पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणार्या कालावधीतील कमतरता भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी, फेब्रुवारीमध्ये एक अतिरिक्त दिवस घेऊन ३६६ दिवसांचे लीप वर्ष गणले जाते. लीप वर्षातल्या फेब्रुवारीत नियमित २८ दिवसांऐवजी २९ दिवस असतात. जगात साधारणपणे ४.८ दशलक्ष लोकांचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला येतो. काही ज्योतिषांच्या मते २९ फेब्रुवारीला जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत प्रतिभाशाली असतात. लीप वर्ष नसेल तेव्हा २९ फेब्रुवारीला जन्म झालेले लोक सहसा २८ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करतात.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एकूण ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांपेक्षा, सहा तास अतिरिक्त कालावधी लागतो. कालगणनेत चूक होऊ नये म्हणून प्रत्येक चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका अतिरिक्त दिवसाचा समावेश केला जातो. तसे न केल्यास पिकांसाठीचा हंगाम, ऋतू हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कालावधीत येतील, ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे ज्या वर्षाला चार या संख्येने भाग जातो ते लीप वर्ष गृहित धरण्यात येते. याचबरोबर ज्या वर्षाच्या शेवटी दोन शून्य आहेत आणि संबंधित वर्षाला ४०० या संख्येने भाग जातो, ते लीप वर्ष गणले जाते. उदा. १९०० हे लीप वर्ष नव्हते. मात्र, २००० हे लीप वर्ष होते.
इस्लामिक कॅलेंडरमध्येही…
रॉयल म्युझियम ग्रीनविचच्या संकेतस्थळानुसार हिजरी या इस्लामिक कॅलेंडरमध्येही प्रत्येक लीप वर्षाला ‘अल हिज्जा’ या १२व्या महिन्यात एका अतिरिक्त दिवसाचा समावेश करण्यात येतो. शेअर बाजारात मात्र या वर्षाला फारसा भाव नाही. आर्थिक प्रगतीचे मोजमाप करताना मुंबईतील शेयर बाजारातील (रोखे बाजार) उलाढाल सांकेतिक मानली जाते. बॉम्बे स्टॉक एकस्चेंजचा (बीएसई) बाजारमूल्याच्या बाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या ५००० हून अधिक कंपन्यांच्या शेयर्सच्या (समभाग) खरेदी-विक्रीचे व्यवहार या रोखे बाजारात केले जातात. मात्र काही जुन्या अनुभवांमुळे इथे लीप वर्ष शुभ मानले जात नाही. उदा. १९९२, २०००, २००८ आणि २०२० मध्ये शेयर बाजार (निफ्टी आणि सेन्सेक्स) बर्याच वेळा कोसळला होता. १९८४पासूनचा इतिहास पाहता शेयरच्या उलाढालींवर १० लीप वर्षांत केवळ ८ टक्के परतावा मिळाला. तर इतर सर्व साधारण वर्षांत तो २३ टक्क्यांपर्यंत होता.
शेयर बाजाराच्या घसरणीचा मागोवा घेताना १९९२च्या हर्षद मेहता शेयर घोटाळ्याची दखल घेतली जाते. शेयर घोटाळा चव्हाट्यावर येताच २९ एप्रिल १९९२ रोजी सेन्सेक्स १२.७७ टक्क्यांनी कोसळला होता. शेयर बाजाराच्या इतिहासातील नीचांक अशी या घसरणीची नोंद झाली होती. २०२४ या वर्षी जानेवारीच्या पहिल्या दिवशी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील उलाढाल सपाटच होती आणि सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फिफ्टीच्या (निफ्टी) अंतर्गत किरकोळ उलाढाल नोंदवली गेली. सेन्सेक्स ३१.६८ पॉइंटस (०.०४ टक्के) वृद्धीची नोंद करून दिवसअखेर ७२,२७१.९४ पॉइंट्सवर बंद झाला. तर निफ्टी १०.५० पॉइंट (०.०५ टक्के) वृद्धीची नोंद करुन दिवसअखेरीस २१,७४१ पॉइंट्सवर बंद झाला. नंतरच्या काही दिवसांतही फारशी प्रगती नव्हती. तज्ज्ञांच्या मते काही महिन्यात या स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक आणि रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीच्या पार्श्वभूमीवर निफ्टी २४ हजारांपर्यंत सरकण्याची शक्यता शेयर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
इतर व्यावसायिक घटना
वर्ष २०००मध्ये अमेरिकेतील ‘डॉट कॉम बबल बर्स्ट’मुळे भारतासह बहुतांश जागतिक बाजारपेठांमध्ये २१ टक्के नुकसानीची नोंद झाली होती. १९९५-२००० या कालावधीत इंटरनेट सर्विस आणि तांत्रिक कंपन्यांच्या रोख्यांच्या मूल्यांत अवास्तव वाढ दाखविली गेली. यामुळे २०००मध्ये बर्याच ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला. २००८मध्ये जागतिक आर्थिक मंदीमुळे सेन्सेक्सचे मूल्य जवळजवळ अर्ध्यावर आले होते. २०१६मध्ये नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइक, अमेरिकेतील निवडणूक अशा बाबींचाही शेयर बाजारावर परिणाम झाला होता. २०२०मध्ये कोविडने जोराचा दणका दिला. २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्सने १२.७१ टक्क्यांचा नीचांक गाठला. नंतर वर्षाच्या शेवटी सेन्सेक्सने १६ टक्क्यांपर्यंत मजल गाठली. मात्र ती केवळ रिझर्व बँकेने केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे. आता २०२४-२५चा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत मांडल्यावर देशाच्या आर्थिक परिस्थितीचा थोडाफार अंदाज येईल. क्रूड तेलाचे अस्थिर दर, विदेशी गुंतवणुकीत घट आणि चलनफुगवट्याचा देशाच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम होतो.
लोककथा
जगभर लीपवर्षाशी संबधित बर्याच लोककथा प्रचलित आहेत. उदा. युकेनमध्ये प्रचलित लोककथेनुसार लीप वर्षांत केलेल्या लग्नाची परिणिती घटस्फोटात होते. इटलीमध्ये लीप वर्षात महिलांना त्यांच्या लग्नासह, कोणतेही मोठे निर्णय घेण्यापासून परावृत्त केले जाते. प्राचीन रोम (६४ ख्रिस्तपूर्व) लीप वर्षात पूर्णपणे जळाले होते. त्याचप्रमाणे १९१२ या लीप वर्षात टायटॅनिक जहाज बुडाले होते. रशियात लीप वर्षात अभूतपूर्व हवामानाला तोड द्यावे लागते असा समज लोकांमध्ये आहे. स्कॉटलंडचे शेतकरी लीप वर्षात पिकांचे नुकसान होते असे मानतात. शिवाय २९ फेब्रुवारीला जन्म झाल्यास त्या व्यक्तीस अडचणींचा सामना करावा लागेल असाही समज आहे. आयर्लंडमध्ये महिला २९ फेब्रुवारीला लग्नासाठी प्रपोज करणे शुभ मानतात. शिवाय पुरुषांना महिलेने २९ फेब्रुवारीला प्रपोज केल्यास त्या प्रस्तावास विरोध करु नये असेही मानले जाते. स्त्री व पुरुषांचे प्रमाण समान राहण्यासाठी सेंट ब्रिगिड आणि सेंट पॅट्रिक यांच्यात करार झाला होता, त्या करारानुसार या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. ग्रीसमध्ये लीप वर्षात लग्न करु नये किंवा घटस्फोट घेऊ नये असे मानले जाते. लीप वर्षात घटस्फोट झाल्यास ते जोडपे कधीच सुखी होणार नाही, असाही समज आहे.