शिवसेना नेते नारायण राणे यांनी २ जुलै २००५ रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी मी शिवसैनिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे असे म्हटले. परंतु शिवसेनाप्रमुखांना राणेंचे शिवसेनाविरोधी कारस्थान लक्षात आल्यामुळे त्यांनी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली. नंतर राणे काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांना महसूलमंत्री केले गेले. त्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदारही गेले. राणेंनी गणेशोत्सवानंतर आपण शिवसेनेचे विसर्जन करू, अशा वल्गना केल्या. परंतु या वल्गना हवेतच विरल्या. शिवसेनेची मोठी पडझड होईल, शिवसेना संपली असे राणेंना वाटत होते, परंतु तसे घडले नाही. त्यांच्या जाण्याने दोन चार चिरा पडल्या, परंतु शिवसेना गड अभेद्य राहिला.
त्यावेळी राणे यांनी शिवसेनेचे २५ आमदार आपल्या बाजूने आहेत असा दावा केला, तो काही दिवसांतच फोल ठरला. प्रत्यक्षात त्यांच्याजवळ फक्त १० आमदारच होते. तेव्हा राणेंनी रडीचा डाव खेळत २५ शिवसेना आमदारांना अपात्र ठरवायचे अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे केली. राणेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेने रामदास कदम यांची शिवसेना गटनेतेपदी निवड करत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. महाराष्ट्र विधानमंडळात २००९पर्यंत नारायण राणे विरुद्ध रामदास कदम असा सामना पहावयास मिळाला. विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून कदम यांची भूमिका महाराष्ट्राच्या विधानमंडळात आणि विधान मंडळाबाहेर पहावयास मिळाली. शिवसेनेचा खरा आक्रमक चेहरा कदम यांच्या रूपाने शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळी पाहिला.
२६ जुलैचा हाहाकार!
याच वर्षात अतिवृष्टीमुळे मुंबईत कुर्ला, कालिना, सांताक्रुझ, वाकोला या भागात हाहाकार उडाला. मिठी नदीच्या आसपास उभारलेली बांधकामे आणि झोपड्या पाहता पाहता मिठी नदीच्या मिठीत सापडल्या. मिठी नदीच्या पूरस्थितीला अनधिकृत बांधकामे हे मोठे कारण असल्याचे सांगून सत्तारूढ काँग्रेस नेते जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला.
२७ जुलै हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे याचा वाढदिवस! २६ जुलै रोजी ते स्वत: दुपारी ‘शिवालया’त गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता. पाणी भरण्यास सुरूवात झाली आणि कलानगर पाण्याने भरून गेले. कसेबसे उद्धवजी माहीमपर्यंत पोहोचले आणि ‘केसरी ट्रॅव्हल्स’चे पाटील यांच्या घरी गेले. ‘मातोश्री’पर्यंत जाणे अशक्य होते. म्हणून होडीची व्यवस्था करण्यात आली. तेथेच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांना एकत्र बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांना कामाला लावले. मुंबईत ठिकठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. वह्या, सतरंज्या, पुस्तके मदत म्हणून देण्यात आली. स्वत: उद्धवजी ठाणे, कल्याण, डोंबिवली भागात गेले. तर अन्य पूरग्रस्त भागाचा त्यांनी झंझावती दौरा केला. ठिकठिकाणी शिवसेनेच्या मदतफेर्या निघाल्या. या मदतफेर्यांतून ज्या रकमा गोळा झाल्या त्यातून औषधे विकत घेण्यात आली. काही कंपन्यांनी विनामूल्य औषधे पुरविली. अशी एकूण दोन कोटी रु. किमतीची औषधे शिवसेनेने गरजू रुग्णांना वितरित केली.
गोरेगावात १०० म्हशी मरून पडल्या व पुरात वाहून त्यांची प्रेते सर्वत्र पसरली. ही प्रेते तातडीने उचलून ४८ तासांत हलविण्याचे काम शिवसेना नेते सुभाष देसाई व नगरसेवक सुनील प्रभू यांनी अहोरात्र उभे राहून महापालिकेकडून करून घेतले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर लोकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसैनिक रस्त्यावर उतरून स्वच्छता करू लागले. मुंबईकरांना पुन्हा एकदा शिवसेनेचे समाजकारण कळून आले. स्वच्छता मोहीम आणि मदत केंद्रे यांच्या माध्यमातून शिवसेनेने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. २६ व २७ जुलै २००५ हा दिवस मुंबई शहराच्या इतिहासात नोंद करून गेला, कारण असा जलप्रलय यापूर्वी कधीच झाला नव्हता.
शिवसेनेचे नेते मनोहर जोशी रायगड जिल्ह्याचे संपर्क नेते असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात मदत करण्यासाठी २७ आणि २८ तारखेला रायगडात गेले. त्यांनी पनवेल, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यांना भेटी दिल्या. त्यांच्याबरोबर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रभाकर मोरे, आमदार देवेंद्र साटम, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, विलास गोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर भोईर, सुधाकर पाटील, माजी आमदार विशाखा राऊत तसेच नगरसेविका स्नेहल जाधव आदी अनेक पदाधिकारी होते. आपल्या जिल्ह्यात त्यांनी पूरग्रस्तांना १०० पोती तांदूळ वाटला. पावसाच्या आपत्तीत सापडलेल्यांना धीर दिला आणि सरकारी यंत्रणेचा कोठेही मागमूस नसल्याबद्दल कडक टीका केली. पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेले हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले पथक असल्यामुळे संकटसमयी शिवसेना कशी पाठिशी उभी राहते याचा प्रत्यय रायगडवासियांना आला.
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्राकडून ५ हजार कोटी रुपयांची प्राथमिक मदत मिळावी अशी मागणी केली. देशात कोठेही संकट आल्यावर मुंबईकर मदतीसाठी पुढे येतात- मग गुजरातमधील भूकंप असो, अंदमान-निकोबारवरील आणि तामिळनाडू, पाँडेचेरीवर कोसळलेलं सुनामी संकट असो किंवा ओरिसातील वादळ असो, संकटाच्या वेळी मुंबई धावून जाते, मुंबईकर मदतीचा सदैव हात देतात. पण देशातल्या कोणत्याही राज्याने तेव्हा मुंबई अडचणीत आल्यावर मदतीसाठी पाऊल उचललं नाही हे दुर्दैव आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर भडकले आणि त्यांनी जाहीरपणे टीका करून प्रश्न विचारला की, मुंबईकडून दरवर्षाला ६० हजार कोटी रुपये घेता आणि संकटकाळी मात्र मदत का करीत नाही? दरम्यान, शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी ५ हजार कोटी रुपयांचा प्रश्न उपस्थित केला आणि मुंबईला मदत करण्याची विनंती केली.
याच काळात, सुशीलकुमार शिंदे यांची आंध्र प्रदेश राज्यपालपदी नियुक्ती झाल्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा पोटनिवडणूक २४ जानेवारी २००५ रोजी झाली. शिवसेनेचे उमेदवार रतिकांत पाटील यांनी काँग्रेसचे राजशेखर शिवदारे यांचा पराभव करून पोटनिवडणूक जिंकली. ५६ वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने सपाट केला. नऊ मार्च २००५ रोजी शिवसेना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेने राज्यसभेचे खासदार आणि ‘दोपहर का सामना’चे कार्यकारी संपादक संजय निरूपम यांची हकालपट्टी केल्याचे शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले.
शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. २४ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. १८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क जिमखान्यावरील पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख हेच माझे दैवत आहे, लवकरच महाराष्ट्राचा दौरा करून नवीन पक्षाची घोषणा करणार असे राज ठाकरेंनी जाहीर केले आणि नंतर नवीन पक्षही काढला.
मी खंबीर आहे!
या वर्षी शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले, परंतु शिवसेनाप्रमुख डगमगले नाहीत. तेव्हा प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख म्हणाले की, कडवट, निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणारे आणि शिवसेनाप्रमुख हेच एकमेव दैवत असल्याचे सांगणारेही सोडून जातात, याचे आता दु:ख होत नाही. या निमित्ताने माणसांच्या स्वभावाची पारख होऊ लागली. हा एक मोठा अभ्यास आहे. मी पुन्हा परिक्षेला बसलोय, असे समजा. शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत परखड शब्दांत बजावले की, मी अजून खंबीर आहे. गेल्या चाळीस वर्षात अनेक वादळं आणि संकटं अंगावर घेतली. असे पुष्कळ प्रसंग माझ्यावर आले आहेत. त्यातूनही मी उभा राहिलो. शिवसेना पुढे नेली. तेव्हा कुणाला चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी मी समर्थ आहे!
बाळासाहेबांनी एक प्रदीर्घ मुलाखत दै. ‘सामना’साठी दिली. खास करून संघटनात्मक बाबी व शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीवरच चर्चा झाली. शिवसेना सोडून गेलेले नारायण राणे व राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी ‘ठाकरी’ शैलीत भाष्य केले. अनेक कडवट शिवसैनिकांनी वेगळा मार्ग स्वीकारला त्यावर त्यांनी सांगितले, ‘यातले काही लोक आदल्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर बसले होते. दुसर्या दिवशी गेले. त्यांचे दु:ख वगैरे करीत नाही, पण माणसाच्या स्वभावाची पारख होऊ लागली. नव्याने काही गोष्टी या वयात शिकलो! कुणी सोडून गेल्याचं दुःख का करू? मी खंबीर आहे!!
संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य बाळासाहेबांनी दाखवून दिले. सध्या तोच धीरोदात्तपणा उद्धवजींमध्ये दिसत आहे.