टोक्योतील अद्वितीय पराक्रमानं क्रीडाक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेला भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला ऑलिम्पिक सुवर्णयशाची पुनरावृत्ती पॅरिसमध्ये साकारता येईल का? आतापर्यंतच्या कारकीर्दीत एकदाही नव्वद मीटरचा टप्पा गाठू न शकलेल्या नीरजला यावेळी कडवे आव्हान असणार आहे. पण त्यातून तावून सुलाखून पदक मिळवणं हे नीरजसाठी किती सोपं असेल आणि किती कठीण असेल? याचं केलेलं हे विश्लेषण.
– – –
एव्हाना पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रंगात आलीय. भारताच्या सर्वाधिक आणि हमखास सुवर्णपदकाच्या आशा आहेत, त्या भालाफेकपटू नीरज चोप्रावर, ज्यानं याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर या वीरानं जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतही रौप्य आणि सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. पण नीरजला ऑलिम्पिक सुवर्णपदकाची पुनरावृत्ती यंदा पॅरिसमध्ये पुन्हा करता येईल का? ही चर्चा क्रीडा क्षेत्रात चांगलीच रंगतेय. ९० मीटरहून अधिक अंतरावर भाला फेकण्याची क्षमता असलेले काही भालाफेकपटू ऑलिम्पिकमध्येही उतरतायत. नीरजनं तर अद्याप एकदाही हा टप्पा ओलांडलेला नाही, हाच मुद्दा या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मधल्या चार वर्षांत नीरजनं नक्कीच प्रगती केली. लांबवर भाला फेकण्याचा नीरजचा आलेख नंतर उंचावतच गेला. टोक्यो
ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यश मिळवताना नीरजनं ८७.५८ मीटर भाला फेकला होता, तर युजीन येथे झालेल्या जागतिक रुपेरी यश मिळवताना ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक केली. मे २०२३मध्ये नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकताना ८७.६७ मीटर भाला फेकला. या पदकामुळे नीरजला प्रथमच पुरुषांच्या भालाफेक प्रकाराच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान गाठता आलं. मग तीनच महिन्यांनी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजनं सुवर्णपदक प्राप्त केलं. यावेळी त्यानं ८८.१७ मीटर अंतर साधलं. ऑक्टोबर २०२३मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत हक्काचं सुवर्णपदक संपादन करताना त्यानं भाला ८८.८८ मीटर अंतरावर फेकला. मात्र, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी मुळीच नाही. तुर्कू, फिनलंड येथे जून २०२२मध्ये झालेल्या पोव्हो नूर्मी क्रीडा स्पर्धेत नीरजनं ८९.३० मीटर अंतरावर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. परंतु त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मग स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने ८९.९४ मीटर अंतरासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पण यावेळीही त्याला रौप्यपदक मिळवता आलं. पण नव्वदीचा टप्पा अजूनही स्वप्नवतच ठरतोय.
नव्वदीच्या टप्पा गाठण्यापेक्षा पदक अधिक महत्त्वाचं आहे. मग ते अगदी ८५ मीटर भाला फेकून मिळालं तरी बेहत्तर, असं नीरजचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनीट्झ ठणकावून सांगतात. १९८६पासून आधुनिक (म्हणजेच नव्या बदलांसह) भालाफेक हा क्रीडा प्रकार अस्तित्वात आला. या क्रीडा प्रकाराची त्यानंतरची आकडेवारी पाहिल्यास २४ क्रीडापटूंनी १२५ वेळा नव्वदीचा टप्पा ओलांडण्याचं कर्तृत्व दाखवलं आहे. पण ऑलिम्पिक स्पर्धेच्या सांख्यिकीकडे नजर टाकल्यास फक्त तीनदाच नव्वदीचा टप्पा पार झाला आहे. बार्टोनीट्झ याचसाठी नव्वदीचा टप्पा आणि ऑलिम्पिक पदक हे दोन स्वतंत्र विषय असल्याचं स्पष्ट करतात.
नीरजपुढे आव्हानं
नीरजच्या ऑलिम्पिक पदकमार्गात प्रमुख आव्हान असेल ते ग्रेनाडाच्या २४ वर्षीय अँडरसन पीटर्सचे. पीटर्सनं २०२२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेलं. त्यावेळी त्यानं ९०.५४ मीटर सर्वोत्तम अंतरावर भाला फेकला होता. सहा प्रयत्नांपैकी तीनदा नव्वदीचा टप्पा त्यानं लीलया ओलांडला. पण त्या स्पर्धेआधी झालेल्या तीन स्पर्धांपैकी दोनदा नीरजनं पीटर्सला मागे टाकलं होतं; स्टॉकहोमच्या डायमंड लीग स्पर्धेत पीटर्सनं नीरजवर मात केली होती. जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून गणल्या जाणार्या पीटर्सनं कारकीर्दीत तीनदा ९० मीटरचा टप्पा ओलांडलाय. यापैकी ९३.०७ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी त्यानं मे २०२२मध्ये दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना साकारली होती. २०२३च्या जागतिक स्पर्धेत पीटर्सला अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. एकंदरीतच गेल्या दीड वर्षांतील त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही पीटर्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. हेच घटक नीरजसाठी सकारात्मक ठरतात.
२०२३च्या जागतिक स्पर्धेत नीरजपाठोपाठ रौप्यपदकाचा मानकरी होता, पाकिस्तानचा अर्शद नदीम. हा तसा नीरजचा मित्रच. पण अर्शद हाच आता नीरजच्या सुवर्णयशाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अर्शदनं दुखापतीची तमा न बाळगता सुवर्णपदक जिंकलं. यावेळी त्याने ९०.१८ मीटरचा टप्पा गाठून सर्वांना अचंबित केलं. त्यानं अगदी पीटर्सलाही (रौप्यपदक; ८८.६४ मीटर) मागे टाकलं. जर्मनीचा १९ वर्षीय मॅक्स डेहनिंग हाही नीरजपुढे कडवे आव्हान उभं करू शकतो, त्याच्या खात्यावर जागतिक युवा आणि युरोपियन युवा अजिंक्यपद स्पर्धांची रौप्यपदकं आहेत. पण काही महिन्यांपूर्वी हॅले हिवाळी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत ९०.२० मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय. नव्वदीचा टप्पा गाठणारा तो सर्वात युवा भालाफेकपटू ठरला. जर्मनीचाच अनुभवी ज्युलियन वेबर हा युरोपियन विजेत्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.५४ मीटर. त्यामुळे वेबरही नीरजसाठी धोकादायक ठरू शकतो.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं, ते चेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅडलेचनं. तशी जाकूबच्या खात्यावर जागतिक स्पर्धांमधील एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं आहेत. डायमंड लीग आणि युरोपियन लीगमध्येही त्यानं कर्तृत्व गाजवलंय. ९०.८८ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता असलेला जाकूबसुद्धा ऑलिम्पिकमध्ये पराक्रम गाजवू शकतो.
प्रेरणादायी लाट
नीरजचा जन्म हरयाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांदरा गावी झाला. शालेय जीवनातच त्याच्या वडिलांनी त्याला जिम्नॅस्टिक्स शिकायला लावलं होतं. मग पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये सराव करताना त्याला भालाफेकीची आवड निर्माण झाली. २०१०मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात नीरजवर प्रशिक्षक जयवीर चौधरी यांनी पैलू पाडले. कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर २०१३मध्ये त्याची पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०१४च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं रौप्यपदक कमावलं. त्यानंतर नीरजनं २०१६च्या कनिष्ठ जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावलं.
२०१७च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने जेतेपद मिळवलं होतं. याशिवाय २०१८ आणि २०२२च्या आशियाई आणि २०१८च्या राष्ट्रकूल स्पर्धांमधील सुवर्णपदकंही त्याच्या खात्यावर जमा आहेत. २०२१मध्ये नीरजनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला अॅथलेटिक्समधील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. नेमबाज अभिनव बिंद्रानंतरचं (२००८च्या बीजिंग) हे दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक. हे यश भारताच्या अॅथलेटिक्स क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलं. नीरजमुळे भालाफेक या क्रीडा प्रकाराला सुगीचे दिवस आले. ही लाट मग अनेक स्पर्धांमधून दिसून आली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जेना किशोर हा आणखी स्पर्धक भारताचं प्रतिनिधित्व करतोय. ८७.५४ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी त्यानं एशियाडचं रौप्यपदक मिळवताना नोंदवलेली. याशिवाय २०२३च्या जागतिक स्पर्धेतही तो पाचव्या क्रमांकावर होता. याशिवाय डीपी मनू, रोहित यादव, यशवीर सिंग, विक्रांत मलिक, सचिन यादव, साहिल सिलवाल असे असंख्य भालाफेकपटू ८० मीटर अंतरापुढे मजल मारतायत. नीरजचं यश हे यातच सामावलेलं आहे.
पॅरिसमध्ये नव्वद मीटर अंतराचा टप्पा नीरजला खुणावत आहे. पण ऑलिम्पिक पदक जिंकणं महत्त्वाचं आहे. त्याला पॅरिसमध्ये अपेक्षित यश मिळावं, यासाठी देशाच्या क्रीडा खात्यानं ४८.७६ लाख रुपये खर्च केलेत. त्यानं दक्षिण आप्रिâका, फिनलंड, जर्मनी, तुर्की या देशांत १७६ दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेतलंय. आता पदक आणि नव्वदीचा टप्पा हा दुहेरी लक्ष्यभेद नीरजनं केल्यास ते कौतुकास्पद ठरेल. तूर्तास, नीरजला ऑलिम्पिक यशासाठी शुभेच्छा देऊया!