‘मार्मिक’चं हे मुखपृष्ठ आहे १९७७ सालातलं. त्यात दिसतायत ते प्रकाशझोताची चटक लागलेले एमजीआर अर्थात एम. जी. रामचंद्रन. तामीळनाडूमधले एक मोठे सुपरस्टार असलेले एमजीआर मूळ काँग्रेसचे कार्यकर्ते. नंतर पटकथालेखक एम. करुणानिधी यांच्या जोडीने त्यांनी अण्णादुराई यांच्या द्रविड चळवळीत सहभाग घेऊन द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षात प्रवेश केला. नंतर करुणानिधी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे एमजीआर यांनी स्वत:चा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष काढला. या पक्षाने आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला. १९७७ साली इंदिराविरोधी लाटेतही तामीळनाडूत अण्णाद्रमुक आणि काँग्रेस यांच्या आघाडीने मोठे यश मिळवले. एमजीआर तामीळनाडूचे मुख्यमंत्रीही बनले. मात्र, १९७७ साली देशात पहिले काँग्रेसेतर सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधी यांना साथ देणार्या सर्व नेत्यांवर, पक्षांवर कारवाईचा वरवंटा फिरवायला सुरुवात केली. एमजीआर यांच्यावर इन्कम टॅक्सचे छापे पडणार, अशी चर्चा सुरू झाली. एमजीआर यांनी लगेच भूमिका बदलून जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या पक्षाने दिल्लीत मंत्रीपदही स्वीकारलं… कुशल नटाप्रमाणे त्यांनी प्रसिद्धीचा झोत स्वत:वर वळवून घेतला. यात प्रसिद्धीबरोबरच होती ती निरंकुश सत्तेची आकांक्षा… आजच्या राजकारणातही नेतेपदावर विराजमान झालेले मुरब्बी अभिनेते कोणत्याही प्रसंगात इतरांवर पडणारा प्रकाशझोतही हिरावून घेऊन तो स्वत:वर पाडून घेण्यात पटाईत झालेले आहेतच का!