दिवाणखान्याच्या चौकटीतून मराठी नाटक कधी बाहेर पडणार का, हा एक न संपणारा प्रश्न कायम विचारला जातो खरा, पण त्याला चोख प्रत्युत्तर देणारी नाटके मात्र अभावानेच रंगभूमीवर येताना दिसतात. आजकाल विनोदासाठी विनोद करताना काहींची जी काय फट्फजिती उडते, ती एक नवा विनोदाचा विषय देणारी ठरतेय. थोडक्यात, निव्वळ करमणुकीकडे हल्ली जे बघितलं जातंय, ही बाब रंगभूमीसाठी चिंता वाढविणारी आहे, महाराष्ट्र नाटकवेडा आहे. मराठी नाटकांची एक समृद्ध परंपरा आहे. अभिव्यक्तीचे सशक्त जिवंत माध्यम म्हणून अधिक गंभीरपणे नाट्यसृष्टीने आणि रसिकांनी बघावयास हवे, ही काळाची गरजच आहे.
या प्रवाहात प्रतिभासंपन्न प्रयोगशील रंगकर्मी, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी ‘गजब तिची अदा’ या हटके शैलीतल्या वेगळ्या विषयावरल्या नाटकाचा आविष्कार रसिकांपुढे सादर केलाय, जो नव्या वळणावरला आहे. तो प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीच्या आशा वाढविणारा दिसतोय. नाटकाच्या विषयाला जागतिक प्रश्नांची पार्श्वभूमी आहे. एक वैचारिक मंथन त्यामागे आहे. जागतिक महायुद्ध उर्फ ग्रेट वॉर. इतिहासातले सर्वात मोठे पहिले महायुद्ध. जे १९१४ ते १९१८पर्यंत चालले. सुमारे सात कोटी सैनिकांचा त्यात सहभाग होता. उभ्या जगाला हादरून सोडणारा हा कालखंड. त्यातून बेरोजगारी, महागाई, उपासमार, आजार, रोगराई, अस्थिरता आली. लाखो कुटुंबं उद्ध्वस्त झाली. हजारो मनोरुग्ण झाले. युद्धाचा तडाखा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात सार्या जगाने अनुभवला. या युद्धाला २०१४ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने युद्धाचे शताब्दी वर्ष आयोजित करून भविष्यात युद्धबंदी असावी, याबद्दलचे कार्यक्रम, प्रकल्प जगभरात झाले. यात हिंदुस्थानात राजधानी नवी दिल्ली मुक्कामी १७व्या भारतरंग महोत्सवासाठी ‘गजब तेरी अदा’चा हिंदीत नाट्यप्रयोग झाला. त्यात पुढाकार होता तो अर्थातच प्रा. वामन केंद्रे यांचा. नाट्य या ताकदीच्या माध्यमातून प्रयोग रंगला. जगभरात संपूर्ण युद्धबंदी आणि शांतता याचा पुरस्कार करणार्यांनी यातील विषय-आशय आणि सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे स्मरते. ही या नाटकाच्या जन्मकथेची पूर्वपिठिका आहे. तोच विषय इथे मांडून मराठी रसिकांना विचार करण्यास भाग पाडले आहे.
नाटककार प्रा. केंद्रे हे नाट्यतज्ञ असल्याने त्यांनी यातील कथानक हे थेट ग्रीक रंगभूमीवरून घेतल्याचे दिसते. वनलाईन तिथली जरी असली तरी सारे संस्कार हे आपल्या लोककलेचे आहेत. ग्रीक नाटककार अॅरिस्टोफेनिस याने कारकीर्दीत पन्नासएक नाटके दिलीत. त्यातील अकरा नाटके ही आजही नाट्यअभ्यासकांचा अभ्यासाचा भाग म्हणून उपलब्ध आहेत. उपरोध आणि उपहास याचा अचूक वापर करणारा हा नाटककार. त्यांच्या संहिता विनोदी अंगाने जाणार्या लक्षणीय सुखांतिका म्हणून ओळखल्या गेल्यात. ‘चमत्कारीत विनोद’ त्यात गच्च भरलेला असल्याने त्यांची नाटके ही ‘अॅरिस्टोफेनिक’ शैलीतली म्हणून पुढे आली. युद्धाला विरोध, शांतीचे समर्थन, प्रचलित राजकारण्यांवर टीका, स्त्रियांचे शासन आणि भंपक राजकारण्यांची भंबेरी हे विषय त्यांच्या ‘द पीस’ या नाटकातून आलेत, जे हसवून अंतर्मुख करतात. नेमका तोच धागा संहितेत घेण्यात आलाय आणि त्याला ट्रिटमेंट ही लोकनृत्याची, काव्याची, समूहाची देण्यात आलीय.
कोणे एकेकाळी, कोण्या एका देशात ‘महाराज’ राज्य करताहेत. तो प्रचंड महत्त्वाकांक्षी. सत्ता-संपत्ती आणि राज्यविस्तार यासाठी आदेशावर आदेश सोडतोय. सैनिक बिचारे एकनिष्ठ. घरादाराची पर्वा न करता युद्धासाठी सदैव घराबाहेर. हुकूमशहा महाराजांच्या आदेशाचे पालन करताहेत. प्रत्येक लढाई जिंकून महाराजांची मर्जी मिळविण्यासाठी त्यांची चढाओढ सुरूच आहे. राज्यात नाचगाणी, दानधर्म, बक्षिसे याची लयलूट चालूच. पण दुसरीकडे अशा या युद्धांमुळे नवनवीन संकटे ही उभी राहातात. त्यात सैनिकांचे त्यांच्या कुटुंबियांकडे, धर्मपत्नींकडे दुर्लक्ष होते. भावनिक, मानसिक असणारे घराशी नाते तुटत जाते. अशावेळी नवरारूपी सैनिकाला वठणीवर कसं काय आणायचं, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. अखेर राज्यातल्या सार्या महिला एकजूट होतात आणि नवी भन्नाट युक्ती शोधतात. ‘पतीबंदी’चा नारा देतात. शारीरिक संबंध ठेवण्यालाच त्या विरोध करतात. त्याचा परिणाम म्हणजे ‘सैनिक पतिराज’ खवळतात. या अहिंसात्मक प्रयोगामुळे महाराजही हताश होतात. शेवटाच्या वाटेवर अनेक घटना, प्रसंग, नृत्य, गाणी याची पेरणी आहे. प्रयोगातील उत्कंठा संपू नये म्हणून नाट्यप्रयोगाचा थेट आस्वाद घेणे उत्तम!
नृत्य-काव्य यांनी परिपूर्ण असे हे पंचवीस कलाकारांचे समूहनाट्य असल्याने पात्रांच्या हालचाली, देहबोली आणि आवाजाची पट्टी उंचीवर ठेवण्यात आलीय. त्यात भडकता असणे स्वाभाविक आहे. महाराजांच्या मध्यवर्ती भूमिकेत नव्या पिढीचा दमदार अभिनेता ऋत्विक केंद्रे याने रुबाब सांभाळला आहे. भूमिकेची समज उत्तम. मंदार पंडित याचा प्रधान, करिष्मा देवले हिची लक्ष्मी या दोघांनी चांगली साथ दिलीय. श्रुती हळदणकर, तेजस्विनी कुराडे, वैष्णवी घोडगेळ मोहिका गद्रे, अंकिता देसाई, सांप्रति पाटील, श्वेतनील सावंत, तन्वी धुरी, संस्कृती जाधव, संमृद्धी देसाई, रोहित कुलकर्णी, सचिन जाधव, अमोल जाधव, मंगेश शिंदे, महेश महालकर, दर्शन रायकर यांची कामेही ठसकेबाज झालीत. सार्यांना नृत्याची चांगलीच समज आहे. समूहनाट्याचा एकत्रित परिणाम हा सादरीकरणात नेमका होतोय.
नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार यांनी नृत्ये सुरेख बांधली आहेत. घंटेसह असणारी नृत्ये नोंद घेण्याजोगी. नृत्यरचना अभ्यासपूर्ण आहे. नृत्यामुळे कथानकाला गती मिळाली आहे. त्यामागले परिश्रम नजरेत भरतात. प्रकाशयोजनाकार शितल तळपदे यांनीही एकूणच नाटकाची शैली लक्षात घेऊन रंग भरलेत. वेशभूषा वेगळ्या काल्पनिक वातावरणात घेऊन जाते. रंगभूषाही समर्पकच. प्रा. केंद्रे यांच्या हाती सूत्रे असल्याने निर्मितीच्या प्रत्येक दालनात त्यांना अभिप्रेत असलेला आविष्कार शंभर टक्के साकार झालाय. दिग्दर्शन कौशल्य लाजवाबच. पारंपारिक शैलीत अडकून न बसता नवी वाट शोधण्याचा प्रयत्न त्यात आहे, जो गुंतवून ठेवतो.
नाटकाची संहिता, दिग्दर्शन आणि संगीत या तिन्ही जबाबदार्या वामन केंद्रे यांनी सांभाळल्या असून त्यांच्या ‘रंगपीठ’ या नाट्यसंस्थेचाही निर्मिती सहभाग आहे. प्रायोगिक शैलीतलं नाटक असूनही ते व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे, त्याला श्रीकांत तटकरे, दिनू पेडणेकर यांची साथसोबत लाभली आहे. पु. ल. देशपांडे यांचे ‘एक झुंज वार्याशी’ किंवा रत्नाकर मतकरी यांचे ‘चार दिवस प्रेमाचे’, उत्तम बंडू तुपे यांचा ‘झुलवा’, विश्राम बेडेकर यांचे ‘रणांगण’, जयवंत दळवी यांचे ‘नातीगोती’, शफाअत खान यांचे ‘राहिले दूर घर माझे’ अशा अनेक संहितांना केंद्रे यांचा समर्थ दिग्दर्शक म्हणून स्पर्श झालाय. प्रत्येक निर्मितीमागे त्यांची कल्पकता नजरेत भरते. ती याही नाटकात दिसून येतेय. चक्क २१ वर्षांच्या मध्यंतरानंतर त्यांचे ‘सबकुछ’ पडद्यामागे असलेली ही कलाकृती. जागतिक रंगभूमी आणि खास करून प्रादेशिक नृत्य-नाट्य याचा शैलीसाठी त्यांनी केलेला नेमका वापर त्यामुळे हे नाट्य वेगळ्या वातावरणात अलगद घेऊन जाते.
नृत्य, नाट्य, संगीत, काव्य असा बहुरंगी संगम असणारी परिपूर्ण अभ्यासपूर्ण नाट्यकृती उभी करण्याचा या ‘टीम’चा प्रामाणिक प्रयत्न दोन अंक खिळवून ठेवतो. नाट्यप्रशिक्षण घेतलेले सारे तंत्रज्ञ, कलाकार असल्यानेही त्याचा सकारात्मक परिणाम या निर्मितीत होतो. विनोदी नाटकांच्या महापुरात एका वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारं जागतिक विषय मांडणारं त्यासोबतच महिलांचे भावनिक प्रश्न उभे करणारे हे नाटक वैचारिक चालना देणारे ठरते.
या नाटकातील आशय हा कधीही भूतकाळ होणारा नाही. राज्यकर्त्यांची साम्राज्य विस्ताराची लालसा ही महासंहाराकडेच घेऊन जाणारी असते. हा गंभीर कडवट इशारा विनोदी प्रत्युत्तराने यातून दिलाय, जो महत्त्वाचा ठरतो. नृत्य, नाट्य, काव्य याने आकाराला आलेले हे शैलीप्रधान नाटक रसिकांना एका सर्वांगसुंदर आविष्काराचे समाधान निश्चितच देईल.
गजब तिची अदा
लेखन / दिग्दर्शन / संगीत : प्रा. वामन केंद्रे
नेपथ्य : नाविद इनामदार
प्रकाश : शितल तळपदे
संगीत : प्रशांत कदम / सुभाष खरोटे
वेशभूषा : एस. संध्या
रंगभूषा : उल्लेश खंदारे
निर्माते : गौरी केंद्रे, श्रीकांत तटकरे, दिनू पेडणेकर
निर्मिती संस्था : अनामिका, रंगपीठ, साईसाक्षी