– राजेंद्र भामरे
बर्याच दिवसांपासून मित्रांची मागणी होती की तुम्ही ‘खबरे’ या विषयावर लिहा. कारण तुमच्या तपासकथांमध्ये खबरे डोकावल्याखेरीज राहत नाहीत. आणि हो खरोखरच सामान्य माणसाला, वाचकाला खबरे या विषयाबाबत प्रचंड कुतूहल असते. विशेष करून चित्रपट, टीव्ही सिरीयलमधल्या रहस्यकथांमध्ये अनेकदा खबर्यांचा उल्लेख येतो, त्यावर काही प्रकाश टाकावा यासाठी हा लेखप्रपंच.
माणूस जसा श्वासाशिवाय जगूच शकत नाही, तसा तपास अधिकारीही खबर्याशिवाय तपास लावू शकत नाही. ‘ज्या इसमाकडून तपासकामात मोलाची माहिती मिळते, तो इसम म्हणजे खबर्या. आर्य-चाणक्याने सुमारे २६०० वर्षांपूर्वी कौटिलिय अर्थशास्त्र या राज्यशकट चालवण्यासाठी लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात त्याने हेरखाते, गुप्तचर किती महत्वाचे आहे याचा ऊहापोह केलेला आहे. ते कसे नेमावे, नेमताना काय काळजी घ्यावी, त्याच्याकडून माहिती कशी काढावी, आदीचे तपशीलवार मार्गदर्शन केलेले आहे.
आपण शिवकालापासून असलेली खबर्यांची परंपरा पाहूयात. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचे प्रमुख होते. एका अर्थाने ते तपास अधिकारीच होते. महाराजांनी सुरतेवर स्वारी करून लूट केली, त्याच्या कित्येक महिने आधी बहिर्जींचा मुक्काम सुरतेमध्ये होता. कोणत्या घरात किती धन मिळेल, ते कुठे ठेवलेले आहे, याची खडा न् खडा माहिती त्यांना होती. आता ते काही प्रत्येक घरात जाऊ शकले नसतील, त्यासाठी त्यांनी तेथे खबरे निर्माण केले असतील, कदाचित त्यांना पैसे दिले असतील किंवा त्यांच्याशी मैत्री करून गोड बोलून युक्तीने माहिती काढून घेतली असेल. त्यांच्या खबर्यांचे जाळे प्रचंड होते, शत्रूच्या हालचाली, संख्या, ताकद, शस्त्रसाठा याची आगाऊ माहिती मिळत असे, त्यामुळे महाराजांना शत्रूवर विजय मिळवणे अत्यंत सोपे जात असे.
ब्रिटिश काळात त्यांनी स्थानिक लोकांमध्ये खबरे निर्माण केले, त्यांच्याकडून माहिती काढून राजकारण करणे, युद्ध जिंकणे त्यांना सोपे गेले. ज्यावेळी गणवेशातील पोलीस तपासकामी सरकारी नेमणुकीचे कर्मचारी नसलेल्या इसमाचा वापर माहिती मिळवण्यासाठी करतात, त्या इसमाला खबरी असे म्हटले जाते. परंतु, गुप्तचर खाते ज्या इसमाचा वापर माहिती मिळवण्यासाठी करतात, त्याला ‘सोर्स’ असे म्हटले जाते. कधी कधी त्यांना मासिक मानधन दिले जाते.
गुप्तहेर व खबरे यामध्ये कमालीचा फरक असतो. गुप्तहेरांना प्रशिक्षण दिलेले असते. त्याचबरोबर मासिक वेतनही मिळत असते आणि संरक्षण देखील असते. खबर्यांना धड प्रशिक्षण नसते की वेतन. ते एकेका खबरीचे बक्षीस घेतात. किंवा कधी हौसेखातर, देशसेवेसाठी ते हे काम करत असतात. यासाठी मुळातच तो धाडसी प्रवृत्तीचा असावा लागतो. बर्याचदा खबरी हे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असतात. गुन्हेगारी जगताशी त्यांचे संबंध असतात. आता तुम्ही म्हणाल, मग असे लोक तुम्ही तपासकामात कशासाठी घेता? पांढरपेशी माणसाचे असे नेटवर्क नसते. आपली इमेज जपायची असते त्यांना. चुकून पोलिसांना बातमी दिली तर त्यापासून होणार्या संभाव्य त्रासाला तोंड देण्याची त्यांची तयारी नसते. वयामुळे, अर्थार्जन किंवा अन्य काही कारणास्तव प्रत्यक्ष गुन्हेगारीतून बाजूला झालेले लोकच हे धाडस करू शकतात. कधी कधी गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असणार्या गुन्हेगारांकडूनही खबर मिळवावी लागते, त्यासाठी कधी त्यांच्या छोट्या गुन्हेगारी कृत्यांकडे कानाडोळा करावा लागतो, तर कधी त्यांना लक्ष्मीदर्शन द्यावे लागते.
खबरे हे परंपरागत नसतात, म्हणजेच एक अधिकारी बदलून गेला की त्याचे खबरे नवीन अधिकार्यांशी संपर्क ठेवतीलच असे नाही, प्रत्येक अधिकार्याला वैयक्तिक कौशल्य वापरून ते निर्माण करावे लागतात. कधी कधी तो अधिकारी जिकडे बदलून जाईल त्या एरियात खबरे अॅक्टिव्ह होतात. खबरे निर्माण करणे हे फार मोठे स्किल आहे. कोणाकडून काय माहिती मिळवता येईल, याचा अंदाज अधिकार्याला असावा लागतो. दोघांचा एकमेकांवर विश्वास असावा लागतो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खबर्यावर अंकुशही ठेवावा लागतो, नाहीतर हे खबरे गुन्हे करायला लागतात. खबर्यांना कोणत्याही प्रकारे उघड करता येत नाही, ते समोर आले तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. कधी कधी काही अधिकार्यांनी खबर्यांचा जाहीर कार्यक्रमात सत्कार केलेला आहे आणि त्यानंतर त्या खबर्यांचा गुन्हेगार टोळ्यांकडून खून झालेला पण मी पाहिला आहे.
भारतीय पुराव्याच्या कायद्याने खबर्याला संरक्षण दिलेले आहे, त्याचे नाव, अस्तित्व, आपण कागदपत्रातून लपवू शकतो. कोर्टात कधी कधी नवशिके वकील, तुम्हाला ही माहिती कुणी दिली, त्या इसमाचे नाव काय, असा प्रश्न तपास अधिकार्याला विचारतात, तेव्हा मा. न्यायाधीश त्यांना, तुम्हाला असे प्रश्न विचारता येणार नाहीत असे सांगतात आणि तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तरी चालेल, असे अधिकार्यांना सूचित करतात. बर्याचदा खबर्यांना हाताळण्यात अधिकारी अयशस्वी ठरतात, ते त्यांना नीट ट्रीटमेंट देत नाहीत. एखादी जबरदस्त माहिती (टिप) त्यांना दिली आणि त्यामुळे गुन्हा उघडकीस आला आणि तरीही त्याचा योग्य मोबदला त्याला मिळाला नाही तर त्या अधिकार्यांपासून तो दुरावतो. खबर्याच्या कुटुंबाचा चरितार्थ या माध्यमातून मिळणार्या पैशावरच अवलंबून असतो.

कधी कधी तात्पुरते खबरे निर्माण करावे लागतात, म्हणजे एखादा गुन्हा घडला की त्या भागात कशी माहिती मिळू शकेल, हे पाहावे लागते. पानवाले, रिक्षावाले, वेटर, मालीशवाले आदींचा खबरी म्हणून वापर करता येतो. उदा. एखाद्या हॉस्पिटलमध्ये संशयित इसम (गुन्हेगार) उपचारासाठी अॅडमिट असेल, तर त्याला भेटायला कोण येतं, त्यांचं काय बोलणं होतं, ही माहिती हॉस्पिटल स्टाफमधून कोण कर्मचारी देऊ शकेल याचा अभ्यास करून, गोड बोलून, त्याला मोठेपणा देऊन, कधी पैसे देऊन, त्याला तात्पुरता खबरी बनवता येतो. तुम्ही त्याच्याशी चांगले संबंध ठेवले तर पुढच्या वेळी तो आपोआपच तुम्हाला उपयुक्त माहिती देऊ शकेल. अशा प्रकारे वेश्यालयापासून ते सेंट्रल जेलच्या आतपर्यंत खबरे निर्माण करता येतात. अधिकार्याचे चारित्र्य, गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता आदी गोष्टी पाहून बर्याचदा खबरे स्वत:हून त्याच्याशी संपर्क साधतात.
कधी कधी व्यावसायिक खबरे काही माहिती नसताना निव्वळ पैसे मिळवण्यासाठी खोट्या खबरी देतात, त्यामुळे पैसेही जातात आणि तपासाची दिशा भरकटून जाते. काही वेळा गुन्हेगारी टोळ्या डमी खबरे तयार करून तपास अधिकार्याकडे पाठवतात. त्यावेळी अनुभव पणास लावून त्याच्या बातमीतील खरेपणा तपासावा लागतो.
एका गाजलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना एक अनाहूत खबर्या मला अप्रोच झाला. सर, तुम्ही ज्याचा तपास करत आहात, त्या गुन्ह्यातला आरोपी मला माहीत आहे. तो दोन दिवसांनी एका पत्त्याच्या क्लबमध्ये येणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला पकडून देतो. हे महाशय पैसे मिळवण्यासाठी हा उद्योग करत असावेत, अशी शंका माझ्या मनात आली. परंतु चुकून त्याची माहिती खरी ठरली तर पश्चात्तापाची पाळी यायला नको, या आशेपोटी मी त्याला आरोपी पकडून दिल्यानंतरच बक्षीस देईन, असे सांगितले. त्यानंतर हे महाशय म्हणले, साहेब, दोन दिवसांनी रेड करायची असल्यामुळे दोन दिवस मी इथेच थांबतो. त्याची ही अट मान्य करत त्याची मुक्कामाची व्यवस्था केली. एक हुशार कर्मचारी त्याच्याबरोबर नेमून दिला. रात्री उशिरा साडेबाराच्या सुमाराला माझा मोबाईल खणखणला. समोरून तो कर्मचारी बोलत होता, सर, याने खूप मद्यपान केलेलं आहे, आता तो ‘नको त्या ठिकाणी’ जाण्याची मागणी करत आहे. ती पूर्ण केली नाही तर मी निघून जाईन असा दम देतो आहे; काय करूयात? त्याच्या त्या बोलण्यावर गुन्हा उघडकीस येईल या आशेने मला त्याच्या ‘त्या’ मागणीला हिरवा कंदील द्यावा लागला आणि एवढे करूनही खबर्याने दिलेली ती बातमी चक्क खोटी ठरली.
मोबाईल येण्याच्या आधी आम्ही पूर्णपणे या खबरी नेटवर्कवरच अवलंबून राहायचो. त्या नंतर ‘इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्स’ हा शब्द आला. म्हणजेच गुन्हेगार वापरत असलेल्या मोबाईलचा तांत्रिक अभ्यास, घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही आदींचा अभ्यास करून त्यावरून तपास करण्यास सुरुवात झाली. दुर्दैवाने तपास अधिकार्यांना असे वाटू लागले की सगळा तपास इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्सद्वारे करता येईल. परंतु तसे होत नाही, तुम्हाला मानवी खबर्यांचा वापर करावाच लागतो. नाहीतर हाताशी येणारे यश हुलकावणी देते.
एखाद्या अधिकार्याचा एखादा खबरी इतका स्ट्राँग असतो की त्याच्याद्वारे कित्येक अवघड गुन्हे तो सहज उघडकीस आणू शकतो. तो खबरी फोडण्याचा प्रयत्न अन्य अधिकार्याकडून होऊ लागतो, तो आपल्याला बातमी का देत नाही, याचा राग येऊन त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होतो. मी मालेगावात शहर पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना माझा एक ‘छुटक्या मुकादम’ नावाचा हुकमी खबरी होता (सध्या तो हयात नाही). तो मूळ बिहारी, त्यामुळे अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थाबाबत त्याला प्रचंड माहिती होती. ती माहिती तो मला देत असे. त्यामुळे शहर पोलीस स्टेशनचा नावलौकिक वाढला होता. मात्र, हा खबर्या राहायला दुसर्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता. आपल्या हद्दीत राहतो आणि खबर शहर पोलीस स्टेशनला देतो त्यामुळे तिथल्या अधिकार्यांचा जळफळाट होत होता. एक दिवस संधी साधून त्यांनी एका शस्त्राच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले आणि मारहाण सुरू केली. त्याच्या जोडीदाराने काही क्षणात माझ्यापर्यंत ही माहिती पोहचवली. लगेच मी तिथे दाखल झालो, तिथल्या अधिकार्यांकडे गेलो, पण काहीच उपयोग झाला नाही. सुदैवाने मालेगावात माधवराव कर्वे हे दूध का दूध पानी का पानी करणारे अधिकारी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना मी ही हकीकत समजावून सांगितली, तेव्हा त्यांनी स्वत: हस्तक्षेप करून या खबर्याला सोडवले, अन्यथा बातमीचा एक मोठा सोर्स नष्ट झाला असता.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)