बेपत्ता आहे! लापता है! अशा जाहिराती वाचून विजय वैद्यांना आश्चर्य वाटायचे. लहान मुलांपासून तरणीताठी माणसंसुद्धा एका रात्रीत गायब होतात कसे? बरे जातात ते जातात, काही निरोपही ठेऊन जात नाहीत. नेसत्या वस्त्रानिशी इतके दिवस राहतात कसे? अशा अनेक प्रश्नांनी वैद्यांना भेडसावून सोडले होते.
१९६६ साली विजय वैद्य टाइम्स ऑफ इंडियात जॉब डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होते. त्यावेळी बेपत्ता मुलांचे पालक फोटो आणि माहिती घेऊन जाहिरात देण्यासाठी टाइम्समध्ये यायचे. चेंबूर येथील १२ वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची जाहिरात घेऊन एक बाप वैद्यांना भेटला आणि ओक्साबोक्सी रडू लागला. दोन महिने वणवण फिरलो, पण मुलगा दिसत नाही. घरच्यांना अन्न जात नाही, रात्रीची झोपही लागत नाही; आईने तर अंथरूण पकडलेय, असं तो सांगत होता. ते ऐकून वैद्यांना गलबलून आले. त्या माणसाला घेऊन ते चेंबूरच्या घरी गेले. घरची चिंताग्रस्त मंडळी पाहिली. त्यांना धीर देत त्याच वेळी निर्णय घेतला. या मुलांचा शोध लागायलाच हवा.
वैद्यांनी बेपत्ता व्यक्ती शोध सहाय्यक समितीची स्थापना केली. त्यात पत्रकार नारायण आठवले, पंढरीनाथ सावंत, शरद वैद्य, दत्ता ताम्हाणे, शिवसेना नेत्या सुधा चुरी यांची नेमणूक केली. प्रमोद नवलकरांचे मार्गदर्शन घेतले. टिळकनगरच्या सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक वि. ग. जोशी यांची अध्यक्षपदी निवड केली आणि शोध समितीच्या कार्याला धुमधडाक्यात सुरुवात केली.
एक फेब्रुवारी १९७० रोजी दादरच्या सीकेपी सभागृहात समितीची पहिली सभा झाली. प्रमुख पाहुणे होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या तडाखेबाज भाषणांनी पोलिसांना खडबडून जाग आली. आठवड्याभरानंतर एक एक करता शेकडो बेपत्ता व्यक्ती वर्षभरात सापडल्या. अनेक घरांतून पुन्हा आनंदाचे वारे वाहू लागले. वैद्यांना स्नेहभोजनाची निमंत्रणे येऊ लागली. तेव्हा वैद्य अविवाहित होते. एका समारंभात बाळासाहेबांनी वैद्यांना जवळ बोलावून घेतले आणि कानात सांगितले, आता वेळ घालवू नकोस. चांगल्या घरातील पोरगी पळवून आण आणि सुखाचा संसार कर.
साहेबांचा आदेश शिरोधार्य मानून काही दिवसांतच वैद्य एकाचे दोन झाले. संसारात रमले तसे पत्रकारितेतही जम बसवू लागले. ‘नवाकाळ’, ‘नवशक्ती’, ‘मुंबई सकाळ’, ‘प्रभात’, ‘महासागर’, ‘मुंबई मित्र’, ‘लोक पत्र’ आदी वृत्तपत्रांतून त्यांनी पाच दशके पत्रकारिता केली. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाने २३ ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विजय वैद्य यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला आणि आचार्य अत्रे पुरस्काराने त्यांना गौरविले.