सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
ऐकायचीही तयारी ठेवा!
प्रश्न : तायडे, मी सोशल मीडियावर खूप वावरत असतो. माझे मित्र, नातेवाईक सगळे इथे सोबतीला असतात. पण बरेचदा आमच्यात छोट्या मोठ्या गोष्टीवर वाद होतात, मनं दुखावतात; मग कारण नसताना काही काळ अबोला होतो. हे चुकते आहे हे कळते पण राजकारण, सिनेमा, खेळ अशा कोणत्याही गोष्टीवर कोणाचे काय डोके तापेल सांगता येत नाही. मग कधी दोन गट पडतात, कधी एक विरुद्ध सर्व असे होते, कधी कोणी क्षुल्लक गोष्टीवर ग्रूप सोडून जाते. हे सगळे कसे ग्रूप अॅडमिन म्हणून कसे हाताळावे?
उत्तर : प्रिय भावड्या, एक तर नातेवाइकांच्या किंवा मित्रांच्या ग्रुपात अॅडमिन हा फक्त लोकांना जमा करणे आणि बाहेर काढणे यापुरता असावा. जवळच्या लोकांना कशाला हवा रे अॅडमिन? ग्रूपमध्ये जमा करताना लोकांना स्पष्ट सांगायचे की इथे जितके बोलाल त्याच्या दुप्पट ऐकायची क्षमता असेल तर थांबा, अन्यथा दार उघडे आहे. झालंय असं की लोकांना आजकाल फक्त विचार मांडायला आवडतात आणि ऐकायला आवडत नाहीत. समोरच्याची देखील एक बाजू असू शकते, ती त्याला मांडू द्यावी, शांतपणे त्या बाजूची चूक दाखवून द्यावी हेच लोकांना नको झाले आहे. मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. मुख्य म्हणजे मी बोलणार ते सगळे योग्य असणार आणि त्याला विरोध करणे हा मूर्खपणा असणार, हे मनात ठरवले की मग वादाला सुरुवात होते. कोणत्याश्या भाषेत एक छान वाक्य आहे, ’प्रत्येक वादाला तीन बाजू असतात. एक आपली बाजू, एक समोरच्याची बाजू अन तिसरी खरी बाजू.’ हे वाक्य प्रत्येकाने खूणगाठ बांधले तरी बरेचसे रुसवे टळून जातील. शाळेचा ग्रूप, नातेवाईकांचा ग्रूप हे एकमेकांची ख्यालीखुशाली आणि योग्य वेळी योग्य मदत यासाठी असायला हवेत. राजकारण, खेळ, जग दुनिया यांच्याबद्दल आपल्याला असलेले ज्ञान आणि आपली मते मांडायला अनेक व्यासपीठं उपलब्ध आहेत. सोशल मीडिया माणसे जोडण्यासाठी बनवला गेला आहे; तोडण्यासाठी नाही हे लक्षात आले की झाले.
– सखी सोमी
मन सुद्ध तुझं…
प्रश्न : सोमीताई, अनेकदा सोशल मीडियावर वावरताना मी भलते काही बोलून जातो किंवा अगदी खर्या आयुष्यात देखील एखाद्या गोष्टीला सामोरे जाताना मी गडबडून जातो. काय करावे कळत नाही.
उत्तर : लाडक्या भावा, आयुष्यात समयसूचकता सगळ्यात महत्त्वाची असते. कोणत्या वेळी काय करावे आणि काय करू नये हे एकदा समजले की मग अनेक अडचणी क्षुल्लक वाटायला लागतात. आयुष्यात नवा आत्मविश्वास येतो. घाबरायचे नाही आणि स्वत:ला थांबवायचे नाही. समोरच्या माणसाचे मन दुखावणार नाही अशी गोष्ट असेल आणि मनाला पटत असेल, त्यावेळी ती कोणाला उपयोगी पडणारी असेल, तर करताना घाबरायचे नाही. सत्कर्माची फळे चांगलीच मिळतात. फक्त आपण सावध राहायचे आणि बुद्धीचा योग्य वापर करायचा.
एका रेल्वे स्टेशनवर एकदा एक आगगाडी येऊन थांबली. आईबरोबर एक १४/ १५ वर्षांचा मुलगा पाण्याची बाटली घ्यायला खाली उतरला. खरेदी झाली, स्टेशनवर गंमत बघून झाली आणि मग अचानक शिट्टी वाजल्यावर आई आणि मुलगा दोघे गाडीकडे धावले. त्यांचे राहिलेले सुट्टे पैसे द्यायला स्टेशनवरच्या दुकानातल्या मालकाचा १०/१२ वर्षाचा मुलगा देखील धावला. गडबडीने गाडीत चढताना त्या गाडीतल्या मुलाची एक चप्पल निसटली आणि नेमकी धावती गाडी आणि रुळाच्या मध्ये पडली. मुलगा घाबरला, आता चप्पल काढता येणे शक्य नाही. चप्पल कायमची गेली. तो रडवेला झाला. इतक्यात त्या दुकानदार मुलाने आपल्या पायातील दोन्ही चपला काढल्या आणि त्या मुलाच्या डब्यात फेकल्या. रडवेला मुलगा एकदम गोड हसला आणि त्याने आपल्याकडे शिल्लक असलेली चप्पल बाहेर फेकली. दोघेही समाधानाने एकमेकांकडे बघून हसले आणि एक चिंतेचा प्रसंग सहजपणे आनंदी माणुसकीच्या नात्यात बदलून गेला.
– समयसूचक सोमी
मोहमायेचा त्याग करा!
प्रश्न : सोमी ताई, माझ्या बायकोला सोशल मीडियाचा वेड नाद लागला आहे. स्वयंपाक करताना देखील तिला रील्स बघायचे असतात, व्हॉट्सअप कॉल करायचे असतात. जेवताना देखील हातात मोबाइल असतो. तिला माझ्यासाठी वेळ म्हणून उरलेला नाही. ऑफिसातून संध्याकाळी घरी आल्यावर बायकोने थोडा वेळ द्यावा, गप्पा माराव्यात असे मला वाटत असते, पण इकडे सगळा कारभार उलटा आहे. या सगळ्यात वादविवाद सुरू होतात ते वेगळे. तिला कसे समजवावे?
उत्तर : भाऊराया, आज मला बोधकथा सांगायचा जाम मूड आलेला आहे, तेव्हा एक कथा तुझ्यासाठी. एका गावात सुखवस्तू म्हातारा म्हातारी राहत होते. पैसा अडका भरपूर पण पदरी मूलबाळ नाही. अर्थात त्यांनी त्याचे कधी दुःखं मानले नाही. ’ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र. वय झाले तसे दोघांनी पूर्णपणे स्वत:ला ईश्वराच्या चरणी वाहायचे ठरवले. जवळ होती ती सर्व संपत्ती दान केली, घर गावातल्या शाळेसाठी दिले आणि मोहमायेचा त्याग करून दोघेही जंगलात निवासाला गेले. जमेल तशी एक झोपडी उभी केली आणि ईश्वराच्या नामस्मरणात दिवस घालवू लागले. म्हातारा सकाळी उठायचा आणि जंगलाच्या आतल्या भागाकडे निघायचा. जमेल तेवढ्या वाळक्या काटक्या, तुटलेल्या फांद्या गोळा करायचा आणि एक मोळी बांधायचा. दुपार झाली की तोवर म्हातारी त्याला शोधत शिदोरी घेऊन पोहोचलेली असायची. दोघेही शांत झाडाच्या सावलीत भाकरीचा आस्वाद घ्यायचे आणि उन्हे उतरली की मग गावच्या बाजाराकडे निघायचे. मोळी विकून जे काही पैसे मिळतील त्यातून दुसर्या दिवशीचा कोरडा शिधा घ्यायचा आणि देवाचे नाव घेत झोपडीकडे निघायचे हा त्यांचा शिरस्ता.
एके दिवशी म्हातारबांनी जंगलात मोळी बांधली, म्हातारी देखील आली आणि जेवण, विश्राम करून दोघेही बाजाराला निघाले. म्हातारबा पुढे आणि आजी मागे. जंगलात वाट तुडवत असताना म्हातार्याला अचानक एक सोन्याची चमकी जमिनीवर पडलेली दिसली आणि तो मनात धास्तावला. बायकांचा सोन्याचा मोह त्याला चांगला माहिती होता. आता बायकोला ही चमकी दिसली, तर तिचे मन विचलित होणार. आपण तर मोहमायेचा त्याग केलेला आहे, अशावेळी हे पातक ठरणार. म्हातार्या ने मग युक्ती केली आणि त्या चमकीवर पाय ठेवून उभा राहिला. म्हातारीला मागे वळून म्हणाला, ’तू हो जरा पुढे, मी थोडा दम घेतो आणि येतो.’ म्हातारीने आज्ञाधारकपणे मान डोलवली आणि पुढे निघाली. म्हातारी वळणावर पोहोचली आणि म्हातारा देखील मागे चालता झाला. दिवसभराचे व्यवहार झाले आणि दोघेही ईश्वराचे स्मरण करून निद्रादेवीकडे निघाले. इतक्या वर्षाचे आयुष्य, कधी एकमेकांना फसवले नाही, कुठली गोष्ट लपवली नाही आणि आता असे काही घडल्यावर म्हातार्याला काही झोप येईना. केलेले कृत्य मनाला डाचत होते. त्याची ती होणारी वळवळ बघून शेवटी म्हातारीने त्याला विचारले, ’काय हो, काय झाले? आज झोप का लागत नाहीये?’ म्हातारा जणू त्या प्रश्नाची वाट बघत होता. त्याने जे काय घडले ते सगळे सांगितले आणि म्हातारीची माफी मागितली. ’तुझ्याकडून काही पातक घडू नये’ या भावनेने सगळे केले असे देखील स्पष्ट केले. म्हातारी आधी खुदकन् हसली आणि मग भरभरून हसली. म्हणाली. ’अहो, तुमच्या आधी ती चमकी मला दिसली होती. फक्त आश्चर्य या गोष्टीचे वाटते आहे की मोहमायेचा त्याग केल्यावर देखील तुम्हाला माती आणि सोने यातला फरक उमगला तरी कसा?’
राजकारणातले कळते काय?
प्रश्न : सोमी, तू राजकारणावर कधी का काही लिहीत नाही? आम्हाला वाचायला आवडेल.
उत्तर : नमस्कार. मला काही काही वेळा असे फार आतून उचंबळून येते आणि राजकारणावर लिहावेसे वाटते. मग मी स्वत:ला विचारते, ’सोमी, तू लिही… लिहिण्याबद्दल काही नाही… पण काय गं, तुला विधानसभा आणि विधान परिषद यातला फरक माहिती आहे का? एका दमात दहा राज्यांची नावे सांगता येतील का? केंद्रशासित प्रदेश आणि त्याचे कायदे तुला माहिती आहेत का? नगरसेवकाचे काम काय असते, आमदाराचे काम काय असते अन खासदाराचे काम काय असते तुला माहिती आहे का? नगराध्यक्ष कसा निवडतात तुला माहिती आहे का? तुझ्या वॉर्डातल्या किमान दोन नगरसेवकांची नावे तुला माहिती आहेत का? हे असे प्रश्न स्वत:ला विचारले की माझ्या आतली ’सर्वज्ञानी’पणाची ऊर्जा शांत होते आणि मी हातात फोन घेऊन नवर्याला त्रास देत बसते.
माणसे नव्हेत, विकाऊ ब्रँड!
प्रश्न : एक खूप मोठा काळ अयशस्वी होत असताना देखील खेळाडू आणि कलाकार निवृत्त का होत नाहीत? सोशल मीडियावर ’चमको’पणा का करत बसतात? आणि इतक्या अयशस्वी माणसांना एवढे चाहते मिळतात कुठून?
उत्तर : लिटिल मास्टर सुनील गावसकरने एकदा निवृत्तीबद्दल सांगितले होते की, ’निवृत्ती अशा वेळी घ्यावी की ती घेतल्यावर लोकांनी ’का घेतली? असे विचारले पाहिजे. त्यांच्यावर ’कधी घेणार’ असे विचारण्याची वेळ यायला नको.’ खेळ आणि कला या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत, त्यामुळे त्यावर एकत्र भाष्य करणे अवघड आहे. पण आजकालचा काळ बघता, निवृत्ती कधी घ्यायची हे कलाकार किंवा खेळाडू ठरवत नाहीत, तर त्यांचे ब्रँड ठरवतात असे वाटते. माणसाची ब्रँड व्हॅल्यू
त्याची कारकीर्द ठरवते. उगाच हे लोक जाहिरातींना इतके महत्त्व देत नाहीत. खेळाडू अयशस्वी असतो पण त्याचे जाहिरातदार स्पर्धेला प्रायोजित करत असतात, त्यामुळे तो खेळणे गरजेचे. त्याच्या नावावर तिकिटे विकली जात असतात, त्यामुळे तो खेळणे गरजेचे असते असे म्हणतात. खरे खोटे त्यांचे ते जाणो; आपण दिसेल ते बघायचे आणि समोर येईल ते वाचायचे. आणि हो, सोशल मीडियावर माझे जे चाहते आहेत, ते सगळे स्वतः प्रेमाने मला फॉलो करतात बरे! मी काही पीआर एजन्सी वगैरे नेमलेली नाही.
– सदाबहार सोमी