कधीकाळी नागपंचमी म्हणजे सापाचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा दिवस असायचा. अंगणात, मंदिराच्या भोवती किंवा गावठाणात एखादा नाग अचानक समोर यायचा. त्याच्या शांत डोक्यावर हळद-कुंकवाचं औक्षण व्हायचं आणि त्याला दूध अर्पण करत ‘नागराजा रक्षण कर’ असा मंत्रोच्चार व्हायचा. त्या दिवशी शहरही थोडं थांबायचं आणि सापासाठी थोडं थांबून नतमस्तक व्हायचं.
पण आज? आज नागपंचमी आली तरी नाग नाही आणि एकंदरीत ‘साप’च नाही!
मूर्तिरूप नागदेव आहे, पण त्याला जीव नसतो. पूजा आहे, पण पूजेचा मानकरी सजीव नाही. उरतात फक्त मातीचे प्लास्टिकचे नाग, रंगीत पोस्टर्स आणि दुकानांतल्या स्टिकर्सवरचे नागराज. ठाणे शहर जे एकेकाळी झाडाझुडपांनी समृद्ध होतं, तिथे आता सर्पांचं दर्शन दुर्मीळ झालं आहे. हे केवळ पर्यावरणशास्त्राचं संकट नाही, ही एक सांस्कृतिक पोकळी आहे – जिथे निसर्गाच्या प्रत्येक घटकाबद्दल आपुलकी होती, त्या भावनेचा मृत्यू झाला आहे.
अधिवास हरवले, साप हरवले
सर्प कुठं राहतात? जंगलात? हो बरोबर. पण फक्त तिथंच नाही. त्यांचे अधिवास म्हणजे गवताळ माळराने, ओसाड बांध, झुडपी जागा, तलावाच्या किनार्यावरील चिखलट जागा, गटारे, झाडांच्या मुळ्या… आणि ही सगळी ठिकाणं आज ठाण्यात नष्ट झाली आहेत. रोड प्रोजेक्ट, मेट्रोचे खांब, पार्किंग लॉट आणि सिमेंटचे टॉवर यांनी जैवविविधतेचे स्वप्न चिरडून टाकलंय. कधी काळी लोकांनी जिथे जिवंत सर्प नैसर्गिक अधिवासात पाहिले होते, ती ठिकाणं आज मॉलच्या बेसमेंट पार्किंगमध्ये बदलली आहेत.
सर्पमित्र निलेश सुतार सांगतात, ‘पूर्वी एका पावसाळ्यात १५० ते २०० सापांची मी मुक्तता करायचो. म्हणजे कुठेतरी साप दिसल्याची वर्दी यायची. मी जाऊन त्याला पकडून जंगलात नेऊन सोडायचो. आता ही संख्या असून नसल्यासारखी आहे. सापच राहिले नाहीत.’
हे केवळ आकडे नाहीत, ही एका प्रजातीच्या हळूहळू अदृश्य होत चाललेल्या अस्तित्वाची हाक आहे.
निसर्गाचा विस्कटलेला समतोल
साप हे अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचे दुवे आहेत. ते उंदरांवर नियंत्रण ठेवतात. उंदीर हे पीक खाणारे जीव. त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे शेतीचे नुकसान होते. साप कमी झाले की उंदीर वाढतात. उंदीर वाढले की बियाणं, अन्नधान्याचा नाश होतो.
कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार, ज्या भागात सापांची संख्या घटली आहे, तिथं उंदीर आणि बेडकांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. जमिनीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. एक साप नसेल, तर अनेक परिणाम साखळीने होतात.
नागाची पूजा, पण रक्षण नाही
नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो. हळद-कुंकू वाहतो. दूध ओततो. पण, विचार करा तो साप कुठं आहे? आज नागपंचमीच्या दिवशी शहरात साप बघायला मिळतो का? कदाचित नाही. कारण आपण त्याला जगूच दिलं नाही. ठाणेकर पर्यावरणप्रेमी संपदा टेंबे म्हणतात, ‘आपण नागाला देव मानतो, पण त्याच्या अस्तित्वासाठी काही करत नाही, ही एक विचित्र श्रद्धा आहे.’ आज नागपंचमीवर लोक पूजा करतात, पण त्या सापांचा अधिवास नष्ट करतात. सर्पमित्रांना फोन करून ‘साप मारून टाका’ असं सांगणारे लोक, दुसर्या दिवशी देवाला दूध वाहतात, ही विडंबनाची परिसीमा आहे.
एका ठिकाणी नागपंचमीला मंदिराच्या पायर्यांवर एक साप यायचा, अशी कहाणी सांगितली जाते. त्याला कोणी घाबरत नव्हतं, उलट त्याला ‘नागदेवता’ समजून पायथ्याशी फुलं ठेवायचे. आज तिथं पार्किंग आहे, आणि नाग नाही, फुलं नाहीत, ती भावना नाही. ही केवळ एक आठवण नाही ही एक हरवलेली जबाबदारी आहे. निसर्गाशी आपलं नातं संपतंय आणि आपल्याला त्याची कल्पनाच नाही.
उपाय कोणते?
सांस्कृतिक पूजा निसर्गसंवर्धनासोबत जोडलेली असते. ती केवळ रूढी न राहता कृती बनली पाहिजे. जैवविविधतेसाठी राखीव झोन तयार करायला हवेत. तलाव, डोंगर, ओसाड जागा संरक्षित ठेवायला हव्यात. सर्प मित्र संघटनांना अधिक बळ द्यायला हवे. सापांच्या सुटकेसाठी आवश्यक साधनं, निधी, प्रशिक्षण द्यायला हवे.
शाळांमध्ये सर्प संवर्धन या विषयावर जनजागृती करून मुलांना सापांची भीती बाळगू नका हे समजावून सांगितलं पाहिजे. साप मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे, पण याची फारशी अंमलबजावणी होत नाही. पारंपरिक सण आणि प्रत्यक्ष निसर्ग यांचा सेतू घातली जात नाही. नागपंचमीची पूजा ही साप वाचवण्याची प्रतिज्ञा असायला हवी.
नागपंचमीला लोक देवाला दूध अर्पण करतात. झेंडूची फुलं वाहतात. काही ठिकाणी मातीचे, प्लास्टिकचे नाग विकले जातात. पण खरा प्रश्न असा आहे ‘आपण सापांसाठी काय केलं?’ त्यांच्या जिवंत राहण्यासाठी, त्यांच्या अधिवासासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी… कारण साप नसतील, तर नागपंचमी उरेल फक्त एक सण म्हणून भावनाशून्य, निसर्गशून्य, आणि वास्तवाला विसरलेली.
भारतात आढळणारे नाग
१. चष्मेधारी नाग
प्रदेश : महाराष्ट्र, ठाणे, मुंबईसह संपूर्ण भारतात आढळतो.
वैशिष्ट्य : डोक्यावर चष्म्यासारखा फणा.
खाद्य : उंदीर, बेडूक, सरडे.
लक्षणीय गोष्ट : माणसाच्या सहवासात सहज आढळतो, पण आता दिसणे दुर्मिळ.
२. मोनोक्लेड कोब्रा
प्रदेश : बंगाल, आसाम, उत्तर-पूर्व भारत.
वैशिष्ट्य : पिवळसर पट्टे, मोठा सात फूट लांब नाग.
खाद्य : मासे, उंदीर, बेडूक.
लक्षणीय गोष्ट : शत्रूवर कधी कधी विषारी लाळ फेकतो.
३. ब्लॅक कोब्रा
प्रदेश : गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू.
वैशिष्ट्य : काळा रंग, सर्वाधिक विषारी.
खाद्य : उंदीर, सरडे, छोटे प्राणी.
लक्षणीय गोष्ट : अत्यंत घातक विष, हलक्याशा दंशानेही मृत्यू.
४. अंदमान कोब्रा
प्रदेश : गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ईशान्य भारत.
वैशिष्ट्य : १२-१८ फूट लांबीचा, फणा असला तरी नागकुळात नसलेला.
खाद्य : इतर साप, विशेषत: नागच खातो.
लक्षणीय गोष्ट : सापांमध्ये सर्वात लांब विषारी साप.
साप वाचवा!
”साप म्हणजे भीती, विष किंवा अंधश्रद्धा एवढाच अर्थ नाही. आज आपण जंगलं, डोंगर उतार, नद्या, ओढे, तळी यांचं अस्तित्वच नष्ट करत आहोत. त्याचा थेट परिणाम सर्पासारख्या प्राण्यांच्या अधिवासावर होतो. जेव्हा त्याच्या नैसर्गिक जागा नष्ट होतात, तेव्हा तो आपल्या अंगणात, घरात, शहरात दिसतो आणि मग त्याला मारण्याची भीतीमिश्रित घाई होते. हे लक्षात घ्या, साप आपल्यावर सहजपणे हल्ला करत नाही, तो आपला बचाव करतो. त्याची प्रत्येक हालचाल, फणा काढणे, फुत्कारणे ही ‘सावध रहा’ अशी निसर्गाची सूचना आहे. नागपंचमीच्या निमित्ताने आपण फक्त पूजा करून थांबू नये, तर सर्प वाचवण्याचा संकल्प करावा. कारण साप वाचला, तर निसर्ग वाचेल.’
– अनिल कुबल, ज्येष्ठ सर्प तज्ज्ञ, ठाणे
ठाणे-मुंबई परिसरात दिसणारे साप
बिन विषारी : धामण, दिवड, नानेटी, गवत्या, डूरक्या घोणस, रुकई, कवड्या, धुळ नागीण, कुकरी.
निम विषारी : हरणटोळ, मांजर्या.
विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे.