आप्पांची सगळ्यात मोठी कमाल म्हणजे आप्पा अजिबात शाळा शिकलेले नव्हते. त्यांना अजिबात अक्षरओळख नव्हती. त्यांना आकडे देखील वाचता येत नाहीत. त्यांच्या मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह केलेला नाही. फोन आले की अंदाजाने ते ओळखतात किंवा बघून बघून आकड्यांची चिन्हं त्यांना ठाऊक झाली आहेत.
– – –
आप्पा नावाच्या असामीशी आमची गाठ अगदी योगायोगानेच पडली होती. आयुष्यात काही माणसे लिहिलेली असतात. कुठून कशी तुमच्या आयुष्याचा भाग होतील काही सांगता येत नाही. त्या माणसाचा आणि आपला पिंड अत्यंत वेगळा असतो. समान म्हणावा असा कुठलाही धागा नसतो. पण तरीही आपण त्या माणसांबरोबर असतो, वेळ घालवतो आणि पुढे ती माणसे विसरताही येणार नाहीत इतकी आपलीशी वाटू लागतात. आप्पा त्यातीलच एक महाभाग. त्यांना महाभाग म्हणावे लागते आहे, यावरूनच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होईल.
कोरोनाच्या साधारण वर्षभर अगोदर आम्हाला आमचे गावाकडचे घर थोडे राहण्याजोगे करून घ्यायचे होते. बरीच पडझड झालेली होती. त्यातल्या त्यात दुरुस्ती करून हे घर भाड्याने देता येईल का, असा विचार आम्ही करत होतो. हे काम करण्यासाठी एखादा मिस्त्री हवा होता. आमचा जुना मिस्त्री होता, पण आताशा वय झाल्याने त्याने हे काम घेणे थांबवले होते. त्यांच्याच ओळखीच्या दुसर्या कुठल्या माणसाचे नाव सुचवता आले तर बघा, अशी गळ आम्ही त्यांना घातली. तर म्हणाले, ‘एक आहे माणूस, पण तो अशी छोटी कामे घेतो की नाही बघावे लागेल. मी त्याला सांगतो. किमान येऊन तुम्हाला भेटून तरी जाईल.’
ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. संध्याकाळी दाराची कडी वाजली. दरवाजा उघडला. समोर एक गृहस्थ उभे होते. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शर्ट, त्यावर पांढरा पायजमा, पायात काळी चप्पल. चप्पल कशाला घातली असा प्रश्न पडावा. कारण समोरून अर्धी चप्पल पायाच्या बाहेरच होती. उगीच त्यात पाय अडकवले आहेत असे वाटत होते. नंतर ओळख झाल्यावर लक्षात आले की त्यांना तशी सवयच होती. गांधी टोपीवाले तिसरीकडेच बघत म्हणाले, ‘साहेब आहेत का?’
मी उलट प्रश्न केला, ‘काय काम आहे साहेबांकडे?’
अत्यंत प्रयत्नाने स्वतःला नियंत्रित करत पुन्हा गांधी टोपीवाले बोलले, ‘बाई, बोलवा की त्यांना. त्यांच्याकडंच आहे काम.’
मला आता रागच आला होता. एकतर घराच्या कामासाठी म्हणून आम्ही तिथे मुद्दाम येऊन काही दिवस राहिलो होतो. काही दिवस कुलकर्णी आणि काही दिवस मी असे राहून ते काम करून घेणार होतो. त्यामुळे येणार्या प्रत्येक माणसाशी माझी ओळख असणे गरजेचे होते. तरीही गांधी टोपी काही मला सांगायला तयारच नव्हती. पण कुठे या माणसाशी वाद घाला म्हणून मी त्यांना तिथेच थांबवले आणि कुलकर्णींना हाक मारली. ते बाहेर आल्यावर गांधी टोपीने स्वत:ची ओळख करून दिली, ‘साहेब, मी आप्पा. ठेकेदार आहे. तुमच्या मिस्त्रीने पाठवले.’
कुलकर्णी म्हणाले, ‘अरे पण कोणीतरी विलास येणार होता.’
‘त्याला न्हाई जमणार. म्हणून मला धाडला.’
माणसाची भाषा खूपच गोड होती. त्यात एक गावरान ठसका होता. आप्पा एकदम स्पष्टवक्ते होते. मिस्त्रीला जमणार नव्हते म्हणून त्याने विलासला पाठवले, विलासला जमणार नाही म्हणून त्याने आता आप्पांना पाठवले होते. अजबच कारभार होता. काम करण्यासाठी आलेल्या माणसाची माहिती हवी म्हणून कुलकर्णीनी त्यांना विचारले, ‘तुमचे नाव आप्प्पाच का?’
‘नावाचं काय घियुन बसला सायेब, समजा मी म्हन्लो असतो की मी विलासे, तरी तुमी इस्वास ठिवला असता. मी समजा म्हन्लो की माझं नाव राज बब्बर हे तर?’
मी सगळं ऐकत होते. मला हसायलाच आलं. राज बब्बर कुठून आला मधेच?
पण आप्पा आता पूर्णपणे तत्वज्ञान विषयात गुंतलेले होते.
‘तुमी घ्याल ते नाव असतं साहेब.’
‘अहो पण, काहीतरी नाव ठेवले असेल ना आईवडिलांनी? असेलच की काहीतरी नाव शाळेच्या दाखल्यावर?’ कुलकर्णी आपली बाजू सोडायला तयार नव्हते.
‘शाळाच केली नाही साहेब. कुठला दाखला न काय?’
शाळेतच न गेलेला हा मिस्त्री आपल्या घराचे काम कसे करणार असा आम्हाला प्रश्न पडला होता, पण आप्पा पुढे बोलू लागले आणि तो प्रश्न आपोआपच सुटला, ‘सायेब, हे बघा. सगळं जग मला आप्पा म्हणतंय. माझी बायको पन तेच म्हणती. आमचे सगळे xxx मजूर तेच म्हणतात. आपल्याला कामाशी संबंध. वीस वर्स झाली, ठेकेदारी करायलो. बेईमानी करनार न्हाई. तेली गल्ली, वांजूर आळी, नाईकवाडी. कुठं हवं तिथं जा. विचारून बघा, आप्पाला वळकता का, त्याचं काम कसंय? बघा काय म्हन्तेत लोक? त्याच्यायला त्याच्या सगळे म्हणणार, आप्पाचं काम अस्सल असतंय. कामात आपला हात धरत न्हाई कोणी, कोणाची माय व्यायली की आपल्या कामाला नावं ठिवल!’
आता आप्पांनी इतक्या उत्तम पद्धतीने आम्हाला समजावून सांगितल्यावर आमची काय हिम्मत होती की आम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवू.
तोपर्यंत आप्पांचे हे सगळे बोलणे दारात उभे राहूनच चालले होते. त्यांना किती वेळा आत या म्हटले, पण ते आले नाहीत. आम्ही त्यांना कळवतो असे सांगितले. एखाद्या स्थळाची करावी तशी आप्पांची रीतसर चौकशी आम्ही नेहमीच्या मिस्त्रींकडे केली. आप्पा त्यांच्या एकदम विश्वासातील आहेत म्हटल्यावर आम्ही निश्चिंत झालो. पुन्हा घर बघून कसे-कसे काम करता येईल आणि अंदाजे खर्च किती येईल हे विचारण्यासाठी आप्पांना बोलावून घेतले. तोंडात तंबाखूचा तोबरा भरलेला. फतफत करत ती तंबाखू उडवायची आणि मग बोलायचे अशी आप्पांची सवय होती. आधी तर ते घर बघण्यासाठीही घरात यायला तयार नव्हते. पण त्याशिवाय काम होणारच नाही म्हटल्यावर आले. घर बघितल्यावर काय काय दुरुस्ती करायची आहे असे विचारल्यावर म्हणाले, ‘सायेब, एक बोलावं का?’
‘बोला ना आप्पा.’ कुलकर्णींनी त्यांना आप्पा म्हटले की त्यांची कळी खुलली. खुललेल्या कळीने फतफत करत तंबाखू उडवली आणि म्हणाले, ‘ते दुरुस्ती वगैरे सोडा. मी काय म्हणायलो, पाडून टाका घर.’
आम्ही थक्कच झालो.
‘अहो आप्पा, एवढं काही पडकं झालं नाही. दुरुस्त करून राहण्याजोगं होईल.’
‘हे बघा सायेब, उगीच काहीही बोलणार न्हाई. पण तुम्ही दोन चार लाख दुरुस्तीवर घालवणार. पुन्हा दोन चार वर्षांनी घर पाडायला येणारच. त्यापेक्षा माफक दरात तुम्हाला आप्पा क्वालिटीचं काम करून द्येतो की. कोणा —ची हिंमत नाही मग तुमच्या घराकडे डोळे वर करून बघायची.’
‘कोणी असंही आमच्या घराकडे डोळे वर करून बघत नाही.’
‘म्हणावं लागतं हो सायेब. तुमी माझं ऐका. एकदम आप्पा क्वालिटी काम म्हणजे काम.’
‘आप्पा क्वालिटी’ असा शेरा स्वत:लाच त्यांनी देऊन घेतलेला होता. हो नाही करता करता आप्पाने पूर्ण घर पाडून पुन्हा बांधकाम हे आमच्या गळी उतरवले.
तेवढ्या काळात आळीपाळीने सुट्टी घेऊन आम्ही नातेवाईकांच्या घरी जाऊन राहिलो.
बांधकामाच्या साईटवर आप्पांना बघणे हा करमणुकीचा उच्चांक असे. एका वाक्यात कमीत कमी चारपाच अपशब्द, शिव्या आल्याशिवाय ते वाक्य बोलण्यात गणलेच जाणार नाही अशी आप्पांना भीती असावी. आपण उगीचच एवढ्या शिव्या वापरतोय याची जाणीवच त्यांना नव्हती. तो त्यांच्या बोलण्याचाच एक भाग होता. ऐकणार्या मजुरांना या शिव्यांची आणि आप्पांच्या रागावण्याची प्रचंड सवय झालेली होती. उलटपक्षी एखाद्या दिवशी आप्पा कोणाशी शिवी न देता बोलले तर त्याला आपले काहीतरी चुकले की काय असे वाटे.
बांधकाम चालू झाले आणि आमचा परिसर आप्पांच्या शिव्यांनी दणाणून निघाला. म्हणून त्यादिवशी त्यांचे नाव ठरले. ‘फुल्या फुल्या आप्पा’. त्यांच्या शिव्या आपण पुन्हा उच्च्चारूही शकत नाहीत, पण आप्पा मात्र दोनचा पाढा कोणी ज्या सहजतेने म्हणेल त्या सहजतेने सगळ्या मजुरांना शिव्या घालत असत. पहिले काही दिवस जुने घर पाडून होईपर्यंत आप्पा दिवसातून एखादी चक्कर मारत, पण बांधकाम सुरू झाल्यावर मात्र आप्पा पुष्कळ वेळ थांबू लागले आणि अशा पुण्यसहवासाने आम्ही धन्य होऊ लागलो.
बांधकाम सुरू व्हायच्या पहिल्याच दिवशी रेती, विटा वगैरे सामान घेऊन येणार्या टेम्पोरिक्षात आप्पा रिक्षाचालकाच्या शेजारी बसून आले. रिक्षा थांबताच आप्पा टुण्णकन उडी मारून बाहेर पडले. रिक्षाचालकाने दोनशे रुपये झाल्याचे सांगितले. त्याने रक्कम सांगताच आप्पांनी शिव्याचा भडीमार सुरू केला.
‘तुझ्या बापाने ठेवले का दोनशे रुपये?’
‘तेवढेच होतात हो मालक. कोणाला पण विचारा. आप्पा, पहिल्यांदा तुमचा माल आणला का?’ रिक्षावाला म्हणाला.
‘पन्नास रुपयांच्या वर एक रुपया भेटणार नाही. व्हय तिकडं.’
‘आप्पा, तेवढे तरी कशाला देता? राहू दे.’
‘राहू दे तर राहू दे. xxx माझा पैसा काय वर आलाय का? xxx’
इतकं घायकुतीला येऊनदेखील रिक्षावाला गेला नाही आणि आप्पादेखील बधले नाहीत. नव्वद रुपयांमध्ये आप्पांनी रिक्षावाल्याची बोळवण केली. आधी रिक्षावाल्याला सगळा माल तिथे टाकायला मदत करायला लावली आणि मगच त्याचे नव्वद रुपये हातावर ठेवले. कोणाकडून कशी कामे करून घ्यायची याचा आप्पा म्हणजे परिपाठ आहेत.
रोज सकाळी काम सुरू व्हायच्या वेळी आप्पा यायचे. त्यांना हे पक्के ठाऊक आहे की ते आल्याशिवाय काम नीट सुरूच होत नाही. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणून आपण दिवस सुरू करतो. अगदी त्याच तालावर आप्पांच्या शिव्यांनी मजुरांचा दिवस सुरू होतो. आप्पा आले की वाळूच्या ढिगावर दात कोरत बसायचे. मधेच फतफत करत ओठांनी तंबाखू बाहेर टाकायचे. पुन्हा दात कोरणे सुरू व्हायचे. जे मजूर उशिरा येतील त्यांची काही खैर नसायची. आप्पा शेलक्या शब्दांचा जो मारा करायचे की ज्याचे नाव ते. पण त्यांच्या हाताखाली काम करणार्या मजुरांना त्याचे काही वाटत नसे.
साधारण संभाषण असं असे.
‘आय सोनुबाई, आलीस कशाला तू? सोडून जा काम. ही येळ कामाला यायची? थोड्यात सांचा चहा यील. जा पळ घरी, xxx…’ अपशब्द वापरण्याच्या बाबतीत आप्पांकडे स्त्री-पुरुष भेदभाव अजिबातच नाही. दोहोंना त्यांच्या सारख्याच शिव्या पडतात.
सोनुबाई म्हणे, ‘आप्पा, काय करू? लेकरू आजारी व्हतं. म्हणून थांबलो.’
‘ठाव आहे तुझं. तू काय डाक्टर आहे का, लेकरू आजारी होतं तर तू काय करणार हुतीस? ‘
‘असं कसं आप्पा, ताप येति त्याला, असं कसं सोडून यायाचं?’
‘नवर्याला ठिवायचं त्याच्यापाशी. xxx असाही काही करत नाही. xxx तुया जीवावर मजा मारतोय. अर्ध्याच दिवसाची मजुरी मिळणार हे. लक्षात ठेव आज.’
‘असं करू नको आप्पा. अकराच वाजायलेत अजून. एखांदा दिस द्या सोडून.’
‘पैशे तुझ्या बापाने ठिवलं का? द्या सोडून. तुयासारखे अजून धा मजूर मिळाले तर झालं मग माझं काम. चला लागा लवकर कामाला. xxx आधीच अर्धा दिस गेलाय.’
काहीही झाले की आप्पा मजुरांना बोलताना ‘काम सोडून जा’ या वाक्यानेच सुरुवात करत. पण त्यांनी काही कोणाला काढले नाही आणि कुठला मजूर देखील काम सोडून गेला नाही. कोणी आगाऊ पैसे मागायला आप्पांकडे आले की मग आप्पांचा तोरा बघावा. आधी शंभर फुल्या फुल्या पडत आणि मग मागणार्याची सगळी पितरं खाली उतरत.
‘तुझ्या बापाने ठेवले का पैसे? का आजा मरताना माझ्याकडे ठेवून गेला? दारू ढोसायला मागायलास हे काय मला ठाव न्हाई का? पुन्हा मागायला तर ये कामाच्या आधी पैसे, मग तुला बघतो xxx’
कोण खरोखर कामासाठी पैसे मागते आहे आणि कोण व्यसनासाठी पैसे मागते आहे हे आप्पांना बरोबर समजते. खरोखर गरज असलेल्या माणसाला ते महिन्याचा अॅडव्हान्स देखील देतात.
आप्पांच्या टीममध्ये काम करणारे नमुने देखील एकाचढ एक आहेत. बायकांसह सगळ्यांना रोजच दारू पिण्याची सवय आहे. घरी जाताना सगळेच थोडी थोडी दारू पिऊन जातात. पण नरसू मात्र चोवीस तास नशेत असतो. तो जेव्हा नशेत असतो तेव्हाच नॉर्मल असतो. एकदा कसे काय कुणास ठाऊक नरसू दारू न पिताच कामावर आला. त्या दिवशी त्याची कामात चांगलीच गडबड होऊ लागली. टोपल्यात रेती घेऊन दुसर्या बाजूला ती नेऊन टाकणे आणि पुन्हा तीच रेती टोपल्यात भरून या बाजूला आणून टाकणे असे त्याचे काम चालले होते.
आप्पा आले. नरसूला जवळ बोलावले. त्याच्या एक थोबाडीत लगावली आणि ओरडले, ‘तुझ्या बापाने असे काम केले होते का xxx? ए इष्ण्या, हिकडं ये. याला घेऊन जा आणि जरा दारू पाजून आण. म्हंजी जरा धड काम करंल हे. xxx काम करायच्या लायकीचं राहिलं नाही हे.’
आधी आधी आम्हाला आप्पांची अशी शिवराळ भाषा ऐकायला नको वाटे. पण नंतर हीच भाषा सवयीची झाली. आम्हा लोकांशी म्हणजे आप्पांच्या भाषेत शेठ लोकांशी बोलताना ते तोंड सांभाळायचा प्रयत्न करत. शक्य तितके सभ्य बोलत. पण शक्य तितकेच. कारण तीच त्यांची सहज भाषा असल्याने आपोआप तोंडातून बाहेर पडे.
आप्पांची सगळ्यात मोठी कमाल म्हणजे आप्पा अजिबात शाळा शिकलेले नव्हते. त्यांना अजिबात अक्षरओळख नव्हती. त्यांना आकडे देखील वाचता येत नाहीत. त्यांच्या मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह केलेला नाही. फोन आले की अंदाजाने ते ओळखतात किंवा बघून बघून आकड्यांची चिन्हं त्यांना ठाऊक झाली आहेत. त्यानुसार ते ओळखतात. अगदीच ओळखू आले नाही तर ‘हा, बोला..’ अशी सुरुवात करतात.
तिकडून समजा कोणी विचारलेच की ‘आप्पा बोलायले का?’
मग त्या माणसाला शिव्यांची लाखोली पडलीच म्हणून समजा.
‘xxx तू कोण समजून फोन लावलास मग?’ असे उत्तर आप्पांकडून मिळे.
आकडे ओळख नसताना देखील आप्पा सगळा हिशोब डोक्यात चोख ठेवतात. कोणाला किती आगाऊ रक्कम दिली, कोणाशी कितीमध्ये सौदा झाला, काय भाव ठरला, कुठल्या शेठकडून किती येणे आहे असे सगळे आप्पांना तोंडपाठ आहे. शेठ लोकांशी आप्पा कमालीचे मवाळ आहेत. बांधकामाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आप्पांचा संपूर्ण जिल्ह्यात कोणीही हात धरू शकत नाही.
मराठवाड्यातील एका छोट्या खेड्यात आप्पा वाढलेले होते. ऊसतोड मजुराचा हा मुलगा. लहानपणापासून आईबापाबरोबर वेगेवेगळ्या ठिकाणी ऊसतोडीसाठी जावे लागले. मोठा झाल्यावर आप्पानेच आईबापाबरोबर इकडे तिकडे भटकणार नाही म्हणून बंड पुकारले. त्याचा भयंकर परिणाम त्याला भोगावा लागला. बापाने बेदम मारले आणि घराबाहेर काढले. एका ठेकेदाराकडे वयाच्या दहाव्या वर्षी आप्पा कामाला लागला आणि तेव्हापासून बांधकामातील सगळं शिकला. पुढे आप्पाशेठ झाले. आपल्या क्षेत्रात थोडेफार नाव कमावल्यावर भावंडाना देखील आप्पांनी तालुक्याच्या गावात आणले आणि कामासाठी ठेवले. तथाकथित शाळा नामक वास्तूत आप्पा कधीही गेले नसले तरी आयुष्याच्या शाळेने त्यांना पुष्कळ शिकवले असावे.
रेतीपासून इलेक्ट्रिक काम करणार्यापर्यंत आप्पांची सगळी माणसे ठरलेली आहेत. हमरीतुमरीवर येतात. एकमेकांशी वचावचा भांडतात. कधीतरी वाटते की आता आप्पा कोणाला तरी हाणणार, रक्त काढणार. या ठेकेदारकडून आप्पा यापुढे कधीच काम करून घेणार नाहीत असे वाटते. पण तेवढ्यापुरतेच. ती माणसे आप्पांना सोडत नाहीत आणि आप्पा देखील त्यांना नाही.
वर्षानुवर्षे तीच माणसे आप्पांना माल पुरवत आहेत आणि तेच मजूर आप्पांकडून मार खाऊन देखील काम करत आहेत. आप्पा जसे दुसर्या ठेकेदाराकडे तयार झाले तसेच ते दुसर्या तरुण मुलांना ठेकेदारीसाठी तयार करत आहेत. आपल्यालाच यातून स्पर्धा निर्माण होईल याचे आप्पांना काही वाटत नाही. एखाद्या तरुण मुलाने कामात चालढकल केली की मग आप्पा बोलू लागतात, ‘xxx आयुष्यभर हीच कामं करायची का? टोपली उचलाया आईबापानं दुनियेत आनला का xxx तुला?’
आप्पांच्या शिवराळ भाषेमुळे त्यांना आम्ही दिलेले फुल्या फुल्या आप्पा हे नाव आता सगळ्यांना ठाऊक झालेले आहे. आप्पांना आजवर एकदाच शिव्या देताना मी पाहिले नाही, ते म्हणजे मजूर गुंजाबाई वारली तेव्हा. आप्पा त्या दिवशी अर्ध्या दिवसातच निघून गेले. नंतर आठ दिवस आप्पांनी कोणालाही शिव्या दिल्या नाहीत. गुंजाबाई आप्पांची खास लाडकी होती. तिच्यावर त्यांचा विशेष जीव होता. कदाचित गुंजाबाई थोडी आधी त्यांच्या आयुष्यात आली असती तर आप्पांनी तिच्याशीच लग्न केले असते. पोटाचा आजार झाला आणि गुंजाबाई अचानक गेली. आप्पा आतून हलले होते. पण गुंजाबाईवर जीव लावण्याची भरपाई आप्पांनी आठ दिवसांतच केली. तिच्या मुलाला कामावर ठेवून घेतले आणि त्याला ठेकेदारी शिकवली.
आठव्या दिवशी आप्पा पुन्हा पहिल्यासारखे झाले. नरसूला त्यांनी कचकचीत शिवी घातली, तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आप्पा समोर असेपर्यंत मजूर नीट काम करत. ते हटले की पुन्हा त्यांची टाळाटाळ सुरू होई. त्यांनाही आप्पांचे बोलणे खाऊनच काम करायची सवय होती.
गांधी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा याशिवाय दुसर्या कुठल्याही वेशात मी आप्पांना कधी बघितले नाही. त्यांना कधी निवांत बसलेले बघितले नाही. थांबून काही खाताना बघितले नाही. चहा त्यांचा जीव की प्राण आहे. चेनस्मोकरसारखे आप्पा चेन टी-ड्रिंकर आहेत. ते कितीही चहा पिऊ शकतात. आप्पा एखाद्या वेळी फारच चिडले तर मजूर म्हणत असत, ‘आप्पा, जा बरं थोडी चा प्युन या. थंड व्हाल जरा.’
शंभर गोष्टींचे हिशोब, सतत वाजणारा फोन, त्यावर कोणाकोणाशी काय बोलतो आहे हे नीट लक्षात ठेवणे, एकीकडे मजुरांवर तोंडाचा पट्टा चालू ठेवणे, मधेच चहाचा घोट घेणे, तंबाखू फतफत करणे, मधेच शेठ लोक दिसले म्हणून अदबीने नमस्कार करणे अशा सगळ्याचं मिश्रण म्हणजे आप्पा आहेत. या सगळ्यापैकी एकही गोष्ट राहिली तर आप्पा पुरे होऊच शकत नाहीत. कोरोनाच्या काळात सहा महिने आप्पांनी सगळ्या मजुरांना फुकट पोसले. तेव्हा तर आप्पा आमच्या नजरेत अजूनच थोर झाले.
या अशा शिवराळ माणसाकडून घराचे काम करून घ्यायचे का असा सुरुवातीला प्रश्न पडलेले आम्ही; मात्र आमच्याकडचे काम संपल्यावर आम्हाला चक्क आप्पांची राहून राहून आठवण येऊ लागली. गावचे काम संपल्याने आम्ही पुन्हा शहरात आलो होतो. अजूनही गावी गेलो की काहीतरी निमित्ताने आम्ही आप्पांना भेटायला बोलावतो. फारसे घरात न येता आप्पा बाहेरच उभे राहून बोलतात. अंगणातच चहा घेतात. अभिमानी नजरेने घराकडे बघतात आणि म्हणतात, ‘मग आहे की नाही आप्पा क्वालिटी?’
मी काय म्हणते की, तुम्ही आमच्या गावी गेलात आणि बांधकामाच्या एखाद्या साईटवर जर एका वाक्यात चार पाच शिव्या ऐकायला आल्या, तर दबकून जाऊ नका. ते नक्की आमचे फुल्या फुल्या आप्पा असणार.