शिक्षणमंत्री भुसे
एकदा आले माझ्या मना
तिथे कुणाचे चालेना
शिक्षकांच्या युनिफॉर्मविना
राज्यात शिक्षणही फुलेना
देऊ शिक्षकांना धोतर
शिक्षिकांना नऊवारी
आपली संस्कृती जपण्याची
आहे हौस मला भारी
नको आता दिरंगाई
काढू युनिफॉर्मचे टेंडर
पोट बरेच रिकामी
आता खातील सारे भरभर
—– —–
मुख्यमंत्री फडणवीस
किती फोडले मी पक्ष
केली भाजपाची सेवा
केली जंबो मी भरती
गद्दारच खाती मेवा
यांचे करायचे काय
यांचे आम्हीच पोशिंदे
दिला पदांचा आहेर
खुश अजित नि शिंदे
कसे सांभाळावे यांना
दोघे होती डोईजड
एकेकाचा काढू काटा
आणि होऊ वरचढ
—– —–
एकनाथ शिंदे
रूसवा-फुगवा काही नाही
जरी सारखा गावी येतो
मुंबैत प्रदूषणाची भीती
गावी शुद्ध हवा खातो
थोडा काळ मिळो मला
राजकारणातून मुक्ती
मोदीनामाच्या जपाने
माझी सार्थ होईल भक्ती
राहू-केतूचीही पीडा
माझ्या खुर्चीच्या राशीला
मोदी कृपेने टळूं दे
भाग्य येवो दिमतीला
—– —–
अजित पवार
खजिन्याची विहीर आटली
पडे पैशाचा दुष्काळ
तरी करिती घोटाळे
करू कसा मी सुकाळ
लाडक्या बहिणींनी दिला
तिजोरीला मन:स्ताप
आणू कुठून मी पैसा
झाली तिजोरीही साफ
झाली राज्याची दुर्दशा
अंगापेक्षा बोंगा मोठा
कसे घालू खावयाला
जिथे तिथे आहे तोटा
—– —–
आशिष शेलार
आता सगळीकडे गाजे
माझे शेलार हे नाव
दिला सांस्कृतिक खात्याने
मला नको इतका भाव
नेहमी राहावे प्रकाशात
जरी बुडाशी अंधार
नट-नट्या कलावंत
माझ्या डोईवरी भार
करू सवंग घोषणा
ज्याला त्याला पुरस्कार
रवींद्राच्या या साक्षीने
घडवूया चमत्कार