महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यापासून ठाकरे ब्रँडची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात होताच; उद्धव-राज यांच्या एकीमुळे तो अधिक भक्कम आणि गडद झाला. ठाकरे ब्रँड हा फक्त ब्रँड नाही तर तो मराठी माणसाचा आवाज आहे, मराठी भाषेचा हुंकार आहे, मराठी अस्मितेचा प्रतीक आहे आणि महाराष्ट्र धर्मरक्षक आहे.
तसे पाहिले तर देशात अनेक राजकीय कुटुंबे आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू-गांधी, जम्मू-काश्मीरचे शेख अब्दुल्ला-ओमर अब्दुल्ला, लालबहादूर शास्त्री, ओरिसाचे बिजू-नवीन पटनाईक, तमिळनाडूतील एम. करुणानिधी-स्टॅलिन, कर्नाटकातील एच. डी. देवेगौडा-कुमारस्वामी, पंजाबचे प्रकाशसिंग बादल-सुखबीरसिंग, उत्तर प्रदेशचे चौधरी चरणसिंग, हरियाणाचे ओमप्रकाश चौताला आदी कुटुंबांनी राज्य आणि देशस्तरावरील राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातही वसंतराव नाईक-सुधाकरराव नाईक, शरद पवार-अजित पवार, शंकरराव-अशोक चव्हाण, विलासराव-अमित देशमुख आदी राजकीय कुटुंबांनी महाराष्ट्रातील सत्तेचा गाडा हाकला आहे. या सर्वांनी सुरुवातीपासूनच सत्तेची उच्च पदे कार्यक्षमतेनुसार भूषवली आहेत. पण महाराष्ट्रातील ठाकरे हे आगळेवेगळे कुटुंब आहे, कारण या कुटुंबाला राजकारणापेक्षा समाजकारण अधिक जवळचे आहे.
शंभर वर्षांपेक्षा जास्त काळात ठाकरे कुटुंबांच्या चार पिढ्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांची एक परंपरा आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यापैकी एक थोर समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे होते. ते सत्यासाठी लढणारे विचारवंत होते. बहुजनांचे कैवारी-महाराष्ट्र भूषण असलेल्या प्रबोधनकारांची आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, इतिहासविषयक, नाट्य आदी क्षेत्रांतील कामगिरी मशहूर आहे. १९५६च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या चळवळीला प्रबोधनकारांचे मार्गदर्शन लाभले होते. या लढ्यात साथी एस.एम. जोशी, सेनापती बापट, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्याइतकाच प्रबोधनकारांचा महत्त्वाचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत ते जसे अग्रस्थानी होते तसेच राजकारणातही त्यांचे स्थान उच्चस्तरीयच होते. महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी, हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, ब्राह्मण्यवाद आणि विखारी जातीयवादाविरुद्ध प्रबोधनकारांनी जो लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेले हे एकमेव कुटुंब आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. ‘महाराष्ट्रात मुंबई होती, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता’ आणि ‘असूनही मालक मी या घरचा, फिरतो दारोदारी बनून भिकारी’ अशी अवस्था मुंबईतील मराठी माणसाची होती. मुंबईच्या आसपास असलेली कार्यालये, कारखाने, कंपन्या, विविध आस्थापनांमध्ये अमराठी माणसांचा, त्यातही प्रामुख्याने दाक्षिणात्यांचा भरणा अधिक दिसत होता. तेव्हा मराठी माणूस अस्वस्थ होता, घुसमटत होता. या घुसमटीला थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून वाट करून दिली. बाळासाहेबांनी कधी कुंचल्याच्या फटकाराने, तर कधी जळजळीत अग्रलेखाने मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. झोपी गेलेल्या मराठी माणसाला जागे केले. मराठी अस्मितेला फुंकर घातली. मग यातूनच १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्या ‘शिवसेना’ या आक्रमक व लढाऊ संघटनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी मार्मिक लिखाणाने आणि धारदार वाणीने शिवसेनेची जडणघडण केली. कडवट महाराष्ट्राभिमानाची आणि हिंदुत्ववादी विचारांची एक पिढी उभी केली. देश-परदेशात त्यांची ओळख ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी झाली. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र आणि राष्ट्र याचा सतत विचार करणार्या आणि तब्बल ४६ वर्षे शिवसेनेसारख्या लढाऊ संघटनेचे नेतृत्व बाळासाहेबांची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. शिवसेनाप्रमुखांची कार्यपद्धती त्यांनी जवळून पाहिली, अंगीकारली आणि अनुभवली. ‘दै. सामना’ वृत्तपत्र सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रात १९९५ साली सत्तेवर आलेले शिवशाही सरकारचे ते साक्षीदार आहेत. २००३ साली महाबळेश्वर येथील शिवसेना पदाधिकार्यांच्या शिबिरात त्यांची कार्यप्रमुखपदी एकमुखाने निवड झाली. शिवसेना कार्यप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा दौरा केला आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. २००५ साली आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांची एकजूट भक्कमपणे उभारली. याचा परिणाम २००७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशात झाला. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर आदी महानगरपालिकांवर भगवा फडकला. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू असतानाच नोव्हेंबर २०१२ साली शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडली तेव्हा उद्धव डगमगले नाहीत. २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचाराचे रान पेटवले आणि एकहाती स्वबळावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आणले. त्या वेळी भाजपाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदासाठीचा शब्द पाळला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी स्थापन झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धवजी ठाकरे हे विराजमान झाले. त्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. लोकोपयोगी योजना राबवल्या. त्याच काळात कोविडसारख्या महाआजाराने सार्या जगाची आरोग्यव्यवस्था ढासळली असताना महाराष्ट्रात कोविडविरुद्ध समर्थपणे लढून लाखो जीव वाचवले. त्यांच्या आरोग्य व्यवस्थेची दखल सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पडू दिले नाहीत. महाराष्ट्राचा राज्यशकट सुरळीत चालत असताना पक्षातील अतिमहत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांनी पक्षात फूट पाडली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. कुठलाही मोह-माया न ठेवता उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सत्ता गेली, पक्षाचे नाव आणि चिन्हसुद्धा चोरीला गेले. तरी पण उद्धव डगमगले नाहीत. पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी सज्ज झाले. उद्धव ठाकरे हे संकटाला संधी मानणारे नेते आहेत. शांत, संयमी तरी धीरोदात्त सेनानी आहेत. कठीण परिस्थितीत आणि निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांवर मात करीत लोकसभेत ९ खासदार आणि विधानसभेत २० आमदार निवडून आणून त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ हे विरोधकांना दाखवून दिले.
‘ठाकरे’ हे कलावंतांचे कुटुंब आहे. या कुटुंबाकडून कलेचा मानसन्मान केला जातो, राखला जातो. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू, उद्धवजी यांचे सुपुत्र एक उत्कृष्ट कवी आहेतच, पण ते पर्यावरण आणि क्लायमेट चेंजचे अभ्यासकही आहेत. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री असताना त्यांनी अल्पकाळात केलेले काम वाखाणण्यासारखे आहे. युवा सेनेच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रामधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यास अग्रक्रम दिला. शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थिनींच्या समस्या, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या न्याय्य मागणीसाठी लढा दिला. मुंबईच्या रस्ते, पाणी, झोपडपट्टी विकास, पर्यावरण आणि एकूणच मुंबईच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास असल्यामुळे आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळे मुंबईच्या नागरिकांचे जीवन निरोगी, सुरक्षित कसे राहील याविषयी ते नेहमीच जागृत असतात. आदित्य यांचे मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी आदित्यच्या रूपाने महाराष्ट्राची सेवा करीत आहे.
आजच्या सद्य परिस्थितीत व गोंधळलेल्या वातावरणात ठाकरे कुटुंबाचा आधार महाराष्ट्राला वाटतो. प्रबोधनकार, बाळासाहेब हे महाराष्ट्राचे विचारधन आहे. महाराष्ट्राच्या कडेकपारीतून ठाकरे विचारांचा नाद घुमत राहिला पाहिजे. कारण ठाकरे यांची मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची ही धगधगती मशालच महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करणार आहे.
एप्रिल २०२५ मध्ये शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्राच्या महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जी.आर. काढला. त्याला महाराष्ट्रातून सर्वप्रथम कडाडून विरोध केला तो उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी. पालक-विद्यार्थी संघटना, मराठी भाषेसाठी झटणार्या संस्था-संघटना, काँग्रेस, डावेपक्ष आदी मराठी भाषेवर प्रेम आणि आस्था असणार्यांनी विरोध केला. बैठका, आंदोलने आणि सभाही घेतल्या. त्याचबरोबर ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या ५ जुलैच्या मोर्चाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा जी.आर. रद्द करावा लागला. ठाकरे बंधूंच्या ताकदीचा अंदाज त्यांना आला. ठाकरे बंधूंच्या शक्तीपुढे महायुती सरकारची हिंदी सक्ती हरली.
५ जुलै २०२५ रोजी उद्धव आणि राज यांनी वरळीच्या डोममध्ये विजयी मेळावा घेतला. त्याला मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी भाषकांनी प्रचंड गर्दी केली. या प्रचंड गर्दीच्या साक्षीने ठाकरे बंधूंनी आता थांबायचे नाही असा हुंकार देत मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र यात तडजोड नाही असा इशारा देत मराठी माणसाचे स्फुल्लिंग पुन्हा एकदा चेतवले. महाराष्ट्रातला मराठी माणूस मग तो कुठल्याही विचारसरणीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो पण ‘ठाकरे’ नावावर तो भावुक होता. मराठी माणूस आणि ठाकरे हे भावनिक नाते राजकारणापलीकडचे आहे. म्हणूनच तब्बल १९ वर्षानंतर उद्धव आणि राज एकत्र येण्याचा सुवर्णक्षण टिपण्यासाठी प्रत्यक्ष हजारो जण उपस्थित होते. तर कोट्यवधी मराठी भाषिकांनी तो क्षण टीव्हीवर पाहिला आणि अनुभवला. संपूर्ण दिवस टीव्हीवर ठाकरे ब्रँडचा मराठी आवाज घुमत होता. महाराष्ट्र धर्म गर्जत होता. हे सगळं घडलं ते ठाकरे बंधूंच्या एकीमुळे. मराठी भाषा आणि महाराष्ट्र संकटात असताना ‘ठाकरे’ धावून आले हे उभ्या महाराष्ट्राने पुन्हा पाहिले. महाराष्ट्रात ठाकरे आणि फक्त ठाकरेच चालणार. ब्रँड ठाकरेच महाराष्ट्र विरोधकांचा बॅण्ड वाजवणार!