जगभरातील वृत्तपत्रांत कॉलमभर बॉक्स कार्टून छापली जातात. हे छोटं कार्टून आजूबाजूच्या घटनांचा वेध घेत असतं. भारतातही सर्व भाषेतील वृत्तपत्रांमध्ये अशी बॉक्स कार्टून्स येतात. आजूबाजूच्या परिसराचा, जिल्ह्याचा, राज्याचा, पर्यायाने देशातील घटनांचा अन्वयार्थ हे एक कॉलमी चित्र ताकदीने मांडताना मिस्कील पंचेस, बोचरी टीका करायला घाबरत नाही. त्याचा मान नेहमीच पहिल्या पानावर राहिला आहे. त्याचे क्रेडिट भारतात तरी आर. के. लक्ष्मण यांना जाते. कारण टाइम्स ऑफ इंडियासारखे प्रतिष्ठित वृत्तपत्र त्यांना ‘यू सेड इट’ या त्यांच्या बॉक्स कार्टूनसाठी लाभले. तेच चित्र महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘कसं बोललात!’ शीर्षकाने छापले जाई. त्यांचे समकालीन अबू अब्राहम, डीजी, सुधीर धर, सुधीर आचार्य, मारिओ मिरांडा, श्रीकांतजी ठाकरे, ज्ञानेश सोनार, निनान, बाळ राणे, विकास सबनीस, बळी लवंगारे, प्रशांत कुलकर्णी आणि बरेचजण… त्या त्या दैनिकाप्रमाणे त्यांचा वाचकवर्ग होता.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलायचा एकदा योग आला. ‘आरके व आपणावर डेव्हिड लो यांचा बराच प्रभाव होता…’
‘हो सुरुवातीला…’
‘पण आर. के. लक्ष्मण यांच्या राजकीय चित्रांवर हा प्रभाव कायम राहिला. तुम्ही मात्र स्वत:ची शैली निर्माण केलीत. तुमचे फटकारे कॅरिकॅचर्स जास्त प्रभावी वाटतात!’
क्षणभर थांबून त्यांनी त्यावर विचार केला. ‘ज्ञानेश तू म्हणतोस तसे असेलही, पण आर. के. यांच्या ‘यू सेड इट’ला तोड नाही. अनेक तरूण व्यंगचित्रकारांना मी नेहमी सांगतो, आर. के. यांच्या ‘यू सेड इट’चा चांगला अभ्यास करा. त्यातलं डिटेलिंग पहा… त्यांनी मुंबईतील एखादी गल्ली रेखाटली असेल तर दुकाने, त्यावरचे जुनाट बोर्ड, वाटेत लावलेल्या मोटरसायकली, फळवाल्याची टपरी.. त्यावरचं प्लास्टिक ते उडू नये म्हणून ठेवलेले दगड, रस्त्याच्या कडेचे सांडपाणी तिथे हुंगणारं एखादं कुत्रं… उंच उंच इमारती, रस्त्यावरची गर्दी. गर्दीत अडकलेल्या मोटारी, उकरलेले रस्ते, टिकाव घेऊन काम करणारा एखादा घामाघूम झालेला मजूर. डोक्यावर मासळीची थोरली टोपली घेतलेली, गजरा माळलेली एखादी कोळीण, विजेचे खांब, त्याखाली बसलेला एखादा चांभार. २ इंच बाय ३ इंचातलं हे एक कॉलमी चित्र… मात्र त्यात डिटेक्स किती… शिवाय एवढ्या भाऊगर्दीतही भांबावलेला कॉमन मॅन. चित्राखाली आशयपूर्ण कॅप्शन! चित्र कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा येत नाही!’
बाळासाहेब कौतुकाने सांगत होते, पन्नासेक वर्षे आरकेने न कंटाळता ही चित्र रेखाटलीत. कामावरची अतूट श्रद्धा हेच त्याचं उत्तर! पुढे बाळासाहेब म्हणाले, ‘माझी स्टाईल नकळतच बदलत गेली, कारण डेव्हिड लो यांना भेटलेली कॅरेक्टर्स त्या मानाने सोबर होती. मला भेटलेले नेते, मंत्री, पुढारी, त्यांचे चेहरे, त्यांचे लुच्चेपण, बेरकीपण, बावळटपणा… जगात कुठे नसतील अशा वल्ली मला रेखाटायला लागल्या. कर्नाटकचे बेरकी निजलिंगप्पा, उंचाडे सडपातळ गुलझारीलाल नंदा, जगजीवनराम, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, शिस्तखोर मोरारजी, मद्रासचे करुणानिधी, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, इंदिराजी, कामराज इ. मला नेहरूंचे टोपीतले चित्र मनासारखे वाटेना. टोपी उडवल्यावर त्यांचे टकलातले चित्र एकदम परफेक्ट झाले. अजून कितीतरी जण आहेत. किती नावं सांगणार? लालूप्रसाद मला रेखाटायला आवडला असता पण मी काम थांबवल्यावर तो राजकारणात आला!’
काही व्यंगचित्रकार मोजक्या रेषेतील रेखाटनांवर भर देत व कॅप्शनला जास्त महत्त्व देत. विशेष म्हणजे तमिळ, केरळी, कन्नडी, मराठी, हिंदीभाषिक बॉक्स व्यंगचित्रे त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे राहिली आहेत. नाशिकमधील ‘गावकरी’तील माझ्या बॉक्स कार्टूनचे नाव होते ‘आरसा’. जवळपास ४० वर्षे मी ‘आरसा’ काढला. ‘गावकरी’चे नाव व लौकिक जवळपास दोन हजार सालापर्यंत अबाधित होता. उत्तर महाराष्ट्रात तो व ‘देशदूत’, श्रीरामपूरचा ‘सार्वमत’ तसे नावलौकिक ठेवून होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ मुंबईवरून, तर ‘सकाळ’, ‘तरुण भारत’सारखा पेपर पुण्यावरून येई. दोन हजार सालानंतर अनेक दैनिकांनी जिल्हावार दुकाने टाकली. कॉम्पिटिशन वाढली. श्रीमंत मंडळी रिंगणात उतरली. ‘लोकमत’, ‘दिव्य मराठी’, ‘पुण्य नगरी’ दैनिके उत्तम धंदा करू लागली. धनदांडग्याच्या स्पर्धेत छोटी मंडळी मागे पडली. अस्तित्व टिकवण्यापत उरली इतकेच. पंचवीस तीस वर्ष ‘गावकरी’चा शिपाई नियमाने माझ्या घरून आरसा चित्र नेई. ‘गावकरी’त मी फ्रीलान्सर होतो.
ऑनलाइन चित्र पाठवण्याची सोय तोपर्यंत अस्तित्वात नव्हती. रोज अंदाजे सहा वाजता शिपाई फोन करी. तरटे नावाच्या शिपायास दुडक्या चालीने माझ्या घरापर्यंत यायला वीस मिनिटे लागत. त्या वीस मिनिटांत माझा आरसा तयार होई. कारण शेकडो विषय आजूबाजूला रेंगाळत असत. त्यातला एखादा कडेवर घेऊन नट्टापट्टा करून शिपायाला सोपवून देई. सर्वसामान्यांच्या मनातील राग, लोभ, संताप, चीड, मिस्कील कॅप्शन्सनी आरशातून व्यक्त होई. परिणामी लोकांची दिलखुलास दाद मिळे. एका पिढीच्या लक्षात तो आरसा अद्यापही आहे. लोक म्हणत, ‘तुमचा आरसा सकाळी पाहिला की जे स्मित ओठांवर येते, ते दिवसभर आम्हाला आनंदी ठेवते!’ सुरुवातीला ‘मटके’वालेसुद्धा आरशावर पैसे जिंकत. कसे ते मला अद्यापही कळले नाही.
एकदा ‘गावकरी’चे संपादक वंदनराव पोतनीस त्यांच्या मित्राला खो खो हसत एक विनोद सांगत होते. मित्राने विचारले, ‘आपण गावकरी पहात नाही का… तुम्ही सांगितलेला विनोद हा आरशातलाच आहे! तुमच्याच गावकरीतला. तुम्ही काय पहाता?’ ‘जाहिराती…! इतरत्र आलेल्या आपल्याकडे आल्यात की नाही ते!’ संपादक उत्तरले.
आताशा दैनिकांची संख्या शेकडोंनी वाढली आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील दैनिके वेगळीच. हौशी व्यंगचित्रकारांची सोय झाली. मात्र त्यांना मानधन किती मिळते हे ठाऊक नाही. ती लोकल असल्याने महाराष्ट्रभर पाहायलाही मिळत नाहीत. व्यंगचित्रकारांनी हतबुद्ध व्हावे इतके कमालीचे विनोद आत्मकेंद्री मंत्री, पुढारी, मीडियाचे पत्रकार करीत आहेत. कधीकाळी डेव्हिड लो, बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण ‘शंकर्स विकली’वाले शंकर पिल्ले, चो रामस्वामी यांची राजकारण्यांना जरब होती. समाजाला त्यांचा आधार वाटे. काळ बदलला… आत्ता राजकारणी, धर्मांध, जात्यंध हे व्यंगचित्रकारालाच जरब बसवू लागले आहेत…
व्यंगचित्रकार म्हणे आता उरलो ‘वाद नको’ पुटपुटण्यापुरता.