आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे काय असते?
– नीती बंडाळे, परभणी
‘मी पुन्हा येईन’ हा मंत्र आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कितीही अपयश आलं तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायची असते (पण त्यासाठी बाकी कशाची राख करायची नसते.. हे पण महत्त्वाचे असते).
प्रजासत्ताक दिन दर वर्षी साजरा होतो, पण प्रजेच्या हाती खरोखरच सत्ता आहे का? आणि प्रजा ती सत्ता राबवण्याच्या योग्यतेची आहे का?
– कृष्णा खोत, बत्तीस शिराळा
का? प्रजासत्ताक दिनाचा इव्हेंट करायचा आहे का? प्रजासत्ताकाचं माहित नाही.. पण ‘सत्ता’ इव्हेंट राबवण्यात पटाईत आहे. आणि ‘प्रजा’ इव्हेंट साजरा करण्याच्याच योग्यतेची आहे (सॉलिड उत्तर दिले ना मी? हे सोशल मीडियावर टाकलंत, तर प्लीज माझं नाव घेऊ नका… उगाच प्रजासत्ताक दिनी माझी योग्यता ट्रेंड व्हायची).
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात, पुरूषांच्या तोंडात तो भिजतो?
– सफिया शेख, गोवंडी
समजा मी म्हटलं पुरूषांच्या तोंडात तीळ भिजतो… तर पुरूषांच्या तोंडात तीळ भिजायला घालून तिळांना मोड आणायचेत का? तुमची तिळाची भाजी होईल… पण आम्हा पुरूषांना केवढ्याला पडतील ते मोड.
महाराष्ट्र सोडून एखाद्या वेगळ्याच राज्यात कायमचे राहायला जाण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही कोणतं राज्य निवडाल? आणि का?
– राजस टिळक, बेळगाव
मालद्वीप… खरं म्हणजे मालदीव आणि लक्षद्वीप यांच्या लफड्यात आपल्याला पडायचं नाही… म्हणून या दोघांच्या मधलं मालद्वीव हे राज्य मी क्रिएट केलंय… जे भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा शोधून सापडणार नाही. त्यामुळे तिथल्या बीचवर मी एकटाच खुर्ची टाकून बसू शकतो… एकटाच फिरू शकतो… तिथे माझ्या व्यतिरिक्त कोणी नसेल… कॅमेरामन सुद्धा…
महाराष्ट्रात मुंबईत जन्मलेले, इथेच व्यवसायाला सुरूवात केलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी गुजरात कशी?
– बळवंत ठाकूर, यवतमाळ
काहीजण असं म्हणतात की, काहीजणांची महाराष्ट्र ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असूनही त्यांना गुजरात ही त्यांची ‘दैव भूमी’ वाटते… असं अंबानींना वाटत असेल आणि ‘ते’ काहीजण उद्या गुजरात वर आपला दावा सांगतील बिंगतील, म्हणून घाबरून अंबानींनी गुजरातवर आधीच आपला क्लेम केला असेल. (तुमच्या मनासारखं उत्तर दिलंय ना बळवंतराव?)
माझी प्रेयसी मला बागेत भेटायला बोलावते, पण जाण्या येण्याचे बसचे पैसे पण देत नाही, भेळीचा खर्चही मलाच करायला लावते. असं कसं हे स्वार्थी प्रेम?
– ओंकार रावते, बुलडाणा
प्रेयसीने परत तुम्हाला भेटायला बोलावलं तर तुम्ही जाऊच नका.. दुसर्या कोणालाही पाठवा… तोच सगळं करेल… (बसच्या तिकीटचा खर्च, भेळीचा खर्च हो.)
नवराबायकोच्या भांडणात नवर्याचं म्हणणं बरोबर निघालं आणि बायकोने चूक मान्य केली, असं कधी पाहिलंय का तुम्ही कुठे?
– शरद शिंदे, येवला
ही अंधश्रद्धा आहे… अंधश्रद्धा पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे… आणि मी तो करणार नाही.
नाटक, सिनेमा, सिरियलींत पुरूषांना बायकांची सोंगं काढल्यावर नेमका काय आनंद मिळतो? ते पाहून प्रेक्षकांना नेमका काय आनंद मिळतो?
– सरिता वाढवे, पनवेल
स्त्रियांमध्ये नसते ‘ती’ गोष्ट प्रेक्षकांना पुरूषांमध्ये बघायला मिळते (विनोदबुद्धी…) पुरूष प्रेक्षक, पुरूष कलाकारांकडून ‘कसला तरी’ आनंद घेतात हे तुम्हाला बघवत नाही का ताई? त्यात तुमचेही कोणी दादा, तात्या, मामा, भाऊ आणि नवरोजीही असतील.. त्यांचा ‘हा’ आनंद हिरावून घेऊ नका.
माझ्या गर्लफ्रेंडने माझ्याच भावाची ओळख तिचा आतेभाऊ अशी करून दिली मला… आता मी काय करू?
– रोहन ढवळे, नालासोपारा
दोघांचं जमवून द्या.. आणि तुम्ही आहेर पाकिटं लिहायला बसा… आणि तुमची ‘ती’ तुमच्या भावाबरोबर का होईना… तुमच्याच घरी येणार आहे यात आनंद माना.