेध याचिका विशेष सत्र न्यायालयात दाखल होणार.
■ इकडे आड आणि तिकडे धरण अशी अवस्था झाली आहे दादांची. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहायचं… काकांची छत्रछाया किती मोलाची होती, हे आता पदोपदी कळत राहील त्यांना.
□ महाराष्ट्रात तब्बल एक लाख मुली, महिलांचा थांगपत्ता नाही – लाडकी बहीण योजनेचा गवगवा; महिला सुरक्षा मात्र राम भरोसे.
■ लाडक्या भावांच्या राज्यात लाडक्या धनवंतांसाठी काय काय उपक्रम राबवले जातात, चालवून घेतले जातात, दुर्लक्षित केले जातात, ते पाहिलं तर या लाडक्या बहिणींचं काय झालं असेल, याचा अंदाज येतो… पण, दीड हजार रुपड्यांत बहिणींची मतं मिळत असतील, तर हे निर्ढावलेले भाऊ कशाला लक्ष देतील?
□ लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढवून भाजप आघाडीने लाटल्या ७९ जागा.
■ ही लाटलेली निवडणूक आहे, चोरलेला जनादेश आहे, हे तर चोरांच्या देहबोलीतूनही दिसून येतंच आहे… हे भांडं कधी फोडायचं ते विरोधकांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे… जेव्हा फुटेल तेव्हा उरली सुरली लाजही गेलेली असेल.
□ मोदी, शहा, फडणवीसांमुळे महाराष्ट्रात गटारी पॉलिटिक्स – संजय राऊत यांचा घणाघात.
■ पण ती दिव्यांची अमावस्या म्हणून खपवतात हे निलाजरे लोक!
□ केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ.
■ केजरीवाल यांच्यावरील सगळे गुन्हे जेव्हा तोंडावर पडतील तेव्हा तथाकथित महाशक्तीला तोंड लपवायला जागा नसेल… अर्थात, त्यांचा आणि लाजेचा काही संबंध नसल्याने ती शक्यता कमी वाटते.
□ ‘आनंदाचा शिधा’ ठरावीक कंत्राटदारांच्याच घशात – अंबादास दानवेंचा आरोप.
■ ही योजना गोरगरीबांसाठी आहे, अशी तुमची समजूत झाली की काय दानवे साहेब… ही योजना आणि सगळ्याच योजना या कंत्राटदार, ठेकेदार यांना आनंदाचा शिधा वाटण्यासाठीच आहेत… फक्त त्यांनी तो वाटून खावा, एवढीच अपेक्षा असते.
□ अदानींच्या तेलवाहिनीला गळती; ऊग्र वासाने उरणकर घुसमटले.
■ अदानींचं तेल आहे ना, मग वास काय म्हणताय? सुगंध म्हणा सुगंध!
□ शहापुरातील अडीच हजार शेतकर्यांना पीक विम्याची फुटकी कवडीही नाही.
■ विमा कंपन्यांची चांदी झाली ना? मग झालं… हे उद्योजकतेला प्रोत्साहन देणारं सरकार आहे… मग ती उद्योजकता बनवेगिरीचीच का असेना!
□ झेडपीच्या शाळांमध्ये रिटायर्ड गुरुजींची वर्णी.
■ गुरुजी आले हे काय कमी झालं?
□ मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; नालेसफाईची पोलखोल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे.
■ या कामांसाठी खर्च झालेले शेकडो कोटी कुठे गेले? वरपासून खालपर्यंत सगळ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले पाहिजेत, त्याशिवाय काही सुधारायचे नाहीत.
□ आमच्या महाराष्ट्राला लुटून नेताय, रोजगार देणार कुठे? – अरविंद सावंत बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर बरसले.
■ रोजगार फक्त आयटी सेलमध्ये मिळणार… थोडीफार भरती कावडिये, गोरक्षक यांची होईल… बाकी सगळ्यांना फक्त थापा आणि ठेंगा!
□ मोदींना महाराष्ट्रातील निवडणुकीची धास्ती; भाजप खासदारांसोबत पंतप्रधानांचे प्रदीर्घ मंथन.
■ या मंथनातून अमृत बाहेर येणार नाही, विषाची पेरणी केलीत, आता विषच येणार, तेच प्यावं लागणार आणि राज्यात मूळ औकातीवर परतावं लागणार… तो देशातही हीच प्रक्रिया सुरू होण्याची शुभसूचक संकेत असेल.
□ दहशतवाद चिरडून टाकणार – कारगिल विजयदिनी पंतप्रधान मोदींचा इशारा.
■ दहा वर्षांत चिरडून चिरडून, इतकी जाहिरातबाजी करून पण तो शिल्लक आहेच… अरेरे, मग थापा कशाला मारता रोज?
□ ‘लाडकी बहीण’ला दादांच्या खात्याचा आक्षेप.
■ दिल्लीतून कळ फिरली की लाडके दादा चिडिचुप्प होतील.