मांसाहारासाठी निष्पाप जिवांची हत्या केली जाते, म्हणून ज्यांचा जीव कळवळतो, त्यांना त्यांच्या जेवणासाठी निष्पाप भाजीपाल्याचीही हत्याच केली जात असते, त्याचा कळवळा कसा येत नाही? ती पण ‘सोयरी वनचरे’च आहेत ना?
– शरद पाटील, कोल्हापूर
दुसर्याच्या खाली वाकून बघणं खूप सोपं असतं. पण स्वत:च्या खाली वाकून बघणं कठीण असतं. हे वाचायला कसंसंच वाटेल (कळवळावाल्यांना भाषेचाही कळवळा येतो) तरीही ही म्हण आहे आणि हा निसर्गनियमसुद्धा आहे. त्यामुळे हे कळवळावाले त्याप्रमाणे वागतात बिचारे. हे कळवळावाले, दुसर्याच्या सणाला कापल्या जाणार्या बोकडाबद्दल कळवळतात, पण तुमच्या आमच्या गटारीला कितीही कोंबडे बकरे कापले तरी वळवळतात का? नाही ना. मग हे तुम्ही का विसरता? ते काही बोलले म्हणून तुम्ही त्यांना बोलणार का?
संतोषराव, पत्ते हातात आल्यावर तुम्हाला पाच तीन दोन खेळायला आवडतं का भिकार सावकार खेळायला आवडतं की रमी आवडते?
– श्रीपाद महाले, हडपसर, पुणे
का? लपून शूटिंग करून ते वायरल करायचंय का? असले ‘भिकार’ नाद ‘सावकार’ असणार्यांना असतात, किती हरलो तरी भिकार होणार नाही, याची हमी असणारेच ‘रमी’ खेळतात. इतके तल्लीन होऊन खेळतात की आजूबाजूला आपलेच ‘पाच’ लोकं असले, तरी त्यातले ‘दोन’ आपले असतात, बाकीचे ‘तीन’ आपलेच असूनही गुपचूप शूटिंग करून बाजार उठवणारे असतात, याचंही भान त्यांना राहत नाही. पण आम्हाला जे आवडतं ते लपून छपून खेळावं लागत नाही. जे असेल ते खुलेआम खेळतो. त्याचा कोणाला संशयही येत नाही आणि नेमकं हेच लपून छपून खेळणार्यांना कळत नाही…
पाठीचा कणा ताठ ठेवला तरी लाथ बसणार असेल आणि पाठीचा कणा वाकवून, झुकून सत्तेची चाटुगिरी केल्यानंतरही लाथच बसणार असेल, तर माणसाने निदान कणा ताठ ठेवण्याचं तरी समाधान मिळवावं, काय म्हणता?
– जफर मुल्ला, शिर्डी
चाटुगिरी करनेवाले भूत बातों से नहीं मानते. मग लाथ बसली तर त्याला लाथ मारणारा तरी काय करणार? अगर लाथ मारने वाला देता है ‘धन’, तो अ’कड’ काहे की? कणा ताठ ठेवून तुम्हाला समा’धान’ मिळत असेल, पण चाटूगिरी करणार्याला एवढं धन मिळतं का? त्यांनाही वाटत असेल कणा ताठ ठेवावा, ते ठेवतही असतील कणा ताठ, पण झुकणारे खांदे आणि जुळणारे हात साथ देत नसतील. जो देतो ‘धन’, ‘कड’ त्याची घ्यावीच लागते.
थिएटरबाहेर तुम्हाला पाहून बायका रडू लागल्या, तुमच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर बेशुद्ध पडू लागल्या, असं कधी झालेलं आहे की नाही तुमच्या रंगमंचावरच्या कारकीर्दीत?
– अर्चना वारंग, प्रभादेवी, मुंबई
तुम्हालाही रडायचं आणि बेशुद्ध पडायचं आहे का? पण आम्हाला बघून कशाला कोण बाई रडेल ताई? अहो, बायकांना काही चॉइस आहे की नाही? समजा बायका रडल्याच, तर फार फार तर नाट्यगृहाच्या बाहेर पडतील, पण मीडियावाल्यांचं कुत्रंसुद्धा त्यांची दखल घेणार नाही. त्यासाठी बायांना मल्टिप्लेक्सच्या बाहेर रडावं लागेल, बेशुद्ध पडावं लागेल. त्यासाठी कोणीतरी हॉलिवुडवाला बघावा लागेल. आणि पाळीव कुत्र्याप्रमाणे मीडियाने दखल घ्यावी वाटत असेल तर फॉरेनला जाऊन रडावं लागेल. पण त्यासाठी अभिनेता नाही तर महानेता बघावा लागेल… पण, कॉम्पिटिशन खूप टफ आहे हो… विशेषतः लंडनमध्ये!
आपण या अक्कल गहाण ठेवायला तयार असलेल्या गाढवांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतो का, अशा विचाराने आपली स्वर्गस्थ पितरे अस्वस्थ होत असतील का हो कधी आपल्याकडे पाहून?
– मनोहर गाडे, पालघर
उगाच नको ते प्रश्न विचारू नका… तुम्ही म्हणताय तसा विचार पितरांच्या डोक्यात आला आणि ते अस्वस्थ झाले, तर अक्कल गहाण ठेवायला एका पायावर तयार असणारे वंशज आपल्या पितरांनाही पाकिस्तानात जा म्हणतील. मग त्या पितरांसाठी तुम्हालाच पाकिस्तानात जाऊन घास ठेवावा लागेल. कारण पितरांना ‘अस्वस्थ’ करून, वंशजांची ‘आस्था’ दुखावल्यावर, ते तुम्हाला माफ करतील असं वाटतं की काय?