महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हे नाव आज कोणाला लक्षातही नसेल. मसकाँ या नावाने १९७७ साली अस्तित्त्वात आलेलं हे प्रकरण म्हणजे इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या, बर्याच अंशी काँग्रेसच्या अंगाशी आलेल्या साहसामुळे काँग्रेसचे जे काही टवके उडाले, त्यातला एक टवका. शंकरराव चव्हाण हे एरवी काँग्रेसचे निष्ठावंत. पण, त्यांनी ही वेगळी चूल मांडली आणि त्या पक्षात बाळासाहेब विखे पाटील, बी. जे. खताळ पाटील, असे काही काँग्रेसजन गेले. खरेतर जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडलेला मोठा गट होता रेड्डी काँग्रेसचा. त्यात यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशी मंडळी होती. जनता पक्ष, काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्या लढाईत मसकाँला काही फार मोठे स्थान नव्हते. तरी ही मंडळी एका तुटक्या होडक्यात आपली लाट येण्याची वाट पाहात आहेत, याचे व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटले होते… आज महाराष्ट्रात एक बलाढ्य पक्ष आणि दोन फुटीर गट यांच्या तिघाड्याकडे सत्ता आहे, सत्तेबरोबर मस्तवालांकडे येणारे पाशवी बळ आहे, सामदामदंडभेद वापरताना सद्सद्वविवेकच बाजूला ठेवणारी आसुरी सत्तालालसा आहे… म्हणजे मसकाँ हे होडकं असेल तर या तिघाड्याकडे आलिशान क्रूझ म्हणावं असं जहाज आहे… पण, जनतेच्या विश्वासाची, प्रेमाची, आदराची लाट… ती काही कुठे क्षितिजावर, दूरवर दिसत नाही.