□ मौलवींसोबत मोहन भागवतांचे अडीच तास चिंतन.
■ एक मराठी कविता इथे एक शब्द बदलून वापरावीशी वाटते… देखावे करण्याचे वय निघून गेले… भागवत आणि कंपनीचे हे चिंतन म्हणजे गब्बर के ताप से तुम्ही एक ही आदमी बचा सकता है… खुद गब्बर, असा दम मुस्लिम समुदायाला भरण्याचाच प्रकार आहे.
□ गृहनिर्माण धोरणात मराठी माणूस ‘बेघर’च! प्रकल्पांमध्ये प्राधान्य देण्याचे सरकारचे आश्वासन ढगात.
■ त्यांना मराठी माणूस मुंबईच्या परिघातून हाकलून देऊन तो सगळा परिसर परात्पर मालकांना दान करायचा आहे, मग केंद्रशासित करून किंवा न करता गुजरातला जोडून टाकायचा आहे. त्यासाठी नेमलेल्या वेठबिगारांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?
□ हिंदुस्थानींना नोकर्या देऊ नका – मोदींचे मित्र ट्रम्प यांचा गुगल आणि मायक्रोसॉफ्टला दम.
■ त्या राजपुरोहितला सांगा की मोदींना ट्रम्प फोन करतायत रोज संध्याकाळी, तो एकदा उचला आणि छप्पन्न इंची दम द्या तात्यांना. भारतीयांच्या नोकर्या हिरावाल तर याद राखा म्हणावं. राजपुरोहितने स्वत:ही फोन करायला हरकत नाही. मोदींकडून कोणीतरी फोन केला म्हणून तात्यांना किती आनंद होईल.
□ लाडक्या बहिणींसाठी महायुतीने ठेकेदारांना ठकवले; ९० हजार कोटींची बिले थकीत.
■ लाडक्या बहिणी उगाच बदनाम होत आहेत. जेव्हा हे सगळं प्रकरण खणलं जाईल तेव्हा लाडक्या बहिणींचं नाव सांगून कोणी कशी आणि किती मलई खाल्ली ते उघड होईल. ठेकेदार सरकारवर बहिष्कार कधी घालणार आहेत?
□ मराठीत बोलतो, असे सांगणार्या विद्यार्थ्यावर वाशीतल्या आयसीएल कॉलेजमध्ये हॉकी स्टिकने हल्ला.
■ हा हल्ला करणार्यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर, त्यांच्या लाडक्या भाषेच्या प्रांतात नेऊन सोडलं पाहिजे. पण तीन भाषा महाराष्ट्राच्या उरावर लादायला उतावीळ झालेल्यांकडून ही अपेक्षा करण्यात अर्थ काय?
□ एसटीच्या ग्रूप बुकिंगची भाडेवाढ एकाच दिवसात केली रद्द.
■ ऐन सणासुदीच्या दिवसात मिळतोय तो महसूल सोडून देण्याच्या या अफाट कल्पना नेमक्या येतात कुणाच्या डोक्यात?
□ मुंबईच्या हॉटेलात गिरीश महाजनांनी तीन महिने लोढाचे पाय चेपले – एकनाथ खडसेंचा दावा.
■ संकटमोचक संकटात सापडले बिचारे आणि खडसे त्याची मजा लुटतायत! मौका सभी को मिलता है…
□ जेएनयूमधील अंधश्रद्धेला घाबरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मराठी अध्यासन केंद्र उद्घाटनाला दांडी.
■ त्यांच्या हे लक्षात येत नाही की फडणवीसांचं त्यांच्या परिवारात, संघटनेत, पक्षात काही ना काही होतच राहील, तुमचे सगळे रस्ते आता डेड एंडकडे चालले आहेत. संपूर्ण अध:पतनासाठी जेएनयूमध्ये जाण्याची गरजही नाही.
□ कृषिमंत्र्यांचा व्हिडिओ काढणार्याला पकडण्यासाठी चित्त्याच्या वेगाने चौकशी- आमदार रोहित पवार यांचा टोला.
■ राजा नागडा आहे हा गुन्हा नसतो रोहितराव, राजा नागडा आहे, हे दाखवणारा गुन्हेगार असतो.
□ एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातच नंग्या तलवारी नाचवत मिंध्यांच्या पंटरची दहशत.
■ आपला बाप कुठल्यातरी बंगल्यावर बसलेला आहे याची या गुंडपुंडांना खात्री असते, म्हणूनच तर ही हिंमत येते. सर्वसामान्य माणसांनी म्हणूनच मत देताना दहा वेळा सर्वांगीण विचार करायचा असतो. लाडके तुम्ही आम्ही कोणी नसतो, लाडके फक्त यांचे सगेसोयरेच असतात.
□ महापालिकेत चुकीचं घडतंय, मुंबईत कायद्याचे राज्य राहणार नाही – हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण.
■ अभिनंदन! बरोब्बर ओळखलंत. तेच तर करायचं आहे. पावतीच दिली न्यायालयाने यशाची.
□ केंद्रात मोदी आल्यापासून महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी घसरला.
■ सुरतेच्या लुटीचा बदला घेतायत वीरजी व्होराचे वैचारिक वंशज! व्होरा कोण होता माहिती आहे ना? औरंगजेबाचा अडाणी होता.
□ मोदी हा मोठा प्रॉब्लेम नाही, मीडियाने फुगवलेला फुगा! – राहुल गांधींचा निशाणा.
■ पण देशात फुग्याला घाबरणारे खूप आहेत. हवा काढून रबर दाखवल्याशिवाय लोकांचा विश्वास बसणार नाही. टाचण्या लावत राहावं लागणार.
□ सामाजिक न्याय विभागाच्या दोन मंत्र्यांमध्ये बैठकांवरून जुंपली.
■ त्यांनी काही चांगलं काम केलं म्हणून त्यांना फुटेज मिळणार आहे का प्रसिद्धीचं. ते असल्याच चिंधीगिरीतून मिळतं. शिवाय तू मोठा की मी मोठा, हे सगळ्याच बारक्यांमध्ये फार तीव्रपणे चालतं.
□ ठाण्यात पोलिसांचा दरारा संपला… दोन गटांत तुंबळ हाणामारी.
■ दरारा हवा कुणाला आहे? सरकार सांगेल त्यांच्यावर दरारा, सरकार सांगेल त्याला खरारा, हेच काम स्वीकारलं आहे त्यांनी.
□ १०० दिवसांच्या प्रगतीपुस्तकात शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागेच.
■ ही प्रगतिपुस्तकं काढतं कोण? राज्याच्या गृहखात्याचा पहिला नंबर आहे का त्यात? मग काय ते ओळखा.
□ मोदींच्या परदेश दौर्यांवर पाच वर्षांत ३६२ कोटींचा चुराडा.
■ असं कसं? त्यातून राष्ट्रीय उद्योगपतीच्या व्यवसायांचा जगभरात केवढा विस्तार झाला, ते पाहा ना!
□ साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा यासाठी खटले मुद्दाम लांबवले जात आहेत – सर्वोच्च न्यायालयाला चिंता.
■ चिंता करायला आम्ही आहोत, तुम्ही उपाययोजना करा.