□ आश्वासन न पाळल्यास पुन्हा आंदोलन : जरांगे पाटील यांचा इशारा.
■ अजून आंदोलन होण्याची शक्यता आहेच? मग विजयाचा गुलाल उधळला तो कशाचा?
□ शासनाचा निर्णय वेळकाढूपणाचा – डॉ. प्रकाश पवार.
■ ‘निवडणूककाढूपणा’ आहे तो डॉक्टर!
□ सरकारच्या निर्णयाचा महायुतीला फटका बसणार?
■ या बेकायदा सरकारने काहीही केलं तरी महायुतीला फटका बसणारच आहे, जनता गद्दारांना क्षमा करणार नाही.
□ राज्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण.
■ आता या बातम्या देऊन तरी काय फायदा? कोणीही, कसलीही शिस्त पाळत नाही, काळजी घेत नाही.
□ मी निवडलेला नाही, निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष – जयंत पाटलांच्या उत्तराने अजितदादांचे वकील बुचकळ्यात.
■ काय गरज बुचकळ्यात पडण्याची? शेवटी निकाल दिल्लीवरूनच लिहून येणार आहे ना!
□ म्हाडाचा भोंगळ कारभार; मास्टर लिस्टवरील विजेते वेटिंगवरच.
■ लोकांचं घराचं आयुष्यभराचं स्वप्न असतं… त्याच्याशी तरी खेळू नका.
□ हिंदू देवस्थानांच्या जमिनी गिळणार्या भूमाफियांना मिंधे सरकारचा आशीर्वाद.
■ केवढं मोठं समाजकार्य करतायत ते… नाहीतरी देवांना काय उपयोग जमिनींचा?
□ आसामचे मुख्यमंत्री हे मोदी-शहांच्या रिमोटने चालतात – राहुल गांधी यांची सडकून टीका.
■ फक्त आसामचे? भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेलं कोणतंही राज्य त्यांच्याच रिमोटने चालतं… कारण पक्षच त्यांच्या ताब्यात आहे पूर्ण.
□ ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये, तर पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार…
■ तरीही इंडिया आघाडी कायम राहील आणि त्याने आघाडीच्या धोरणाला काही फटका बसणार नाही. मोदीभक्त रोंबासोंबा करू लागले असले, तरी हे भाजपलाही नीट माहिती आहे.
□ उडणार्या पक्षाचे पंख कापून जगायला सांगता? – भाजपला शेतकर्याने सुनावले खडे बोल.
■ दादा, मतदान करतानाही हे लक्षात ठेवा म्हणजे झालं… नाहीतर तिथे मोदींनीच रामाला घर दिलं, या अपप्रचाराला बळी पडाल.
□ पाकिस्तानातील हुकूमशाही हिंदुस्थानात आली का? – आदित्य ठाकरे यांचा सवाल.
■ भाजपची हिंदुत्वाची कल्पना त्याच धर्तीवरची आहे… आता हिंदूंचा पाकिस्तान बनवायचा तर तेच मॉडेल स्वीकारावं लागणार ना आदित्यजी!
□ डोंबिवलीच्या कोपर गावात भूमाफियांचा ‘टॉवर’.
■ त्यावर फोटो लावा… सरकारमधून वरदहस्त ठेवणार्या तारणहारांचा.
□ ‘लोकशाही’ वाहिनीवरील बंदी उठवली; दिल्ली हायकोर्टाचा केंद्राला दणका.
■ निब्बर निलाजरे आहेत ते… काही फरक पडत नाही अशा दणक्यांनी. सरकारं बरखास्त करण्याचे अधिकार असायला हवेत न्यायालयांकडे. मग वठणीवर येतील.
□ मराठ्यांच्या फौजेपुढे सरकारची दाणादाण! सर्व मागण्या मान्य.
■ नक्की काय झालंय, हे कळायला अजून वेळ आहे…
□ दादरचे कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण.
■ बालवाड्याही नासवल्याशिवाय राहणार नाहीत हे गणंग!
□ मतदानपत्रिका नाही तर निवडणूक नाही – ईव्हीएम हटाओ कृती समितीचा निर्धार.
■ लोकांची डोकी हॅक झाली आहेत, तोवर अशा निर्धारांना जनतेतून कुठे पाठबळ मिळणार?
□ प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची ऑनलाइन फसवणूक.
■ नेमकी कोणी केली आहे ते पाहा… काही भरवसा नाही…
□ सगेसोयरे यांनाही मिळणार कुणबी जात प्रमाणपत्र.
■ सगेसोयरे यांची व्याख्या नवी आहे की जुनी? पटण्यासारखी आहे का ती? ते महत्त्वाचं.
□ ओबीसींचा एक फेब्रुवारीपासून एल्गार
■ एक झाले की दुसरे, दुसरे झाले की तिसरे… निवडणुका होईपर्यंत आणि कायदेशीर सरकार येईपर्यंत हेच खेळ चालू राहणार…
□ नितीशकुमार पुन्हा कमळाबाईला शरण.
■ त्यांच्यामुळे बिहारमध्ये सरड्यांच्या आत्महत्येची लाट आलीये म्हणे, सरड्यांच्या मनात न्यूनगंडाने नैराश्य दाटल्यामुळे.