बाळासाहेबांनी १९६६ साली रेखाटलेलं हे मुखपृष्ठ चित्र. हे शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष. चित्राच्या खाली शिवसेनेच्या नोंदणीची बातमीही आहे मुखपृष्ठावर. त्यात २५ हजार जणांनी शिवसैनिक म्हणून नाव नोंदवलं आहे आणि नोंदणी अजून सुरू आहे, असं नमूद करण्यात आलेलं आहे. साहजिकच मराठी भूमिपुत्रांची त्यांच्याच राज्यातली अवस्था, हा बाळासाहेबांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय या मुखपृष्ठावर आलेला आहेच. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारे स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्या जीवितकाळातील भारतीय जनतेचे निर्विवाद नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे मुखपृष्ठचित्र आज या सदरात आले आहे, पण त्याचे औचित्य तेवढेच नाही. १९६६ साली मराठी माणसाची जी परिस्थिती होती, ती आजही तशीच आहे. तो आपल्याच राज्यात रस्त्याकडेला फाटक्या कपड्यांमध्ये फुटपाथवरच डाराडूर झोपला आहे डोक्यावर एक टोपलं घेऊन. त्याच्या राजधानीमध्येच त्याला किंमत नाही, त्याच्या भाषेला किंमत नाही आणि त्याच्या राज्याचे प्रमुखच उरली सुरली मराठी संस्कृती रसातळाला नेणार्या आणि मराठी माणसाला सांस्कृतिक गुलामीत ढकलणार्या मागास भाषेला पायघड्या घालत आहेत… कधीतरी लोकमान्य हताश होते, कधीतरी बाळासाहेबांनी खडबडून जागं केलं, पण मराठी माणसाला अजूनही धोका समजलेलाच नाही… तो पुन्हा घोरतो आहे शांतपणे. फुटपाथही आपल्या मालकीचा किंवा हक्काचा राहिलेला नाही, तोही विकला गेला आहे, हे त्याला कधी कळेल?