महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच निकाल लागला आहे… तोही कुण्या लुंग्यासुंग्याने लावलेला नाही, सगळ्या निवडणुकांचे ‘निकाल’ जे लावतात, त्या भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या (नजीकच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे ते कोणाला माहिती?) सर्वोच्च नेत्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच लावलेला आहे… त्याची घोषणा करण्याची जबाबदारी मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली होती… त्यांनी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्या बजेटच्या माध्यमातूनच विधानसभेच्या निवडणुकीचा निकालही सांगून टाकला… महाराष्ट्रातलं हे तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार जाणार, ईडीच्या भीतीने आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे बेईमान भेदरट मिंधे आणि पक्षफोडे तडफडणवीस यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळणार आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार… भल्या पहाटे भलत्याच याराबरोबर आपण रममाण झालो होतो याचा सोयीस्कर विसर पडलेल्या कमळाबाईने गेल्यावेळी निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाल्यामुळे अस्सल शिवसेनेला विश्वासघातकी ठरवलं होतं… जनतेचा कौल तुमच्याकडे नाही हो, असं रडून दाखवलं होतं… आपली पहाटेची शिंदळकी यशस्वी ठरली असती तर तो जनतेचा कौल होता की काय? लोकसभेच्या निवडणुकीत भयभीतांच्या महायुतीला अस्मान दाखवणारी महाविकास आघाडी आता विधानसभेच्या निवडणुकीत एकदिलाने लढेल आणि प्रचंड बहुमताने विजयी होईल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी मविआचा स्वाभिमानी मुख्यमंत्री विराजमान होईल, यात इतर कोणाला असो नसो, मोदी-शहा यांना मात्र खात्री आहे… म्हणूनच त्यांनी यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा ‘म’पण उच्चारला जाणार नाही, याची खात्री करून घेतली आहे…
निवडणुकीच्या वर्षात ज्या राज्यात जातील त्या नंबर वन बनवणार, अशा घोषणा करणारे, त्या राज्याशी आपली लहानपणापासून नाळ जोडली गेलेली आहे, अशी भावुक भाषणे करणारे मोदी निवडणूक वर्षात महाराष्ट्राकडे पाठ फिरवतात, याचा वेगळा काय अर्थ असू शकतो? मोदी चुकून ग्वाटेमाला, टिंबक्टू, चिली, पेरू वगैरे देशांच्या दौर्यांवर गेले आणि तिथे निवडणुका आहेत असं त्यांना कळलं तर त्यांचा, त्यांच्या पक्षाचा त्या निवडणुकीशी काही संबंध नसताना तिथेही पॅकेजची रेवडी वाटून आले असते. त्या मोदींनी महाराष्ट्राला इतक्या उघडपणे ठेंगा दाखवावा, याचा अर्थ महाराष्ट्राने दिलेल्या मात्रेच्या वळशांनी तोंड अजून कडूझारच आहे त्यांचं. इथे इतक्या सभा घेतल्या, इतक्या प्रमाणात काहीही आश्वासनं दिली आणि लोकांनी नेम धरून जिथे मोदींनी भाषण केलं, तिथले त्यांचे उमेदवार पाडले… हे मोदी विसरतील? त्यांनी साक्षात प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा, त्याभोवती एकवटलेल्या हिंदू अस्मितेचा गैरवापर करून चारशेपार जाण्याची दिवास्वप्ने पाहिली होती. त्यांना प्रभू रामाने अयोध्येतच जमिनीवर आणले, जिथे जिथे रामस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, त्या प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, तेव्हा मोदींनी त्यांच्या पक्षाला संजीवनी देणारी ‘जय श्रीराम’ ही घोषणा बदलून तिच्या जागी ते ओडिशात भाजपच्या विजयरथाला आशीर्वाद देणार्या जगन्नाथाचा जयघोष करू लागले- जे रामाचे झाले नाहीत, ते महाराष्ट्राच्या कामाचे कसे होतील?
मुळात मोदी-शहा हे महाराष्ट्रद्वेषाची परंपरा चालवणारे गुजराती आहेत. त्यांचा महाराष्ट्राच्या भूमीत वसलेल्या, इथल्या मातीत मिसळून मराठी बनलेल्या गुर्जर बांधवांशी काही संबंध नाही. मुंबई हातची गेली, मुंबईसह गुजरात झाला नाही आणि महागुजरात विसर्जित झाल्यावर महाराष्ट्राने गुजरातपेक्षा कितीतरी पटींनी अधिक प्रगती केली, याने यांचा पोटशूळ उठतो. शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरतेच्या लुटीची भरपाई करण्याचे यांचे स्वप्न आहे. म्हणूनच महाराष्ट्राची लूट करून गुजरातची भर करण्याचे धोरण चालवले गेले आहे आणि त्याच कामावर इथले दोन पक्षचोर भामटे वेठबिगार नेमले गेले आहेत… त्यांना सुका दम देत फिरणारे मुकादम तर आहेतच त्यांच्या डोक्यावर.
काहीही करून महाराष्ट्र जिंकायचा आणि शिस्तीत भिकेला लावायचा, मग प्रशासकीय सोयीसाठी छोटी राज्यं हवीत, हे फेक नॅरेटिव्ह चालवून महाराष्ट्राचं त्रिभाजन करून टाकलं की मराठी अस्मिता कायमची नष्ट होईल, अशी दिवास्वप्नं भाजप परिवार कायम पाहात आलेला आहे. मात्र, दोन पक्ष फोडून, सगळ्या यंत्रणांना, खासकरून कायदा सुव्यवस्था यंत्रणांना बटीक बनवून, राज्याची तिजोरी खाली करून, सामदामदंडभेदाचा वापर करून, धो धो पैसे वाटून, महाशक्तीच्या महासत्तेचा बुलडोझर चालवून हा महाराष्ट्र ना ताब्यात आला ना नरमला; उलट त्याने महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून यश घातलं आहे.
इथे कितीही लाडका कंत्राटदार योजना आणल्या, बेगडी हिंदुत्वाचं पिचकं नाणं बद्द वाजवणार्या बनावट सिनेमांची शोबाजी केली, कितीही सुपारीसम्राटांना कामाला लावलं तरी महाराष्ट्र काही आपल्या टाचेखाली येणार नाही, हे दिल्लीच्या पतपातशहांना कळून चुकलं आहे. बनिया दिमाग घाट्यातल्या सौद्यात हात घालत नाही. जिथे आपल्याला साथ, त्यांचाच विकास हा आता त्यांचा नवा फंडा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला द्यायचाrच असेल, तर शिक्षा द्या, आपल्याविरोधात गेल्यावर कशी तोंडाला पानं पुसली जातात, ते दाखवा, अशा हिरीरीने दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे, पण मराठी इंगा त्यांनी अजून पुरता पाहिलेला नाही.
दिल्लीचं तख्त राखण्यासाठी स्वार्थ मागे ठेवून पुढे धावणारा महाराष्ट्र वेळ पडली तर दिल्लीचं मदांध तख्त फोडण्याची आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांना सप्तपाताळात गाडण्याची पण हिंमत राखून आहे… दिल्लीतल्या औटघटकेच्या सरकारची घटिका भरली आहे, हे सांगणारा घंटानाद महाराष्ट्रातूनच होणार आहे… म्हणूनच निवडणुकीआधीच निर्मलाक्कांनी निकाल सांगितला आहे.