पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन झाले, त्या दिवशी सगळ्या जगभरात फक्त याच एका सोहळ्याचा जयघोष व्हावा, सर्वत्र आपलीच छबी दिसावी, अशी त्यांची इच्छा असणार. ती त्यांच्या भाटगिरीला वाहून घेतलेल्या चॅनेलांनी पूर्णही केली. पण आपल्या घरातल्या, आपणच खर्च करून आणलेल्या आरशांमध्ये पाहून आपण टाळ्या वाजवल्या की लक्षावधी प्रतिबिंबे टाळ्या वाजवताना दिसतात; ते दिसायला छान दिसतं, पण तो काही जगाने केलेला जयघोष नसतो. मोदींनी सेन्गोल नावाचा, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी योग्य ठिकाणी म्हणजे वस्तुसंग्रहालयात ठेवलेला सेन्गोल नामक धर्मदंड हा राजदंडच आहे, अशी एक बनावट कहाणी उभी करून तो नवीन संसदेत ठेवला. एखाद्या राजाचा राज्याभिषेक असावा अशा प्रकारे धर्मगुरूंच्या उपस्थितीत स्वनामधन्यतेचा हा सोहळा करून घेतला, पण या सोहळ्याच्या बातम्यांबरोबर सगळ्या देशाने बातमी पाहिली ती देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकून आणणार्या महिला कुस्तीगीरांना दिल्लीच्या पोलिसांनी कशी नृशंस वागणूक दिली त्याची.
संसद हे लोकांक्षा आणि लोकाशेचे प्रतीक असले पाहिजे. मुळात लोकशाहीतला विरोधी पक्ष, स्वपक्षातले नेते, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बाजूला ठेवून, सर्व संसदीय संकेत धुळीला मिळवून मोदी यांनी साडे तेरा हजार कोटी रुपये खर्च करून उभी केली आहे, ती त्यांच्या अहंकाराचं प्रतीक असलेली इमारत आहे. ज्यांना लोकहिताचं काही करून लोकांच्या लक्षात राहता येत नाही, ते मोठमोठ्या इमारती उभ्या करून त्यांच्यावर आपलं नाव कोरून ठेवतात. इतिहासात अजरामर होण्याचा त्यांचा तो क्षीण प्रयत्न असतो.
जिथे मोदींनी सभागृहाच्या रचनेत विरोधी पक्षाला न्याय्य पद्धतीने सरकार पक्षाचा निषेध करता येऊ नये, अशी व्यवस्था करून घेतली आहे, तिथे त्यांनी त्यांच्या या राज्याभिषेकाच्या दिवशी लोकशाहीचा प्राण असलेलं एक आंदोलन नव्या संसदेसमोर होऊ दिलं असतं, हे असंभवच होतं. ते दु:साहस करायला गेलेल्या कुस्तीगीरांना जंतर मंतरवर रोखलं जाणार, हेही उघडच होतं. मात्र, ते करताना या खेळाडूंच्या हातातला तिरंगाही धराशायी व्हावा, अशी जुलूम जबरदस्ती पोलिसांनी केली. त्यामुळे काल समाजमाध्यमांवर एकीकडे संसदेत बनावट राजदंडापुढे लोटांगण घातलेले पंतप्रधान आणि दुसरीकडे पोलिसांनी आडवे पाडलेले कुस्तीगीर यांचे फोटो एकमेकांशेजारी डकवून लोक वरूण आनंद यांची ही काव्यपंक्ती शेअर करत होते…
हाकिम को इक चिठ्ठी लिक्खो सब के सब
और उसमें बस इतना लिखना, लानत है
हाकिम म्हणजे सत्ताधीश आणि लानत है, म्हणजे तुझा तिरस्कारच वाटू शकतो फक्त! बाकी काव्यपंक्ती स्वयंस्पष्ट आहे.
इथेही एक वेगळा काव्यात्म न्याय स्पष्टपणे दिसत होता. ज्या फोगट भगिनी काही काळापूर्वीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा, मोदींचा उदोउदो करत होत्या, त्यांना आज त्याच मोदींकडून न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. लैंगिक दुर्वतनाचा आरोप असलेला ब्रिजभूषण नावाचा रावण अयोध्येवर राज्य करतो आहे, लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत सुखाने विराजमान होतो आहे आणि ज्या मायभगिनींच्या रक्षणाची ग्वाही सरकारने द्यायची असते, त्यांना रस्त्यावर आडवे पाडून तुडवले जात आहे. राहत इंदौरी म्हणाले होते,
लगेगी आग तो आएंगे घर कई जद में
यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है
भाजप आणि मोदींची भलामण करण्यात धन्यता मानणारे अनेकजण आपल्या पार्श्वभागाला चटके बसू लागल्यानंतर आग आग म्हणून ओरडू लागले आहेत. या आगीत सगळयांचा नंबर लागणार आहे, याची जाणीव या निमित्ताने इतरांना व्हायला हरकत नाही.
मोदींनी नव्या संसदेत घातलेले लोटांगण पाहून जुने संसद भवन दचकले असेल आणि त्याने नव्या संसदेला सांगितले असेल, सावध राहा. या माणसाने माझ्या पायर्यांना स्पर्श करून प्रवेश केला आणि नऊ वर्षांत माझा पाया उखडला. तुझ्यापुढे तर लोटांगण घातलेलं आहे, आता तुझं काही खरं नाही.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मंत्रिमंडळ आणि नव्या संसदेच्या उद्घाटनाला पंतप्रधानांभोवती जमा झालेले तथाकथित धर्मगुरू यांच्या फोटोंची तुलना करून लोक स्वत:लाच प्रश्न विचारत होते की देश पुढे चालला आहे की मागे चालला आहे? शिवसेनेने नेहमीच सर्वसमावेशक हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व मानलेलं आहे आणि प्रबोधनकारांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनी घंटा बडवणारे शेंडीजानव्याचे हिंदुत्व नाकारले आहे. तेच भोंदुत्व तिथे पुजले जात होते; तेही विज्ञाननिष्ठ धर्माची कल्पना मांडणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या मुहूर्तावर.
देशाची वाटचाल मध्ययुगाकडे होणार आहे, याचे हे संकेत आहेत, आता मोदी २०२४नंतर निवडणुका घेणारच नाहीत, फक्त वरून प्रतिनिधी नियुक्त केले जातील, वगैरे गावगप्पा पसरवल्या जात आहेत. मोदी यांचे तसे इरादे असतीलही, पण ते पूर्णत्वास जाण्याची सुतराम शक्यता नाही. मोदींच्या या इव्हेंटवर २० पक्षांनी बहिष्कार घातला होता. हा जवळपास ७० टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रतिनिधींचा बहिष्कार होता. त्याचबरोबर कर्नाटकात भाजपला गुडघे टेकायला लावून संपूर्ण दक्षिण भारतातून या पक्षाला हुसकावून लावण्यात आले आहे. अशा वातावरणात असले सोहळे करून मोदींनी स्वत:भोवती आरत्या ओवाळून घेतल्या असल्या तरी २०२४ सालात काय घडणार, या विचाराने भाजपेयी आज चिंतित आहेतच…
…काळ मोठा कठोर असतो. दुसर्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडण्याचे प्रकार घडतात, त्याचप्रमाणे लोकशाहीत स्वत:साठी उभारलेल्या महालांमध्ये स्वत:लाच निवास करण्याचे सौख्य लाभेल, याची शाश्वती नसते!