सुरुवातीपासून ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे शिवसेनेचे सूत्र होते. मराठी तरुणांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असणारी शिवसेना वेगवेगळ्या सरकारी, खासगी कंपन्यांतील परप्रांतीय कर्मचार्यांच्या याद्या ‘मार्मिक’मध्ये छापून मराठी माणसाच्या मनात लढण्यासाठी अंगार फुलवण्याचे काम करीत होती. या बहुतांश कारखान्यांत/ कार्यालयात दक्षिणात्यांचा वरचष्मा होता. तेथील कामगार संघटना कम्युनिस्टांच्या हाती होत्या. कम्युनिस्ट कोणत्याही गटाचे असोत, ते सेनेचे विरोधकच होते. शिवसेनेच्या दृष्टीने ते कायम रशियोन्मुख असल्याने राष्ट्रद्रोही होते. त्यातच १९६७ साली लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. शिवसेनेने समाजकारणाचा वसा घेतला होता, तरी कम्युनिस्टांना विरोध करायचाच, या धोरणात्मक भूमिकेमुळे शिवसेनेने डाव्या विचारसरणीचे कृष्ण मेनन (पंतप्रधान पंडित नेहरू यांचे विश्वासू सहकारी मंत्री) यांचा निवडणुकीत पराभव करायचाच असा चंग बांधला. निवडणुकांच्या राजकारणातील सेनेचे हे पहिले अप्रत्यक्ष पाऊल होते.
१९६७च्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेमुळे मराठी माणसांत नवे चैतन्य निर्माण झाले. आतापर्यंत शिवसेनेने निवडणुकीत भाग घेतला नव्हता. परंतु १९६७च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. त्यावर शिवसेना विरोधकांनी टीका केली. सेनेला काँग्रेसचे बटीक म्हटले, परंतु कम्युनिस्ट व्ही. के. कृष्ण मेननला पाडायचेच हा शिवसेनेचा निर्णय पक्का होता. तो त्यांनी तडीस नेला.
निवडणूक प्रचारास सुरूवात झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. सभांनी मैदाने गजबजू लागली. काँग्रेस उमेदवार स. गो. बर्वे यांच्या प्रचारासाठी ठाण्याच्या गावदेवी मैदानात प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत स. गो. बर्वे यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहणार असे शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले. ‘ज्या मेननने महाराष्ट्राचा आवाज कधी उठवला नाही, ना मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून खटपट केली, ना गोव्याबद्दल एका शब्दाने साथ दाखवली किंवा बेळगाव-कारवार हे महाराष्ट्राचे आहेत म्हणून कधी आवाज उठवला, अशा उपर्या मेननला मराठी माणूस मत देणार नाही,’ असा विश्वास व्यक्त केला. स. गो. बर्वे यांचे मनःपूर्वक कौतुक केले. ‘हा मनुष्य अर्थशास्त्राचा पंडित आहे. कर्तबगार प्रशासक आहे. हाडाचा महाराष्ट्रीय आहे. त्यांच्या नावाला पैशाच्या लफड्याचा कलंक नाही. ज्यावेळी मुंबई राज्याच्या मालमत्तेचे गुजरात-महाराष्ट्रात वाटप झाले त्यावेळी स. गो. बर्व्यांनी बजावलेली कामगिरी सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावी लागेल, म्हणूनच मेनन यांना पाडून बर्वे यांना निवडून आणणे आवश्यक आहे,’ असे आग्रही प्रतिपादन शिवसेनाप्रमुखांनी केले.
कृष्ण मेनन जेथे जेथे गेले तिथे घोटाळे केले. हिंदुस्थानचे हाय कमिशनर असताना त्यांची ‘जीप’ची भानगड गाजली होती. त्यांनी सातत्याने चीन व रशिया यांची तळी उचलली, वकिली केली. मागच्या लोकसभा निवडणुकीत नेहरूंनी त्यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली होती. परंतु यावेळी उमेदवारी नाकारल्यामुळे कृष्ण मेनन यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांना डावे-उजवे कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष यांचा पाठिंबा होता. त्यांच्या विरोधात काँग्रेसने मातब्बर, हुशार, सनदी अधिकारी असलेल्या स. गो. बर्वे यांना तिकीट दिले. तर जनसंघातर्फे प्रा. मुुकुंदराव आगसकर हे उभे होते. ईशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघ हा चेंबूर ते कल्याण-अंबरनाथ असा पसरला होता. त्यामुळे ठाणे-कल्याणमधील मराठी माणसांना सेनेने आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे स. गो. बर्वे विजयी झाले. तेव्हा ३० एप्रिल १९६७च्या ‘मार्मिक’मध्ये ‘हा राष्ट्रप्रेमी लोकांचा विजय’ हा लेख छापून आला. ‘मराठी माणसाच्या एकजुटीमुळे कम्युनिष्ट कृष्ण मेननचा भोपळा आपटला,’ असे त्या लेखात नमूद केले होते.
१ जानेवारी १९६७ रोजी शिवतीर्थावर झालेल्या सभेत हजारोंच्या इच्छेला मान देऊन मी निवडणूक लढवीत आहे, अशी घोषणा कृष्ण मेनन यांनी केली. या सभेला ‘ब्लिट्झ’चे संपादक आर. के. करंजिया, बॅ. रजनी पटेल, अरुणा असफअली, आचार्य अत्रे आदी डाव्या विचारसरणीच्या दिग्गजांची उपस्थिती होती. त्या सर्वांनी काँग्रेसवर टीका करताना शिवसेनेवर तोंडसुख घेतले हे वेगळे सांगायला नको. या सभेत आचार्य अत्रे यांनी कृष्ण मेनन यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली. ‘कृष्ण मेनन नसते तर नेहरू नसतेच! कृष्ण मेनन यांनी नेहरूंना आंतरराष्ट्रीय वाद शिकवला. अशा कुशाग्र बुद्धीच्या कृष्ण मेनन यांना विजयी करा,’ असे आवाहन केले. तर दुसरीकडे निवडणुकीत सर्व सामर्थ्यानिशी शिवसेना स. गो. बर्वेंचा प्रचार करीत होती. एका प्रचारसभेत ‘महाराष्ट्रीय जनतेला अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नात काही गैर नाही,’ असे स. गो. बर्वे यांनी निक्षून सांगितले. एक प्रकारे शिवसेनेच्या धोरणांना पाठिंबा दिला. विचारांना पुष्टी दिली. त्यामुळे मनात काँग्रेसविरोध असूनही मराठी मतदारांनी काँग्रेसच्या स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला.
‘लोकसत्ता’ने कृष्ण मेनन यांच्या उमेदवारीस विरोध वेâला आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीचे राजकारण हे कम्युनिस्टांचे आवडते संयुक्त आघाडीचे राजकारण आहे अशी टीका-टीप्पणी केली. आचार्य अत्रे यांनी लोकसभेसाठी उभ्या राहिलेल्या ‘पाच पांडवांना विजयी करा’ असे आवाहन मराठातून केले. कृष्ण मेनन, जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे, कॉ. एस. ए. डांगे आणि ह. रा. गोखले या पाच पांडवांच्या विजयासाठी जंग-जंग पछाडले. पण मेनन यांचा पराभव झाला.
स. गो. बर्वे यांच्या विजयानंतर जवळजवळ सर्वच मराठी वृत्तपत्रांनी दिल्लीतील मराठी नेतृत्व बळकट करण्याचा आग्रह धरला. स. गो. बर्वे हे महाराष्ट्र व दिल्ली यातील एक जाणकर, जबाबदार दुवा बनतील असा विश्वास व्यक्त केला. स. गो. बर्वे यांना चांगले खाते मिळणार होते, त्याचा फायदा महाराष्ट्राला निश्चितच झाला असता; परंतु नियतीच्या मनात वेगळाच विचार होता. विजयाचा आनंद त्यांना उपभोगता आला नाही. त्यांचे दिल्लीत आकस्मिक देहावसान झाले. केवळ महाराष्ट्र नाही तर सारा देश बर्वे यांच्याकडे आशेने पाहत होता. बर्वे यांच्या निधनानंतर त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे या ईशान्य मुंबईतून पोटनिवडणुकीला उभ्या राहिल्या. त्यांच्याविरूद्ध पुन्हा एकदा कृष्ण मेनन उभे राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्वे यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांना ‘विजयाची कवचकुंडले द्या,’ असे आवाहन केले. लोकांनी शिवसेनाप्रमुखांचे हे म्हणणे ऐकले आणि ताराबाई सप्रे निवडून आल्या.
या निवडणुकीत आचार्य अत्रे यांनी शिवसेनाविरोधी तोफ डागली होती. शिवसेना काँग्रेसची बटीक आहे, काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे. ती शिवसेना नसून ‘वसंत सेना’ आहे, असे नाना आरोप केले. परंतु मराठी माणूस बिथरला नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीने कृष्ण मेनन यांना पाठिंबा दिला होता. तरी मराठी मतदारांनी शिवसेनाप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डाव्या विचारसरणीच्या कृष्ण मेनन यांचा पराभव केला.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख आणि अन्य नेत्यांनी चेंबूर ते कल्याण हा पट्टा ढवळून काढला. त्यांच्या सभांना मराठी माणसांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. मराठी माणसाला, निवडणुकीच्या राजकारणात पर्याय दिसू लागला. अन्यायाचा अंधकार दूर होऊन आशेचा किरण दिसू लागला. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची मने जिंकली होती. त्यांच्या मराठी बाण्याचे गारुड मराठी मनावर झाले. संपूर्ण महाराष्ट्र समितीमुळे डाव्यांकडे झुकलेला बराचसा मराठी मतदार या निवडणुकीमुळे सेनेकडे वळल्याचे चित्र हळूहळू दिसू लागले. त्यांचे मतपरिवर्तन करण्यात बाळासाहेब ठाकरे यशस्वी झाले होते. ठाण्यातील मराठी मतदारांची नस बाळासाहेबांना कळली होती. त्यामुळे ऑगस्ट १९६७मध्ये होणार्या ठाणे नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उतरली आणि विजयी झाली. शिवसेनेचा भगवा सर्वप्रथम ठाण्यात फडकला. सेनेच्या या विजयाची बीजे स. गो. बर्वे यांच्या निवडणुकीत रोवली गेली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे राजकारणातील अप्रत्यक्ष पाऊल यशस्वी ठरले.