• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बघा नीट, येईल झीट

- शुभा प्रभू साटम (डोक्याला शॉट)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 3, 2023
in भाष्य
0

मला सोशल मीडियाचे फार वेड नव्हते, पण लॉकडाऊनच्या त्या रोमहर्षक काळात एका अ‍ॅपला शरण गेले. आजपावेतो शरणागत आहे. कारण मी किती नॉर्मल आहे हे त्या अ‍ॅपवरून कळते. सुरुवात झाली ती ‘मीट्रो, आज हम थाली फोडेंगे’ या जगप्रसिद्ध आचरट आवाहनापासून- लोकांनी थाळ्या बडवल्याच, पण ते चाळे, देशभक्तीच्या नावाखाली सोशल मीडियावर भरभरून टाकले आणि चर्चिलचे जे मत आधी माझ्या डोक्यात जायचे त्याच्याशी मी थोडी का होईना, सहमत झाले. दुर्दैवाने आजपर्यंत ते मत दृढच होत गेले आहे…
…त्याचं मत होतं की बहुतांशी भारतीय मूर्ख आहेत…
…हे वाक्य वाचून तुमची देशभक्ती किंवा जाज्वल्य देशप्रेम उफाळून आलं आणि तुम्ही खाकी चड्डी सावरत, काठी घेवून फुरफुरून चर्चिल किंवा माझ्यावर उसळून उठलात, तरीही मला अज्याबात फरक पडत नाही. कारण आजकाल अनेक ठिकाणी आपल्या लोकांचे जे चाळे बघायला मिळतात ते पाहून दुसरे काही मत होणे अशक्य. मी मघाशी जे अ‍ॅप सांगितलं ना ते आहे इन्स्टाग्राम… त्या अ‍ॅपवर जाऊन काही रील्स पाहा, तुम्ही माझ्याशी आणि चर्चिलशी सहमत होणारच… बेट आपली!.. अर्थात तुम्ही स्वत:च रील्स बनवण्याच्या भानगडीत पडणार्‍यांतले नसाल तर. रील्स म्हणजे काही सेकंदांचा आचरटपणा असतो. बहुतेक मंडळी लोकप्रिय गाण्यांवर व्हिडिओ बनवत फिरतात. अचानक सरकार आणि जनतेत चीनविरोधी भावना उफाळून येऊन बंद केलेले
टिकटॉक आठवते का? जाज्वल्य देशभक्तीमुळे बंद झालेल्या त्या अ‍ॅपवर हेच धंदे चालायचे. फेसबुकला इन्स्टाग्राम लोकप्रिय करता यावे, म्हणून टिकटॉकला लाल डोळे करून दाखवले असण्याची शक्यता खूप आहे (चीन सीमेच्या आत शिरून बसल्यावर मात्र हे डोळे मिचमिचे होतात, ते एक असो).
तर, मुद्दा काय की हल्ली कंटेंट नको, पण रील आवर असे म्हणावे लागण्याइतके डोक्याला शॉट झालेत. कोणत्या तरी काकाचा गोविंदाच्या नाचाची हुबेहूब आणि एनर्जेटिक नक्कल करणारा डान्स जबर हिट झाला आणि भारताच्या गल्लीबोळातील मध्यमवयीनांपासून जख्ख वृद्धांपर्यंत सगळ्यांनी कंबरा हलवत धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
रील्स हा काही मुळात तेवढा बाद प्रकार नाही. त्यात खरोखरच क्रिएटिव्ह असं काही करता येतं. विदेशातली, त्यातही कोरियन रील्स नक्कीच उजवी आणि काही कलामूल्य असणारी आहेत. आपल्याकडे पब्लिक बाद असल्यामुळे रील्सच्या माध्यमातून बहुतेक वेळा दिसतात, ते ते हिडीस चाळे.
‘आय एम एम डिस्को डान्सर’ गाण्यावर पोट सुटलेले पुरुष मस्त ‘टाकली’मध्ये नाचतात. एरव्ही जीन्स घालणार्‍या बायकांना थोर भारतीय संस्कृतीचे अनावश्यक धडे देणार्‍या सत्संगी बायका झिरझिरीत साड्या नेसून ‘छत पे सोया था बेहनोई’ असल्या थेट अश्लील गाण्यावर धिंगाणा करतात. शब्दांचा एक अर्थही न कळणार्‍या लहान मुली द्वयर्थी लावणीच्या ठेक्यावर कामुक अंगविक्षेप करत ताल धरतात, अगदी आजी आजोबा पण यातून सुटलेले नाहीत. आणि हे सर्व ‘आमची कला’ या नावाखाली चालते.
पूर्वी पालक घरी पाहुणे आले की मुलांना अमुक जिंगल म्हणून दाखव पाहुण्यांना अशी सक्तीची मनोरंजन शिक्षा करायचे, आज पालक आपली आणि आपल्या अपत्यांची रील्स दणादण फॉरवर्ड करतात. होऊ दे डेटा खर्च!!!
आता म्हणाल की लोक नाचतात, मजा करतात, त्यांना आनंद मिळतो, त्यात तुमचे काय जाते?
बरोबर आहे. माझे काहीच जात नाही हो, पण वैताग येतो. कारण आपण जी काही कला सादर करतो आहोत, तिची एबीसीडी तरी आपल्याला अवगत आहे का, याचं भान नको का? कोण तरी सामान्य माणूस अचानक भाजी बाजारात नाच करताना दिसला तर तुमची काय अवस्था होईल? एक बाई आहे लोकप्रिय, ती नाच किंवा नृत्य या नावाखाली जे हावभाव करते, ते बघून रात्री दचकून उठायला होईल. एक माता आपल्या अर्धवट वयाच्या मुलीसोबत नाचकाम करते, ते कमी म्हणून त्यात तिच्या कुकवाचा धनी पण सामील होतो. एक माणूस हॉलमध्ये आई आणि बायकोसोबत रील करतो आणि शेवटी हमखास आई त्याच्या मुस्काटात देते (हा एवढा एकच भाग मला अतिशय भावला). एक तरुण भिकार्‍यासोबत नाचतो. एक आज्जी पार्कमध्ये लावणी करते, एक भाभी घुंघट सावरत ‘टिप टिप बरसा पानी’वर ठुमके धरते. घर कमी म्हणून की काय, हे रीलवाले भाजी बाजार, चाळीतील गल्ल्या, मध्यवर्ती बाजार, ट्रेन, मेट्रो, स्टेशन, एसटी स्टँड, हायवे, लिफ्ट, ऑफिस, हॉटेल्स, कॅफे, अगदी हॉस्पिटलसुद्धा, कुठेही सुरू होतात.
त्यात काही कलात्मक असावे तर ते शून्य. गलिच्छ ते अतिहिडीस अशा श्रेणींमध्येच बहुतेक उपक्रम चालू असतात.
मी सोशल मीडियाच्या विरोधात अजिबात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीवर माझा विश्वास आहे, पण आजकाल हा धिंगाणा बघून मात्र मत बदलत चाललेय.
या रील्समधे आपले एनआरआय पण मागे नाहीत. परदेशात जाऊन, राहून तिथून इथे भारतीय मूल्ये, संस्कार, देशभक्ती यांची हाकाटी करणारी रील्स ते पण टाकतात. साडी, धोतर नेसूनच यांच्या भारतप्रेमाला उधाण येते, खास करून स्वातंत्र्यदिन वगैरे दिवस. जगात देशभक्तीचे इतके ओंगळवाणे प्रदर्शन बाकी कुठल्या देशात होत असेल असे वाटत नाही.
आपण असे का वागतो?
मला वाटते की मुळातच अनेक भारतीय लोकांचे मन पुराणकाळात आणि शरीर आधुनिक भारतात आहे. आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला कुटुंब आणि समाज यांच्या अनेक जाचक नियमांनुसार वागावे लागते आणि नव्या पिढीचे मुक्त वागणे त्यांच्या पोटदुखीचे कारण होते. दाबून ठेवलेल्या अनेक इच्छांचा निचरा मग कौटुंबिक समारंभ, धार्मिक प्रसंग, लग्न अशा ठिकाणी हौस या नावाखाली केला जातो. ते पण करावे, पण काहीतरी मूल्यभान ठेवा, थोडी तरी कला आत्मसात करा.
सिनेमातलं किंवा इतर कुठलं एखादं गाणं हिट झालं की दहामधील साडे नऊ रील्समध्ये तेच वाजते, उघडले इन्स्टा की वाजले गाणे. आपला चित्रपट हिट करण्यासाठी आजकाल प्रसिद्ध रीलकरांना निर्माते बोलावतात म्हणे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका अस्सल मराठी चित्रपटाच्या एका गाण्याने तर उच्छाद मांडला होता. त्यावर रील करणार्‍यांपैकी दहा टक्के लोकांनी किमान त्याची परतफेड म्हणून थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहण्याचे कष्ट घेतले असते, तर तो सुपरहिट झाला असता.
दहा पंधरा सेकंदाच्या या रील्समुळे अनेक रिकामटेकड्या (यांची संख्या किती आहे ते जेसीबी मशीनचं खोदकाम पाहायला होणार्‍या गर्दीवरून कळायला हरकत नाही) भारतीय लोकांना चांगले साधन मिळाले आहे. यात पण उत्तम दर्जा, विनोद, आशय असणारे रील्स असतात, नाही असं नाही. पण, त्यांचं प्रमाण सुबुद्ध माणसांच्या प्रमाणाइतकंच असतं. बाकी सर्व भयाण! डोक्याला शॉट!!
खोटे वाटते? मग आपल्या जबाबदारीवर उघडा इन्स्टा, बघा नीट, येईल झीट…
आयला, नव्या रीलसाठी ही लाइन बेस्ट आहे!

Previous Post

नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

Next Post

प्री-पेड टास्क फ्रॉड

Next Post

प्री-पेड टास्क फ्रॉड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.