आपल्या देशाने एक देश म्हणून एकत्र येऊन, एकमुखाने जल्लोष करावा अशी एक अत्यंत रोमांचकारक घटना २३ ऑगस्ट २०२३च्या संध्याकाळी घडली आणि सगळ्या देशाने ती धडधडत्या हृदयाने पाहिली. चंद्रयान-३ (या यानाचा मराठी माध्यमांमध्ये सर्रास ‘चांद्रयान’ असा उल्लेख केला गेला असला तरी त्याचे अधिकृत नाव ‘चंद्रयान’ असे आहे, ते इस्रोच्या वेबसाइटवरही पाहता येईल) मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आणि सगळ्या देशाने रोखून धरलेला श्वास सोडला. देशातल्या घराघरातून या घटनेचे थेट प्रक्षेपण पाहिले गेले आणि त्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. चंद्रयान-३च्या यशाने निव्वळ चंद्रयान-२चे अपयश धुवून निघाले नाही तर भारताचे अंतराळविज्ञान परावलंबी आहे हा डाग देखील कायमचा धुवून निघाला आहे. आजवर फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच हे जमले होते, भारत हा त्या यादीतला चौथा देश ठरला. आपण चंद्राचा फक्त अर्धाच भाग (५९ टक्के) पृथ्वीवरून पाहू शकतो आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा निम्मा भाग (४१ टक्के) पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. अमेरिका, रशिया व चीन या देशांनी आजवर फक्त चंद्राच्या विषुववृत्ताजवळच्या, पृथ्वीवरून दृश्य अशा तुलनेनेने सोप्या भागात यान उतरवले होते. पण चंद्रावरच्या संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग पृथ्वीवरून न दिसू शकणार्या दक्षिण ध्रुवाचा आहे. तिथे यान उतरवणे आजवर कोणालाच शक्य झाले नव्हते. ती कमाल करून दाखवणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे आणि ही फार मोठी गौरवास्पद कामगिरी आहे. चीन, अमेरिका, रशिया, युरोप यांच्यासारखे भव्यदिव्य काही करणे आपल्या भारताला कधी जमणार आहे का नाही, या संदेही मानसिकतेतून आता आपल्याला कायमचे बाहेर यावे लागेल, कारण त्या प्रगत देशांनाही जे आजवर जमले नाही ते भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्यकिरणे देखील पोहोचू शकत नाहीत, तिथे अब्जावधी वर्षांचा अंधार साचलेली अतिखोल विवरे आहेत. या भागात उणे २३० अंश से. तापमान आहे. चंद्राच्या इतक्या दुर्गम भागात जगातील अनेक देश मोहीम राबवत आहेत, कारण, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाळ प्रदेश असण्याने तिथे पाणी असण्याची एक दाट शक्यता शास्त्रज्ञांना वाटते आहे. या होर्याला पुष्टी देणारी माहिती चंद्रयान-१ या प्रारंभिक मोहिमेतूनच भारतीय शास्त्रज्ञांना मिळाली आहे. तिथे अंतराळयानासाठी लागणारे हायड्रोजन हे इंधन तसेच ऑक्सिजन आणि पिण्यायोग्य पाणी देखील मिळवता येण्याची दाट शक्यता आहे. अत्यंत दुर्मीळ खनिजे देखील तिथे असतील, असे शास्त्रज्ञांना ठामपणे वाटते. त्यामुळेच सर्व जगाचे लक्ष चंद्राच्या या प्रदेशावर आहे. आजच्या अवकाश मोहिमा अवकाशातील जागेवर दावेदारी करण्यापासून मुक्त असल्या (तरी आपण त्या जागेचे नामकरण करून मोकळे झालो आहोत आणि कोणा एकाने चंद्राला हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे). तरी भविष्यात जर अवकाश मोहिमा या कमी खर्चाच्या, वेगवान आणि मोठ्या झाल्या आणि चंद्रावर कायम स्वरूपाचे अवकाश केंद्र, इंधन स्थानक बनवण्यात यश आले तर चंद्रावरील विशिष्ट प्रदेशावर सर्वात आधी आल्याचा दाखला देत जो आधी पोहोचला तो त्याचा प्रदेश अशी दावेदारी सांगितली जाऊ शकते आणि सध्यातरी दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले आपण एकमेव होतो.
चंद्रयान-३ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळयान आहे. संपूर्ण मोहीम भारताने, भारतासाठी, भारतामध्ये तयार केलेली अस्सल भारतीय मोहीम तर आहेच, पण जगाला आश्चर्याने बोटे तोंडात घालावी लागतील, इतक्या कमी खर्चात ती राबवलेली आहे. चंद्रयान-३मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. या मोहिमेचा प्राथमिक उद्देश हा चंद्रयान-२ मोहिमेचा जो उद्देश होता तोच होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात विक्रम लँडर अलगद उतरवणे आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर नियंत्रितपणे चालवणे, हा उद्देश शंभर टक्के यशस्वी ठरला. आता चंद्राच्या पृष्ठभागावरून आणि चंद्राच्या कक्षेतून अनेक वैज्ञानिक निरीक्षणे केली जातील, नमुने आणि मोजमापे घेतली जातील. यातील लँडर आणि रोव्हर यांची संरचना चंद्रयान-२वरील लँडर, रोव्हर प्रमाणेच असली, तरी त्यातील सर्व त्रुटी दूर करून यान सुरक्षित उतरण्यासाठी अनेक नव्या सुधारणांसह चंद्रयान-३ अत्याधुनिक बनवले गेले. चंद्रयान-२ची मोहीम अखेरच्या क्षणी लँडर अलगद न उतरता चंद्रावर आदळल्याने अपयशी ठरली, तरी अंतिम टप्प्यापर्यंत त्यात यश मिळाले होते हे लक्षात घेऊन इतर फारसा बदल न करता फक्त लँडरच्या लँडिंगमध्ये योग्य बदल करून चार वर्षांत मोहीम फत्ते झाली. आजदेखील चंद्रयान-२चे ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत सुस्थापित असून त्याचा उपयोग हा चंद्रयान-३ मोहिमेत करून घेतला जात आहे.
चंद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली म्हणून पैसे वाया गेले, अशी ओरड करणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत अज्ञान पाजळत असतात. अंतराळ संशोधनात काहीच वाया जात नसते. अंतराळयानात जी उपकरणे असतात, त्यांना पेलोड असे म्हणतात. ही उपकरणेच महत्वपूर्ण असतात आणि बाकीचा व्याप हा त्याना चंद्रावर नेण्यासाठी असतो. हा पेलोड एकूण यानाच्या वजनाच्या जेमतेम दहा टक्के देखील नसतो. संपूर्ण संशोधन हा पेलोड जास्त कसा होईल व इतर वजनभार कसा कमी होईल या दिशेने सुरू असतो. विक्रम लँडरवर फेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट, इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सैस्मिक अॅक्टिव्हिटी, लेझर रेट्रोरिफ्लेक्टर अॅरे, रोवर अँड रेडिओ अॅनॉटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड अॅटमोस्फियर हे वर उल्लेखलेली चार पेलोड आहेत तर अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर व लेझर इन्ड्यूस्ड ब्रेकडाउन लेझर स्पेक्ट्रोस्कोप हे प्रज्ञान रोव्हरवर बसवलेले पेलोड चंद्रयान-३ मिशनचा आत्मा आहेत. यातील एक चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान तसेच उष्णतेचे मापन करेल, एक चंद्राच्या वातावरणातील वायू आणि प्लास्मा याचा अभ्यास करेल, एक चंद्रावरील भूकंप व भृपृष्ठाखालील हालचालींचा अभ्यास करेल. अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील माती व दगड यांचे परीक्षण करून त्यात मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम या मूलद्रव्यांचे अस्तित्व व प्रमाण शोधून काढेल. लेझर इन्ड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप चंद्राच्या जमिनीच्या रासायनिक आणि खनिज संयुगांबाबत माहिती मिळवेल. एकूण चौदा दिवस हे संशोधन चालेल व त्यानंतर लँडर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर विश्रांती घेतील. लँडर व रोव्हर पृथ्वीवर परत आणण्याचे तंत्रज्ञान आपण अजूनपर्यंत मिळवले नसले तरी तो दिवस फार दूर नाही.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फात पाणी असेल तर त्याचे विघटन करून अंतराळयानासाठी आवश्यक असे हायड्रोजन हे इंधन मिळवता येते का पहाणे, ही यापुढच्या संशोधनाची दिशा असेल. कोणत्याही अवकाश मोहिमेत पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाण्यासाठी सर्वाधिक इंधन खर्ची पडते, त्यामुळेच फार लांब पल्ल्याच्या अवकाश मोहिमांमध्ये इंधन साठवण्यावरील आलेली मर्यादा एक मोठा अडथळा ठरतो आहे. भविष्यात चंद्रावर इंधनाची निर्मिती झाली, तर चंद्र हा एक रिफ्युएलिंग स्टेशन म्हणजेच इंधनासाठीचे स्थानक बनू शकतो. ही एक भविष्यातील योजना झाली, पण अशा असंख्य योजनांचे भविष्य आज भारतासमोर आहे. गगनयान ही अवकाशात मानववहन करणारी पुढची मोहीम आहे. ‘आदित्य’ हे सूर्यावर स्थिर नजर ठेवणारे यान तर पुढच्याच आठवड्यात मोहिमेवर निघेल. भारतीय शास्त्रज्ञांसमोर आता हे गगन ठेंगणे ठरणार आहे.
भारत ही कामगिरी करू शकला ते विक्रम साराभाई यांच्यामुळे. ३० डिसेंबर १९७१च्या मध्यरात्री वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी विक्रम साराभाई यांचे निधन झाले. पण या ५२ वर्षांत त्यांनी अंतराळविज्ञानाचा जो पाया रचला, त्यामुळेच एकेकाळचा भुकेकंगाल देश आज चंद्राचा दक्षिण ध्रुव काबीज करणारा पहिला देश ठरला. देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की विक्रम साराभाई यांनी त्यांना पहिल्यांदा भेटायला बोलावले होते ती वेळ होती पहाटे ३.३०ची. इतक्या पहाटे कामाला सुरुवात करणारे, अहोरात्र काम करणारे हे भारावलेले शास्त्रज्ञ नसते तर आज आपण इतके स्वावलंबी झालो नसतो. होमी भाभा, सतीश धवन त्यांचे उत्तराधिकारी विक्रम साराभाई आणि त्यांचे शिष्य कलाम ही अशी शास्त्रज्ञांची परंपरा या देशाला आजवर लाभली म्हणून आजचे यश आपण पाहतो आहोत. विक्रम साराभाई यांचेच नाव लँडरला दिले आहे. ते स्वतः तसेच त्यांच्या घरचे सर्वजण महात्मा गांधीचे सच्चे अनुयायी होते. विक्रम यांचे लग्न झाले त्यावेळी त्यांची बहीण मृदुला ‘भारत छोडो’ आंदोलनातील सहभागासाठी अठरा महिने कारावास भोगत होती. साराभाई कुटुंब प्रतिष्ठित आणि श्रीमंत होते, त्यामुळेच मृदुलाला कारावासातून सोडण्यास ब्रिटिश सरकार तयार झाले. पण मृदुलाने ते स्वीकारले नाही. विक्रम साराभाई स्वतः कायम खादी वापरायचे, त्यांनी लग्नावेळी पत्नीने साधी खादीची साडी नेसावी असा आग्रह धरला होता.
चंद्रयान-३च्या यशाचे साक्षीदार म्हणून जमलेल्या तमाम महिला शास्त्रज्ञ देखील परंपरागत साडीच्या पोशाखात अलंकृत होऊन आल्या होत्या. कारण चंद्रयान-३चे चंद्रावर उतरणे हे एखाद्या उत्सवासारखेच होते. मात्र, त्यांच्या फक्त पोशाखाचीच अवास्तव चर्चा करून त्यांच्या कर्तृत्वाला अनुल्लेखित ठेवणे सर्वथा चुकीचे ठरते.
विज्ञानात अखंड बुडालेले लोक भान हरपून काम करतात. आर्किमिडीज या शास्त्रज्ञाला बाथटबमध्ये नग्नावस्थेत असताना स्वत:च्या वजनाइतके पाणी बाहेर पडल्यावर नवीन सिद्धांत सापडला. तो ते सांगण्यासाठी नग्नावस्थेत राजाकडे गेला अशी आख्यायिका आहे. शास्त्रज्ञाचे फक्त कर्तृत्व पाहायचे असते. विक्रम साराभाई रोज बारा सूर्यनमस्कार घालायचे म्हणून लगेच सूर्यनमस्कार घातल्याने त्यांची बुद्धी तल्लख झाली, असे योगशास्त्राच्या दुकानदारांनी समजू नये. आजवरची सर्व शास्त्रज्ञ मंडळी परंपरेचे पालन करणारी, देशभक्तीने भारावून काम करणारी होती, तरी ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी होते. आज अंतराळ विज्ञानात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे हे महत्वाचे आहे आणि तो टक्का वाढतोय. मात्र, चंद्रावर भारताचे यान पोहोचल्यानंतर देखील बहुसंख्य भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र अजून का आलेला नाही हे कोडेच आहे. देशासाठी सर्वोच्च अशी एक वैज्ञानिक घटना घडत असताना देशात मात्र देवभक्तीचे दलाल बनून गोरगरीबांना नादी लावणारे पाखंडी बुवा आणि बाब्ाांसारखे संधिसाधू चंद्रयान-३च्या यशासाठी यज्ञ व हवन करतात, घंटा बडवतात तेव्हा आपण चंद्रावर पोहोचून तरी काय साध्य होणार आहे, असे वाटू लागते. या बुवा आणि बाबांनी चंद्रयान-२च्या वेळी देखील हवन केले होते आणि ती मोहीम अपयशी झाल्यावर ते पाखंडी गायब झाले होते. पण शास्त्रज्ञ मात्र चंद्रयान-२ का अपयशी ठरले ते शोधण्यात गुंतले. विज्ञान आणि आध्यात्म/ज्योतिष यात एक मोठा फरक आहे तो हा की विज्ञानात अपयशाचे खापर स्वत:च्या डोक्यावर फोडून त्याकडे डोळसपणे पाहून कारणे शोधायची पूर्वअट असते तर ज्योतिष हे ग्रहांवर आणि पूर्वग्रहावर सर्व खापर फोडून अपयशातून हात झटकून मोकळे होते. ज्योतिषात एखाद्याच्या कुंडलीतील चंद्र मांडला जातो, तर विज्ञानात त्या अखंड चंद्राचीच कुंडली मांडली जाते. इस्रोच्या तमाम शास्त्रज्ञांनी आज चंद्राची कुंडली मांडली आहे आणि यापुढे त्यांनी मंगळ, शनी, गुरू यांची देखील कुंडली मांडून देशाचे भाग्य उजळण्याची त्यांची क्षमता आहे. सर्व भारतीयांना देखील विवेकवादी विज्ञान आपले आयुष्य उजळू शकते हे ओळखून बुवाबाबांचा नाद सोडून, घंटानाद, शंखनाद, थाळीनाद सोडून विज्ञानाचाच नाद करावा, शास्त्रज्ञांसमोरच नतमस्तक व्हावे, ज्ञानमंदिरी दानधर्म करावा आणि विज्ञानाचीच आरती गावी. तरच देशाच्या कुंडलीतील बरेचसे पापग्रह कायमचे निघून जातील.