सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यावर मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या गटातील चाळीस आमदारांना जो धक्का बसलाय, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने अगदी हाडाच्या पत्रकाराचे कर्तव्य पार पाडत ताबडतोब त्यांना सुरत गोहाटीपासून मुंबईपर्यंत डोक्यावर घेऊन नाचवणार्या सत्ताधारी मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या मुलाखती नेहमीच्या पद्धतीने घेऊन त्यांना बोलकं केलं.
– मुख्यमंत्रीजी, सुप्रीम कोर्टाच्या नोटीसनंतर तुमच्यासह तुमचे चाळीस आमदार मनातून घाबरले आहेत की नाहीत?
– मी तर घाबरलो नाही. माझ्या चेहर्यावरून तसं वाटतं का? दाढीमुळे माझा चेहरा नीट दिसत नसला तरी लावोसला जाऊन आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स किती वाढलाय हे तुम्ही मिरवणुकीतील जल्लोषानंतर पाहिलंच असेल ना! आता मी कुणाला घाबरत नाही. दिल्लीचा वरदहस्त माझ्या पाठीशी असताना मला घाबरवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आमच्या नार्वेकरांनी लावलेल्या त्या निकालानंतर तर कोणतंही कोर्ट आमच्या बाजूनेच निकाल देईल हा कॉन्फिडन्स आहे मला. बघाच तुम्ही. दिल्लीच्या हाती आमचं भविष्य सुरक्षित आहे.
– तुम्ही सारखी दिल्लीकडे दुर्बिण लावून बसलेले असता का? उद्या त्यांनी काखा वर केल्या तर?
– असं होऊच शकत नाही. केवढा दबदबा वाढलाय त्यांचा अखंड देशात. त्याशिवाय मीही आता किती अॅक्टिव्ह झालोय ते दररोज दिसतच असेल तुम्हाला.
– हो ना. तुम्हाला त्या स्वच्छता मोहिमेत झाडू मारताना पाहिलं आणि उर भरून आला माझा आणि जनतेचा. अशी कळकळ हवी शहरांच्या स्वच्छतेची.
– उगाच नाही मुंबईचा पहिला क्रमांक आला. आता तुम्हाला मुंबईत कुठेही कचरा, घाण सापडणार नही, दुर्गंधी जाणवणार नाही. ये आता.
– येऊ का घरात फडणवीसजी.
– या. या. वाटलंच होतं तुम्ही येणार. ते सुप्रीम कोर्टाच्या नोटीसबद्दल विचारायला आलात ना?
– हो ना. काय प्रतिक्रिया?
– ते होणारच होतं. कोर्ट यांना नोटीस पाठवणार, मग हे अपील करणार, मग कोर्ट त्यांना नोटीस पाठवणार, मग ते अपीाल करणार. हे रहाटगाडगं चालूच राहणार. निवडणुकीपर्यंत चालू राहिलं म्हणजे झालं. मला कशात रस आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही पुन्हा या.
– मग काय, मी पुन्हा येईन. आता जायचंय अजितदादांकडे. राम राम अजितदादा. जागावाटप संपलं का? तुम्ही बिझी असाल ही शंका होती. सुप्रीम कोर्टाच्या त्यांना बजावलेल्या नोटीसबद्दल काय वाटतं?
– मला आदर आहे त्यांच्याबद्दल.
– तो तर सर्वांना असलाच पाहिजे. पण दादा, सुप्रीम कोर्टाच्या सूचना डावलून हे जर निकाल देत असतील तर…
– मला त्या खोलात शिरायचं नाही. कोणी कसलाही निकाल देऊं दे. माझं आणि माझ्या सहकार्यांचं घोडं पुढे दामटणं हा माझा हक्क आहे. त्यासाठी वाटेल तेवढं झुकावं लागलं, तर माझी तयारी आहे.
– आणि तुम्ही झुकणार! कुणापुढे?
– ते तुला माहीत आहे. काकांना सोडून इथे आलोय कशासाठी?
– मला काय माहीत?
– फक्त शुद्धीकरणासाठी. काय असतं ते तुला नाही कळणार.
– बरोबर आहे तुमचं. मला कळलं असतं तर मी नाही का नेता झालो असतो तुमच्यासारखा. पण आपलं ठीक आहे. रिपोर्टरगिरी करायची आणि इकडचा माल तिकडे आणि तिकडचा इकडे टाकायचा. – बराय. जागावाटपात गुंतलोय. अजिबात वेळ नाही मिळत. सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं. आयुष्यात कधी जमलं नाही आपल्याला ते आता करावं लागतंय. अन्याय तरी किती सहन करायचा?
– सांभाळा स्वत:ला. मी निघतो. ५२कुळेंकडे जायचंय…
– नमस्कार ५२कुळेजी. प्रतिक्रिया द्या नोटीसबद्दल.
– हा आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. त्यांच्या गटाचा आहे.
– पण ते तुमच्या सरकारी पक्षाच्या आधीन आहेत ना. त्यांच्याच गटाचे मुख्यमंत्री आहेत. मग त्यांच्यावर कोसळलेल्या संकटानंतर तुम्ही पाठराखण करणारच ना!
– ते आम्ही पाहून घेऊ. नोटीसला उत्तर देण्यासाठी कायदेतज्ज्ञ असतातच ना. सध्या आम्ही जागावाटपात कोण आडवं जातंय त्याची बारकाईने पाहणी करतोय. कुणाबद्दल तसं वाटलं तर त्याची गय करणार नाही मी. शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझा पक्ष पुढे नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तरी चालेल. शेवटी महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. कुणाला आवडो वा न आवडो.
– तुम्ही नाव घेऊन का बोलत नाही?
– आता उखाणा घेऊ का?
– नको. एवढं बोललात खूप झालं. मला केसरकरांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. तिथे डोकं कसं शांत होतं…
– नमस्ते केसरकरजी.
– या या या या. कशासाठी येणं केलंत?
– नाही. त्या चाळीशी नोटीसबद्दल…
– मी जाणतो. त्यात काही विशेष नाही. तशी नोटीस येणारच. प्रारब्धात असतं ते चुकत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.
– कुणी केलं पाहिजे?
– शेवटी मनुष्यप्राणी आहे. वाद-प्रतिवाद होत असतात.
– पण त्या नोटीसबद्दल?
– तू प्रथम एक गोष्ट लक्षात ठेव. जे आज आहेत ते उद्या नाहीत. परवाचं मला माहीत नाही. माझा सर्वांवर विश्वास आहे. आपल्यातले अवगुण आपणच ओळखायला हवे. सध्या जे भरलेलं वाटतं तिथेसुद्धा पोकळी आहे आणि जिथे पोकळी वाटते ते भरलेलं असू शकतं. परमात्म्यावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही संकटाला सामोरं जा.
– जातो मी.