□ ईव्हीएमवर कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच – भाजपच्याच खासदाराने केली पोलखोल.
■ त्यांनीच घोड्यावर बसवलेलं पिल्लू नाहीये ना, याची खात्री करून घ्यायला हवी. ईव्हीएमऐवजी मतपत्रिका हव्यात हा एक विषय असायला हवाच प्रचारात. पण, तेवढाच असू नये.
□ भीमा पाटस कारखान्याच्या जप्तीचे आदेश; भाजप आमदार राहुल कुल यांना दणका.
■ असं कसं झालं? वॉशिंग मशीन फेल गेलं?
□ भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे कुटुंबीयांना हायकोर्टाचा दिलासा; एसीबीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती.
■ सगळ्यात शेवटी खडसे निर्दोष शाबित होतीलही, पण तोवर झालेल्या मानहानीची, मनस्तापाची भरपाई कोण देणार?
□ महाराष्ट्रात खायचे वांदे; २१ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; वरुणराजा रुसल्याने दुष्काळाचे सावट.
■ असलं काही बोलू नका, खायचे वांधे झाले म्हणालात तर एखादा मंत्री म्हणेल, मुळात तुम्हा लोकांना इतकं खायचं तरी का असतं? दोन दिवसाआड जेवत का नाही? जेवण जीवनावश्यक असतं का?
□ मोदी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकर्यांचीही पिळवणूक; साखर निर्यातीवर बंदी आणणार!
■ सहकारी चळवळ हायजॅक झाली नाही, तर मोडीत काढली जाणार. शेतकरी संपवून शेती कॉर्पोरेट करायचीच आहे. त्यासाठीच हे उद्योग सुरू आहेत.
□ बावनकुळेंनी शरद पवारांना अक्कल शिकवण्याची गरज नाही; राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा सल्ला.
■ हे, यांचे मित्र, यांचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्यलढ्यातल्या अग्रणींपासून समकालीन ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सगळ्यांवर राळ उडवत फिरत असतात आणि यांची विचारधारा ज्येष्ठांचा आदर करा वगैरे ग्यान चोंबाळत फिरत असते गावभर.
□ ठाण्यात ट्रॅफिकचा जांगडगुत्ता.
■ फक्त ट्रॅफिकचा? तिकडे सगळाच जांगडगुत्ता होऊन बसलेला आहे.
□ मुख्यमंत्री ठाण्याचे, तरी ठाण्यातील गणेश मंडळे दादांच्या दरबारी.
■ पॉवर कुणाकडे आहे, ते लोकांना बरोबर कळतं…
□ मोदी खोटं बोलताहेत, हिंदुस्थानची जमीन चीनने बळकावलीय – राहुल गांधी यांचा घणाघात.
■ वर दक्षिण आप्रिâकेत मोदी-जिनपिंग यांच्यात सीमेवरच्या घडामोडींसंदर्भात चर्चा झाल्याचा भारताचा दावाही चीनने खोटा ठरवलेला आहे.
□ मोदी सरकारएवढा शेतकर्यांचा अपमान कोणी केला नाही – कोल्हापूर सभेत शरद पवारांचा जोरदार हल्ला.
■ पण, हे शेतकर्यांना उमजले आहे का? आपण शेतकरी म्हणून खतरे में आहोत, हे लक्षात आलेलं आहे का?
□ भाजपचा पदाधिकारी निघाला तोतया टीसी.
■ अरे, मग त्याला लगेच घ्या सेवेत. साहेब कुठून आलेत याचा काही मान ठेवा.
□ मंत्रिपद नाही; बच्चू कडू यांची जनता दलाच्या कार्यालयावर बोळवण; शिंदे-फडणवीस सरकारचा अजब कारभार.
■ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!
□ राजकारणाचा अर्थ समाजकारण, पण सध्या सुरू आहे ते सत्ताकारण – नितीन गडकरी.
■ हे हळुहळू सरसंघचालक बनण्याच्या वाटेवर आहेत काय? आपण सगळ्याचा भागच नाही अशा पद्धतीने बोलत असतात कायम. कॅगचे अहवाल वाचताय ना गडकरी साहेब?
□ कंत्राटदारांचे पैसे तीन आठवड्यांत दिले नाहीत तर मिंधे सरकारला द्यावी लागेल दहा लाखांची नुकसानभरपाई – हायकोर्टाचा इशारा.
■ त्यांच्या खिशातून कुठे द्यायची आहे? जनतेचाच पैसा आहे, लूटो जी भर के!
□ मिंध्यांच्या ठाण्यात पालिकेच्या फक्त पाच शाळांची दुरुस्ती पूर्ण; १५ कोटींचा निधी गेला कुठे?
■ जिथे नेहमी जातो तिथेच!
□ भाजपला फॅसिस्ट म्हणणे हा गुन्हा नव्हे! – उच्च न्यायालय.
■ कमळाला फूल म्हणण्यासारखंच आहे ना ते!
□ राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचे नेते – शरद पवारांच्या गुगलीने दिवसभर चर्चा
■ या गुगल्यांमुळे तात्पुरत्या गुदगुल्या होतात साहेब, पण तुमच्यावर विश्वास टाकणार्यांचा जीव टांगणीला लागतो, त्याचं काय!