ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे’कडे (महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल) करण्यात यावी असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्यानंतर अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी डॉक्टरांमधला एक दशकापूर्वीचा वाद फिरुन एक वार उफाळून आला आहे.
‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने, होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सर्टिफिकेट कोर्स इन फॉर्माकोलॉजी’ (सीसीएमपी) असा एक वर्षाचा कोर्स या आधीही सुरू केला होता. हा ब्रिज कोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर मॉडर्न मेडिसिन म्हणजेच अॅलोपॅथीद्वारे रुग्णांवर उपचार करू शकतात. सध्या हा कोर्स पूर्ण केलेले बरेच होमिओपॅथी डॉक्टर अॅलोपॅथीची औषधे रुग्णांना देतात. शिवाय ते प्रिस्क्रिप्शनवर अॅलोपॅथीची औषधेही लिहून देतात.
‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे’चा कारभार ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५’ अन्वये चालतो. २०१४मध्ये, नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने ‘होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स अॅक्ट’ आणि ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्ट’मध्ये सुधारणा केल्यानंतर, ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देतानाच आधुनिक अॅलोपॅथिक औषधे लिहून देण्याची औपचारिक परवानगीही दिली. याचबरोबर ‘होमिओपॅथिक डॉक्टर्स कौन्सिल’ची मागणी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अन्न आणि औषध प्राधिकरणा’नेही डिसेंबर २०२४मध्ये सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक अॅलोपॅथिक औषधे लिहून देण्याची औपचारिक परवानगी दिली. परंतु ब्रिज कोर्स पूर्ण करून होमिओपॅथीचे डॉक्टर अलोपॅथीसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करू शकतात असा निर्णय महाराष्ट्र सरकारने २०१४मध्येच जाहीर केल्यानंतर ‘इंडियन मेडिकल असोसिशएन’च्या डॉक्टरांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करून घेण्याचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे काम अर्धवट राहिले. आता हे प्रकरण न्यायालयात लवकरच सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
या वर्षी ३० जूनला ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने एक अधिसूचना काढून ब्रिज कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांनी नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करावे असं म्हटलं होतं. पण त्यावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या डॉक्टरांनी आक्षेप घेऊन संपही पुकारला. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तो तात्पुरता मागे घेतला.
होमिओपॅथिक डॉक्टर
सध्या देशात २५ लाखांहून अधिक आणि महाराष्ट्रात जवळजवळ ९०,००० होमिओपॅथी डॉक्टर कार्यरत आहेत. यातील काहीजण महाराष्ट्राची अत्यावशक वैद्यकीय सेवा (१८०) (गोल्डन अवर) अॅम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक आरोग्य सेवा, अशा सेवांत कार्यरत आहेत. शिवाय ग्रामीण भागात जिकडे एमबीबीएस डॉक्टरांची वानवा आहे तिथे होमिओपॅथिक डॉक्टरच रुग्णसेवा पुरवितात. परंतु अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करताना दिलेल्या औषधाची प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्यास होमिओपॅथी डॉक्टरांना संरक्षण नाही. यासाठी ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडे नोंदणी व्हावी अशी होमिओपॅथी डॉक्टर्सची मागणी आहे. म्हणून एमबीबीएस डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टर यांच्यात भेदभाव करणे चुकीचे असल्याचे प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. जयंत रांजणे म्हणाले.
एमबीबीएस डॉक्टर
देशभरात दरवर्षी साधारणपणे २४ लाख विद्यार्थी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रंस टेस्ट’ (नीट) परीक्षेला बसतात आणि त्यात १० लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. महाराष्ट्रातील सुमारे ७० मेडिकल कॉलेजेसमध्ये १०,०००हून अधिक विद्यार्थी एमबीबीएस परीक्षा दरवर्षी पास होतात. राज्यात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या २४० शाखा कार्यरत आहेत, ज्या ग्रामीण भागात मागणीप्रमाणे डॉक्टर पुरवितात. अशा परिस्थितीत अल्पावधीचा कोर्स करून एखादा अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणार असेल तर विद्यार्थांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविण्यापासून अंतिम परीक्षा पास होईपर्यंत जिवाचा आटापिटा का करावा? एमबीबीएसचे विद्यार्थी नीटसाठी मेहनत करून प्रवेश मिळवतात आणि सहा वर्ष शिकून पदवी घेतात. मग एक वर्षात होमिओपॅथीच्या डॉक्टरांना असा कोर्स करून अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी परवानगी मिळत असेल, तर तो एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का, असा सवाल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी केला. शिवाय होमिओपॅथी डॉक्टरांनी आपल्या तक्रारी त्यांच्या कौन्सिलमध्ये मांडाव्यात. उद्या डेंटिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टर आणि युनानी डॉक्टरही अशा नोंदणीची मागणी करतील. या मागणीला काही अर्थ नाही, असेही डॉ. उत्तुरे म्हणाले.
एमबीबीएसचा अभ्यासक्रम
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष औषधशास्त्र आणि तीन वर्ष मेडिसीन शिकवतात. मेडिसीनमध्ये अचूक निदान आणि त्यावरील उपचार शिकवतात, तर औषधशास्त्रात औषध कसं बनतं, हे शिकवलं जातं. शिवाय औषधातील रासायनिक भाग, त्यांची प्रतिक्रिया, हेही शिकविले जाते. एमबीबीएसचं रोज आठ तास कॉलेज असतं. पण, सरकारने सुरू केलेल्या ब्रिज कोर्समध्ये औषधशास्त्र आणि मेडिसीन अशा दोन विषयांचं एका वर्षात आठवड्यातून दोन दिवस शिक्षण देण्याची तरतूद आहे.
होमिओपॅथी पदवीधारकांना पूर्ण एक वर्ष शिक्षण नसतं. आठवड्यातून दोन वेळा उपस्थित राहावं लागतं. त्यामुळे मॉडर्न मेडिसीनच्या डॉक्टरांशी त्यांची तुलना कशी करणार? ज्याच्याकडे ज्ञान नाही अशा व्यक्तीकडून उपचार करून घेतल्यामुळे रुग्णांचे काय हाल होतील? अपुर्या ज्ञानापोटी उपचार कसे होतील? असा प्रश्न डॉ. उत्तुरे यांनी उपस्थित केला.
एमबीबीएससाठी पात्रता
विज्ञान विषयांसह उच्च माध्यमिक परीक्षा पास होणे आवश्यक. यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी/ बायोटेक्नोलॉजी यांत किमान ५० टक्के गुण आवश्यक (आरक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के). याचबरोबर ११वी १२वीला इंग्रजी मुख्य विषय असावा हीदेखील अट आहे.
होमिओपॅथी डॉक्टरसाठी पात्रता
होमिओपॅथी डॉक्टर बनण्यासाठी बीएचएमएस (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी) किंवा एमडी (होमिओपॅथी) यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांसाठी एनईईटी (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांमध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, गायनॅकॉलॉजी, सर्जरी आणि मेडिसीन यांसारख्या विषयांचा समावेश असतो. इच्छुक उमेदवारांना एक वर्षाची इंटर्नशिपही करावी लागते.
ब्रिज कोर्स
पण, होमिओपॅथी डॉक्टरांना हे आक्षेप मान्य नाहीत. मुंबईत अंधेरीतील होमिओपॅथिक डॉ. स्मिता पाटील म्हणतात, ‘एमबीबीएसला जे विषय असतात तेच विषय होमिओपॅथीलाही (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसीन एण्ड सर्जरी (बीएचएमएस) असतात. फक्त फॉर्माकोलॉजी (औषधशास्त्र) हा विषय नसतो. पण ब्रिज कोर्समध्ये तो शिकवला जातो. ब्रिज कोर्सचा सगळा अभ्यासक्रम एमबीबीएससारखाच असतो. आठवड्यातून दोन वेळा सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत क्लास होतात. त्यानंतर ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’तर्पेâ परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जे होमिओपॅथीचे डॉक्टर उत्तीर्ण होतात त्यांनाच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी मिळू शकते’.
अॅलोपॅथी
अॅलोपॅथी म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र. यात रोग आणि लक्षणांवर उपचार करण्यासाठी औषधे, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय पद्धतींचा वापर केला जातो. यालाच आपण मुख्य प्रवाहातील किंवा पाश्चात्य वैद्यकशास्त्रही म्हणतो.
होमिओपॅथी
होमिओपॅथी एक पर्यायी किंवा पूरक पद्धत असून पारंपरिक वैद्यकशास्त्रातील उपचारांपेक्षा ती वेगळी आहे. १७९०च्या दशकात जर्मन डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ती विकसित केली. होमिओपॅथी उपचार शरीराची स्वत:ला बरे करण्याची क्षमता उत्तेजित करतात. होमिओपॅथीमुळे रोग मुळासकट काढून टाकता येतो असा दावा आहे. होमिओपॅथिक औषधे विशिष्ट अँटीबॉडी किंवा जंतू-लढाऊ पेशी निर्मितीवर आधारित नाहीत आणि पारंपरिक लसींना स्वीकार्य पर्याय नाहीत. एखादा पदार्थ जितका अधिक विरघळवला जातो, तितकी त्याची लक्षणं बरी करण्याची क्षमता अधिक वाढते असं उपचार करणार्यांना वाटतं.
होमिओपॅथी डॉक्टर्स सर्दी, खोकला, ताप, हिवताप, ऑटिझम, कर्करोग, बालरोग, गर्भधारणे दरम्यानचे आजार, त्वचा रोग, अॅलर्जी आणि इतर आजारांवर उपचार करतात. परंतु रोग बरे होण्याची प्रक्रिया मंद असते. होमिओपॅथीमध्ये वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी सुसंगत नाही, असा अॅलोपॅथी डॉक्टर्सचा दावा आहे.
होमिओपॅथी डॉक्टर्सना मान्यता
कायदेशीररित्या होमिओपॅथी प्रॅक्टीशनर्सना भारतात डॉक्टर ही पदवी वापरण्याची परवानगी आहे. फिजिओथेरेपिस्टनाही अलीकडेच डॉक्टर ही पदवी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. होमिओपॅथिक चिकित्सक त्यांचे खाजगी दवाखाने चालवतात आणि होमिओपॅथिक उपायांचा वापर करून रुग्णांना सल्ला देऊन उपचार करतात. होमिओपॅथिक संशोधन करणारे संशोधन संस्था, औषध कंपन्या किंवा विद्यापीठांमध्ये काम करू शकतात.
आयुष मंत्रालय
दरम्यान केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतात २५ लाख नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर आहेत. तसेच देशांतील १० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या या उपचारपद्धतीवर अवलंबून आहे. तसेच या पॅथीचा जगभरात प्रभाव वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
समिती
होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे करण्याच्या सरकारच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता एक तज्ज्ञ समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करून त्यांना अॅलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करायची परवानगी द्यावी किंवा नाही, याबाबत शासनाशी सल्लामसलत करून निर्णय घेईल.