चंद्र हा पृथ्वीचा सर्वात जुना जोडीदार. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीमधूनच जन्मलेला. पण, त्याला पृथ्वीचं बाळ म्हणता येणार नाही. कारण, पृथ्वीच्या जन्मानंतर लगेचच तिची मंगळ ग्रहाएवढ्या आकारमानाच्या रहस्यमय थिईआशी टक्कर झाली आणि तिच्या व्यासाच्या एक चतुर्थांश लांबीचा व्यास असलेला जो छोटा तुकडा बाहेर भिरकावला गेला, तो म्हणजे आपला चंद्र. एका अपघाताने अलग झालेला पृथ्वीचा धाकटा भाऊच म्हणावा असा तिचा एकमेव नैसर्गिक उपग्रह.
साडेचार अब्ज वर्षांपासून तो पृथ्वीची सोबत करतो आहे, तिच्याभोवती भिरभिरतो आहे. ती सूर्याभोवती फिरते, हा तिच्याभोवती फिरतो. दिवसरात्र सोबत करणारा, रात्रीच्या वेळा शीतल प्रकाशाची बरसात करणारा, कलेकलेने घटणारा, वाढणारा चांदोबा माणसाच्या जन्माच्या आधीपासून सोबतीलाही आहे आणि साक्षीलाही. या साक्षीची दखल घेण्याइतकी बुद्धिमत्ता मात्र पृथ्वीवरच्या फक्त मानवप्राण्यातच निर्माण झाली. ती बुद्धी वापरून त्याने कालगणना सुरू केली, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष हे सगळं या चंद्राच्याच आधारावर रचलं गेलं.
अग्नीचा शोध लागेपर्यंत रात्रीच्या वेळी माणसाला नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या आकाशात डौलाने विहरणारा, प्रकाश देणारा चंद्र इतका जवळचा होता की त्याला देवतेचं स्वरूप मिळालं, तो ज्योतिषापासून कथा-कवितेपर्यंत माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणार्या सगळ्या गोष्टींमध्ये हक्काची जागा पटकावून बसला. पृथ्वी ही आई, तर चंद्र हा चांदोमामा बनून बसला.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मानवाने अवकाशाचा वेध घ्यायला सुरुवात केली आणि १९६९ साली नील आर्मस्ट्राँगने मानवाचं पहिलं छोटं पाऊल चंद्रावर उमटवलं. चंद्र आता नुसता दूरचा साक्षीदार राहिला नाही, तो आता मानवाच्या झेपेच्या कक्षेत आला. या चंद्रावर भारताचा झेंडा नुकताच पोहोचला चंद्रयान-३ या मोहिमेच्या माध्यमातून. सगळ्या भारतवर्षाला अभिमान वाटावा अशी ही घटना, आपल्या शास्त्रज्ञांची फार मोठी, अभूतपूर्व कामगिरी. पण, दुर्दैवाने आज देशात एकही गोष्ट अशी नाही, जी राजकारणापासून मुक्त नाही. चंद्रयान सुरक्षितपणे उतरल्यानंतर काही द्वेषभक्तांना कोणाच्या तरी झेंड्यातला चंद्र आठवावा, ही कोतेपणाची परिसीमा. अंतराळात अजून तरी कोणत्याही देशाची मालकी कशावरही प्रस्थापित झालेली नाही. तरी चंद्रयान उतरलं त्या जागेचं परभारे नामकरण करणे, तिथे हिंदुराष्ट्र घोषित करा, अशी मागणी करणे, यातून पोरकटपणा दाखवण्यापलीकडे आपण काय करतो आहोत?
चंद्रयान मोहीम यशस्वी करण्याचं श्रेय आहे वैज्ञानिकांचं. इस्रो या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, हल्लीच्या सत्तेच्या सुरात सूर मिसळून, सगळं विज्ञान वेदांतून आलं, अशी अशास्त्रीय मांडणी करत असले तरी आपण अवकाशात सोडलेल्या यानांना चालना देणारी शक्ती आधुनिक विज्ञानाची आहे, हे नाकारता येणार नाही. भारतीय वैज्ञानिकांनी ठिकठिकाणचं तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरून, त्याला संशोधनाची जोड देऊन अतिशय स्वस्तात हे यान चंद्रावर धाडलं ही कौतुकाची गोष्ट आहे. मात्र, हा खर्च देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रसिद्धीच्या वार्षिक खर्चाच्या एक दशांश असावा किंवा उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा कॉरिडॉरसाठी बांधल्या जाणार्या रस्त्याच्या खर्चापेक्षाही कमी असावा, यातून दिसणारे चित्र काही देशासाठी भूषणावह नाही. त्यात वैज्ञानिकांच्या कामगिरीचे श्रेय ओढून घेण्यासाठी राजकीय नेतृत्त्वाने केलेली केविलवाणी धडपड पाहिल्यावर या देशातली भावी पिढी इथे वैज्ञानिक म्हणून काम करण्याचा विचार तरी करेल काय? काय प्रेरणा देतो आहोत आपण त्यांना?
या मोहिमेशी संबंधित वैज्ञानिकांना आठ महिने पगार मिळाला नाही, भारतीय वैज्ञानिकांना जगाच्या तुलनेत फारच कमी पगार मिळतो, सोयीसुविधा मिळतात, मूलभूत संशोधनापेक्षा चमको उपयोजनावर जास्त भर दिला जातो, इथे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्यातला फरक लक्षात घेतला जात नाही, अशा अनेक गोष्टींची चर्चा, दबक्या आवाजात का होईना, झाली. भारतीय वैज्ञानिकांनी स्वबळावर एवढं मोठं यश खेचून आणल्यानंतर आणि देशाला अंतराळविज्ञानात सरस कामगिरी करणार्या चार देशांच्या पंक्तीत नेऊन बसवल्यानंतर तरी या वैज्ञानिकांना घसघशीत पगारवाढ द्यायला हवी, भत्ते द्यायला हवेत, बक्षीस दिले गेले पाहिजे. राजकारण्यांनी जिथे तिथे स्वप्रसिद्धीचा सोस बाजूला ठेवून या कर्तबगार वैज्ञानिकांवर प्रसिद्धीचा झोत जाऊ द्यायला हवा.
या सगळ्याच्या जोडीला देशात वैज्ञानिक प्रगती होण्यासाठी आवश्यक आहे ते विज्ञानाला पोषक वातावरण. खरंतर तोच वैज्ञानिक प्रगतीचा प्राणवायू आहे. पण, दुर्दैवाने आपल्याकडे सध्या या प्राणवायूच्या जागी छद्मविज्ञानाचा कार्बन डाय ऑक्साइड
विज्ञानजगतात पसरवला जातो आहे. देशातील उत्तमोत्तम विज्ञानसंस्थाही या प्रदूषणाने गुदमरत आहेत. निखळ विज्ञानाचा पाठपुरावा करण्याची चंगळ आपल्या देशाला परवडणारी नाही, आपण उपयोजित विज्ञानाचेच वारकरी आहोत, आपला आर्थिक वकूब सध्या तरी तेवढाच आहे. पण, बौद्धिक वकुबाचे काय? आपण किती दिवस इथल्या तरूण मुलांनी नासामध्ये यश मिळवलं, प्रवेश मिळवला, मोठ्या मोहिमा सांभाळल्या, म्हणून टाळ्या वाजवत बसायचं. या मुलांना भारतातच ते वातावरण देण्याची जबाबदारी कोणाची आहे?
ती ज्यांची आहे ते सध्या देशाचा इतिहास बदलण्याच्या मागे आहेत. जगातल्या सगळ्या वैज्ञानिक शोधांचा शोध वेदांमध्ये लावण्यात मग्न आहेत. आधुनिक वैद्यकाला मात दिली असे कोणा व्यापारी बाबाचे दावे निव्वळ त्याच्या अंगातल्या कपड्यांच्या रंगामुळे खपून जातात, त्याला कोणी कोर्टात खेचत नाही, ते का?
तिकडे आपले वैज्ञानिक असंख्य प्रकारची गणिती समीकरणं करून, पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणार्या भागावर यान उतरवण्याचा भीमपराक्रम करत असताना ही मोहीम यशस्वी होण्यासाठी देशभर लोकांचे यज्ञयाग, हवन, ज्योतिष्यांची भाकीते वगैरे उपक्रम सुरू होते…
…तो आकाशातला चंद्र या सगळ्याचाही साक्षीदार आहे हे विसरता कामा नये!