ओबीसींचे आरक्षण त्यातील वाटेकरी याची सगळी पार्श्वभूमी फडणवीसांना माहित नसेल, असे म्हणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. मग आरक्षणावरून हिंदू समाजातील जातींमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होईल, भांडणे लागतील, वाद निर्माण होतील असे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी फडणवीस संघाचे स्वयंसेवक म्हणून शंभर टक्के पार पाडतील अशी अपेक्षा ठेवली तर त्यात काहीच चूक नाही.
– – –
दहा-बारा वर्षांपूर्वी राज्याच्या राजकीय क्षितिजावर देवेंद्र फडणवीसांचा उदय झाला आणि याच कालावधीत महाराष्ट्रातील सामजिक व राजकीय वातावरण टोकाचे गढूळ बनले. दहा वर्षांपूर्वीची फडणवीसांची प्रतिमा आणि आजची प्रतिमा यात जमीनअस्मानाचे अंतर पडले आहे. सोज्ज्वळ, सात्त्विक, चारित्र्यशील नेतृत्व ते सत्ताप्राप्ती आणि बदला घेण्यासाठी पक्ष फोडणारा आणि आरक्षणावरून हिंदूंमधील जाती-जातीत भांडणे लावणारा अशी या नेत्याची प्रतिमा का तयार झाली, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या स्वयंसेवकाच्या प्रतिमेची अशी घसरण का व्हावी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कुणी काही प्रतिकूल मत व्यक्त केले, विरोधातील मुद्दा मांडला किंवा प्रश्न विचारला तर अनेकदा ‘संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेवर या, आतून बघा, वरून बघा, खालून बघा’ अशी उत्तरे दिली जातात. मात्र, सर्वसामान्य सरळमार्गी समाज असल्या गोष्टी करण्यापेक्षा संघाच्या स्वयंसेवकाचे समाजातील बोलणे आणि प्रत्यक्षातील वागणे कसे आहे यावरून संघ कसा असेल याचा अंदाज बांधत असतात. अर्थात संघाचा स्वयंसेवक हा देखील माणूस आहे आणि माणसातील संधीसाधूपणा, सत्तेची-पदांची हाव, अधिकारांचा सोस हे सगळे गुण त्यामध्ये कमीअधिक प्रमाणात असणार. बाकी संघाच्या शाखेवर संस्कार होतात हा एक मोठा भ्रम राजकीय क्षेत्रात काम करणार्या अनेक स्वयंसेवकांनी दूर केलेला आहे. साधी राहणी ते दिवसातून चारवेळा कपडे बदलणारी अलिशान जीवनशैली हा प्रवास कसा घडतो हे जनतेने गेल्या दहा वर्षांमध्ये पाहिलेले आहे. समाजात आयुष्यभर सचोटीने काम करणारी, सामाजिक संवेदनशीलता आणि बांधिलकी असणारी लाखो माणसे या देशात काम करत असतात. हीच हिंदू समाजाला बांधून आणि टिकवून ठेवणारी प्राचीन काळापासूनची मोठी ताकद आहे. आजही असे अनेक निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनाने काम करणारे लोक देशात आहेत. त्यांना प्रयत्नपूर्वक स्वतःशी जोडून घेऊन हाच संघाचा सेवाभावी, विधायक काम करणारा चेहरा असल्याचे ठसवले जाते. जोपर्यंत संघ स्वयंसेवक थेट सत्तेत जात नव्हते, तोपर्यंत हे सगळे खरे वाटण्यासारखी परिस्थिती होती. सत्ता मिळाल्यानंतर अनेक स्वयंसेवकांचा खरा चेहरा आणि वागण्या-बोलण्यातील दुटप्पीपणा तसेच संघटनेला प्राधान्य देण्याऐवजी काँग्रेसप्रमाणेच पक्षातील विरोधकांचा खातमा करणे आणि हुजरेगिरी करणार्यांना, दुसर्या पक्षातून आलेल्या भ्रष्ट नेत्यांना विधान परिषद, राज्यसभेवर पाठवणे असे घडू लागले. असल्या काळ्या कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी चाणक्यनीती, हिंदुराष्ट्रासाठीचे दीर्घकालीन धोरण असे सांगून स्वयंसेवकांची आणि समाजाची बोळवण केली जाऊ लागली. त्यासाठी विविध माध्यमसमूहांना खिशात टाकण्यापासून ते नव्या युगातील युट्यूबर, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर म्हणून वावरणार्या भाटांची फौज तयार करण्यात आली. खोटे नॅरेटिव्ह सेट करणार्या भाटांचे उदंड पीक आले. गेली आठ-दहा वर्षे ही रणनीती यशस्वी ठरत होती. मात्र त्याचवेळी संघाच्या संस्कारातील स्वयंसेवक राजकारणात जाऊन नेता झाल्यावर काय बोलतो आणि कसा वागतो याकडे सर्वसामान्य स्वयंसेवक आणि हिंदू समाजाचेही बारीक लक्ष होते आणि असणार. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी काहीही उचापत्या केल्या तरी त्याकडे समाज दुर्लक्ष करत होता. मात्र या सगळ्यांचा अतिरेक झाल्यावर राजकारणात काम करणार्या स्वयंसेवकांवर बालपणापासून झालेले संघाचे संस्कार गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणाविषयीची भूमिका अतिशय सावधपणाची असते. अर्थात त्यामागे आरक्षणावरून हिंदू समाजात दुहीचे, मतभेदांचे, वादाचे वातावरण होऊ नये अशी काळजी असते आणि ते एका अर्थाने योग्यच म्हटले पाहिजे. असे असले तरी ओबीसी आरक्षणावरून संघालाही पलटी मारण्याची वेळ येते, असेही दिसून आले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर फुटीर गटाचे आमदार-मंत्री जेव्हा नागपुरात जाऊन हेडगेवारांच्या स्मृतिस्थळावर डोके टेकवून आले त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना संघाच्या विदर्भ प्रांताच्या सहसंघचालकांनी जातनिहाय जणगणनेला स्पष्टपणे विरोध दर्शवला होता. हिंदूऐक्याच्या दृष्टीने ही भूमिका रास्त असली तरी राजकीयदृष्ट्या परवडणारी नसल्याचे लक्षात आल्यावर दोनच दिवसांत संघाचे प्रचारप्रमुख आंबेकर यांनी समाजाचे हित होणार असेल तर जातनिहाय जणगणनेला संघाचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र यातून समाजाचे कसले हित साध्य होणार आहे हे त्यांनी सांगितले नव्हते.
आता देवेंद्र फडणवीस आरक्षणाबाबात २०१३पासून कशा कोलांटउड्या मारत आले आहेत हे पाहणे रंजक ठरते. त्यांचे वडील स्वर्गीय गंगाधरपंत फडणवीस यांनी स्वतःचे आयुष्य संघकार्य आणि हिंदूऐक्यासाठी समर्पित केले. अर्थात देवेंद्र यांच्यावर संघाच्या संस्कारांप्रमाणेच वडिलांच्या कार्याचेही संस्कार आणि प्रभाव पडलेला असणार याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस हे उच्चशिक्षित आहेत, कायद्याचे पदवीधर आहेत. महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजता येतील अशा बुद्धिमान नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. असे असताना आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवल्याखेरीज मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देणे शक्य होणार नाही हे माहित असूनही २०१३पासून ते मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे घोषणा कशाच्या आधारावर करत होते? आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा समाजाला खेळवत ठेवले आणि एका टप्प्यावर मराठा समाजात ५० टक्के मर्यादेतच आरक्षण मागू लागला तर काय करायचे याचा विचार फडणवीसांनी केलाच असणार. आजही अनेक राज्यांमध्ये संख्येने कमी असलेल्या जातींचा सहजपणे ओबीसी वर्गात समावेश केला जातो. उत्तर प्रदेश, गुजरात सरकारने गेल्या दहा वर्षांत अनेक नव्या जातींचा ओबीसी वर्गात समावेश केलेला आहे. त्याला कुठेही विरोध झाला नाही, कारण या जातींची लोकसंख्याच अल्प असल्याने आपल्यात नवे वाटेकरी आले आहेत असे ओबीसींमधील अन्य जातींना वाटले नाही. महाराष्ट्रात मराठा समाजाबाबतची परिस्थिती, ओबीसींचे आरक्षण त्यातील वाटेकरी याची सगळी पार्श्वभूमी फडणवीसांना माहित नसेल, असे म्हणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. मग आरक्षणावरून हिंदू समाजातील जातींमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होईल, भांडणे लागतील, वाद निर्माण होतील असे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी फडणवीस संघाचे स्वयंसेवक म्हणून शंभर टक्के पार पाडतील अशी अपेक्षा ठेवली तर त्यात काहीच चूक नाही. आता प्रश्न असा आहे, की फडणवीस या अपेक्षेवर खरे उतरले का?
आता ५० टक्क्यांच्या बाहेर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकत नाही, हे सगळ्यांना समजले आहे. फडणवीसांनी मराठा समाजासाठी जे कथित ‘टिकणारे आरक्षण’ दिले होते ते सर्वोच्च न्यायालयात उडाले. यातील आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फडणवीसांनी दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात दुसर्या-तिसर्या कुणी नव्हे, तर त्यांचेच समर्थक म्हणून वावरणार्या वकिलांनी याचिका दाखल केली होती. फडणवीसांच्या सत्ताकाळात एसटी महामंडळ, एसटी कामगार संघटनेपासून ते एसटी कर्मचार्यांच्या बँकेपर्यंत त्यांची कशी प्रगती झाली हे देखील महाराष्ट्र पाहतो आहे.
केवळ मराठा आरक्षणासंदर्भात नव्हे, तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीलाही खतपाणी घालण्याचे काम फडणवीसांनी केले. २०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बारामतीतील जाहीर सभेत त्यांनी धनगर समाजाला वचन दिले होते की सत्तेवर येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार. कायद्याचे पदवीधर आणि राज्यघटनेचे जाणकार असलेल्या या नेत्याने धनगर समाजाच्या मागणीतील धोके आणि त्या मागणीची पूर्तता करणे अशक्य असल्याचे माहिती असूनही धनगर समाजाच्या भावनांशी का खेळ केला असावा? आता या प्रश्नाबद्दल फडणवीस अवाक्षरही काढत नाहीत. अर्थात आपण काय करत आहोत याची त्यांना जाणीव झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण भाजपमधील आदिवासी नेत्यांचा आजही या मागणीला तीव्र विरोध आहे. पक्षभेद विसरून आदिवासी राजकीय नेते एकत्र येतात हेदेखील दिसलेले आहे.
आता बाळबोध वाटणारा पण फडणवीसांचा सोज्वळ-सात्त्विकपणाचा बुरखा फाडणारा प्रश्न असा आहे की, सगळे माहित असतानाही हिंदुत्त्व आणि हिंदुऐक्याच्या आणि विकासकामांच्या जोरावर सत्ता मिळवण्याऐवजी अनेक जातींना आरक्षणाची दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तासोपान गाठण्याचा मार्ग त्यांनी का निवडला? संघाने गेली जवळपास ९९ वर्षे महाराष्ट्रासारख्या, त्यांच्या दृष्टीने खडकाळ असणार्या भूमीत हिंदूऐक्याचे कार्य नेटाने चालवून त्यात काही प्रमाणात यश मिळाल्याचे दिसत असताना फडणवीसांनी न देता येणार्या आरक्षणावरून मराठा-ओबीसी, धनगर-आदिवासी अशी भांडणे लावण्याचे राजकारण का केले असावे?
बाकीचे राजकीय पक्ष व नेते हे हिंदूविरोधी असल्याचा समज ठसवण्याचा तुमचा कायम प्रयत्न असतो. अर्थात अन्य राजकीय पक्षांना हिंदूऐक्य, हिंदूहित याचे काहीही पडलेले नाही, अशी भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये असतात. त्यामुळेच अन्य राजकीय पक्षांपेक्षा हिंदूऐक्य अधिक घट्ट होण्याची जबाबदारी भाजपची आहे. अशा स्थितीत आरक्षणाच्या मुद्द्यांचा राजकीय हत्यार म्हणून तुम्ही वापर करणे कितपत समर्थनीय ठरते?
जी गोष्ट खाऊ नये ती खाल्ली की घशात अडकण्याची शक्यता जास्त असते. आरक्षणाच्या प्रश्नी या बुद्धिमान, घटनेच्या अभ्यासक असणार्या नेत्याचे असेच काहीसे झाले आहे. आता यातून बाहेर पडता यावे यासाठी एकतर्फी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून या पापात विरोधकांना सामील करून घ्यायचे त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्थात विरोधकांनी त्यांचा हा डाव उधळून लावल्यावर त्यांच्या समर्थकांनी आणखी थयथयाट करणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही.
तुम्ही अन्य कुठल्याही गोष्टीला विरोधकांना जबाबदार धरू शकता, विरोधकांवर आरोप करू शकता; मात्र, तुम्ही हिंदूऐक्याच्या ज्या संघसंस्कारांत वाढलात त्याला पूर्णपणे छेद देणार्या आरक्षणावरून राजकारण करण्याचे पाप करत असाल तर विरोधकच काय, संघ देखील तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही. तुम्ही गणवेश घालून विजयादशमीला संघाच्या संचलनात सहभागी होता म्हणून स्वयंसेवक म्हणून मिरवणार असलात तरी संघाच्या हिंदूऐक्याच्या कार्याच्या विरोधात तुम्ही राजकारण करत आहात हे जनतेपासून आता लपून राहणार नाही.