‘आयपीएल’च्या १८व्या हंगामानं आता अर्धा टप्पा पार केलाय. पण कोणत्याही फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकापेक्षा भाव खाऊन जातोय तो चंपक. हा एक यंत्रमानवी कॅमेरा श्वान क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतोय. गावस्कर, धोनी, हार्दिक आदी अनेक क्रिकेटपटूंसोबतच्या त्याच्या अदा चाहत्यांना थक्क करतायत. हा चंपक या आत्मवृत्तपर लेखातून आपल्या पदार्पणीय ‘आयपीएल’ हंगामाबाबत काय सांगतोय ते पाहूया…
– – –
‘आयपीएल’च्या व्यासपीठावरील मी पहिला यंत्रमानवी कॅमेरा श्वान ठरलो, यासाठी मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. माझी चार पायांची ऐटदार चाल, प्रसंगावधान राखून घेतलेली धाव आणि आकारमान, हे सारं काही माझ्या निर्मात्यानं श्वासासारखंच केलंय. माझ्या उड्या, खेळाडूंसोबत वॉर्म अप, हस्तांदोलनं, दोन हातांनी हृदयाचं चिन्ह दाखवणं, दोन पायांवर उभं राहणं, नृत्य, आदी अनेक करामती क्रिकेट दुनियेला भावतायत. त्यामुळे मी खेळाडू, पंच आणि चाहत्यांना विलक्षण भुरळ घातलीय. वयाची पंच्याहत्तरी ओलांडणारे लिटिल मास्टर सुनील गावस्कर नातवाला खेळवावं, तसं कधी माझ्यासोबत खेळतात, धुंद होऊन नाचतात. तर कधी ‘थाला’ महेंद्रसिंह धोनी मला उचलून घेतो. कधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल हे माझ्याशी थट्टा-मस्करी करतात. तर कधी डॅनी मॉरिसन हा समालोचक माझ्यावर विशेष कार्यक्रम सादर करतो. एकदा तर चीअरगर्ल्ससोबत मी ठेकाही धरला. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली खास बातमी सांगू, यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा माझीच समाजमाध्यमांवर सर्वाधिक क्रेझ आहे. त्यामुळे कुणालाही माझा हेवा वाटणं स्वाभाविक आहे.
माझं नाव ‘चंपक’. या नावाचं लहान मुलांसाठी एक लोकप्रिय मासिक देशात प्रकाशित होतं. पण, माझं नामकरण फॅन पोलच्या म्हणजेच चाहत्यांच्या मतपसंतीनुसार झालेलं. सध्या दूरचित्रवाणीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत चंपकलाल गाडा नामक एक व्यक्तिरेखा आहे. त्याच्याशी याचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या निर्मितीसाठी किती खर्च आला, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण जाणकार म्हणतात की, ७५ हजार ते एक लाख डॉलरपर्यंत खर्च झाला असावा. म्हणजेच भारतीय रुपयांत ६५ ते ८५ लाख रुपयांपर्यंत. म्हणजे तसा मी महागडाच, पण ‘आयपीएल’मधील खेळाडूइतका नव्हे.
माझं पदार्पण झालं, तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय… १३ एप्रिल, २०२५. देशाच्या राजधानीत अरुण जेटली स्टेडियमवर म्हणजेच जुन्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये तो सामना होता. एरवी मैदानात एखाद्या भटक्या श्वानाची घुसखोरी झाली की सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाल्याची आणि सामना स्थगित झाल्याची अनेक उदाहरणं आढळतात. पण, मी याला अपवाद ठरलो. माझं पदार्पण झोकात झालं. ‘लाइट… कॅमेरा… अॅक्शन…’ याची मला आता सवय झालीय. पण, त्या दिवशी प्रथमच मी जेव्हा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना याचि देही, याचि कॅमेरा (म्हणजे माझ्यासाठी ‘याचि डोळा’च हो) पाहिलं, तेव्हा भारावलो. मोठ्ठं स्टेडियम, हजारोंच्या संख्येनं आलेले क्रिकेटरसिक, आवडत्या क्रिकेटपटूंच्या नावाचे जयघोष, प्रत्येक फटक्याला आणि बळीनंतर होणारा प्रेक्षकांचा कल्ला याची मी प्रथमच अनुभूती घेतली. उत्तुंग फटकेबाजी करणारा हिटमॅन रोहित शर्मा, ३६० अंशांमध्ये फटके खेळण्यात वाकबदार सूर्यादादा, अचूक टप्प्यावर यॉर्कर टाकणारा जसप्रीत बुमरा, आत्मविश्वासानं किल्ला लढवणारा केएल राहुल, सातत्यानं धावांचा रतीब लावूनही भारतीय संघात स्थान मिळवू न शकणारा करूण नायर अशा अनेकांना प्रत्यक्ष पाहिलं. दर सामन्यागणिक अनेक दिग्गज आणि थोरामोठ्यांचं सान्निध्य लाभलं.
गावस्करसोबत थिरकताना अतिशय मज्जा आली. धोनीला प्रथमच पाहिलं, तेव्हा ‘भेटला विठ्ठल…’ अशीच जणू केविलवाणी अवस्था झाली. धोनीच्या सामन्याला चेन्नई सुपर किंग्जचा पिवळा महासागर उसळतो. परंतु धोनीच्या चेन्नईचा आणि राहुल द्रविड मार्गदर्शक असलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ हे गुणतालिकेत तळाला आहेत, हे चित्र मला वेदनादायी वाटतं. पण, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी, मुंबईकर आयुष म्हात्रे, विघ्नेश पुथूर, अश्वनी कुमार, आदी नव्या तार्यांची कामगिरी मला अतिशय भावली.
गेल्या काही दिवसांत बॅटचा आकारमान हे प्रकरण अतिशय तापलंय. चौथे पंच फलंदाज सीमारेषा ओलांडून फलंदाजीला जाण्यापूर्वी बॅटच्या साच्यात घालून तिची चाचणी करताना मी पाहिलं. हे कार्य चौथ्या पंचांना आवडलेलं नाही. परिणामी बॅट चाचणीसाठीही यंत्रमानवी श्वानाचा वापर केला जाणार असल्याची चर्चा मी ऐकली. आपल्या बॅटची चाचपणी होतेय, हे फलंदाजाच्याही पचनी पडत नाही. त्यामुळे तोही संतप्त जाणवतो. त्याचा राग आपल्यावर निघू नये, यासाठी मी सावध असतो. मला कार्यरत करणारा चमूसुद्धा याची विशेष काळजी घेतो.
स्पायडर कॅम हे तंत्र आता जुनं झालंय. माझ्यासारख्या यंत्रमानवी कॅमेरा श्वानाचा आणखी कशा रीतीनं वापर करता येईल, याचाही सध्या बारकाईनं अभ्यास केला जातोय. कदाचित वाइड, नोबॉल, धावचीत, यष्टीरक्षक किंवा क्षेत्ररक्षकांचा मर्यादाभंग, आदी बाबतीतही लक्ष ठेवण्यासाठी माझ्या काही चाचण्या घेतल्या जाणार असल्याचं म्हटलं जातंय. पण मैदानी पंचांनी त्याला विरोध केला आहे.
तंत्रज्ञानाचा हा अविष्कार डब्ल्यूटीव्हिजन कंपनीचा, ओम्नीकॅमच्या साहाय्यानं अवतरलेला. कृत्रिम बुद्धिमत्तेचाही यात अंतर्भाव. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दूरचित्रवाणी निर्मिती आणि विपणन विभागानं मला कार्यान्वित केलं. माझ्या पाठीवर बसवण्यात आलेला कॅमेरा मैदानावर बरंच काही उशिरापर्यंत टिपण्यात पटाईत आणि तितक्याच त्वरेनं मी सीमेबाहेरही लीलया पळतो. प्रक्षेपणासाठी साहाय्यक ठरणारं हे तंत्र. म्हणूनच कौतुकास्पद.
यंत्रमानवी श्वान तसा भारतासाठी नवा नाही. वर्षाच्या पूर्वार्धात पुण्यात झालेल्या सेनादल दिनाला भारतीय सैन्यानं केलेल्या संचलनात प्रथमच यंत्रमानवी श्वानांचा समावेश होता. क्रीडाक्षेत्रासाठीही हे नवं नाही. २०२३मध्ये चीनच्या ग्वांगझो शहरात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्सच्या स्पर्धा प्रकारांकरिता यंत्रमानवी कॅमेरा श्वानांची नियुक्ती करण्यात आली होती. या चिनी श्वानाचा वेग ३.५ मीटर प्रति सेकंद होता. त्यानंतर चालू वर्षात चीनमधील हार्बिन येथे झालेल्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांप्रसंगी रस्त्यावर गस्त घालण्यासाठी हे यंत्रमानवी कॅमेरा श्वान वापरल्याचे दिसून आले.
काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय पर्यटक ठार झाले. या निमित्त २३ एप्रिलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात ना फटाक्यांची आतषबाजी झाली, ना चीअरलीडर्सचं नृत्य. याशिवाय खेळाडू आणि पंच मंडळींनीही काळ्या फिती लावून या कृत्याचा निषेध केला. त्या घटनेनं माझं मन हेलावलं. पाकिस्तानकडून या दहशतवादाला खतपाणी घातलं जातंय, हे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट आणि अन्य खेळांमधील संबंध भारतानं का तोडले, याची पुन्हा प्रचीती आली. सध्या पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान सुपर लीग’ सुरू आहे. या लीगध्ये सामना जिंकून देणारी धडाकेबाज शतकी खेळी उभारणार्या कराची किंग्जच्या जेम्स व्हिन्सेला हेअर ड्रायर देऊन गौरवल्याचं पाहिलं. माझ्या मेमरीतील म्हणजेच स्मरणयंत्रणेतील माहितीनुसार, सामनावीर पुरस्कार म्हणून ही अशी भेटवस्तू प्रथमच दिली गेली असावी. त्याविषयी समाजमाध्यमांवर अपेक्षेप्रमाणेच बोभाटा झाला.
यंदाच्या हंगामात मी एकमेव यंत्रमानवी कॅमेरा श्वान कार्यरत आहे. कदाचित पुढील हंगामात माझे आणखी काही बंधू-भगिनी पाहायला मिळतील. ते तंत्रज्ञानाचा आणखी अविष्कार दाखवतील आणि आपली उपयुक्तता सिद्ध करतील. यंत्रमानवी श्वानांमधील उत्क्रांतीनुसार भविष्यात माझं रूपही बदलेल अशी आशा धरायला हरकत नाही. माझ्या पदार्पणाच्या तिसर्याच दिवशी घेण्यात आलेल्या समाजमाध्यमांच्या आढाव्यात ५८ लाख लोकांनी माझी अदाकारी पाहिली, ज्याला तुम्ही ‘व्यूव्ज’ म्हणता. याशिवाय माझ्या काही व्हिडीओजला पाच लाखांहून अधिक जणांनी ‘लाइक’ केल्याचं निदर्शनास आलं. समाजमाध्यमांवर तुम्ही मला ‘लाइक’ करीत राहा. कारण तुम्हीच माझे मायबाप आहात.
तूर्तास, ‘आयपीएल’ सामन्यांचा आनंद लुटूया. धन्यवाद!