माझा मानलेला परममित्र पोक्या जेव्हा त्याच्या ईडीच्या मित्राचा आदेश आल्यावर सुरतच्या पिकनिकला गेला- आणि तोही आपल्या भावी पत्नी पाकळीसोबत- तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटलं. मी त्याला फोन केला तेव्हा म्हणाला, दिल्लीवरून ईडीच्या ऑफिसात सोमय्यांना फोन आला तेव्हा त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणून मला तिथे जाण्यास सांगितलं. तिथे जाऊन काय करायचं त्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सोमय्या स्वत:च तिथे येणार होते, पण महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातल्या आणखी कोणत्या नेत्यांना ईडीच्या तोफेच्या तोंडी द्यावे याची यादी बनवण्यास त्यांना दिल्लीहून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ते आपल्या कामात व्यस्त होते. तसेच ईडीसाठी नेत्यांचे नाव पक्के झाल्यावर त्यांना ते कळवण्याची व नाव नको असेल तर सुरतला पिकनिकला येण्याची ऑफर त्यांना देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. काहीही करून सरकार पाडण्यासाठी अशा कितीही पिकनिक आपले राज्य जिथे आहे त्या राज्यात काढा असे आदेश दिल्लीतून आले होते. त्यामुळे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पिकनिकसाठी काय काय खास आकर्षण तिथे असेल याची गुप्त माहितीही मला देण्यात आली होती. त्यावरून आकर्षक निमंत्रणपत्रिका छापून त्या वितरित करण्याची जबाबदारीही माझ्यावर होती. मी त्याचा फॉर्म्युला तयार केला. खाली आपली लाडकी महाशक्ती अशी लफ्फेदार सही ठोकली. त्या निमंत्रणपत्रिका छापून आणल्या. त्याचा मजकूरच वाचून दाखवतो.
श्री महाशक्ती प्रसन्न
आमचे येथे भाजप कृपेकरून सत्ताधारी आमदार व नेत्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. सहलीचे नक्की ठिकाण अद्याप ठरलेले नाही. तरी गुजरातपासून भाजपप्रणित सर्व राज्यात किमान दोन-दोन दिवस तिचा मुक्काम असेल. सुरुवात सुरत मुक्कामापासून होईल. तो प्रवास व्हिडिओ कोच बसद्वारे करण्यात येणार आहे. पुढील सर्व राज्यांतील प्रवास हवाईमार्गे करण्यात येईल. प्रत्येक फ्लाइटमध्ये दोन जादा हवाई सुंदरी सेवेसाठी नेमण्यात आल्या आहेत. आपण आपली काळजी घेण्यासाठी पत्नी, कन्या किंवा मैत्रीण सोबत आणू शकता. प्रत्येकाची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलात करण्यात आली आहे. प्रत्येकाला काही मोठ्या रकमेची कुपन्स देण्यात येतील. ती देऊन आपण त्या हॉटेलात हवे ते मनसोक्त खाऊ पिऊ शकता. प्रत्येक हॉटेलला लागून पोहण्याचा तलाव आहे. तिथे कधीही जलविहार करू शकता. दिवसा मद्यपान करण्यास मनाई आहे. मात्र रात्री डान्स बारसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवशी सकाळी अल्पोपहार केल्यानंतर सर्व नेत्यांचे व आमदारांचे एक मेडिटेशन सेमिनार आयोजित करण्यात येईल. त्यात सर्वांवर सामुहिक संमोहनाचे म्हणजे हिप्नॉटिझमचे प्रयोग करण्यात येतील. त्यामुळे आपली आत्मशक्ती वाढते. बुद्धीची कार्यक्षमता दुप्पट होते. आत्मविश्वास वाढतो. मनात ठरवलेली योजना यशस्वी होते. हे संमोहन उत्तर प्रदेशातून मागवलेल्या खास साधू तज्ज्ञांकडून केलं जाईल. जे संमोहित होणार नाहीत त्यांना विशिष्ट प्रकारचे पेय देऊन संमोहनाचा आनंद प्राप्त करून दिला जाईल. स्वर्गसुखात असणे, दिवसा डोळ्यांसमोर रंगीबेरंगी नोटांच्या राशी दिसणे अशी स्वप्ने त्यानंतर पडू लागतील. रात्री सामूहिक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सुरतला गरबा किंवा दांडिया नृत्याला प्राधान्य असेल. तर गुवाहाटीला आसामी नृत्य शिकवून प्रत्येकाला सामूहिक नृत्यात सहभागी व्हावे लागेल. दिवसभरात मोकळ्या वेळात ज्यांना शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतील त्यांना मुभा आणि पोलीस संरक्षण देण्यात येईल. परत आल्यावर बैठकीत आमचे नव्हे, तर तुमचे नेते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. त्यात प्रामुख्याने बंड म्हणजे काय, पुराणकाळापासून आजपर्यंत भारतात झालेल्या बंडांचा इतिहास येथपासून बंडाचे परिणाम आणि दुष्परिणाम याची उपयुक्त माहिती तुमचे भाजपप्रिय थोर नेते तुम्हाला देतील. त्याशिवाय ‘तोतयाचे बंड’ हा गाजलेला चित्रपटही दाखवण्यात येईल. त्यानंतर गद्दार आणि गद्दारीचा इतिहास या विषयावरील उद्बोधक परिसंवाद जबरदस्तीने घडवून आणला जाईल. मात्र हे सारे करताना मनाची फार मोठी एकाग्रता लागते. ही एकाग्रता टेस्टही तिथे मोफत करून घेण्याची सोय आहे. त्यानंतर प्रत्येकाचे स्वतंत्र ब्रेन वॉशिंग मशीनमध्ये डोके घालून करून घेतले जाईल. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळा असतो. डोके मोठे असले म्हणजे मेंदूही मोठा असेल असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे, हे नेत्याचे वाक्य मनात कोरून ठेवा. ही प्रेक्षणीय सहल असली तरी ती विचारप्रवर्तक आहे. त्यातून राजकारणातून, समाजकारणातून नि:संकोचपणे स्वत:चा उद्धार कसा करून घेता येईल याचे धडे घेता येतील. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा असेल व त्यावर सरकार ईडीच्या वक्रदृष्टीने पाहात असेल तर घाबरू नका. महाशक्ती तुमच्या मागे आहे. या भारतभ्रमण फुकट सहलीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि स्वत:ला कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी या सहलयात्रेत आनंदाने सहभागी व्हा आणि आपले जीवन सुखी करा. महाशक्ती आपल्या पाठीशी आहे…
हे पत्रक सर्व सत्ताधारी आमदार आणि नेते यांना त्यांच्या पत्त्यावर वितरित केल्यावर मी त्यावर संपर्क क्रमांक लिहिल्यामुळे मला दूरध्वनी येऊ लागले. मी एकेकाची नावे लिहून त्याची यादी ईडी कार्यालयात पाठवली. त्याप्रमाणे त्यांनी त्या आमदार व नेत्यांना संपर्क केला आणि सुरतसाठी पहिली आरामगाडी ‘भोली सुरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे’ हे सामूहिक गाणे गात वेगात सुटली. गाडी जशी पुढे जाऊ लागली तसे काही नेत्यांच्या आणि आमदारांच्या पोटात गोळे येऊ लागले. आपण चुकीचे तर करत नाही ना या विचाराने काहींच्या मनात धडकी भरली. पण डोळ्यांसमोर सुरतची रंगीत स्वप्ने दिसत होती. पंचतारांकित हॉटेलातील ती मौजमजा तरळत होती. असा स्वर्गीय सहलीचा आनंद पुढे अनुभवायला मिळणार की नाही याबद्दल मनात शंका असल्यामुळे काय होईल ते होईल, आता मात्र मागे हटायचे नाही, असा निर्धार सर्वांनी केला. आपण सुरतचे नाव यापूर्वी ऐकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, एवढेच आपल्याला माहीत होते, पण तिची खुबसुरती प्रत्यक्ष अनुभवायला मिळत असेल तर का सोडा, असा विचार मनात येताच ‘चलो सुरत’चा एकच नारा घुमला!