रा. स्व. संघाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण कसे मुस्लिमविरोधी नाही, आम्ही गांधींना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, असे वेळोवेळी जे दावे केलेले आहेत त्या दाव्यांचा फोलपणा अमित इंदुरकर यांनी अनेक लेखांत उघड केलेला आहे.
– – –
– पुरुषोत्तम भिसीकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता शंभरी ओलांडली आहे. कोणत्याही संघटनेकरिता शंभर वर्ष पूर्ण करणे हे त्यांच्या, त्या संघटनेत कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. १९२५ साली केशव बळिराम हेडगेवार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी स्थापन केलेल्या रा. स्व. संघाने केलेल्या कार्याचे मूल्यमापन एकाच वाक्यात करायचे झाल्यास त्या संघटनेला एक बुद्धिभेदाची कार्यशाळा असेच म्हणता येईल. ही उपमा देण्यामागचे एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे नुकतेच अमित इंदुरकर या युवा अभ्यासू पत्रकाराने लिहिलेले वरील शीर्षकाचे पुस्तक. लेखक माझा विद्यार्थी असल्याचा मला आज सार्थ अभिमान आहे.
लेखकाने या पुस्तकात २०१४ ते २०२५ या वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक वादग्रस्त निर्णयांचा, भाजप पक्षाच्या त्यात विशेषत: त्यांचे मातृसंघटन असणार्या रा. स्व. संघाच्या इतिहासाचा, त्यांच्या वर्तमान कृती कार्यक्रमांचा अभ्यासपूर्ण घेतलेला आढावा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सध्या रा. स्व. संघ आपण एकमेव राष्ट्रवादी असल्याच्या बाता मारत असला तरी ह्या निव्वळ निरर्थक थापा आहेत. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते व मेट्रो बांधून देशाचा भौतिक विकास करणारे सर्वांना हवेहवेसे रा. स्व. संघाचे अस्सल प्रॉडक्ट असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण कसे राष्ट्रवादी आहोत, आपण मुस्लिमविरोधी नाही, आम्ही गांधींना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, असे वेळोवेळी जे दावे केलेले आहेत त्या दाव्यांचा फोलपणा अनेक लेखांत उघड केलेला आहे.
रा. स्व. संघाच्या मते, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना प्रात:स्मरणीय आहेत. ज्या गांधीविचारांना, ज्या आंबेडकरांना आणि त्यांच्या विचारांना ते हयात असेपर्यंतच नव्हे, तर त्यांच्या निधनानंतर देखील ज्यांनी विरोध केला, ज्यांनी ते संपविण्याचा प्रयत्न केला, त्यांना आज गांधी-आंबेडकर प्रात:स्मरणीय आहेत हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो. पण संघाच्या या दाव्याला छेद देणारी माहिती संघात वयाच्या पाचव्या वर्षापासून स्वयंसेवक म्हणून कार्य करणार्या सुदेश मिन्नी नावाच्या माजी प्रचारकाने आपल्या सेलर्स ऑफ इन्फेर्नो या इंग्रजी पुस्तकात दिलेली आहे. त्याच्या मते, रा. स्व. संघाच्या प्रार्थनेत (सात दिवसीय शिबिरात सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी घेण्यात येणारी प्रार्थना) सर्व चांगल्या आणि काही वाईट लोकांना वंदन केले जाते (पृष्ठ क्र. २६). आता रा. स्व. संघासाठी चांगले कोण आणि वाईट कोण हे त्यांच्या विचारसरणी व कार्यकर्तृत्वातून दिसून येते.
भाजपच्या धर्मांध राजकारणाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचे मोदी यांच्या हस्ते झालेले उद्घाटन. या प्रसंगी त्यांनी केलेले भाषण भारतीय संविधानाला पूर्णतः नाकारणारे भाषण होते. त्यात त्यांनी देशाचे विधान (कायदा) म्हणजे राम असे म्हणत आपला आणि आपल्या मातृसंघटनेचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. रामनवमी उत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, भारतीय संविधानाद्वारेच रामराज्याची स्थापना होईल असे धक्कादायक वक्तव्य केले. या वक्तव्याचा आधार आहे भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत असणारे रामाचे चित्र. या चित्राचा आधार घेत वर्तमान सत्ताधीश संविधानात रामराज्य असल्याचा जो दावा करीत आहेत त्या दाव्याची उलट तपासणी अमित इंदुरकर यांनी आपल्या पुस्तकात महत्त्वपूर्ण संदर्भ देऊन केलेली आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत गाजलेला अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव. विरोधकांनी प्रामुख्याने या एकाच मुद्द्यावर २०२४ची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यापासून रोखून धरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याद्वारे निर्मित भारतीय संविधान हा मुद्दा कधी नव्हे इतका चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यामुळे भाजपने देखील आपण कसे संविधानप्रेमी, आंबेडकरप्रेमी आहोत हे सांगण्याचा सपाटा लावलेला आहे. परंतु लेखकाने ‘भाजपचे बेगडी आंबेडकरप्रेम’ या दीर्घ आणि संदर्भयुक्त लेखात भाजप व रा. स्व. संघाचा खोटारडेपणा उघडा पाडून त्यांचा बुरखाच टराटरा फडलेला आहे.
वर्तमान सरकार संस्कृत भाषेबद्दल अतिशय आग्रही आहे. त्याकरिता त्यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणले. या शैक्षणिक धोरणातून त्यांनी आपला सुप्त अजेंडा राबविण्याची सुरुवात केलेली आहे. अनेक विद्यापीठे यात आधीपासून बळी पडलेली आहेत. रा. स्व. संघाचे मुख्यालय असणार्या नागपुरातील विद्यापीठ देखील बळीचा बकरा ठरलेला आहे. या विद्यापीठातील इतिहास शिकविणारा विभाग आता इतिहास घडविणारा विभाग झालेला आहे, असा निष्कर्ष काढीत लेखकाने परखडपणे आपली बाजू मांडलेली आहे. हिंदुत्त्ववाद्यांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे देखील संघाचे आवडते नेते आहेत. देशाच्या लोकसभा, कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुका किंवा संसदेचे व विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्ो की सावरकर हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. मग यातून सावरकरांची बदनामी झाली अशी आवई उठवत सरकार त्या मुद्द्याचे भांडवल करतो. पण सावरकरांची बदनामी नेमकं कोण करीत आहे? काँग्रेस? राहुल गांधी की अन्य कुणीतरी? या प्रश्नाचे उत्तर देणारा एक लेख भक्तांचे पितळ उघड करतो.
सावरकर आणि हेडगेवारांना मोठे करण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या नावाचा कुबड्यासारखा वापर करण्यासाठी रा. स्व. संघाची थिंक टँक असणार्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे लोकसत्ता दैनिकात लेख लिहिले जातात. त्या लेखाचा उत्तम प्रतिवाद अमित इंदुरकर यांनी पुस्तकात केलेला आहे. लेखकाने या पुस्तकात एकूण १३ लेख आणि धीरेंद्र कुमार झा यांनी कारवाँ या इंग्रजी मासिकासाठी लिहिलेल्या चार इंग्रजी लेखांचा मराठी अनुवाद दिलेला आहे. हे चारही लेख रा. स्व. संघाचा अस्सल खोटारडेपणा उघडा पाडणारे आहेत. या चारही लेखांनी हे पुस्तक अतिशय वाचनीय आणि विशेषतः संग्रहणीय झालेले आहे.
या पुस्तकात लेखकाने रा. स्व. संघात अनेक वर्षे स्वयंसेवक म्हणून कार्य केलेल्या तीन स्वयंसेवकांचे संघाविषयी असलेली मते, त्यांना आलेले अनुभव व त्यांनी संघाविषयी केलेले महत्त्वपूर्ण खुलासे दिलेले आहेत. मी आधीच लिहिले आहे की, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक हा पत्रकार असल्यामुळे लेखकाने सध्याच्या प्रसारमाध्यमांवर, त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करणाराही एक लेख लिहिला आहे. लेखकाच्या मते, ज्या दिवशी सिनेअभिनेत्री श्रीदेवीचा अंघोळीच्या टबात बुडून मृत्यू झाला त्याचे वार्तांकन करताना अनेक पत्रकारांनी स्वतःच्या पेशाला (पत्रकारिता) टबात बुडवून जलसमाधी दिली.
सध्या रा. स्व. संघाचे सरसंघचालक संघ बदलत असल्याचे दाखवण्यासाठी आपल्याच विचारधारेला तिलांजली देण्यात येत असल्यासारखे विधाने करीत आहेत. पण त्यांचे बदलत असल्यासारखे भासविणे हा देखील त्यांच्या षडयंत्राचाच एक भाग आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते. मोहन भागवत आणि एकूण संघ परिवाराच्या या बदलण्याचा दाव्याला दोन उदाहरणे चपखल बसतात. ‘सरड्याने रंग बदलला तरी तो सरडाच असतो आणि सापाने कात टाकली तरी तो सापच असतो, अधिक चपळ होण्यासाठीच तर कात टाकत असतो.’ विचारांची लढाई, विचारांनी लढण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे.